मीच सजा भोगायला हवी

Submitted by निशिकांत on 31 July, 2020 - 23:03

(लघु कथा--प्रकार--अलक}

कार जवळ जवळ अर्ध्या तासापासून प्रवास करत होती. रस्ता संपता संपत नव्हता. निर्जन प्रदेश सारा. गाडीत दोघेच!  मुलगा निरंजन ड्राइव्ह करत होता आणि मागे त्याची वृध्द आई. दोघेही शांत शांत. आईला माहीत नव्हते मुलगा कोठे  घेऊन जातोय ते. समोर एक मोठी वास्तू दिसली. कंपाउंडवर लावलेल्या पाटीवर वृध्दाश्रमाचा बोर्ड पाहून आईच्या काळजात चर्रर्र झाले आणि ती समजून चुकली काय ते.
गेटमधे गाडी थांबवून मुलगा म्हणाला की आई आता तुला ४/५ वर्षे इथेच रहायचे आहे. आम्ही अमेरिकेतून चार वर्षांनी परत येवू तेंव्हा पुन्हा तुला घरी घेऊन जाईन नक्की. येथे तुला कांही कमी पडणार नाही. खूप कॉस्टली आश्रम आहे हा. मी एका वर्षाचे पैसे भरले आहेत आणि नंतर मी पाठवीत जाईन. तू कांही काळजी करू नकोस. मी आठवड्याला तुला फोन करून तुझ्या संपर्कात राहीन.
दोघेही भावविभोर झाले होते. सर्व कागदपत्रावर सह्या करून मुलगा परत निघाला.
मुलाने आईकडे पाठ वळवली आणि शर्टाच्या बाहीने डबडबलेले डोळे पुसले. आईने एक आवंढा गिळत मुलाला हाक दिली आणि म्हणाली निरंजन, तू रडू नकोस बाबा! सजा तर मला भोगायचीय रे! पोटाला मुलगा जन्माला यावा म्हणून मी तू जन्माला यायच्याआधी तीन स्त्रीभ्रुणाच्या हत्येचं पाप केलय रे! एवढे म्हणून पदराने डोळे पुसत ती वृध्दाश्रमात निश्चयाने तरातरा गेली.

निशिकांत देशपांडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त मेसेज....
बाय द वे वृद्धाश्रम म्हणजे वाईट हे जनरलायझेशन आहे... सेम एज ग्रुप वाल्या लोकांबरोबर वेळ व्यतीत करायला मिळणे ही देखील भाग्याची गोष्ट आहे...

कधी कधी दुसरा काही पर्याय हि नसतो... घरी एकटे राहण्यापेक्षा केव्हाही बरे.. आमचे शेजारी आजोबा ९० आणि आजी ८७.. मुलगा ऑस्ट्रेलिया मध्ये असतो. ४ महिने झाले ..आजोबा घरातून बाहेर नाही पडले.. म्हणजे मीच बाहेर नाही पडू दिले.. मी सगळे आणून देते.. भाजी.. वाणसामान मासे.. सगळे.. आजी कामवाल्या बाई ठेवली तर तिच्याशी अड्जस्ट करत नाहीत. त्यामुळे बाई पण नाही.. पैशाला तोटा नाही..आता दर २ दिवसांनी आजोबांची शुगर डाउन होते. २ दिवसापूर्वी अचानक रात्री २ वाजता त्याना चक्कर आली.. दुसऱ्यादिवशी सकाळी ते मला सांगत होते.. एकदा रात्री आपापल्या फ्लॅट चे दरवाजे बंद झाले.. मग कोण जातंय कोणाकडे.. माझ्या पण काही मर्यादा आहेत .. मी काही खास बनवले कि नेऊन देते.. पण बाकीची घरातली कामे तर त्यांनाच करावी लागतात.. खूप थकले आहेत काका. नातेवाईक खूप आहेत.. पण कोणी येत नाहीत.. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवून मोकळा होतो.. आजपण सकाळी सांगत होते..काल रात्री पुन्हा चक्कर आली म्हणून.. मला तर खरंच काळजी वाटते त्यांची.. चक्कर येऊन पडले कुठे फ्रॅक्चर झाले तर काय ? मग अशावेळी मला वाटते.. वृद्धाश्रम चांगले.. तिथे त्यांना वेळेवर मदत मिळेल.. थोडा आरामही हि मिळेल..