Gone With The Wind जेव्हा गारूड करतं...

Submitted by ललिता-प्रीति on 16 August, 2020 - 03:17

आठवतंय तेव्हापासून या पुस्तकाचं वर्णन ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’ असंच वाचण्यात आलं होतं. प्रेमकथा म्हटलं की आपल्या डोक्यात काही basic ठोकताळे तयार असतात. पुस्तकाची पहिली १००-१२५ पानं वाचून झाली तरी त्यातलं फारसं काही कथानकात येत नव्हतं. त्याचंही इतकं काही नाही, पण (narration ला एक छान लय असूनही) त्या शंभर-एक पानांमध्ये हळूहळू कंटाळाही यायला लागला. ५००+ पानांचं पुस्तक कसं काय पूर्ण करणार, असा प्रश्न पडायला लागला. (Kindle वर ५००+ पानांची आवृत्ती मिळाली होती.)

पुस्तक विकत घ्यावं की नाही, वाचलं जाईल की नाही, अशा शंकेनं आधी काही वाचक मित्रमंडळींना पिडलं होतं. त्यातल्या बर्‍याच जणांनी वाचायला सुरुवात करून कंटाळा आल्याने मध्येच सोडून दिलं होतं, ते आठवलं. मग काही काळ पुढे रेटू म्हणून वाचत राहिले, आणि... कधी पुस्तकाने माझा ताबा घेतला हे कळलंच नाही!

सुरुवातीला कंटाळा आला, पण आता जरा बरं सुरू आहे... आता फारच इंटरेस्टिंग होत चाललं आहे... व्यक्तिचित्रणं करण्याची पद्धत कमाल आहे... वाचणार्‍याला आपल्यासोबत ओढून नेणारं आहे... दिवसेंदिवस unputdownable होत चाललं आहे... झपाटून, हेलपाटून टाकणारं आहे... अशा एक एक पायर्‍या चढत मी वाचत गेले.
आणि शेवटी मेलनीच्या आजारपणानं सुरू झालेला प्रदीर्घ प्रसंग वाचत वाचत पुस्तकाच्या शेवटाला आले तेव्हा तर मला स्पष्टपणे जाणवलं, की मनावर एक गारूड तयार झालेलं होतं, एक अंमल चढला होता...
त्याचं मर्म पुस्तकाच्या पानापानावरच्या detailing मध्ये होतं; तरीही घेतलेल्या अनपेक्षित jumps मध्ये होतं... त्या jumps मुळे वाचकांचा अजिबात विरस न होण्यात होतं; historic fiction मध्ये इतिहास किती आणावा याच्या घालून दिलेल्या परिपाठात होतं; प्रेमकथेला किती तर्‍हेचे कोन असू शकतात याच्या दाखवून दिलेल्या शक्यतांमध्ये होतं; प्रेमाची कबुली देण्याचा प्रसंग किती जगावेगळा असू शकतो या जाणीवेत होतं... ’माणसं अशी वागतातच का?’ या प्रश्नांच्या अनेको उत्तरांमध्ये होतं.

हो, ही ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्‍हेट बटलरची प्रेमकथा’च आहे, पण तेवढ्या ६(च) शब्दांत पुस्तकाचं वर्णन करणे हा अन्याय आहे.
ही जगण्याच्या वावटळीत टिकून राहण्यासाठी केलेल्या अथक धडपडीची, धीरोदात्तपणाची कथा आहे; आता सगळं संपलं, अशी परिस्थिती समोर ठाकते तेव्हाही शरण न जाता जमेल तसे हातपाय मारण्याची आहे; प्रेमामुळे या धडपडीसाठी मोठी ताकद मिळू शकते याकडे झालेल्या दुर्लक्षाची आहे.

काही पुस्तकं चाळीशीच्या अनुभवांचं गाठोडं हाताशी आल्यावरच वाचावीत असं मला ’The God Of Small Things’ वाचल्यावर जाणवलं होतं. Gone With The Wind नं त्यावर शिक्कामोर्तब केलं.

Timeless Classics म्हणजे नेमकं काय हे या पुस्तकामुळे लख्खपणे समजलं.

----------

पुस्तकात गुलामगिरीची पाठराखण केली गेली आहे असा या पुस्तकावर आरोप होतो. (जॉर्ज फ्लॉइड प्रकरणानंतर नेटफ्लिक्सवरून हा सिनेमा हटवण्यात आला, असंही वाचलं.) पण लेखिका एक southerner होती, कथानकही southerners च्या दृष्टीकोनातून लिहिलं गेलं आहे, हे एकदा लक्षात घेतलं, तर मग ती बाब खूप खटकत नाही.
उलट त्या संदर्भात आणखी एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. पुस्तकातल्या गुलाम पात्रांचे संवाद ते ज्या उच्चारांची इंग्रजी बोलतात तशा पद्धतीनंच लिहिलेले आहेत. (I - Ah, going - gwine) ते वाचायला सुरुवातीला जरा अडचणीचं वाटतं. पण नंतर मजा यायला लागते. ती पात्रं खरंच आपल्यासमोर उभी राहून बोलत असल्याचा भास होतो.

----------

Gone With The Wind हा सिनेमा मी पाहिलेला नाही. YouTube वर त्यातल्या बर्‍याच महत्वाच्या प्रसंगांच्या clips आहेत. पुस्तकातला तो-तो प्रसंग वाचून झाला की मी त्या-त्या clips पाहत होते. आणि (संपूर्ण सिनेमा पाहिल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे चुकीचं आहे हे मान्य करून म्हणेन, की) पुस्तकात फार सुंदर/भेदक/परिणामकारक रीतीने समोर येणारे प्रसंग त्या clips मध्ये ५० टक्केही वठलेले वाटले नाहीत... अर्थात माध्यमांतर हा वेगळा विषय झाला.

पण मुद्दा आहे गारूड! पुस्तक पूर्ण करायला दोन महिने लागले, पण ते झालं. पुस्तक पूर्ण करून एक आठवडा होऊन गेला, तरी ते अजून तसंच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाडजुड पुस्तक वाचणे कसोटीच असते. प्रत्येक पानावरची चारपाच वाक्ये वाचून पुढे गेलं तरी कथानक कळतं. लेखकाची शैली कळते.

याच पुस्तकाचा अनुवाद अपर्णा वेलणकरांनी केलाय. मी तो वाचलाय. मूळ पुस्तक वाचलेलं नाही .

स्कारलेट ओ हारा आणि र्हेट बटलरची प्रेमकथा न राहता ती जगण्यासाठी झालेली धडपड , त्या नादात मानवी स्वभावातील बदल , गुलामगिरी या , मानवी स्वभावाचे विविध कंगोरे याच यथार्थ चित्रण ह्या कादंबरीत आलेलं आहे.

कादंबरीचा पॉझिटिव्ह शेवट मला आवडला. After all , tomorrow is another day Happy

रच्याकने , गॉन विथ द विंड या चित्रपटात मेलनीची भूमिका साकारण्याऱ्या अभिनेत्रीच अलीकडेच निधन झालं . Olivia de Havilland हे तिचं नाव .

छान वर्णन केले आहे पुस्तकाचे. हे पुस्तक मी ओरिजिनल नाही वाचले पण साधारण सहा एक वर्षांपूर्वी ह्याचा मराठी अनुवादित पुस्तक वाचले होते. मला आठवतंय अवघ्या चार दिवसांत पूर्ण पुस्तक वाचून झाले होते माझे. सुरवात कंटाळवाणी आहे खरी पण एकदा पकड घेतली की पूर्ण झाल्याशिवाय रहावत नाही.
चाळीशीच्या आसपास लोकांना हे पुस्तक जास्त आवडेल असे काही नाही त्यापेक्षा लहानांना देखील आवडेल असे मला माझ्या स्वानुभवातून वाटते.

गॉन विथ द विंड सुरुवातीला धीमे आहे. पण मग स्कार्लेट अटलांटाला येते व मग कथा वेग घेते. स्कार्लेट चे व्यक्तीचित्र 'लार्जर दॅन लाईफ' आहे. इतकी धाडसी, धीराची, हिंमतवान स्त्री. मेलनीचे बाळंतपण ती करते ती भर उन्हाळी दुपार आपल्यालाही घाम फोडते. अक्षरक्षः आपण ही सर्व सुरळीत पार पडल्यानंतर 'हुश्श' करतो. लाडाकोडात वाढलेल्या आणि किंचीत अल्लडच स्कार्लेटवरती पुढे जे जे काही ओढावतं ते नाट्यमय आहे.
दर वेळेला मी वाचते व अर्धे वाचून ठेवते. पण सिनेमा मी अनेकदा पाहीला आहे.

मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि काही पानांनंतर कंटाळून बाजूला ठेवलं. पहिल्यांदा फार बोजड वाटलं होतं. काही वर्षांनी परत नेटाने सुरूवातीची पाने वाचली आणि मग मात्र त्याचा फडशाच पाडला. अतिशय जिवंत चित्रण आहे यात.

त्या मानाने चित्रपट फिका वाटतो..

गॉन विथ द विंड पुस्तक असेच कुठेतरी दिसले आणि विकत घेतले गेले. पण हे 3 इंच जाड पुस्तक वाचणे शक्य आहे का या विचाराने कादंबरी बरेच दिवस पडून राहिली. नंतर वाचायला घेतली तेव्हा मात्र कित्येक रात्री जागून संपवली. एकदा सुरवात केली की ही गारुड करतेच..

पण -हेट स्कारलेट प्रेमकहाणीपेक्षाही मला ही स्कारलेट टेरा प्रेमकहाणी वाटली. आपली वडिलोपार्जित जमीन टिकावी म्हणून ती कुठल्याही थराला जाते. पैसेवाला असल्यामुळे जमिनीचा कर भरेल ह्या विचारातून बहिणीच्या नियोजित वराला फसवून त्याच्याशी लग्न करण्यात तिला काहीही गैर वाटत नाही. जमिनिपुढे तिला सगळे तुच्छ!.

-हेट आयुष्यात परतल्यावर त्याच्याशी लग्न करते पण ऍशलेवर जीव टाकत राहते. एक क्षण असा येतो की तिला कळते तिने आयुष्यभर ज्याच्यावर प्रेम केले तो मुळात ती समजते तसा नव्हताच, ती चुकीचा समज करून घेऊन जीव टाकत राहिली...

कित्येक प्रसंग अफलातून रंगवलेले आहेत. मी चित्रपट पाहिलेला नाही पण वाचताना तिकडची भौगोलिक स्थिती माहीत नसतानाही प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात.

कादंबरी वाचताना स्कारलेटची व्यक्तिरेखा प्रचंड मनस्वी, धाडसी, मनात घेईल ते कुठल्याही परिस्थितीत करणारी म्हणून मनावर ठसते आणि कुठेही तिचा राग येत नाही. आश्चर्य वाटत राहते की त्या कालखंडात मेलनीसारख्या स्त्रिया जास्त असतानाही स्कारलेटसारखी एखादी हेडस्ट्रॉंगही असावी. -हेट व तिच्या संसाराची तिच्या हट्टीपणामुळे व एशलेबाबत तिने स्वीकारलेल्या अंधभक्तीमुळे धूळधाण उडत असतानाही वाईट वाटत राहते. एकमेकांवर प्रेम करणारे दोन जीव केवळ खोट्या स्वाभिमानाच्या कल्पनांमुळे दूरावतात.

परत वाचायला हवी.

चित्रपटाविषयी प्रचंड वाचलंय आणि विवीयन ली विषयीसुद्धा.
स्कारलेटच्या कामासाठी हिरोईन शोधायचे काम सुरू असताना तिची 18 इंची कंबर हाही एक मापदंड होता. हा चित्रपट मिळवायचाच ह्या जिद्दीने विवीयन लीलाही पछाडले होते. तिची कंबरही सुदैवाने या मापदंडात बसत होती.

मी या पुस्तकाचा,वर्षा गजेंद्रगडकर यांनी केलेला मराठी अनुवाद वाचला आहे.वाटले नव्हते की ११७६ का ११८६ पाने वाचून होतील म्हणून.पण पुस्तकाने अक्षरशः ओढून नेले.
वयाच्या १३-१४ व्या वर्षी प्रथम हा सिनेमा पाहिला .काहीही कळले नाही,नंतर विशीत परत पाहिला.तेव्हाही संवाद कळले नसल्याने डोक्यावरून गेला.कादंबरी वाचताना कळत गेले की किती अफलातून स्टारकास्ट होती!त्याचबरोबर कादंबरीला न्याय द्यायचा खूप प्रयत्न केला गेला आहे.त्यावेळी स्कार्लेटला पाहून दिपल्यासारखे झाले तर मेलनी आवडली होती.क्लार्क गेबल तर दिलकी धडकन झाला होता.असो.धाग्याशी बरंच अवांतर झालेय.

छान लिहीले आहे. पुस्तक वाचलेले नाही पण चित्रपट पाहिलेला आहे. तेव्हा अमेरिकेत नुकताच आलो होतो, इथली स्लेवरी वगैरेची हिस्टरी फारशी (भारतातील इतिहासात वाचलेली सोडल्यास) माहीत नव्हती. पण तरीही चित्रपट अतिशय ग्रिपिंग वाटला होता. आता पुन्हा बघायचा आहे.

सुंदर लिहिलंय. खूप ऐकलं आहे या पुस्तकाबद्दल. जवळपास 100 वर्षापुर्वी लिहिलेलं पुस्तक अजून गारुड करतंय म्हणजे विशेष आहे.
To-be-read यादीत घालून ठेवते. क्लासिक्स फारशी वाचत नाही पण हे रोचक वाटत आहे.
बाकी book is always better than movie त्यामुळे चित्रपट बघितला नाही तरी चालेल Happy

अफाट पुस्तक आहे. पण सुरूवातीला आजिबातच पकड घेत नाही पुस्तक जवळपास शंभर दिडशे पाने तरी. आणि मग खाली ठेवता येत नाही असे गुंतून जायला होते. माझ्या मैत्रिणीने मला ती पहिली पाने अक्षरशः फोर्स केलं वाचायला पुस्तक and I am very thankful to her for that!
तेव्हा UT Austin च्या campus वर या confederate च्या नेत्यांचे पुतळे होते. मी ही कादंबरी वाचल्यावर त्या पुतळ्यांपाशी विशेषतः रॉबर्ट ली च्या पुतळ्यापाशी जाऊन उभी राहीले होते आणि त्या जागेची मला नव्याने ओळख झाल्यासारखे वाटले! त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या घटनांमुळे कॅम्पस वरच्या confederate च्या खूणा पुसायचा निर्णय झाला आणि यातले काही पुतळे हलवण्यात आले.
सिनेमा पण पाहीला आहे आणि खूप छान घेतला आहे पण तरी पुस्तक अधिक प्रभावी आहे. सगळ्या व्यक्तीरेखा प्रचंड प्रभावी आहेत.
स्कार्लेट सारखी ग्रे प्रसंगी स्वार्थी नायिका आणि रूढार्थाने हिरो नसलेला ऱ्हेट बटलर हा नायक, मेलनी सारखी सर्वगुणसंपन्न मुलगी जिची बाजू घ्यायची सोडून जेव्हा आपण स्कार्लेटचा विचार करतो तेव्हा लेखिकेच्या प्रतिभेची दाद द्यावीशी वाटते! She makes you root for a character who is morally incorrect.
Netflix वरून सिनेमा काढणे ही knee-jerk reaction वाटली मला.

>>> She makes you root for a character who is morally incorrect.
Netflix वरून सिनेमा काढणे ही knee-jerk reaction वाटली मला.>>> + १

पुस्तकच फार सुरेख लिहिलं आहे. सिनेमा बोअर होतो. खूपच लांबडा आहे. स्कार्लेट ची व्यक्तिरेखा न जेन्युइन अस्ते एस्प. स्त्रियांनी कायम दुसृयांचा विचार करायला हवा. बलिदान त्याग करायला हवा सेवा व घरकाम करायला तत्प रच असायला हवे अश्या विचारसरणीच्या अगेन्स्ट ती नेहमी स्वतःचा विचार करते. अवघड परिस्थितीतून कसे बाहेर पडा यचे ह्याचा विचार व कृती करते. हे नाविन्याचे आहे. सिनेमातला अ‍ॅशली फारच प्रौढ वा टतो मला तरी. माबुदो. लेखन शैली सुपर आहे मी हे पुस्तक हैद्राबादेस आर के खान लायब्ररी नारायण गुडा मधून आणून वाचले आहे. स्कार्लेट च्या जीवनातील सर्वात अवघड दिवस युद्धातून पळू न ती घरी परत येते तर घर बहुतेक जाळलेले व आई वारते असे काहीतरी आहे ( आता आठवत नाही नक्की परत वाचायला हवे.) त्या दिवसाच्या वर्णनानेच मला फार स्फूर्ती दिलेली आहे अनेक वेळा आपण म्हणतो एक संकट पार पडले तर दुसरे मोठे कदाचित शेवटाला उभेच अस्ते हा धडा शिकले तिथून.

स्कार्लेट पन एकदा पडद्याच्या कापडातून बॅग हॅट व गाउन शिवते ह्यातून आहे त्यातून टुकीत राहायचे हा धडा घेतला. आजही घरातले पडदे टाकले जात नाहीत. त्याचे बेडशीट नाहीतर पिशवी काहीतरी बन्वले जाते.

मेलनी फारच गोड गोड व्यक्तिमत्व आहे आदर्श मच.
व्हिवीअन ले छानच दिसते पण मला त्या प्रकारचे सौंदर्य आवडत नाही. त्यामुळे मी पुस्तकातल्या स्कार्लेट वर खुष आहे.

स्का. च्या दुकानाचे नाव कॅविट एम्प्टोरिअम असायला हवे असे ह्रेट म्हणतो हे तेव्हा लॉचा अभ्यास करत असल्याने लगेच कळले व फार भारी वाटले होते. असे खूप पॉइंट आहेत. गुलामगिरीचे समर्थन नसले तरी चित्रण आहे.
मॅमी कॅरेक्टर बेस्ट लिहिले आहे. नेट फ्लिक्स वरौन चित्रपट जात येत असतात.

परवा रेडिट वर एक व्हिडी ओ बगितला \ पब्लिक फ्रीक आउट मध्ये. एक व्हाइट मुलगा एका आ. अमे. मुलीला ए तिथे कॉटन आहे जा पिक कर असे सांगतो. मग ती त्याला फोडून काढते ते बघितल्यावर हा विषय अजूनही किती ज्व लंत व रेलेवंट आहे हे कळते.

मस्तच लिहीलय. फार पूर्वी अनुवादच वाचलाय. चित्रपट बघीतलाय. दोन्ही तेवढेच आवडले. एवढा मोठा आवाका असलेले पुस्तक दोन अडीच तासात दाखवणे सोपे नाहीये. स्कार्लेट ही व्यक्तिरेखाच जबरदस्त आहे.

स्कार्लेट सारखी ग्रे प्रसंगी स्वार्थी नायिका आणि रूढार्थाने हिरो नसलेला ऱ्हेट बटलर हा नायक, मेलनी सारखी सर्वगुणसंपन्न मुलगी जिची बाजू घ्यायची सोडून जेव्हा आपण स्कार्लेटचा विचार करतो तेव्हा लेखिकेच्या प्रतिभेची दाद द्यावीशी वाटते! + ११११

ही कादंबरी लेखिकेने कशी लिहीली वगैरेवर एक मोठा लेख एका दिवाळीअंकात वाचला होता. ती गोष्टही रोचक आहे. एवढच आठवतय.

काल चित्रपट परत पाहिला, मूळ आवृत्तीच पाहिली 3 तास 53 मिनिटांची.

बनवलाय सुंदरच, पण कादंबरीतील स्कारलेट चित्रपटात तशीच उतरली नाहीय असे वाटले. पात्रांचा किंवा दिग्दर्शकाचा दोष नसावा, मुळात कादंबरीच इतकी मोठी आहे की ती 4 तासात बसवणे पण कठीण गेले असणार.

स्कार्लेट सारखी ग्रे प्रसंगी स्वार्थी नायिका आणि रूढार्थाने हिरो नसलेला ऱ्हेट बटलर हा नायक, मेलनी सारखी सर्वगुणसंपन्न मुलगी जिची बाजू घ्यायची सोडून जेव्हा आपण स्कार्लेटचा विचार करतो तेव्हा लेखिकेच्या प्रतिभेची दाद द्यावीशी वाटते! >>>>> खरंच!

काल चित्रपट परत पाहिला, मूळ आवृत्तीच पाहिली 3 तास 53 मिनिटांची. >> हा चित्रपट कुठे पाहायला मिळेल आता? वर नेफ्लि वरून काढल्याचा उल्लेख आहे.

कादंबरी आणि चित्रपट दोन्ही पाहिले आहे. अतिशय आवडती कादंबरी आणि चित्रपटाच्या मर्यादा लक्षात घेउनही अतिशय आवडला. चित्रपटातील स्कार्लेट, मेलनी, ऱ्हेट एकदम जमलेले आहेत. त्यामानाने अशले वयस्क वाटला.

कादंबरी मूळ इंग्रजीतून वाचण्यातच मजा आहे. वर उल्लेख केलेला अनुवाद मी चाळला होता पण फारशी पकड घेऊ शकला नाही.

कादंबरीचा दुसरा भाग स्कार्लेट मात्र खूप रटाळ आहे. तो कोणी दुसर्‍या लेखिकेने लिहिलेला आहे, केवळ गोड शेवट करायचा म्हणून, त्याची काहीएक आवश्यकता नव्हती. मूळ गॉन विथ द विंड जिथे संपतं तोच शेवट समर्पक आहे.

चित्रपट पाहून युगे लोटली. आता आठवताना स्कार्लेट आणि आर्चीची उगीच तुलना करून झाली. दोन्ही खूपच आवडत्या व्यक्तिरेखा.

Netflix वरून सिनेमा काढणे ही knee-jerk reaction वाटली मला.>>>

सहमत. इतिहास बदलता येत नाही. तुमच्या आजच्या विचारांशी सुसंगत असे त्याला बदलता येत नाही, बदलू नयेच.

यु ट्यूबवर मूळ चित्रपट रेंट करून पाहता येतो.

स्कार्लेट सारखी ग्रे प्रसंगी स्वार्थी नायिका आणि रूढार्थाने हिरो नसलेला ऱ्हेट बटलर हा नायक, मेलनी सारखी सर्वगुणसंपन्न मुलगी जिची बाजू घ्यायची सोडून जेव्हा आपण स्कार्लेटचा विचार करतो तेव्हा लेखिकेच्या प्रतिभेची दाद द्यावीशी वाटते! >>>>> खरंच!
मी या पुस्तकाचा,वर्षा गजेंद्रगडकर यांनी केलेला मराठी अनुवाद वाचला आहे.
मला तरी हि प्रेमकथा वाटली नाही . एक कालखंड संपून दुसरा कालखंडाला सामोरे जाताना समाजात होणारया बदलाची कहाणी वाटते मला. जशी कि पडघवली मध्ये आहे .

मला तरी हि प्रेमकथा वाटली नाही . एक कालखंड संपून दुसरा कालखंडाला सामोरे जाताना समाजात होणारया बदलाची कहाणी वाटते मला. ...........+१.

कादंबरी संपल्यावर हा विचार आल होता की अशी कोणी आपल्या आजूबाजूला असती तर आपण तिचा राग केला आता की असेच भारावले गेलो असतो?

सर्वच प्रतिसाद छान...

मला खरं सांगायचं तर कादंबरी वाचल्यानंतर आता सिनेमा पहावासाच वाटत नाहीये... (यूट्यूब क्लिप्स पाहून तरी विविएन लीचं कास्टिंगच मला फारसं आवडलं नाही.)

To Kill A Mocking Bird वाचल्यावरही माझं असंच झालं होतं. ग्रेगरी पेक असूनही तो सिनेमा बघावासा वाटलेला नाही.

या लेखामुळे इण्टरेस्ट वाढून पुन्हा एकदा चित्रपट पाहायला सुरूवात केली आहे. ज्या स्ट्रीमिंग सर्विस वर हे पाहात आहे तेथेच इतर क्लिप्स आहेत, या चित्रपटाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल माहिती देणार्‍या. त्याही इण्टरेस्टिंग आहेत.

पण या चित्रपटाचा प्रीमियर झाला तेव्हाच्या गोष्टी या विरोधाभासाने भरलेल्या इतिहासातील इतर अनेक गोष्टींप्रमाणेच आहेत. प्रीमियर झाला अटलांटामधे. ते ही सेग्रेगेशन असलेल्या हॉल मधे. यात "मॅमी" चे काम केलेली (आफ्रिकन अमेरिकन) हॅटी मॅक्डॅनियेल इतर लोकांच्यात बसू शकली नाही. तिला इतरांपासून लांब वेगळे टेबल होते. प्रीमियर ला कॉन्फेडरेट व्हेटरन्स (सिव्हिल वॉर मधे सदर्न स्टेट्स च्या बाजूने म्हणजे "युनियन" च्या- मूळ अमेरिकेच्या विरोधात लढलेले) प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले गेले होते. तेव्हा एकूण ओल्ड साउथ ग्लोरिफाय करण्याचे उद्देश क्लिअर दिसतात.

स्मिथसोनियन च्या या क्लिप मधे याची माहिती आहे. वरती उल्लेख केलेल्या त्या क्लिप्स मधे ही आहे (एचबीओ मॅक्स वर TCM चॅनेल चे चित्रपट आहेत त्यात)
https://www.youtube.com/watch?v=in_xAcNZYRw

चित्रपटातही सुमारे १५-२० मिनीटांनतर तो अ‍ॅशली त्या मेलनी ला त्यांच्या घराबद्दल माहिती देतो तो सीन असाच ते सगळे ग्लोरिफाय करणारा आहे. त्यानंतर ५-१० मिनीटांत गुलामांची ७-८ वर्षांची मुले व्हाइट्स मुली झोपलेल्या असताना त्यांना वारा घालताना दाखवली आहेत.

पण हे सगळे उघड असले, तरी चित्रपट नेफिवरून काढणे वगैरे पटत नाही. एचबीओ सुद्धा काढणार होते बहुधा. पण अजून आहे. जे आहे तो इतिहास आहे. तो आता लपवण्यात काय अर्थ आहे. त्याचे कौतुक करण्याचेही कारण नाही आणि काढून टाकण्याचेही. आणि मुळात इतिहासातील अनेक गोष्टींना आत्ताचे मापदंड लावून कॅन्सल करायला लागलो तर जवळजवळ सर्वच गोष्टी बॅन कराव्या लागतील. एचबीओ वर आहे तश्या आणखी माहिती व पर्स्पेक्टिव्ह्ज देणार्‍या क्लिप्स बरोबर द्याव्यात. लोकांनी बघूदे आणि ठरवूदे.

बाय द वे, ओल्ड साउथ व कॉन्फेडरेट्स बद्दल एक लॉस्ट कॉज थिअरी आहे. तीही यासंबंधाने वाचण्यासारखी आहे. त्यावेळी अमेरिकेतून फुटून निघालेल्या लोकांचे गौरवीकरण साउथ मधे अजूनही का होते (साउथ कॅरोलीना मधे आत्ता आत्तापर्यंत सरकारी ठिकाणी कॉन्फेडरेट फ्लॅग होता) त्याबद्दल शोधाशोध मागे करत होतो तेव्हा हे दिसले होते.

ललिता-प्रीति - होप हे अवांतर इथे चालेल.

ललिता- प्रिती व इतर...मार्गारेट मिचेलच्या या कादंबरीने जगात आतापर्यंत असंख्य वाचनप्रेमींना भुरळ घातली आहे.

जर का तुम्ही या कादंबरीकडे नुसते फिक्शन म्हणुन बघीतले ( व्हिच यु शुड!).. व स्कार्लेट ओहारा, मेलनी,अ‍ॅशली व र्हेट बटलर या पात्रांतच तुम्हाला गुंतवुन ठेवलेत तर ही कादंबरी सुंदरच आहे यात वादच नाही! पण तुम्ही जर यात वास्तव इतिहास बघायची चुक केलीत( जे पुष्कळशे वाचक करतात!).. तर कळते की यात दाखवलेल्या दक्षिणेचे व दक्षिणेतल्या जिवनशैलीचे लेखिकेने तिच्या अँगल मधुन शुगरकोटींग केले आहे . दक्षिणेतली गुलामगिरी हे सिव्हिल वॉरचे मुख्य कारण होते या महत्वाच्या मुद्द्याला तिने सोयिस्कररित्या या पुस्तकात बगल दिली आहे.दक्षिणेच्या राज्यांच्या जिवनशैलीवर...उत्तरेची राज्ये विनाकारण गदा आणत आहेत व म्हणुन दक्षिणेची राज्ये सिव्हिल वॉर करत आहेत असा काहीसा चुकीचा समज कादंबरी वाचुन होउ शकतो.

म्हणुन जी लोक या साहित्याकडे नुसते फिक्शन म्हणुन न बघता... त्यात पोर्ट्रे केलेला इतिहास सुद्धा ( व्हिच लुम्स व्हेरी लार्ज.. थ्रुआउट द बुक!)फॅक्ट म्हणुन बघायची चुक करतात... ते या कादंबरीवर आक्षेप घेतात. कारण आजही अमेरिकेत ब्लॅक अमेरिकन्स व व्हाइट अमेरिकन्स यांच्या मधले संबंध... ही दुखरी नस आहे. व म्हणुन.. सध्याच्या ब्लॅक लाइव्ह्स मॅटर या मुव्हमेंटच्या पार्श्वभुमीवर या कादंबरीवरुन बनवलेला चित्रपट अश्या लोकांना जास्तच खटकतो.

कादंबरीतल्या कथानकाचा वर सगळ्यांनी चांगला उहापोह केला आहे. त्यात अजुन मी भर घालत नाही.

पण मला इथे अजुन २ गोष्टी मांडाव्याश्या वाटतात..

एक.. हे काय किंवा इतर कुठलेही साहित्य... जर भाषेची अडचण नसेल तर.. मुळ भाषेतच वाचावे अश्या मताचा मी आहे. भाषांतर कितीही उत्तम असले किंवा भाषांतरकार कितीही प्रतिभाशाली असला/ असली तरी... मुळ भाषेतल्या साहित्याची खरी मजा चाखायची असेल तर मुळ भाषेतच साहित्य वाचले पाहीजे.

दुसरे.. मी मुळ कादंबरी जेव्हढी एंजॉय केली तेवढाच त्यावरुन बनवलेला चित्रपटही मी एंजॉय केला. १९४० मधे अश्या प्रकारचा .. मल्टिकलर.. भव्य दिव्य व “ एपिक“.. म्हणावा असा चित्रपट काढुन हॉलिवुडने जगासमोर एक उदाहरण घालुन दिले. आजही तो सिनेमा बघताना वाटत नाही की हा ८० वर्ष जुना चित्रपट आहे. क्लार्क गेबल व व्हिविअन ली.. दोघांचे अभिनय..उत्कृष्ट! १८६५ चा साउथ व प्लांटेशन लाइफ ( हाउएव्हर शुगरकोटेड, रोमँटीसाइझ्ड अँड डिस्टोर्टेड इट मे बी फ्रॉम द हिस्टॉरिकल फॅक्ट्स!).... एक चित्रपट म्हणुन अतिशय सुंदर चित्रीत केले आहे. कलर पॅलेटही खुप सुंदर वापरली आहे. वेषभुषाही अतिशय सुंदर!

(पुस्तक व चित्रपट अशी तुलना या कादंबरीची व त्यावरुन काढलेल्या चित्रपटाची व हॅरी पॉटर पुस्तके व त्यावरुन काढलेल्या चित्रपटांशी केली तर... गॉन विथ द विंड हा चित्रपट पुस्तक न वाचता एक वेळ समजु शकेल पण हॅरी पॉटरच्या खर्‍या विश्वाचा त्याचे नुसते चित्रपट बघुन उलगडा होणे अशक्यच!)

{ अवांतर... ( सॉरी ललिता -प्रिती)....फारेंड.. तुझ्या पोस्टशी अर्धसहमत! तुझ्या पोस्ट मधे तु उल्लेखलेल्या.. “लॉस्ट कॉज“ बद्दल इथे लिहीले तर ते इथे खुप जणांना अवांतर वाटु शकेल पण थोडक्यात.. लॉस्ट कॉज हे दक्षिणेच्या राज्यांनी गुलामगीरीचे केलेले उदात्तीकरण आहे. ज्या देशाची घटना लाइफ, लिबर्टी व परस्युट ऑफ हॅपीनेस या ३ मुलभुत तत्वांवर आधारलेली आहे त्यात ही दक्षिणेची राज्ये कुठल्या मॉरल ऑथॉरीटीने गुलामगिरीचे समर्थन करु शकतात?

तुला माहीत असेल की १८८० पासुनचे साउथ मधले .. सॅग्रीगेशनचे समर्थन १९६५ पर्यंत करणारे.. जिम क्रोज लॉज.. पद्धतशीररित्या क्रुष्णवर्णियांची आर्थिक, शैक्षणिक व सामाजीक मुस्कटदाबी करत होते... तसेच....हेही तुला माहीत असेल की ६० च्या दशकात.. जॉर्ज वॉलेस या अलाबामा गव्हर्नरचे किती अतिशय हिन विचार.. क्रुष्णवर्णिय.. माणसांबद्दल होते. सेल्मा ते माँटगोमेरी मोर्चा एडमंड पेटीस ब्रिजवर आल्यावर.. त्याने मोर्च्यात भाग घेणार्‍यांवर कुत्रे सोडले होते व त्या मार्च करणार्‍यांना घोड्यांच्या पायाखाली तुडवले होते. तुम्ही साउथ मधली राज्ये क्रुष्णवर्णियांना असे वागवता व लॉस्ट कॉजचे समर्थन करता! वा रे वा!

१८६१- ते १८६५ च्या दरम्यान झालेल्या या अमेरिकन सिव्हिल वॉरनंतर अ‍ॅब्राहम लिंकन च्या इमँसिपेशन प्रॉक्लमेशन प्रमाणे अमेरिकेत गुलामगीरी अधिक्रुतरित्या जरी पेपर वरती बंद झाली पण अनधिक्रुतरित्या..या लॉस्ट कॉज थिअरीमुळेच.... अजुन १०० वर्षे क्रुष्णवर्णियांना.. गुलामांसारखेच वागवले गेले व त्यांना मतदानाचा हक्क मिळायला १९६५ साल उजाडले!

त्या लॉस्ट कॉज विचारसरणीनेच अमेरिकेत आजही आपल्याला जॉर्ज फ्लॉइड सारख्यांचे ..पोलिसांच्या हातुन .. खुन होताना दिसतात. }

जाता जाता... ज्यांना या कादंबरीत असलेल्या ऐतीहासीक काळाबद्दल जर कुतुहल निर्माण झाले असेल तर अजुन एका सुंदर पुस्तकाचे नाव मी तुम्हाला सांगु इच्छीतो..१८५२ मधे लिहीलेले...“ अंकल टॉम्स केबिन“..लेखिका.. हॅरिएट बिचर स्टो.... असे म्हटले जाते.. या पुस्तकाने अ‍ॅब्रॅहम लिंकन ... अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरला व या पुस्तकाने गुलामगीरी नष्ट करायच्या विचारसारणीला १८५० च्या दशकात चालना दिली. अतिशय वाचनिय पुस्तक!

Pages