जय श्रीकृष्ण

Submitted by nimita on 11 August, 2020 - 03:25

माझ्या लहानपणी मला प्रसंगानुरूप सगळेच देव आवडायचे....म्हणजे परीक्षा जवळ आली की सरस्वती, मोदक खायला मिळतात म्हणून गणपती, लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मी, प्रसादाचा शिरा खाताना सत्यनारायण भगवान वगैरे वगैरे ! माझी आई श्रीरामाची भक्ती करायची. त्यामुळे अधून मधून मी पण रामरंगी रंगून जायची. लग्नानंतर सासरी सगळ्यांना शिर्डीच्या साईबाबांची आराधना करताना पाहिलं; स्वतः देखील त्यांची कृपा अनुभवली आणि साहजिकच माझ्या देवांच्या लिस्ट मधे अजून एक नाव जोडलं गेलं. पण जसं जसं आयुष्य उलगडत गेलं तसं तसं माझ्या मनातल्या देवघरात एका देवाचं स्थान अधिकच पक्कं होत गेलं..याचा अर्थ आता मी इतर देवांना मानत नाही असा अजिबात नाही. खरं सांगायचं तर जेव्हाही मनापासून देवाला हाक मारते ना त्याक्षणी या सगळ्या देवांपैकी कोणाचीच प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहात नाही. फक्त एका अनामिक शक्तीचं, ऊर्जेचं अस्तित्व जाणवतं आसपास.

पण तरीही माझ्या मते - या कलियुगात, आयुष्याच्या संघर्षात कसं वागावं आणि कसं वागू नये याची योग्य शिकवण देणारा देव म्हणजे श्रीकृष्ण !!

मला जे काही थोडंफार माहिती आहे त्यानुसार मला असं वाटतं की ब्रम्हा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांपैकी विष्णु हा सगळ्यात प्रॅक्टिकल देव आहे. ब्रम्हा आणि महेश हे दोघंही त्यांच्या जागी श्रेष्ठच आहेत पण त्यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी वर मागणारे कितीतरी दुष्टबुद्धी आपल्याला माहिती आहेत. पण 'जशास तसे' या उक्तीचा वापर करून त्यांना योग्य ती शिक्षा देण्याचं काम भगवान विष्णुनी केलं आहे. मग तो भस्मासुर असो वा हिरण्यकश्यपू ... वाली असो वा शिशुपाल ! वेगवेगळे अवतार घेऊन श्री विष्णुनी वेळोवेळी या सृष्टीचा उद्धार केला आहे.

त्यांच्या दशावतारांतला...नाही नाही आत्तापर्यंतच्या नऊ अवतारांतला - कारण त्यांच्या दहाव्या अवताराबद्दल अजून तरी मला काही कल्पना नाही... माझा सगळ्यात आवडता अवतार म्हणजे श्रीकृष्ण ! या कलियुगात तग धरून राहण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, येणाऱ्या संकटांवर मात करत पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला उपयोगी पडेल असं 'आयुष्य जगण्याचं हँडबुक' म्हणजे 'श्री कृष्ण' आणि त्याची 'कृष्ण नीती'!!

मी श्रीकृष्णाबद्दल जे काही थोडंफार ऐकलं आणि वाचलं आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात आली. देव असो की सामान्य व्यक्ती- आयुष्यात संकटं आणि शत्रू कोणालाच चुकले नाहीत! फरक एवढाच की आपल्यावर संकट कोसळलं की आपण देवाचा धावा करतो, देवावर सगळा भार टाकून मोकळे होतो. संकट टळल्यावर काही कृतज्ञ लोक देवाचे आभार मानतात...पण बरेच लोक अगदी सोयीस्कररित्या त्या कर्त्या करवित्याला विसरून जातात. पण देवादिकांच्या वर जेव्हा संकटं येतात तेव्हा त्यांना स्वतःच ती निस्तरावी लागतात.. मग ते एकमेकांच्या मदतीनी त्यांच्या शत्रूवर विजय मिळवतात.

कृष्णाचा शत्रूवर्ग तर अगदी त्याच्या जन्माच्या आधीपासून ते त्याच्या अवतार समाप्तीपर्यंत सक्रिय होता.अगदी सख्ख्या मामापासून ते शकुनीमामा पर्यंत!

आयुष्यात त्याला कित्येकदा अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं... प्रत्येक टप्प्यावर विविध संकटांना आणि शत्रूंना सामोरं जावं लागलं....प्रसंगी अगदी इंद्रदेवाचा रोषही पत्करला त्यानी.

परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी वेळप्रसंगी माघार घ्यायला लागली, पराभव पत्करावा लागला तरी खचून जाऊ नये- हे त्यानी आपल्या कृतीतून दाखवून दिलं ... त्यामुळे कपाळी कायमचा शिक्का बसला- 'रणछोडदास' ! पण त्यानी कधीच या सगळ्याची पर्वा केली नाही.

मला कृष्णाच्या अजून एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. त्यानी कधी कोणाला 'हे कर, ते नको करू' अशा प्रकारचं स्पून फीडिंग नाही केलं.... त्यानी समोरच्या व्यक्तीला सद्य परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीचे विविध मार्ग तर दाखवले पण त्यातला कोणता मार्ग निवडायचा हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर सोपवलं. 'एखाद्या परिस्थितीमधे कोणी कसं वागायचं हे ज्याचं त्यानीच ठरवायचं असतं...' हेच तथ्य लोकांपर्यंत पोचावं म्हणून असेल कदाचित. अर्थातच एखाद्या परीक्षेच्या घडीमधे तुम्ही जो मार्ग निवडाल त्याप्रमाणे तुम्हांला त्याचं फळ मिळेल हेही जगमान्य सत्य आहे.

पण जेव्हा गरज वाटली तेव्हा त्यानी तितक्याच शिताफीनी धूर्तता देखील दाखवली.

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या जे योग्य आहे ते घडवून आणणं ! त्यासाठी 'काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर' - हे मानवाचे षड्रिपु आणि त्या बरोबर 'साम, दाम, दंड ,भेद'- यांपैकी परिस्थितीनुरूप जो योग्य ठरेल तो मार्ग वापरून शेवटी सगळं काही सुरळीत; धर्माला अनुसरून घडवून आणणं!! अशी ही कृष्णाची कृष्णनीती...

तसं पाहिलं तर सगळं काही तोच करत असतो ; आपल्याकडून करवून घेत असतो....त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला तसे संकेत देत असतो. ज्या मानवाला ते संकेत ओळखणं जमलं त्याचं आयुष्य सत्कारणी लागलं!

आपल्याकडे बऱ्याच परिवारांत गर्भवती महिलांना तिसऱ्या महिन्यानंतर 'हरिविजय' ही पोथी वाचायला सांगतात. या पोथीत कृष्ण आणि त्याच्या विविध लीलांचं वर्णन आहे. मी शाळा कॉलेजमधे असताना एकदा माझ्या आजीला विचारलं होतं की "हीच पोथी का वाचायची? विष्णूच्या इतर अवतारांबद्दल किंवा बाकी कुठल्या देवांबद्दल का नाही ?" तेव्हा ती म्हणाली होती की "कृष्ण हा परिपूर्ण देव आहे. तो जसा भोगी आहे तसाच तो योगीही आहे. आयुष्यात भोग आणि योग यांचा समतोल साधण्याचं कसब आहे कृष्णाकडे !"

तर असा हा आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत रंगून जाणारा, प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा कृष्ण .... बालवयात मित्रांबरोबर बाललीला करणारा.. तारुण्याच्या त्या स्वप्नील दुनियेत गोपिकांबरोबर रासलीला करणारा... संपूर्ण विश्वाला आपल्या असंख्य लीला दाखवून तारून नेणारा !!

त्याच्या केसांत खोवलेलं मोरपीस आणि कमरेच्या उत्तरीयात खोचलेली ती बासरी..... कृष्णाच्या अस्तित्वाचे अविभाज्य घटक...तसं पाहता या दोन्ही निर्जीव वस्तू... पण त्या जगदीश्वराच्या नुसत्या स्पर्शानी त्यांना स्वतःचं असं एक अस्तित्व प्राप्त होतं.

आणि त्याची बासरी म्हणजे तर जणू काही त्याची जीवनसंगिनीच .... इतर वेळी निर्जीव, पोकळ असणारी ही बासरी..... पण जेव्हा कृष्णाची जाणीवपूर्वक फुंकर तिच्या आरपार जाते तेव्हा याच अचेतन बासरीतून कर्णमधुर संगीताचे सप्तसूर अवतरतात ! तिच्या असण्याचं सार्थक होतं....

खरंच, किती काही शिकण्यासारखं, समजण्यासारखं आहे या बासरीकडून ....

तिच्याही नकळत ती आपल्याला आपल्या जीवनाचं सार सांगून जाते. आपणही त्या बासरी सारखंच स्वतःचं अचेतन अस्तित्व त्या श्रीकृष्णाच्या हातांत सोपवून निर्धास्त व्हावं... तो आहेच ना आपल्या शरीररूपी बासरीत श्वासांची फुंकर घालायला..... आपल्या रंगहीन आयुष्यात मयूरपंखाचे रंग भरायला !!!

"ओम् नमो भगवते वासुदेवाय" !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिले आहे. तो युगपुरुष आहे, योगपुरुष आहे, योगेश्वर आहे , पुरुषोत्तम आहे. मानवाच्या सगळ्या बौद्धिक, आध्यात्मिक, मानसिक,व्यावहारिक उन्नती आणि उत्क्रांतीचा तो शिखरबिंदू आहे. ह्यापेक्षा अधिक विकसित असा कुणी असूच शकत नाही. त्याचे कार्य, त्याचे व्यक्तिमत्त्व हे प्रत्येकाने आपल्यासमोर लक्ष्य म्हणून ठेवण्याजोगे आहे. चिखलात राहूनही निर्मळ कसे राहावे, भव व्याधी,उपाधीनी लिप्त असूनही अलिप्त कसे असावे, त्यागात भोग आणि भोगात त्याग कसा राखावा, ' तेन त्यक्तेन भुंजीथा:' हे ईशावास्य वाक्य प्रत्यक्ष आचरणात कसे आणावे हे सर्व त्या सख्याकडून शिकावे.

सुंदर लिहीले आहे.
>>>>> इतर वेळी निर्जीव, पोकळ असणारी ही बासरी..... पण जेव्हा कृष्णाची जाणीवपूर्वक फुंकर तिच्या आरपार जाते तेव्हा याच अचेतन बासरीतून कर्णमधुर संगीताचे सप्तसूर अवतरतात ! >>>>>>>>>>
आपल्या शरीराचेही बासरी हे प्रतिक आहे. ९ रंध्रे आणि त्यातून वहाणारा श्वास.