कुलूप (लघुकथा)

Submitted by बोकलत on 14 August, 2020 - 10:53

ही खरीखुरी गोष्ट माझ्यासोबत चार वर्षांपूर्वी घडलेली आहे. मी त्यावेळी नोकरीच्या ठिकाणी रुम रेंटवर राहत होतो. मी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी घरीच राहायचो. घरी असलो की दिवसातून कधीही काळवेळ न पाहता शंखनाद करणे, बासरी वाजवणे, जोरात गाणी ऐकणे असली कामं मी करत असे. या गोष्टी मी शक्यतो दुपारीच करत असे. दुपारी शांत ac,फॅन लावून झोपलेली लोकं मला अजिबात पटत नसत. या गोष्टीमुळे आजूबाजूचे माझ्यावर खार खाऊन असत.
तर मी रविवारी शक्यतो जेवण घरीच बनवायचो. माझ्या शेजारी काका काकी राहायचे त्यांचा मुलगा सून काही दिवसांसाठी घरी आले होते. काका काकी शुद्ध शाकाहारी होते, मुलगा पण शाकाहारी होता पण लग्न झाल्यावर बायकोने त्याला मांसाहार करायला शिकवलं होतं. तर माझ्या रूममधून रविवारी मटण, मच्छीचे वास आजूबाजूच्या घरात जात असत. वास घेऊन काकांच्या मुलाला आणि सुनेला नॉनव्हेज खायची खूप इच्छा होत असे. असाच एके रविवारी मी मटण मागवून संध्याकाळी बाहेर फिरायला गेलो होतो. दरवाजाला मी शक्यतो कुलूप लावत नसे.फिरून आलो तर काकांच्या घराबाहेर भरपूर माणसं जमली होती. मला वाटलं काका गेले की काय, म्हणून काय झालं? हे विचारायला गेलो तर सगळे माझ्याकडे घाबरलेल्या नजरेने बघायला लागले. त्या विचित्र नजरा पाहून मी तिथे न थांबता घरी आलो. काही दिवसांनी मला समजलं की मी जेव्हा फिरायला गेलो तेव्हा काकांचा मुलगा माझ्या घरी मी काय जेवण करणार आहे हे बघायला आला होता. घरात काळोख होता आणि नेमकी लाईट गेली होती. तो जेव्हा स्वयंपाकघरात गेला तेव्हा तिथे त्याला कोणाच्यातरी असण्याची चाहूल लागली. तो फ्रीज उघडणार इतक्यात त्याला एका कोपऱ्यात एक साडेसात आठ फूट उंच माणसाची काळी आकृती दिसली. ती कपाळावर आठ्या पडलेली आकृती अतिशय रागाने त्याच्याकडे बघत होती. हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे हे काकांचा मुलगा समजून गेला. कसाबसा त्याने तिथून पळ काढला आणि पुढचे पाच सहा दिवस तापाने अंथरुणाला खिळून होता. हे ऐकून मी घरी आलो फ्रिजमधलं गार पाणी प्यायलो आणि जोरात ओरडलो "अरे बावळट बायंगी परत लोकांसमोर आलास तर कुलूप लावून बाहेर जात जाईन."

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बायंग्या भूत म्हणजे कोकणातला एक पिशाच्च.. कोकणातली लोकं आंब्याच्या बागा वगैरे राखण्यासाठी ह्या भुतांना नेमून ठेवतात. त्यांना ताब्यात घेण्याचा विधीसुद्धा वाचला होता कुठेतरी, आता नेमका आठवत नाहीये.

अच्छा, माझं भुतं आणि त्यांचे प्रकार याबाबतीत knowledge जरा कमीच आहे. आम्ही सगळ्यांना सरसकट भुतंच म्हणतो.
बाकी गोष्ट पण भारीच आहे, मांसाहाराचे जेवण तर होते ना शाबूत म्हणजे बायंगाने नव्हतं ना खाऊन टाकलं?
Lol

बायंगी भुताचा प्रकार आहे. आपण त्याला काहीपण काम काम सांगितलं की तो करतो. त्याबदल्यात तोसुद्धा आपल्याकडून काहीतरी मागतो जर आपण ते द्यायला असमर्थ ठरलो तर तो आपला जीव घेतो.
अरे वा ..बायंगीला खूष ठेवण्यासाठी बासरी आणि शंख..भलतीच रसिक दिसतेय>>> Lol

भारीच Lol
बायांगीला सतत काम द्यावे लागते म्हणे . नाहीतर मालकावरच उलटते असे ऐकून आहे .

कोकणात बाईंग्या भुताची खूप दहशत, हे भूत पाळतात म्हणे .. आणि ज्याच्याजवळ हे असते त्याला सगळेच टरकून असतात

बायंगी स्त्रिलिंगी असते का? >> काहीही असू शकतं.
कोकणात जाऊन बायंगी विकत घेतली तर तो कोकणाबाहेर घेऊन जाता येतो का?>> हो येतो.

आमच्या आजोबाकडे होती... मटक्यात नंबर लागू लागला... दोनशे पन्नास एकर जमीन घेतली मग हळू हळू...

Lol अजून थोडी खुलवायला हवी होती कथा.

कोकणात जाऊन बायंगी विकत घेतली तर तो कोकणाबाहेर घेऊन जाता येतो का? हैद्राबादला?>>>>>> Lol मानव

उलटली का नंतर? नातू craps निघाला म्हणून विचारले
>>नाही...आमचा संबंध नाही.. 125 एकर मिळाली आम्हाला... विकून टाकायचा विचार आहे आणि त्यातले काही टक्के पैसे दान देऊ...

कुलूप च्या धाग्यावर किल्ली आली तर काय होईल?

जरा विस्तारित लिहा हो बोकलत, प्रतिभा बहरू द्या तुमची Happy

आता अशीही भुताची भीती वाटेनाशी झालीये,
भूत भेटलंच तर तुमचं नाव सांगून त्याला पळवता येईल ना Lol

कुलूप च्या धाग्यावर किल्ली आली तर काय होईल?>>> Lol
जरा विस्तारित लिहा हो बोकलत>>> लिहायचा कंटाळा येतो हो. एखाद्या आत्म्याला सांगायचं तर ते शक्य नाही होत. आत्मे फक्त ऐकू शकतात त्यांना लिहिता वाचता येत नाही. क्वचितच लाखातून एखादा भेटतो ज्याला लिहिता वाचता येतं.

आत्मे फक्त ऐकू शकतात त्यांना लिहिता वाचता येत नाही.>>>>बोकलत सर तुम्ही आत्म्यांसाठी साक्षरता वर्ग सुरू करा. त्यांनाही लिहिण्याचा वाचण्याचा हक्क आहे. Proud

माझा तोच विचार आहे.
कोकणातून बायंगी आणून त्याला चार भाषा लिहा/वाचायला अस्खलित शिकवायच्या आणि त्याच्याकडून इतर सहा बायंग्याना शिकवून घ्यायच्या. असे करत सर्व प्रकारच्या भूतांना साक्षर करण्याची मोहीम राबवायची.

बायंगी म्हणल्यावर जाम हसू आले कारण नाव ऐकले होते. पण परवा का तेरवा रात्री सोनीवर महाराष्ट्राची हास्यजत्रेत प्रभाकर मोरे आणी सुहास परांजपेचा वाद ऐकुन बायंगी समजले. त्यात प्रभाकर मोरे कोकणातले, तेच ते शालु झोका वाले. वॉचमन असुनही चोराला का पकडले नाही तर म्हणे तो चोर नव्हता बायंगी भूत होते. Proud

Pages