हिरव्या मिर्च्यांची भाजी!

Submitted by maitreyee on 11 January, 2015 - 13:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तूर डाळ, १२-१३ हिरव्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा कांदा, १ टोमॅटो, १ इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, काळा मसाला + गरम मसाला दीड चमचा, वरून घालायला कोथिंबीर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

हो हिरव्या मिरच्यांची भाजी!! (सिमला मिर्ची नव्हे) नाव ऐकूनच धास्तावायला झालं का?! ही भाजी कमकुवत हृदयाच्या - आय मीन जिभेच्या अन पोटाच्या लोकांसाठी नाहीच्चे ! पट्टीचे तिखट खाणर्यांनीही भाजी खाऊन पळता भुई थोडी झाली तर नंतर थंडावा द्यायला आइस्क्रीम किंवा तत्सम काहीतरी घरात असू द्यावे Happy
इतक्यातच नणंदेकडे नाशिक ला गेले होते. तिथे ही भाजी तिने मला खाऊ घातली. माझं सासर विदर्भातलं असलं तरी ही भाजी आमच्याकडे केली जात नाही. नणंदेला ही रेसिपी तिच्या लेवा पाटील मैत्रिणीने दिली . विदर्भातल्या लेवा पाटील समाजाची ही पारंपारिक खासियत आहे म्हणे.

तर कृती अशी:
कुकर ला १ वाटी तुरीच्या डाळीमधे १२-१३ हिरव्या मिर्च्या वाटून घाला आणि डाळीबरोबर नीट शिजवून घ्या.
IMG_0019.JPG
कांदा, आले, लसूण, टोमॅटो, खोबरे हे सर्व मिक्सर वर बारीक करून हे वाटण बाजूला ठेवा.
जाड बुडाच्या कढईत सढळ हाताने तेल तापवून फोडणी करा. त्यात तयार केलेले वाटण घालून परतून घ्या. जरा तेल सुटायला लागले की त्यात काळा + गरम मसाला घालून अजून थोडे परता. लेवा पाटील लोकांचा काळा मसाला काहीतरी वेगळा असतो असे नणंद म्हणाली, पण आपला नेहमीचा १ चमचा काळा मसाला+ अर्धा चमचा गरम मसाला असे मिश्रण त्याऐवजी चालेल. दगडू तेली मसाला वापरला तरी छान लागेल.
कुकर झाला असेल तर ( वॉर्निंग- झाकण उघडताच कदाचित मिर्चीच्या वासाने फटाफट शिंका/ ठसका येऊ शकतात Happy )शिजलेले वरण नीट हलवून कढईत ओता. लागेल तसे थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी जरा पातळच, आमटीसारखी करा. ( मैत्रिणीच्या टिपनुसार हे वरून ओतायचे पाणीपण गरम केलेले असावे. थंड पाणी घातल्यास चव बिघडते म्हणे) चवीप्रमाणे मीठ घाला. २ मिनिटे उकळी येऊ द्या.
वरून कोथिंबीर घाला अन गरम गरम पोळी अथवा भाकरीबरोबर ओरपा !! सोबत कांदा, आणि तिखटपणा जरा सौम्य करायला खाताना या भाजीवर वरून लिंंबू पिळून घेतात.
>IMG_0022.JPG

ही भाताबरोबर पण चांगली लागेल पण मला भातामुळे चाव फारच डायल्यूट झाल्यासारखी वाटते.

वाढणी/प्रमाण: 
३-४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

* ही भाजी कशी लागत असेल याचा कृती वाचून अंदाज येणे जरा अवघड आहे. डाळीत केली असली तरी वरण कॅटेगरी चव नसते. जरा शेव भाजी किंवा मिसळीच्या कटाच्या आस पासची चव म्हणायला हरकत नाही.
* हा वरचा फोटो काढेपर्यंत भाजी जरा घट्टच झाली आहे, याहून किंचित पातळ असू द्या.
* आधी एक चमचा चव पाहिली तर लक्षात येत नाही पण जस जसे खात जाऊ तसे चव अजून तिखट वाटू लागते !
* तिखटपणाला घाबरून मिरच्या फार कमी केल्या तर चव, स्वाद अगदीच बदलेल.. १-२ कमी करा हवे तर.त्याहून कमी वापरल्या तर वरण म्हणून खा मग, त्याला मिर्चीची भाजी नाव देऊन मूळ रेसिपीचा अपमान करू नये ! Happy
यालाच खानदेशात डाळ-गन्डोरी किंवा Dal Gandori / दाल-गंडोरी असेही म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
नणंद, तिची मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केली. खाल्ली. जिवंत आहे. मस्त आहे.
रेस्पी जबराट.
पाऊण वाटी तूर + पाव वाटी चणा डाळ घेतली. २०-२२ मिरच्या घेतल्या होत्या. टमाटू नव्हता त आमचूर वापरलं जरा. बाकी कृती सेम. भक्कम कोथिंबीर घालून चापली. लय भारी आहे रेस्पी. Happy
हाटेलात कोल्हापूरी नावानी ज्या टाईप तिखट डिश मिळते तसली तिखट झाली होती. अतीतिखट नक्कीच नव्हती. चणाडाळीमुळे जरा बाईट राहीला.

बाबौ! तू २२-२३ मिर्च्या घेतल्यास योकु!! खतरनाक आहेस!
काही लोक आंबटपणासाठी चुका घेतात पण आम्हाला इथे नाही मिळत.
बायदवे नव्या मॉम ला नको रे बाबा देऊस असले काही Happy

न्हाई ओ. Wink
वर सांगायचं राहीलं काळा/गोडा मसाला मस्ट आहे. त्याची चव भारी लागते.

आज परत एकदा ही भाजी/डाळ्/वरण करण्याचा योग आला! पण फक्त पाच मिरच्या घातल्या त्यात डाळ शिजवताना...... पण तरीही मस्तच मजा आली....
वरचे सगळे प्रतिसाद वाचुन मजा आली Biggrin
ता. क. - आता आम्ही माउंट डिसअपॉईंटमेंट जवळ रहात नाही Biggrin

हि भाजी आणि योकु ची मिरची लोणचं रेसिपी ह्या दोन्ही हिट लिस्ट वर आहेत आता. जहाल लोकांसाठी खास !

Pages