पखरण

Submitted by द्वैत on 16 August, 2020 - 03:13

पखरण

घाटाच्या वळणावरती
पाऊस असावा सोबत
झाडांची हिरवी गाणी
रस्त्याच्या हृदयी रुजवत

एक शुभ्र झरा उतरावा
घाटाच्या माथ्यावरूनी
नितळावी हिरवी राई
ह्या कडेकपारीमधुनी

झाडांनी ओढून घ्यावी
रेशीम धुक्याची चादर
गाईंच्या कळपामधूनी
बघ कृष्णसख्याचा वावर

गगनात अचानक यावा
पक्ष्यांचा दीर्घ थवा मग
सळसळ पानांची व्हावी
व्याकूळ जीवाची तगमग

कोवळ्या उन्हाच्या खाली
झाडांचा रंग खुलावा
हिरव्या पिवळ्या मातीचा
मृदगंध नभाशी जावा

कोरड्या मनावर माझ्या
ही हिरवळ पसरत जावी
बहुरंगी रानफुलांची
देहावर पखरण व्हावी

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Refreshing

खूप सुंदर काव्यरचना द्वैतजी...

कोरड्या मनावर माझ्या
ही हिरवळ पसरत जावी
बहुरंगी रानफुलांची
देहावर पखरण व्हावी<< अप्रतिम

फारच सुंदर....
जे वाचते ते व्हिज्युअलाइज करायची सवय आहे. त्याने हे रमणीय वर्णन अक्षरशः पाहिले Happy !
तुमच्या पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.