पासवर्ड

Submitted by कविन on 14 August, 2020 - 10:16

सकाळपासून माझी चिडिचड झाली होती. गेल्या मिहन्यात ‘वॅलेंटाईन-डे’ला एक साधा ‘व्हॉट्सॲप’ मेसेजही नव्हता पाठवला हेमंतनं. म्हणे, “ही कसली फॅडं! सगळं जग करतं म्हणून काहीही काय करायचं आपणही?”

बाकी सगळं तर जगरहाटी म्हणत, सगळी लोकं करतात तस्सच करायचं.

काय होतं केलं तर? म्हणत सगळे सणवार,कुळधर्म मला पटो न पटो मोठ्यांचा आदर म्हणत मस्का मारुन का होईना पण करायला भाग पाडायचं. पण वॅलेंटाईन मात्र फॅड म्हणत विसरायचं.

मग आजचा दिवस लक्षात असण्याचा काहीच संबंध नव्हता. तरी मी आडून-आडून आठवण करुन दिली होती काल. पण उपयोग शून्य. शेवटी आज सकाळी मीच सांगून टाकलं, "आज आपल्या साखरपुड्याला ७ वर्ष होतील."

त्यावर फक्तं , "हो? तुला काय वाट्टेल ते डिटेल्स लक्षात रहातात" म्हणत माझ्या रोमॅंटिक मूडला टाचणी लावून सगळी हवा फुस्सकन काढून झाली होती.

मग मी पण कुकरच्या शिट्टी बरोबर माझा आवाज वाढवत ऐकवलं, "तुझा ना आता पाsर नवरा झालाय. वॅलेंटाईन-डे वगैरे सारखी गोष्ट तर राहूच दे, तू पूर्वीसारखी छोटी छोटी सरप्राईझेस पण द्यायला विसरलायस."

यावर पण, “ए तुझा वाढदिवस आणि तुझा लग्नाचा वाढदिवस अजूनपर्यंत एकदाही विसरलो नाहीये हा मी” असं उत्तर मिळालं.

“माझ्या लाग्नाचा वाढदिवस? अरे! माणसा किमान 'आपल्या लग्नाचा' तरी म्हण!” माझा पारा आता फुटायच्या बेतात होता.

यावर फक्तं दोन्ही कान पकडत सॉरीची खूण आली.

“तुझ्याशी ना आता बोलण्यातच काही अर्थ नाही. त्या रेश्माचा नवरा बघ 'प्रपोज-डे’ पण न
विसरता साजरा करतो. आणि त्या हेमाचा पण बघ, किचनचा ताबा घेऊन तिच्यासाठी स्पेशल डिश करुन सरप्राईझ देतो. एव्हढच कशाला, फॅमिली गॅदरिंगमध्ये वहिनींसाठी किती मस्त रोमॅन्टिक गाणं गायलं दादांनी, ते आठव. याला म्हणतात रोमॅंटिक वागणं. नाहीतर तू.” मी माफक राग व्यक्तं करत त्याच्याकडे बघीतलं.

तो शांतपणे माझ्यासाठी कोकम सरबत करत होता. माझ्या हातात ग्लास देत म्हणे, "घे, पित्तं झालं की डोकं सटकतं तुझं"

“या असल्या उपायांनी मी विरघळणार नाही आता”, ग्लास हातात घेत मी ऐकवल्यावर समोरुन फक्तं एक मिश्किल हसू आलं.

कॉलेजमध्ये असताना वहीवर माझ्या नावाचा कोडवर्ड ’०५१०’ असा गिरिमटवणारा हेमंत हरवलाच कुठेतरी. आता एकमेकांना आई-बाबा हाक मारता मारता आमच्यातलं रोमॅंटिक कपल संपून पालक मोडच उरणार फक्तं. माझं लाडाचं नाव तर लक्षातही नसेल त्याला. त्यानेच दिलय ते नाव, पण पार विसरला असेल आजच्या दिवशीसारखंच. सरबत पितानाही हे असलं काहीबाही मनात येत राहीलं.

“जरा फ्री असशील तर माझं जी-मेल अकाऊंट ॲक्सेस कर प्लीज आणि त्या म्युच्युअल फन्डवाल्या राहूलचा काही इमेल आलाय का बघ. जरा अर्जंट आहे. या स्टॅन्डबाय फोनचा तसा काही उपयोग नाही एसएमएस आणि कॉल व्यतिरिक्त. लॅपटॉप ऑफीसमध्ये ठेवलाय. तुझ्याच फोनवर चेक कर प्लीज." त्याच्या या बोलण्यावर मी फक्तं डोळे वटारुन बघितलं. काहीच कसं वाटत नाहीये या प्राण्याला!

"बाहेर जाऊन येतोय. होपफुली माझा फोन रिकव्हर झाला असेल तर इशानला घेऊन येताना फोनपण घेऊन येईन.” त्याने माझ्याकडून ग्लास घेऊन विसळून ठेवता ठेवता ऐकवलं आणि चप्पल सरकवून बाहेरही पडला.

जी-मेल ॲक्सेस कर म्हणे! पण पासवर्ड? मला माझे पासवर्ड लक्षात रहायची मारामार याचा कुठून लक्षात असायला?
तेव्हढ्यात परत लॅचचा आवाज आला म्हणून दारात बिघतलं तर अधर्वट दारातून हेमंतचा आवाज.. "पासवर्ड एसएमएस केलाय, जी-मेल बघून ठेव प्लीज", एव्हढं बोलून लॅच लावून तो गायब.

“काहीही होऊ शकत नाही या माणसाचं या जन्मात. इतरांच्या नवऱ्यांचे रोमॅंटिक किस्से ऐकणंच नशीबात लिहीलय बहुतेक आमच्या. चला आता, आहे हे असं आहे म्हणत पदरी पडला अनरोमॅन्टिक नवरा म्हणावे आणि जी-मेल चेक करुन म्युच्युअल फन्डच इमेल डाऊनलोड करावेत” असं मनाशी
म्हणत मी पासवर्ड बघायला एसएमएस ओपन केला. समोर दिसणाऱ्या पासवर्डने मात्र मी पुरती विरघळले. एक क्षण जी-मेल चेक करायचा आहे हेच विसरले आणि परत परत पासवर्ड वाचत राहीले - 'मिष्टी ०५१०'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चिन्नू

जुनीच आहे ही. बरचसं जुनं लिखाण इकडे तिकडे विखुरलय. एका ठिकाणी आणायच म्हणून आता जरा शोधाशोध करतेय. Lol काही मासिकातले वगैरे स्कॅन केलेलं आहे म्हणून मिळालेय पण परत टाईप करावं लागणार आहे कारण फायनल ड्राफ्ट असलेलं हस्तलिखित गहाळ झालय आणि जुने ड्राफ्ट सेव्ह आहेत Lol

धन्यवाद केदार, मृणाली, ॲंजेलिका, सुहृद आणि नंबर१वाचक

@सुहृद, टायपो दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

आयडिया चांगली आहे... बायको रागावली की मेल चेक कर म्हणायचे आणि त्याच्या आधी गर्लफ्रेंड चे नाव असलेला पासवर्ड बदलून बायकोचे लाडाचे नाव असेल असा पासवर्ड ठेवायचा... Happy