बळे पेलि कोदंड रक्षार्थ धर्म

Submitted by पुरंदरे शशांक on 4 August, 2020 - 15:26

बळे पेलि कोदंड रक्षार्थ धर्म

जनी सज्जनी आज आनंद मोठा
अयोध्यापुरी सोहळे थोर होता
स्वये श्रीप्रभू येउनी मंदिरी या
प्रतिष्ठापिली धर्मकिर्ती ध्वजा या

बळे पेली कोदंड रक्षार्थ धर्म
झणी निर्दळी दुष्टशक्ती कुकर्म
अति प्रेमभावे स्वभक्ता सहाया
पदी राघवाच्या मनोबुद्धी काया

जनी मानसी आज संतोष मोठा
अयोध्यापुरी व्यापूनि भक्तीलाटा
जनी दावितो नित्य कर्तव्यनिष्ठा
स्मरुया गुणा राघवाच्या तदर्था

सदा अंतरी सर्वदा रामराया
जरी भाविता तोचि येतो सहाया
मुखी नाम येणे कृपा ही तयाची
समाधान हे साक्षचि जाण त्याची

दिनाकारणे रामराया त्वरेसी
करी घेई कोदंड रक्षावयासी
बहु कोवसा नित्यचि सज्जनासी
समाधान ते पादपद्मी विशेषी

उभारु गुढ्याही गृहीदारी तोषे
करु स्वागता राघवाचे विशेषे
मनी स्थापना होत सीतापतीची
तरी अंतरी ग्वाही ती सौख्यतेची

अयोध्यापुरी व्यापूनि रामराये
जना अंतरी सर्वदा तोचि होये
सदा रक्षीतो भाविकासी स्वभावे
जये नाम ते सज्जनासी सुखावे

गुढ्या तोरणे लाऊनीया घरासी
करु स्वागता या चला राघवासी
स्वये पावती रामराणा गृहासी
बहु तोष होई जना अंतरीसी

सुशोभून रंगावली अंगणात
गृही दीप लावू गुढ्या ही भरात
किती थोर भाग्ये प्रभू मीलनात
पदी राघवाच्या सुखाने रहात

अयोध्या पुरी सोहळे होत फार
स्वये राघवे लाभते राजद्वार
जरी धाडिले त्या पुन्हा काननासी
अति आदरे पातले स्वगृहासी

सजावे धजावे अयोध्या पुरीने
पुन्हा मानसन्मान घ्यावे प्रभूने
स्वभक्ता सुखे देसि कैवल्यदाने
पदी राघवाच्या समाधान बाणे

....................................................

कोवसा..... आधार

कानन..... अरण्य

.................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

सुंदर...आज मनात नक्की काय वाटतंय हे शब्दात व्यक्त करणे अवघड आहे पण खूप भारी फीलिंग आहे.
वनवास आणि रावणवध केल्यानंतर श्रीराम व सीतामाई स्वगृही परतल्यावर अयोध्येच्या नागरिकांना काय वाटलं असेल त्याचा थोडा तरी अंदाज आज येतोय.

सुंदर नेहमीप्रमाणेच आणि समयोचित !!
सनव...तुम्ही माझ्या मनातले बोललात अगदी.
या पवित्र दिनाच्या रामभक्तांना शुभेच्छा !!

जय श्रीराम !!

खूपच छान लिहिलं आहे.
'दिनाकारणे रामराया त्वरेसी' - इथे दीनाकारणे पाहिजे का? अर्थावरून तसं वाटलं.

हरचंद ... वृृृृृृत्तात येण्याकरता तसे लिहिलंय, अर्थाने दीन च घ्यायचे.

माझेमन ..... जरुर शेअर करणे, मनःपूर्वक धन्यवाद.

सर्वांना मनापासून धन्यवाद.

श्रीरामभक्तांस सादर वंदन.

जय श्रीराम

_____/\____

धर्मा
कुकर्मा

केल्यास वृत्तात बसेल
मराठी काव्यात शेवटी र्हस्व स्वर वापरायची पद्धत नाही,

दीनाचे जना केल्यास अर्थ बदलणार नाही , वृत्तही मोडणार नाही

सुंदर