डॉक्टर, पाळी पुढे घालवण्यासाठी गोळ्या हव्या आहेत.

Submitted by नादिशा on 21 August, 2020 - 03:40

श्रावण महिना म्हणजे चैतन्याचा महिना ! एकामागून एक येणारे सण, व्रतवैकल्ये यांची अगदी रेलचेल असते या महिन्यात.सगळे वातावरण उत्साहाने आणि धार्मिकतेने भारलेले असते.
नारळीपौर्णिमा झाली, श्रावणी सोमवार झाले, गोकुळाष्टमी झाली, आता सर्वांना वेध लागले आहेत, ते गौरीगणपतीचे ! घरोघरी सजावट,आरास वगैरे गोष्टींच्या चर्चा चालू असतील.
माझ्या नजरेसमोर मात्र अजून एक गोष्ट असते, अशा सण - उत्सवांच्या काळामध्ये. ती म्हणजे, पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळ्या मागायला येणाऱ्या पेशंटची दवाखान्यात वाढलेली गर्दी !
याविषयी इतर काही बोलण्यापूर्वी या गोळ्या नेमक्या कसल्या असतात आणि त्यांनी नेमके काय होते, हे आपण समजून घेऊया !
या सर्व गोळ्यांचा घटक असतो -नॉरएथिस्टरॉन .हे एक कृत्रिम प्रकारचे प्रोजेस्टेरॉन आहे.
स्त्री शरीरात 2 प्रकारची संप्रेरके (हार्मोन्स )असतात -इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. नेहमीच्या ऋतुचक्रामध्ये जेव्हा पाळी येते, तेव्हा इस्ट्रोजेन पातळी वाढलेली असते. तर प्रोजेस्टेरॉन ची पातळी कमी होते, त्यामुळे गर्भधारणा झाली तर त्या गर्भाचे पोषण करण्यासाठी, गर्भाची गर्भाशयामध्ये व्यवस्थित वाढ व्हावी, या हेतूने गर्भाशयामध्ये तयार झालेले अस्तर बाहेर पडायला लागते. म्हणून पाळी येते.
जेव्हा आपण पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतो, तेव्हा आपण शरीरातील प्रोजेस्टेरॉन ची पातळी वाढवतो, त्यामुळे गर्भाशयातील भिंतींना उलट अस्तर तयार होते किंवा अगोदरच तयार असणारे अस्तर अजून वाढते. त्यामुळे पाळी थांबवली जाते, अडवली जाते.
गोळ्यांचे दुष्परिणाम -
1)प्रोजेस्टेरॉन चे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवले जात असल्याने, गर्भाशयातील अस्तर जास्त बनले जाते, त्यामुळे ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी साहजिकच जास्त रक्तस्त्राव होतो.
2)पाळीच्या रक्तस्रावामध्ये गाठी पडण्याची शक्यता वाढते.
3)जास्त दिवस रक्तस्त्राव होत राहणे .
4)स्तनांमध्ये जडपणा, दुखरेपणाची जाणीव, ठणका.
5)मळमळणे, उलटी होणे.
6)डोकेदुखी.
7)चक्कर येणे.
8)पोटात दुखणे.
9)काही स्त्रियांमध्ये केसगळती.
10)स्त्री शरीराची कार्यें सुरळीतपणे चालू राहण्यासाठी संप्रेरके, त्यांचे योग्य प्रमाण, त्यांचे संतुलित कार्य आवश्यक असते. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांमुळे आपण त्या संप्रेरकांचा समतोल बिघडवतो. त्यामुळे चिडचिड , सतत बदलणारे मूड्स (मूड स्विंग्स ), हळवेपणा ह्या गोष्टी अनुभवास येतात.
जास्त वेळा या गोळ्या घेण्यात आल्या, तर पाळीतील अनियमितता-तारखेच्या आधी किंवा तारीख उलटून गेल्यावर खूप दिवसांनी पाळी येणे , पाळी येऊन गेल्यावर सुद्धा अचानक मध्येच थोडा रक्तस्त्राव(स्पॉटिंग ), अशक्तपणा, रक्तस्रावातील अनियमितता -कधी जास्त, कधी एकदम थोडा रक्तस्त्राव असा त्रास संभवतो.

वरील सर्व गोष्टींमुळेच दरवेळी एखादा सण दृष्टीक्षेपात आला, कि मला चिंता सतावू लागते. माझा दवाखान्यातील पेशंटची गर्दी वाढते त्या काळात, हे जरी खरे असले, तरी माझ्या मनाला मात्र ती वाढलेली गर्दी टोचत असते . पण मासिक पाळीचा अपवित्रतेशी जोडलेला संबंध अर्धशिक्षित स्त्रियांबरोबरच शिक्षित, उच्चशिक्षित स्त्रिया आणि त्यांचे परिवार सुद्धा पुसू इच्छित नाहीत, हेच चित्र बहुतांश वेळा पाहायला मिळते. त्यामुळे नाईलाजाने मी मागतील त्या पेशंटना, मागतील तेवढ्या गोळ्या देते, पण माझा वेळ घालवून, मनापासून, अगदी पोट तिडकीने गोळ्यांचे दुष्परिणाम सांगून गोळ्या शक्यतो न घेण्याबद्दल, निदान कमीत कमी घेण्याबद्दल विनविते.निदान जे सण काही दिवसांनी पार पाडले तर चालतात, (उदा. संक्रांतीचे हळदीकुंकू-संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत चालते, रक्षाबंधन नारळीपौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चालते. ) त्यांसाठी तरी गोळ्या घेऊ नका, असे समजावून सांगते.
अगदी खुराक असल्यासारख्या सतत या ना त्या कारणाने अशा गोळ्या खात राहणारे पेशंट माझ्याकडे आहेत. माझ्या सांगण्याचा काहीही परिणाम होत नाही त्यांच्यावर. पण त्यांतील कुणाची ढासळलेली तब्येत, तर कुणाचे वाढलेले वजन पाहून चुकचुकण्याशिवाय माझ्या हातात काहीच नसते.
निदान ज्यांच्या घरात दुसरी कुणीतरी स्त्री आहे, मग ती तिची मुलगी असो, किंवा आई, सासूबाई.. त्यांनी तरी गोळ्या खाऊ नयेत. कारण तुम्हाला पाळी आली, तरी ती घरातली दुसरी स्त्री स्वयंपाक, पूजा करू शकतेच कि, असे मी सुचवते. पण बहुतांश वेळा त्याचा काहीही उपयोग होत नाही. "अहो, ती पोरगी आहे, तिला कसे जमणार एवढे सगळे?" ;"आमच्या सासूबाई खूप चिडचिड करतात अहो अशी सणासुदीला बाहेरची झाले की !ती चिडचिड, आदळआपट ऐकण्यापेक्षा आपणच गोळ्या खाल्लेले चांगले, होऊ देत काही व्हायचे ते माझ्या तब्येतीचे !";"आमचा देव /देवी खूप कडक आहे म्याडम, त्याला नाही चालत असलं काही !"अशी उत्तरे ऐकावी लागतात.
काहीवेळा तर घरातले पुरुष च गोळ्या न्यायला येतात. "अहो, तोंडावर सण आलाय आणि आमच्या बायकोचा नंबर आलाय.च्यायला, आता कोण करणार सगळं? एवढ्या एवढ्या दिवसांच्या गोळ्या द्या हो, "असे वैतागाने सांगतात. मी चुपचाप त्यांना गोळ्या देते .
अगदी अपवादात्मक म्हणता येतील, असे 2 सुखद अनुभव माझ्या गाठीशी आहेत. कारखान्यात कामगार असणारे माझे एक पेशंट बिल्कुल आपल्या पत्नीला गोळ्या घेऊ देत नाहीत.पत्नीला तर त्यांनी समजावून सांगितलेच आहे, पण अचानक सणांच्या वेळी जर तिला पाळी आली, तर ते स्वतः सगळा स्वयंपाक, पूजा पार पाडतात.
तर दुसरे माझे पेशंट वयस्कर मध्यमवयीन आहेत. फारसे शिकलेले नसूनही या गोळ्यांचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आल्यापासून त्यांनी त्यांच्या घरातील कोणाही स्त्रीला या गोळ्या घेऊन दिल्या नाहीयेत.मग घरात कितीही महत्वाचा कार्यक्रम, कितीही मोठा सण असू देत. पाळी येणे, ही नैसर्गिक गोष्ट आहे.उलट खरेतर सर्वात पवित्र गोष्ट आहे. जर ती नसती, तर वंशसातत्य चालू राहिले असते का, असा त्यांचा रास्त प्रश्न असतो . त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व स्त्रिया पूजाअर्चा, सणवार, रीतिरिवाज सर्व काही पाळी चालू असतानाही निःशंकपणे पार पाडतात , अगदी कोणत्याही संकोचाशिवाय !
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, कुणाच्याही श्रद्धेला धक्का पोचवण्याचा मुळीच हेतू नाही या लेखाचा. परिवर्तन हे हळूहळू आणि स्वतः च्या मताने -विचारांनी व्हावे लागते, त्यामुळे लगेच हा लेख वाचून उद्यापासून गोळ्या घ्यायचे बंद करा, असेही अजिबात म्हणणे नाही माझे. फक्त इथून पुढे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताना डोळसपणे, अगदी विचारपूर्वक घ्या, एवढाच प्रेमळ सल्ला !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख पूर्वी फेसबुकवर वाचल्या सारखा वाटतो.तिथेही याच नावाने आहे का?
लेखातल्या कंटेंट बद्दल
मला एकदम पटतं.(आणि तरीही याच कारणासाठी माझ्या लग्नात मी गोळ्या घेतल्या होत्या.कोणाचेही प्रेशर,कोणाचीही सुचवणी नसताना.मनाने आताची मी असते तर नसत्या घेतल्या गोळ्या.)

बाप रे! लोक खरेच अशा करणांकरता पाळी लांबवायला औषध मागतात हे वाचून आश्चर्य वाटले.
चांगले लिहिले आहे.

शाळेत असताना माझ्या एका मैत्रीणीचे एकत्र कुटुंब होते. सगळे सण समारंभ साजरे केले जायचे, प्रत्येक वेळेस कुणीतरी तीची आई ,काकू, आत्या ह्या गोळ्या घ्यायच्या.
आता पण काही कार्यक्रम असला की मैत्रीण, तीची बहिण,वहिनी घेतात.

अजून एक महत्वाचा मुद्दा! या गोळ्या घेणे सुरू होते ते वय!
जेव्हा तेरा चौदा वर्षाची मुलगी वयात येते आणि तिच्या पोटात दुखू लागते तेव्हा शाळेत कटकट नको म्हणून आधी आईच तिला डाॅ. कडे घेऊन जाते. बर्याच मुलींची याचवेळी स्त्रीरोगतज्ञांशी सर्वप्रथम गाठ पडते. मग त्यांनी दिलेल्या पेनकिलर पुढच्यावेळेपासून थेट मेडिकलमधून स्वतःच्या मनाने घेतल्या जातात. ईतर काही उपाय जसे आहारविहारात बदल, डाॅ. चा सल्ला इ.कडे सरळ दुर्लक्ष केले जाते.
यापुढे जाऊन मग जेव्हा मुलगी दहावीबारावीला जाते, तेव्हा मग अभ्यास, परिक्षा इ. कारणाने या पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आई स्वतःच मुलीला आणून देते किंवा घ्यायला सांगते.
इथूनच खूप कमी वयातच या गोळ्या घ्यायची सवय मुलींना लागते.

>>>> पण मासिक पाळीचा अपवित्रतेशी जोडलेला संबंध अर्धशिक्षित स्त्रियांबरोबरच शिक्षित, उच्चशिक्षित स्त्रिया आणि त्यांचे परिवार सुद्धा पुसू इच्छित नाहीत, हेच चित्र बहुतांश वेळा पाहायला मिळते. <<<
+१००००००

इतका मुर्खपणा, अगदी स्वतः डॉक्टर असलेली मैत्रीण पण करायची कारण घरी, सनातनी आजी व तिचे सोवळे.

आम्ही सुदैवीच म्हणायच्या. कधीही गोळ्या घेतल्या नाहीत, न कुणाला घेताना पाहिले.. असे घेतात ऐकलय फक्त..
पाळी खर तर कुळाचाराच्या आड सुध्दा यायला नको. वरिष्ठांना चालत नसेल तर, स्वतः करावे, नाहीतर नंतर करायची परवानगी द्यावी.. असो.. हेमावैम.

उत्तम लेख आणि विषय.

हो असे पाळी पुढे ढकलणे खरेच घातक आहे. आमच्याकडेही हे प्रकार पाहिले आहेत. कधी गोळी घेताना तर कधी दूर बसलेले पाहिले आहे.

पण जर तुम्ही देवासमोर मांसाहार नको यावर श्रद्धा ठेवत असाल तर मग मासिक पाळीने विटाळ होतो या श्रद्धेलाही मुर्खपणा बोलू शकत नाही. दोन्ही गोष्टी इक्वली लॉजिकल वा ईनलॉजिकल आहेत.

त्यामुळे लोकांच्या श्रद्धा बदलायच्या भानगडीत न पडता वा भावना न दुखावता त्यांना याचे दुष्परीणाम समजवायला हवेत. एका पिढीत घडणारा बदल नाही हा..

हे इतके दुष्परिणाम असणारी गोळी बनवतातच का म्हणे?
कोणत्याही (अधार्मिक / वैद्यकीय) कारणांसाठी ही गोळी घ्यायची असेल तरी दुष्परिणामांचे इतके धोके पत्करूनच घ्यावी लागणार का म्हणजे.
क्षणभर श्रद्धा -अश्रद्धा , डिमांड-सप्लाय वगैरे बाजूला ठेवून वेगळा विचार करावा; परिवर्तन (अजून) कुठे (कुठे) आणायला हवेय?

चांगल्या विषयावरचा लेख!

हे इतके दुष्परिणाम असणारी गोळी बनवतातच का म्हणे?>>

बहुतेक गर्भनिरोधन करण्यासाठी असलेली गोळीच या कारणासाठी वापरली जाते (असा माझा तरी समज आहे) पण गर्भनिरोधक म्हणून वापरताना त्या नियमितपणे दर महिन्यात अमुक अमुक दिवस घेतात त्यामुळे त्या गोळ्यांचे असे उलटेसुलटे परिणाम होत नसतील.

डॉ शंतनू अभ्यंकरांचा या विषयावरचा लेख पूर्वी अंतर्नाद मासिकात वाचला होता.

अवांतर -
लेखाचं शीर्षक आणि अनोळखी आयडी बघून मी आधी दचकले. मला वाटलं की खरंच गोळ्या हव्या आहेत म्हणून सल्ला मागायला धागा काढलाय की काय! Lol

@धागालेखिका, Light 1 घ्या. म्हणजे रागावू नका.

पहिल्या मंगळागौरी साठी अशा गोळ्या घेतल्याने माझ्या एका मैत्रिणीचा गर्भ पडला.
तोवर प्रेग्नंसी लक्षातही आली नव्हती.

म्हणून सल्ला मागायला धागा काढलाय की काय! >>+१ Lol

बायकांना असे करताना पाहिले आहे. आपण स्वतःहून आपल्या ऋतुचक्रात बदल/फेरफार करणे मला आधीपासून चुकीचे वाटते.

>>>>पहिल्या मंगळागौरी साठी अशा गोळ्या घेतल्याने माझ्या एका मैत्रिणीचा गर्भ पडला.
तोवर प्रेग्नंसी लक्षातही आली नव्हती.>>>> आई ग्ग!! Sad ट्रॅजेडी.

हे इतके दुष्परिणाम असणारी गोळी बनवतातच का म्हणे? >>
असे अनेक शोध योगायोगाने लागले असतात.
कुठल्या एका रोगा/लक्षणासाठी बनवलेल्या औषधाने हे सुद्धा होते (कधी सुपरिणाम तर कधी दुष्परिणाम म्हणुन) असे दिसून येते. अशी काही औषधें आहेत जी वेगळ्या कारणासाठी घेतली जातात आणि त्याचा एक परिमाण म्हणजे पाळी तात्पुरती थांबते. त्या रोगासाठी सध्या ईतर परिणामकारक औषध उपलब्ध असल्याने हे औषध वापरात असते.

तुम्ही खरंच छान लिहीले आहे, कळकळ जाणवतेयं.

Submitted by भरत. on 21 August, 2020 - 18:10>> Sad भयंकर आहे हे.
जागरूकता गरजेची आहे या विषयी !! नैसर्गिक चक्राचा
धार्मिक शुचितेशी संबध लावणे ताबडतोब बंद केले पाहिजे.
पाळी नियमित करण्याच्या पण गर्भनिरोधक नसलेल्या गोळ्या आहेत त्यासोबत लोह वगैरे सुद्धा देतात. पण काही गंभीर वैद्यकीय कारण नसेल तर ढवळाढवळ न केलेली चांगली.

मला वाटलं की खरंच गोळ्या हव्या आहेत म्हणून सल्ला मागायला धागा काढलाय की काय! >>>>>> धाग्याच्या शीर्षकावरून मलाही तसेच वाटले.
अनघा म्हणाली तसे अशा गोळ्या घेणे कधी पाहिलेच नाही किंवा घेतल्याही नाहीत.माहेरी गणपती असायचा.अशावेळी पली आली की माझा भाऊ विनाकारण वैतागायचा.पण आरतीच्या वेळी भावाबरोबर मीही उभी असायचे.भाऊच आग्रह धरायचा.
नादिशा,तुमच्या कामगार रुग्णाचे कौतुक वाटले.खरे तर सर्दी,मलामुत्रसारखाच हा नैसर्गिक स्त्राव आहे.

माझ्या सासरी माझी नणंद सर्रास अश्या गोळ्या घ्यायची.. म्हणजे दर २ महिन्यांनी काहींना काही कारण निघायचं. माझ्यावर पण तीच सक्ती झाली.. पण मी दाद दिली नाही..मी नात्यापेक्षा माझ्या शरीराला जास्त इम्पॉर्टन्स दिला..

माझ्या लग्नानंतर २ वर्षांनी नणंदेला गर्भाशयाचा कॅन्सर झाला. पूर्ण सिस्टिमच काढून टाकावी लागली..कारण ह्या गोळ्या हेच होते..

पूर्वीच्या बायका पाळी आली की निमूटपणे बाहेर बसायच्या. त्यानिमित्ताने शरीराला थोडी विश्रांती मिळायची.

या गोळ्या म्हणजे वैज्ञानिक संशोधनाचा अंधश्रद्धेला खतपाणी घालायला उपयोग झाला असेच आहे. दिव्यानेच अंधार केला थोडक्यात Sad

>>गर्भनिरोधन करण्यासाठी असलेली गोळीच या कारणासाठी वापरली जाते (असा माझा तरी समज आहे) >> माझा ही हाच समज होता. पिरिएड पुढे ढकलायला डॉक्टरकडे परत प्रिस्क्रिप्शनला कशाला जायला हवं? गर्भनिरोधक पिल्स मधल्या अ‍ॅक्टिव्ह हार्मोन असलेल्या पिल्स कंटिन्यू केला की होईल असं वाटलं.
कोणी डॉक्टर असतील तर सांगतीलच.

गर्भनिरोधन करण्यासाठी असलेली गोळीच या कारणासाठी वापरली जाते
>>>>
या गोळ्यांचे नसतात का काही साईडईफेक्ट?
कि पुरुषाने गर्भनिरोधक वापरायला लागू नये म्हणून त्याऐवजी हे प्रीफर करतात.

पूर्वीच्या बायका पाळी आली की निमूटपणे बाहेर बसायच्या. त्यानिमित्ताने शरीराला थोडी विश्रांती मिळायची.>> होना.
माझ्या बहिणीच्या सासरी गावाकडे अजुनही हे सगळे पाळतात. पण बायकांवाचून काही अडू नये म्हणून घरातल्या सगळ्या पुरुषांना संपुर्ण स्वयंपाक येतो.

माझ्या ओळखीचे गोळ्या घेणार्यांना ही काही ना काही हेल्द ईश्युज क्रिएट झालेले पाहिलेत. अनियमित पाळी, कन्सिव व्हायला प्रॉब्लेम, प्रेग्नन्सी मधे कॉम्पलीकेशन्स.
पण मग जे ह्या गोळया नियमित घेतात त्यांना खरच कल्पना नसते का ह्याच्या लॉंग टर्म साईड ईफेक्ट्सची?
लकीली माझ्या माहेरी, सासरी दोन्हीकडे पाळीचा बाऊ करत नाही.सो कधीच अशा गोळ्या घ्यायची वेळ नाही आली.

गोळ्यांनी आयर्न कमी होणे, केस गळणे, फॅट टिश्यू जाड होणे(म्हणजे कमी करायला जास्त कष्ट) असे इश्यूज येऊ शकतात.यासाठी आता आयर्नयुक्त गोळ्या देतात.शिवाय वेट गेन गोळीने होतोच असे 100%पुरावे नाहीत.

‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए:’
-----स्वामी चक्रधर, लीळाचरित्र(साधारण सात आठशे वर्षांपूर्वी)

Pages