उजळले लक्ष दीप

Submitted by सनव on 29 July, 2020 - 01:09

श्रावणाचे दिवस एकेक पुढे सरकत होते. माई कालनिर्णय बघून एकेक दिवस आपल्या परीने एकटीने साजरा करत होत्या. पहिल्या दिवशी खीर पुरण झालं. नागपंचमीला पातोळ्या केल्या.

बघता बघता लॉकडाऊन सुरू होऊन चार महिने झाले. दिवसातील अनेक तास काचेच्या बंद खिडकीतून बाहेर बघत माई बसायच्या. एकेक जुन्या आठवणी यायच्या.

माईंना- म्हणजे नर्मदाला- शिकायची खूप आवड होती. पण घरच्या परिस्थितीमुळे शाळेनंतर शिक्षण सुटलं. "कॉलेज वगैरे श्रीमंती चोचले मला परवडायचे नाहीत" असं नानांनी सांगूनच टाकलं होतं. नानांनी योग्य वेळी स्थळ शोधून नर्मदेचं माधवरावांशी लग्न करून दिलं. सुखाचा संसार सुरू झाला. पण नर्मदेची कूस उजवली नाही. दहा बारा वर्ष उलटली. सुरुवातीला आडून आडून आणि नंतर थेटच चौकशी, पुढे अघोषित सामाजिक बहिष्कार आणि टोमणे हे सगळं तिच्या वाट्याला आलं. माधवराव मात्र तिच्यासोबत ठाम उभे होते, तिला एका शब्दाने दुखवत नव्हते.

पुढे शिकायला किंवा काही अर्थाजन करायला घरून परवानगी मिळणं अशक्य होतं. पण वाचनालयाची फी भरायला माधवराव तयार होते. मग नर्मदा भरपूर वाचन करू लागली. त्यात तिचं मन रमायचं.

असंच एकदा परगावाहून आलेल्या पाहुण्यांना शहर दाखवायचं म्हणून घरापासून जरा लांब असलेल्या गणपतीच्या देवळात नर्मदा आणि माधवराव पाहुण्यांसोबत गेले. देवासमोर नर्मदेने हात जोडले आणि मनातलं मागणं आपसूक ओठावर आलं-"मला बाळ होऊ दे." देवाची कृपा म्हणा किंवा योगायोग, पण नर्मदेला दिवस गेले आणि सुखरूप प्रसूती होऊन मेधा झाली.

मेधा झाल्यावर माधवराव तर खूपच बदलले. इतक्या वर्षात त्यांना लहान मुलांची आवड असेल असं त्यांनी कधीच जाणवून दिलं नव्हतं पण स्वतःची लेक जन्मल्यावर त्यांच्यातला प्रेमळ पिता जागा झाला. खेळ, कपडे, खाऊ, पुस्तकं- मेधाला कशाचीच कमी नव्हती. वडिलांचं रूप आणि आईचा समजूतदारपणा घेऊन जन्माला आलेली मेधा हुशार होती, विचारी होती. वडिलांच्या लाडाने ती बिघडली नाही. आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन, आईवडिलांना पसंत पडेल असा जोडीदार स्वतः निवडून आज लंडनला नोकरी, संसार, मुलगा सर्व काही छान सांभाळत मजेत राहात होती.

काही वर्षांपूर्वी माधवराव निर्वतले. मेधा तिच्या आयुष्यात व्यग्र होती. आसपासच्या ओळखीच्या काही बायकांशी नर्मदेचं बोलणं व्हायचं. त्यातूनच संस्कारवर्गाची कल्पना निघाली. सुरुवातीला फारशी धार्मिक नसलेली नर्मदा मेधाच्या जन्मानंतर मात्र धार्मिक आणि आध्यात्मिक उपासनेकडे वळली. त्या गणपतीच्या देवळात ती जमेल तेव्हा जातच होती. माधवराव फारसे धार्मिक नसले तरी त्यांचा तिला विरोध नव्हता.

आता आसपासच्या बायकांची इच्छा होती की त्यांच्या लहान मुलांना नर्मदेने म्हणजे माईंनी जरा काही स्तोत्रं वगैरे शिकवावं. ती सहजच तयार झाली आणि बघता बघता त्या छोट्या स्तोत्रवर्गाचं रूपांतर खेळांगण मध्ये झालं होतं. इथे लहान मुलांना केवळ स्तोत्रपठण नव्हे तर शारीरिक व्यायाम, विविध खेळ, छंद, योगासनं, गाणी, गोष्टी, हस्तकला, चित्रकला असं बरंच काही करता येत होतं. एका शाळेने आपल्या मैदानाचा एक भाग खेळांगण साठी वापरायला परवानगी दिली होती. माईंना अनेक वर्षांनी आपला सूर सापडला होता. नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि शिकवण्याची त्यांची इच्छा आता पूर्ण होत होती. इतकी वर्षं त्या नुसत्याच भरपुर वाचन करायच्या. आता त्यांना वाचलेलं सगळं प्रयोगातून अप्लाय करता येऊ लागलं.

खेळांगण चं सगळं काटेकोर प्लॅनिंग त्या एखाद्या मॅनेजमेंट प्रोफेशनलला लाजवेल इतक्या व्यवस्थित पध्दतीने करत असत. काही पालक त्यांना सहकारी म्हणून मदत करत होते. शिवाय मदतनीस म्हणून जानकीमावशी आणि मैदानाची व कार्यालयाची निगराणी करायला सोपान नावाचा माळी/हरकाम्या ही विश्वासू माणसं नेमलेली होती. माईंनी लॅपटॉप, अँड्रॉइड सर्व शिकून घेतलं होतं. सगळं छानच सुरू होतं.

आणि अचानक करोना नावाचा काहीतरी विषाणू शहरात आला. इकडे एक केस सापडली, तिकडे दोन केस सापडल्या. खेळांगण निदान काही दिवस तरी बंद ठेवायला हवं हे माईंनी ठरवलं. खरंतर त्यावेळी खेळांगण तर्फे एक नाटकाचा प्रयोग होणार होता. कपडेपट, सेट्स सर्व तयारी झाली होती. नाटक बसलं होतं. त्यामुळे मुलं खूपच हिरमुसली. पण इलाज नव्हता.
आणि आता हे शहरच असं बंद पडलं होतं. माई अस्वस्थ होत्या. मेधाने त्यांना आपल्याकडे निघून यायचा आग्रह केला होता. पण त्या गेल्या नाहीत. जानकी आणि सोपानला तीन-तीन महिन्याचा आगाऊ पगार त्या स्वतःच्या खिशातून देऊन टाकत होत्या. खेळांगण चा हिशोब चोख असायचा. पण काही पालकांनी पुढच्या महिन्यांचे पैसे आगाऊ भरलेले असायचे. ते त्यांनी परत मागितले नसले तरी माई ते परत करण्याच्या तयारीतच होत्या. खेळांगण च्या नाटकाचा हिरो प्रथमेश. त्याच्या आईचा घाईघाईत मेसेज येऊन गेला होता. त्याच्या वडिलांची नोकरी गेल्यामुळे ते त्यांच्या मूळ गावी परत चालले होते. कदाचित परत कधीच भेट होणार नव्हती. अशी किती मुलं आता दुरावणार होती..माईंना कळेना.

शेजारच्या कुटूंबाने माईंना सांगितलं होतं- काही सामान वगैरे आणायचं असल्यास आम्हाला सांगा. पण माई त्यांना फार काही सांगत नव्हत्या. त्यांनी आपल्या गरजाच कमी केल्या होत्या. उगाच आपल्या सामानाची व्यवस्था करताना त्या घरातील कोणाला करोना व्हायला नको. एरवी रोज खेळांगण च्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या माई आता फक्त कोपऱ्यावरच्या दुकानापर्यंतच जात होत्या..तेही क्वचित.

खेळांगण इतक्यात सुरू होणार नाही हे सत्य स्वीकारून माईंनी अकाऊंटचे डिटेल मेधाला इमेल केले. आगाऊ फी भरलेल्या पालकांना संपर्क करून त्यांना ऑनलाइन पैसे देऊन टाकण्याची जबाबदारी तिने घेतली होती. हे काम तिला परदेशातून करणं शक्य होतं.

माईंचा वेळ घरात बसून अध्यात्म, उपासना यातच जात होता.

श्रावण गेला, गणपती उत्सव कधी आला कधी गेला कळलंच नाही. दसरा-दिवाळी झाले. आणि खेळांगण च्या शांत झालेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा सुरू झाली. शाळा सुरू होत होत्या.कार्यालये सुरू झाली होती. आता मुलांना खेळांगण ची प्रतीक्षा होती.

पुनश्च हरी ओम म्हणून माईंनी सुरुवात केली. जानकी व सोपानच्या मदतीने ऑफिस आणि मैदान नीट स्वच्छ व तयार केलं. मार्गशीर्षाच्या पहिल्या दिवशी मुलं आणि पालक अनेकानेक महिन्यांनी खेळांगण वर जमले. तेव्हढ्यात मेधाचा फोन आला. "अगं आई तुला एक सांगायचंय. मी सर्व पालकांना पैसे परत करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला. त्यावर गप्पा मारताना कोणीही पैसे घ्यायला तयार नव्हतं. मग त्यात मी आणि तेजसने आणखी भर घातली, इतर पालकांनी भर घातली, आम्ही आमच्या परिचितांकडूनही पैसे जमवले आणि आता कोविद फ्रंटलाईन वर्कर्स व त्यांच्या परिवारासाठी एक कायमस्वरूपी फ़ंड जमवला आहे. सगळं आम्हीच बघणार आहोत, तुझ्या फक्त कानावर घालतेय."

मेधाशी बोलणं होतंय तोच स्पृहाची आई माईंना शोधत आली. "माई, आपल्या अद्वयचे बाबा सर्जन आहेत. ते आज मुलांशी करोना काळातील अनुभवांबद्दल बोलणार आहेत. चालेल ना? वीसेक मिनिटांचा कार्यक्रम करू या." माईंनी स्मित केलं-"युध्दस्य कथा रम्या".

नेहमीप्रमाणे प्रार्थनेने रोजच्या सेशनला सुरुवात झाली. माईंनी सुरुवात केली-"बरं का बाळांनो, आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आहे. आजचा दिवस सत्ययुगाचा पहिला दिवस मानला जातो. भगवदगीतेतही मार्गशीर्षाचं महत्व श्रीकृष्ण सांगतात. आज योगेश्वर श्रीकृष्णाचे पूजन आणि अद्वयच्या बाबांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण नव्याने सुरुवात करणार आहोत..

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद!

मार्गशीर्ष ही चालेल
\\
Hope so!

मार्गशीर्ष.. ३ च महिने राहिलेत..खूप छान वाटले वाचून..सगळे पूर्वपदावर येऊ दे लवकर..

थँक्स मोहिनी!
मीही नुकतंच मैत्रिणीशी बोलताना तिने सांगितलं की आता भारतात ओलमोस्ट सर्व सुरू झालं आहे Happy