टोकियो ऑलिंपिक्स 2021 च्या निमित्ताने!

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

दुर्दैवाने या कोव्हिड -१९ पँडेमिक मुळे या वर्षीचे २०२०टोकियो ऑलिंपिक्स पुढच्या वर्षी पर्यंत होणार नाही. या वर्षीच्या ऑलिंपिक्सच्या निमित्ताने मी माझी २००८ मधे मायबोलिवर चालु केलेली ऑलिंपिक्स संबधीत गोष्टींची मालीका मी पुढे चालु करणार होतो. पण यंदाचे ऑलिंपिक्स रद्द केल्यामुळे माझा खुप हिरमोड झाला.

परत नविन गोष्टी लिहीण्याच्या आधी .. थोडी पुर्वपिठीका म्हणुन .. जुन्या मायबोलिवरच्या त्या मालीकेमधल्या मी लिहीलेल्या काही निवडक गोष्टी मी इथे नविन मायबोलिवर टाकत आहे.

प्रकार: 

२००८ वर्ष सुरु झाले व माझ्यासारख्या अनेक क्रिडाशौकीनांना साहजीकच दर ४ वर्षांनी येणार्‍या ऑलिंपीक्स स्पर्धेचे वेध लागले. या वर्षीच्या स्पर्धा बैजिंग येथे अजुन जवळ जवळ २०० दिवसात सुरु होतील. त्या निमित्ताने या बीबीवर ऑलिंपीक संदर्भातल्या मनोरंजक आठ्वणी किंवा माहीती टाकता यावी यासाठी हा बीबी सुरु करावासा वाटला.

लहानपणापासुन सगळ्या खेळांची आवड असल्यामुळे १९७६ पासुन मला या स्पर्धांचे जबरदस्त आकर्षण! फास्टर.. हायर... स्ट्रॉन्गर... असे ब्रिदवाक्य असलेल्या या खेळांबद्दल लिहीताना (व आजच्या अनेक खेळांमधील खेळाडुंच्या उत्तेजक पदार्थांच्या सेवनाच्या बातम्या रोज वाचायला मिळत असताना)मला एका खेळाडुच्या स्फुर्तीदायक गोष्टीने या बीबीची सुरुवात करावी असे वाटते.. ती गोष्ट मी माझ्याकडे असलेल्या 100 years of Olympic glory या ८ व्हिडिओ कॅसेट्स च्या( बड ग्रीनस्पॅन या अतिशय प्रतिभावान दिग्दर्शकाने निर्मीत व दिग्दर्शीत केलेल्या)संचात अनेक वेळा पाहीलेली आहे.. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट बघताना माझ्यातला प्युरिस्ट क्रिडाप्रेमी अजुनही असे मानायला तयार होतो की आज जगातला एक जरी ऍथलिट या गोष्टीतल्या ऍथलिटसारखा असेल तर त्या अशा एका ऍथलिटसाठी मी ऑलिंपीक स्पर्धा बघायला तयार आहे...

तर ही गोष्ट आहे १९६८ मेक्सिको सिटी ऑलिंपीकची. स्पर्धेचा शेवटचा दिवस.. ऑलिंपीक्स स्पर्धेच्या ट्रॅडीशनप्रमाणे स्पर्धेची सांगता ही नेहमी मॅरेथॉन शर्यतीने होते. त्याप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता ही मॅरेथॉन शर्यत सुरु झाली. २६ मैलाची ही शर्यत साधारणत: सगळे सव्वा दोन ते तिन तासात पुर्ण करतात.साधारणपणे ९ वाजता ती स्पर्धा मेन ऑलिंपीक स्टेडीअममधे संपुन मग स्पर्धेचा क्लॉजींग सेरीमनी पार पाडायचा असा संयोजकांचा बेत असतो.

या शर्यतीत भाग घेणारे सगळे ५ वाजता धावण्यास सुरु झाले. सगळे रप रप असा ठेका घेत आपापल्या स्ट्रॅटीजीप्रमाणे वेग घेउ लागले. आणी अचानक एक टांझानियन स्पर्धक अडखळुन ठेच लागुन खाली पडला. ठेच अगदी साधीसुधी नव्हती.... त्याच्या उजव्या पायाला जबरदस्त खरचटुन रक्तस्त्राव सुरु झाला.तेवढेच नाही तर त्याच्या उजव्या गुढग्याचा सांधा निखळला. अतिशय वेदनेने तो स्पर्धक कोलमडला. बाकीचे सर्व स्पर्धक त्याला मागे टाकुन केव्हाच पुढे गेले. हा थोडा वेळ एक हात डोक्याला व एक हात उजव्या गुढग्यावर ठेवुन वेदनेने विव्हळत डोळ्यात पाणी येउन बसुन राहीला. पण दोनच मिनीटात त्याने त्याच्या पायावरच्या जखमेवर कपडा गुंडाळला व अडखळत अडखळत उभा राहीला व लंगडत लंगडत, अतिशय वेदना होत असुनसुद्धा पुढचे २५ मैलाचे अंतर काटण्यास त्याने जिद्दीने सुरुवात केली.

इथे त्याच्या पुढे गेलेले सर्व स्पर्धक एका मागुन एक असे मेन ऑलिंपीक स्टेडीअम मधे येउन पोहोचले. पहिला, दुसरा, तिसरा असे सुवर्ण पदक,रजत पदक व ताम्र पदक जिंकणारे निश्चीत झाले. दहावे विस्सावे,तिस्सावे वगैरे पण शर्यत संपवुन मेन ऑलिंपीक स्टेडीअम मधे परत आले. आता जेव्हा २० ते २५ मिनिटे कोणीच येइनासे झाल्यावर स्पर्धेच्या क्लोजींग सेरिमनीला संयोजकांनी सुरुवात केली.

इथे तो टांझानियन स्पर्धक लंगडत लंगडत का होइना..आपला मजल दरमजल करत मेन ऑलिंपीक स्टेडीअमकडे वाटचाल करतच होता.

इकडे स्पर्धेची क्लोजींग सेरिमनी संपलीसुद्धा. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आले की अरे अजुन एक स्पर्धक जखमी अवस्थेत असुनसुद्धा स्पर्धा पुर्ण करण्याचा प्रयत्न करत मैदानाकडे येत आहे.

मोठ्या जंबोट्रॉनवर त्याचे थेट प्रक्षेपण दाखवायला सुरु झाले व जे खरे दर्दी व क्रिडाशौकीन होते ते हजारोंच्या संख्येने टाळ्या वाजवत व जंबोट्रॉनकडे बघत त्या स्पर्धकाची वाट बघत स्टेडीअममधेच थांबले.

सरते शेवटी अतिशय दमलेल्या अवस्थेत रात्री बाराच्या सुमारास या स्पर्धकाने मेन ऑलिंपीक स्टेडीअममधे प्रवेश केला. त्याला माहीतही नव्हते की स्टेडीअममधे कोणी त्याची वाट पाहात असेल म्हणुन!लंगडत लंगडत तो जेव्हा स्टेडीअममधे प्रवेशकर्ता झाला तेव्हा जे काही ५-१० हजार लोक त्याची वाट पाहात ताटकळत इतक्या उशीरापर्यंत बसले होते त्या सगळ्यांनी त्याचे टाळ्यांच्या कडकडात त्याचे सुवर्णपदक विजेत्यासारखे स्वागत केले! त्या स्पर्धकानेही शेवटची एक फेरी स्टेडीअमला घालताना दोन्ही हात वर करुन,डोळ्यातले अश्रु आवरत लंगडत लंगडत एकदाची अंतिम रेषा पार केली व एकदम कोलॅप्स होउन जमिनीवर पडला पण टाळ्यांचा कडकडाट मात्र चालुच होता....

त्या स्पर्धकाची मुलाखत घ्यायला एक वार्ताहर पुढे झाला.. त्याने त्याचा माइक पुढे करुन त्याला विचारले... अरे इतका जखमी झालेला असताना व वेदनेने विव्हळत असुनसुद्धा तु शर्यत का नाही सोडलीस? त्या स्पर्धकाने पटकन उत्तर दिले.... "माझ्या देशाने मला इथे ५००० मैल दुर शर्यत सुरु करण्यासाठी नव्हते पाठवले.... शर्यत पुर्ण करण्यासाठी पाठवले होते....."

त्या स्पर्धकाचे नाव होते...जॉन स्टिव्हन अखवारी.....

हॅट्स ऑफ टु जॉन स्टिवन अखवारी, आणि ते दर्दि ५-१० हजार शेवट पर्यंत थांबणारे प्रेक्षक. परत एकदा धन्यवाद मुकुंद, हि मालिका नविन माबोवर आणल्याबद्दल..

धन्यवाद मुकुंद.... असे खेळाडू दुर्मिळ आणि त्यांच्यावर जीव लावणारे क्रीडप्रेमीही.....
किती निर्धार, सहनशक्ती आणि देशभिमान असेल त्यांचा. शब्दच सुचत नाहीयेत....
पाहिले त्या धन्य माणसाला यूट्यूबवर शोधून शेवटी. 100 Years of Olympic Glory (Documentary, Part 2 - 1996) मध्ये आहेत. (शेवटी १:१७ ते १:२२ दरम्यान)

मुलाखत घ्यायला एक वार्ताहर पुढे झाला.. त्याने त्याचा माइक पुढे करुन त्याला विचारले... >>>>> माईकवाल्यांचा हा बिनडोक उद्योग १९६८ पासूनचा आहे?! जखमी होऊन ७ तास धावलेल्या माणसालाही 'अब आपको कैसे लग रहा है?'

मुकुंद,
मायबोलीच्या साच्यात गेल्या काही वर्षात बदल झाले आहेत, त्यामुळे रंगीबेरंगी मधे लिहिलेले , तुलनेने जास्त वाचले जात नाही . तुम्ही इथे लिहले तरी हरकत नाही, पण त्यापेक्षा खेळाच्या मैदानात (किंवा क्रिकेटबद्दल असेल तर खेळाच्या मैदानात -क्रिकेट) या ग्रूपमधे लिहले तर जास्त लोक वाचतील.

वेबमास्टर.. मी बदल केला आहे पण मला परत दुसरा धागा उघडावा लागला. त्यामुळे लिखाण दोन हेडींग्स ( ग्रुप्स) मधे येउन डुप्लिकेट झाले आहे.

हा बदल तुम्ही म्हणता तसा झाला आहे की नाही हे मला सांगाल का? आणी नसेल झाला तर तुम्हाला तो करता येइल का?

आणी बदल हवा असेल तसा झाला असल्यास डुप्लिकेट झालेला धागा तुम्ही उडवु शकता का?