वाटणी

Submitted by तो मी नव्हेच on 4 August, 2020 - 11:37

आजवर जिनं पोसलं, वाढवलं,
तिच्यावरच रेषा पडत होत्या
जुनी जाणती सारी बांधांची झाडं
अन् त्यावरील चिमण्या बघत होत्या

बांधालाही आता कळेनासे झाले
त्याला अचानक का महत्व आले
सोयीसाठी उभा केलेल्या त्याला
कुंपणाचे ओझे जरा जास्तच झाले

काळजीत आली सारी बांधांचीही झाडं
काय करावं कळंना, सुटंना की हे कोडं
ज्यांनी फांद्यात बसून खाल्ली आंबा,बोरं
तिच लेकरं आता घेती फळ वर्षा आड

भरली विहीर ही आता भरे आणि थोडी
तिच्या डोळ्यांतील पाणी करे कमी गोडी
जरी तिचीही वाटणी आता पोरं करणार
सर्वांसाठीच सारखा तिचा पान्हा झरणार

भरल्या आसवांनी बघती आई बाप सारे
सख्खी पोरं, नातवंडे, घर फाडतीच सारे
बाप पाही फोटोतल्या त्याच्या बापाकडे
त्यांच्या डोळ्यातले दुःख आता एकरूप झाले

-रोहन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users