मोहम्मद रफी: अखेरचा दिवस...

Submitted by अतुल. on 31 July, 2020 - 07:59

३१ जुलै १९८०. रफीसाहेबांसाठी तो एक नेहमीचा दिवस होता. सकाळी सहाच्या दरम्यान उठून नेहमीप्रमाणे बाल्कनीत बसून एका हातात बिनसाखरेच्या चहाचा कप तर दुसऱ्या हातात रेकॉर्डिंगसाठी तयार असलेल्या गाण्याचा कागद. चहाचे घोट घेत घेत, मेहुणे झहीर यांनी उर्दूमध्ये सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या त्या ओळी त्यांनी काळजीपूर्वक डोळ्याखालून घातल्या. सूर्योदयाबरोबर उठणे हि लहानपणापासूनची सवय. तो दिवस सुद्धा अपवाद नव्हता.

त्या दिवशी गुरुवार होता. आज कलकत्त्याहून एक-दोघे संगीत दिग्दर्शक भेटायला यावयाचे होते. एक दोन बंगाली गाणी रेकॉर्ड करायची होती. खरेतर आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत रेकॉर्डिंग सुरु होते. रफी खूप थकले होते. त्यांना वास्तविक विश्रांतीची खूप गरज होती. पण हे इतक्या लांबून भेटायला येत आहेत तर त्यांना ऐन वेळी नाही म्हणणे योग्य नव्हे अशी रफींची भूमिका होती. भेटायला आलेल्या कोणीही नाराज होऊन परत गेले नाही पाहिजे हा त्यांचा शिरस्ता होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे ते नऊ वाजता रफींसाहेबांच्या घरी आले. "रफी मॅन्शन" हे रफींचे निवासस्थान. भेटायला येणाऱ्यांसाठी खाली लिविंग रूम. आणि वरती बेडरूम बाल्कनी इत्यादी. त्या दिवशी लिविंग रूममध्ये रफिसाहेबांकडून हे बंगाली संगीतकार गाण्याचा सराव करून घेत होते. ज्या सहजतेने आणि सफाईदारपणे रफी काही क्षणातच गाणे ते बंगाली गीत आत्मसात करून संगीतकारांना अगदी हवे तसे गाऊन दाखवत होते ते पाहून ते संगीतकार विस्मयचकित झाले होते. केवळ एकदोन उच्चारांच्या चुकाच काय त्या सांगाव्या लागल्या. असे सांगितले जाते कि हा सराव सुरु असतानाच रफींच्या छातीत बारीक वेदनेची कळ सुरु झाली असावी. पण ते त्यांनी ते बोलून दाखवले नाही. इतक्या लांबून आलेल्या संगीतकारांच्या रिहर्सल मध्ये व्यत्यय येईल असे बहुधा त्यांना वाटले असावे. किंबहुना तो त्यांचा स्वभावधर्मच होता.

गाण्यांचा सराव झाला. संगीतकार निघून गेले. एव्हाना छातीतली कळ वाढून रफींची अवस्था बिकट झाली होती. जिना चढून ते बेडरूममध्ये गेले. नेमके त्याच दिवशी मिसेस रफी (बिल्किस रफी) तापाने आजारी होत्या व त्यामुळे अद्याप झोपूनच होत्या. रफींनी बेडरूममधील कपाटामधून सोडामिंटची बाटली (आम्लपित्त झाल्यास त्या काळात हे सर्रास घेतले जायचे) घेतली तेंव्हाच डोळे किलकिले करून मिसेस रफींनी त्यांना, "काय झाले? तब्येत ठीक आहे का?" असे विचारले. तेंव्हा रफींनी सांगितले कि थोडा त्रास होतोय, कदाचित ऍसिडिटी असेल म्हणून सोडामिंट घेतोय. सोडामिंट घेऊन ते खाली पुन्हा लिविंग रूम मध्ये आले आणि सोफ्यावर बसले.

थोड्या वेळानंतर बिल्किस यांना, कसे कुणास ठावूक, पण आपल्या नवऱ्याच्या बाबत काहीतरी विपरीत घडत असल्याची जाणीव झाली. त्या खाली आल्या. त्यांच्या अतींद्रिय शक्तीलाच ते जाणवले असावे जणू. अन्यथा तापाने फणफणलेल्या अवस्थेतही त्या खाली आल्या नसत्या. तिथे सोफ्यावर रफींना विचित्र पद्धतीने विव्हळत बसलेले त्यांनी पाहिले. बिल्किस यांना पाहताच वेदना जाणवून न द्यायचा ते आटोकाट प्रयत्न करत होते. पण त्यांचा चेहराच सर्व काही सांगत होता. बिल्किस यांनी क्षणात आपले आजारपण विसरून त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी झहीर यांना जोरात हाक मारली व तत्काळ डॉक्टरांना बोलवायला सांगितले. डॉक्टर अलीम चंदीरामाणी, रफींच्या बंगल्यापासून जवळच, केवळ दोन बंगले सोडून तिसऱ्या बंगल्यात राहत होते. ते जनरल सर्जन, तसेच रफींचे अत्यंत चांगले मित्र होते. ते येईपर्यंत रफींच्या पाठीवर बिल्किस त्यांना आराम पडावा म्हणून असहायपणे हलक्या हाताने मसाज करत राहिल्या. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले रफिसाहेबांची बोटं निळसर झाली होती. झहीर यांनी बोलवताच डॉक्टर चंदीरामाणी यांनी ताबडतोब धाव घेतली.

वयोवृद्ध डॉक्टर चंदीरामाणी आठवतात आणि सांगतात, "मी आल्या आल्या पाहिले. रफींना अत्यंत वेदना होत होती. त्यांना तपासताच मला लक्षात आले कि त्यांचा रक्तदाब प्रचंड वाढला होता आणि ते घामाने थबथबले होते. हि ह्रदयविकाराचा झटका आहे हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही. त्यांना मधुमेह आहे हे मला माहित होते. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका लगेचच प्राणांतिक ठरू शकतो हे माहीत असल्याने मी काही काही तत्काळ उपाययोजना केली आणि लगेचच नॅशनल हॉस्पिटलचे (सध्याचे हिंदुजा) ह्रदयरोगतज्ञ डॉ. निचाणी यांना फोन केला आणि रफिसाहेबांच्या तब्येतीविषयी त्यांना माहिती दिली. एव्हाना मला कल्पना आली होती कि प्रकरण गंभीर आहे. त्यानंतर वीस-पंचवीस मिनिटात रुग्णवाहिका आली. पण रफिसाहेबानी आपल्या फियाट मधूनच जाण्याचा आग्रह धरला (कि जी त्यांचा विश्वासू ड्रायवर कासीम हा चालवत असे). मग सोबत पत्नी बिल्किस व मुलगा शाहीद यांना घेऊन ते फियाट मधून त्वरेने हॉस्पिटलकडे जाण्यास निघाले. हाताशी वेळ फार कमी होता. हॉस्पीटलमध्ये पोहोचताच वेळ अजिबात वाया न घालवता त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज होती. म्हणून त्यांच्या कार पाठोपाठच मी माझी कार ठेवली"

हॉस्पिटलमध्ये रफीसाहेबांना तपासताच डॉ. निचाणी यांची लगेचच खात्री झाली कि हा हृदयविकाराचा तीव्र झटका आहे. पुढच्या काही तासातच त्यांच्या सोबत इतर हृदयरोगतज्ञांनी मिळून रफींची तब्येत थोडीफार स्थिर ठेवण्यात यश मिळवले. पुढील चाचण्या व तपासण्या करून त्यांना पेसमेकर बसवण्याच्या निर्णयाप्रत डॉक्टर आले. दुर्दैवाने त्या काळात त्या हॉस्पीटलमध्ये पेसमेकर उपलब्ध नव्हता, त्यामुळे अर्थातच तत्काळ ह्रदयशस्त्रक्रिया करणे सुद्धा शक्य नव्हते. १९८० साली पेसमेकर हे आजच्या सारखे सहज उपलब्ध होणारे उपकरण नव्हते. त्यामुळे या हृदयरोगतज्ञांनी रफींना लगेचच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. कारण तिथे पेसमेकर उपलब्ध होईल याची त्यांना खात्री होती. म्हणून हृदयरोगतज्ञ व इतर डॉक्टरांच्या एका टीमच्या देखरेखीखाली रफींना तेथून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवले गेले.

या प्रवासात असतानाच माहीम आणि मरीन लाईन्सच्या दरम्यान रफींना दुसरा तीव्र झटका आला. बॉम्बे हॉस्पिटलला जायला जवळजवळ पंचेचाळीस मिनिटे लागली. हा कालावधीच निर्णायक ठरला. संध्याकाळी जवळपास सहा वाजता रुग्णवाहिका बॉम्बे हॉस्पिटलला पोहोचली. पोहोचताक्षणीच त्यांना ऑपरेशन थियेटरमध्ये नेले गेले. सर्जन आणि विविध वैद्यकीय तज्ञ मिळून रफींना जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. एव्हाना त्यांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तो रमझानचा महिना होता. सायंकाळच्या नमाजात त्या सर्वांनी रफींच्या तब्येतीच्या सुधारणेसाठी आर्जव केले.

साधारणपणे सव्वा तासात रफींवरची ह्र्दयशस्त्रक्रिया पार पडली. त्यांना पेसमेकर बसवला गेला. ऑपरेशन थियेटर मधून त्यांना आयसीयू मध्ये नेण्यात येत असताना बिल्किस यांनी त्यांचा हात हातात घेतला आणि गदगदलेल्या आवाजात बोलल्या, "आता तुम्ही मला सोडून एका क्षणासाठी सुद्धा बाजूला जायचे नाही"

रात्री पावणे दहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिये नंतर देण्यात येणारे सलाईन, ऑक्सिजनची नळी व इतर आवश्यक उपकरणे बसविली. अखेर जेंव्हा ते शुद्धीवर आले तेंव्हा अत्यंत क्षीण हालचाली करून ते सलाईन व त्या नळ्या काढण्याचा प्रयत्न करू लागले. बिल्किस यांना ताबडतोब आत बोलवले गेले. त्यांनी रफींना सांगितले शांत रहा हालचाल करू नका. आणि अवसान आणून म्हणाल्या, ऑपरेशन व्यवस्थित झालंय, आता लगेच तुम्ही बरे व्हाल मग जाऊ आपण घरी.

रफींची कन्या नसरीन. डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये जाण्याची परवानगी दिली. तिच्या मावशीचे पती रफींसाठी कुराण वाचत होते. आत येताच नसरीनने वाकून आपल्या वडीलांच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाली "अब्बा जान, तुम्ही लवकरच बरे होणार आता". रफींनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. फक्त एकवार टक लावून तिच्याकडे पाहत राहिले. मात्र, त्यांच्या नजरेतून त्यांना काहीतरी बोलायचे आहे असे जाणवत होते. आयसीयूमधून बाहेर पडताना तिने मागे वळून पाहिले. त्यांची नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे होते. रात्री सव्वा दहाच्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटलचे ह्रदयरोगतज्ञ डॉ. मोदी यांनी बिल्किस यांना बोलावून घेतले आणि सांगितले कि रफीसाहेब आपल्या सर्वाना सोडून गेले. बिल्किस यांच्या अंगातील ताप अद्याप उतरला नव्हता. हे ऐकून त्यांना भोवळ आली.

शाहीद, तेंव्हा अवघा अठरा एकोणीस वर्षाचा असेल, हे ऐकताच कोसळला. छत्र हरपले होते. त्याच्या खांद्यांवर आता त्याच्या अब्बूंचा आश्वासक हात कधीही पडणार नव्हता. रफींच्या चार मुलांपैकी तेंव्हा सर्वात धाकटा शाहीद हा एकटाच तिथे होता. बाकी तिघे तेंव्हा लंडनमध्ये होते. डॉक्टरांनी शाहीदला बिल्किस यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. बिल्किस यांना विश्रांतीची तीव्र गरज होती. रफिंचे पार्थिव ताब्यात मिळण्यासाठी औपचारिक बाबी पूर्ण होण्यास बराच अवधी लागेल हे हॉस्पिटलकडून स्पष्ट करण्यात आले. तेंव्हा शाहीदसमोर आजारी असलेल्या व धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या असलेल्या बिल्किस यांना घरी घेऊन जाणे हा एकच पर्याय होता. रफींच्या अंत्यदर्शनासाठी घराच्या परिसरात हजारोंची गर्दी होणार हे त्या कुटुंबाने जाणले. त्यामुळे हॉस्पिटलवर भरोसा ठेवून सकाळी अंत्ययात्रा निघेपर्यंत मृतदेहाची काळजी घेतली जाईल या विश्वासावर ते घरी निघून गेले.

झहीर आणि लेस्ली (ड्रमर. हा रफी यांच्या शो मध्ये त्यांच्या सोबत नेहमी असायचा) हे दोघेच हॉस्पिटलमध्ये थांबले. मृतदेहाकडे कोणाचे फार लक्ष नाही असे त्यांना जाणवले. झहीर औपचारिकता पूर्ण करण्यात गुंतला होता तर लेस्लीला दमट व गरम वातावरणात मृतदेहाचे काय होईल याची काळजी लागली होती. रात्री केंव्हातरी दीडच्या पुढे केर्सी लॉर्ड (संगीतकार व रफिंचे एकेकाळचे शेजारी), भूपिंदर सिंग (गायक) आणि उत्तम सिंग (संगीतकार) या तिघांना हे वृत्त समजताच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. केर्सी लॉर्ड सांगतात, "आम्ही पोहोचलो तेंव्हा हॉस्पिटल प्रशासनाच्या औपचारिक मागण्यांची पूर्तता करता करता झहीरची प्रचंड दमछाक झाली होती. त्याचा धीर सुटू लागल्याचे जाणवत होते. रफींसाहेबांचे पार्थिवाचे आम्हाला दर्शन हवे होते. अखेर हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला खाली शवागारात जाण्यास सांगितले. दुर्दैवाने तिथले एसी तेंव्हा सुरु नव्हते. वातावरणात फारच उकाडा आणि दमटपणा असल्याने मृतदेहाचे विघटन होऊ नये म्हणून हॉस्पिटल प्रशासनाने तो बर्फाच्या लाद्यांवर ठेवला होता". तिथे पोहोचताच भूपिंदर सिंग यांनी हॉस्पिटलमधल्या अखेरच्या कागदपत्रांची जबाबदारी घेतली. झहीर आणि केर्सी यांनी सकाळी मृतदेह घरी नेण्यासाठी लागणाऱ्या गाडीची व्यवस्था पाहिली. भूपिंदर सिंग सांगतात, "माझ्या परीने जे शक्य ते मी केले. त्या क्षणी प्राण जरी द्यावे लागत असते व त्यायोगे रफी जिवंत परत येऊ शकत असते, तरी मी ते दिले असते". उत्तम सिंग सांगतात, "मृत्यू सर्वाना जणू समपातळीवर आणतो. एका अतिशय महान अशा हस्तीचा मृतदेह आम्ही एका पांढऱ्याशुभ्र कापडाच्या तुकड्याने झाकला. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी देवळाशेजारच्या दुकानातून फुले आणून ती रफीसाहेबांच्या पार्थिवावर आच्छादली. एका मित्राच्या वाहनातून ते पार्थिव रफी मॅन्शन कडे घेऊन गेलो. ते पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन केले आणि लक्षात आले, आमची जबाबदारी संपली होती"

आयुष्यभर संगीताची आराधना करणाऱ्या व त्यायोगे विश्वनिर्मात्याची, मग तो कोणत्याही धर्माचा असो, प्रार्थना करणाऱ्या रफींच्या अंतिम क्षणी हिंदू, ख्रिश्चन आणि शीख मित्रांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली हा नियतीने घडवून आणलेला विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.

एव्हाना हि बातमी कर्णोपकर्णी त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईकांना कळली होती. रात्रभर त्यांच्या नंबर ५३३१३७ वर सातत्याने फोन येत होते, परंतु त्यांचे लाडके रफीसाहेब आता त्यांचा फोन कधीच घेणार नव्हते.

(संदर्भ: सुजाता देव यांच्या Mohammad Rafi: Golden Voice of the Silver Screen या पुस्तकातून)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह!

माझा नवऱ्याने सांगितलेला हा प्रसंग.
तो दहावीत असताना 'युवास्नेह' संस्थेबरोबर 'केसरी' वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये गेला होता. मुलांना वृत्तपत्र कचेरीची ओळख व्हावी म्हणून ही भेट आयोजित केली. होती. तेव्हा श्री. अरविंद गोखले संपादक होते. मुलांनी त्यांना विनंती केली की एखादा लक्षात राहिलेला अनुभव सांगा. तर त्यांनी सांगितलं की महंमद रफी गेल्याची बातमी रात्री आली तेव्हा ते घरी होते (बहुतेक फोन आला असेल) आणि ते घाईघाईने रिक्षाने ऑफिसला जायला निघाले. रिक्षावाल्याला अंदाज आला की आत्ता हा माणूस घाईघाईने केसरी ऑफिसला जातोय म्हणजे काही तरी महत्त्वाची बातमी असणार. त्याने विचारलं. त्यांनी आधी सांगितलं नाही. पण रिक्षावाला खनपटीलाच बसला, की काय बातमी आहे ते सांगाच. शेवटी त्यांनी सांगितलं की महंमद रफी गेले. हे ऐकताच त्याने पटकन रिक्षा थांबवलीच आणि तो सुन्नच झाला. शेवटी त्याला कसंबसं समजावून गोखल्यांनी त्याला रिक्षा ऑफिसला न्यायला लावली.

बापरे
ही माहिती आधी वाचली नव्हती.
कदाचित आताच्या काळात त्यांना अजून थोडे आयुष्य मिळाले असते.अर्थात हृदयविकाराच्या बाबतीत सर्व जर तर च्या गोष्टी.

@अतुल ठाकुरजी @mi_anu

मला सुद्धा हे इतके सगळे झालेय हे माहित नव्हते. आजवर जितके वाचनात आले त्यानुसार "सकाळी नेहमीप्रमाणे गाण्याचा रियाज करताना हृदयविकाराचा झटका आला आणि गेले" इतकेच माहिती होते. मागच्या काही दिवसांपूर्वी सुजाता देव यांचे वर उल्लेख केलेले पुस्तक हाती पडले आणि त्यात हि दोन प्रकरणे वाचून बराच वेळ मी सुन्न झालो. दुसरे त्यांच्या अंत्ययात्रेचे प्रकरण आहे. लेख खूप लांबेल म्हणून तो भाग मी यात घेतला नाही. पण हे सगळे तपशील आपल्याला त्या काळात घेऊन जातात.

रफी माणूस म्हणून खूप मोठे होते. त्यांच्याकडून घेण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. असे सांगतात कि कोणी आर्थिक अडचणीत मदत मागायला आल्यास पैसे न मोजता देत. मोजून मदत करणे त्यांच्या दृष्टीने पाप होते. या शिवाय सुद्धा त्यांचे खूप किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातला एक मला पट्कन आठवतोय तो म्हणजे नवीन गायकांना प्राधान्य आणि प्रोत्साहन देण्याचा. चंद्रशेखर गाडगीळ तेंव्हा उभरते गायक होते. एका गाण्याचे रेकॉर्डिंग त्यांच्या आवाजात व्हायचे होते. पण निर्मात्याने कि संगीतकाराने आग्रह धरला रफींच्या आवाजातच गाणे हवे. रफींना यातली काहीच कल्पना नव्हती. ते नेहमीप्रमाणे रेकॉर्डिंग स्टुडीओ मध्ये गेले. एक दोन अंतऱ्यांचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले. मधल्या ब्रेकमध्ये चहा घ्यायला गेले असता बाजूचे दोन वादक कुजबुजताना त्यांनी ऐकले "काय माणूस आहे. चंद्रशेखर गाणार होते. त्यांच्याकडून यांनी काढून घेतले गाणे" ते ऐकताच रफिनी तडक घर गाठले. जे रेकॉर्डिंग झाले त्याचा एक पैसा घेतला नाही. संबंधितानी त्यांना फोन करून विचारले तर म्हणाले तुम्ही मला हे गाणे चंद्रशेखर गाणार होता हे सांगितले नाही. ते काही नाही हे त्यानेच गायला हवे. आजही "सुख दुख कि हर एक माला" हे गाणे रफींच्या आवाजात अर्धे तर चंद्रशेखर गाडगीळांनी ते पूर्ण गायिलेले ऐकायला मिळते.

अतिशय विनम्र स्वभावाचा मनुष्य होता. उषा खन्ना तेंव्हा नवीन होत्या. त्या सांगतात कि रफींकडून त्यांना गाणे गाऊन घ्यायचे होते. तोवर रफी हे खूप मोठे नाव झाले होते आणि या अगदी नवीन संगीतकार. उशाजींना खूप टेन्शन होते. कि आपली चाल रुचेल का रफींना? गातील का? कि बदल करायला सांगतील? वगैरे वगैरे नाना शंका त्यांना. पण काही नाही. अगदी विद्यार्थी असावा तसे रफी त्यांच्यासमोर बसले होते आणि त्यांच्याकडून चाल ऐकून त्यांना कसे अपेक्षित आहे अगदी तसे गाणे त्यांनी गायिले!

खूप किस्से सांगण्यासारखे आहेत.

>> Submitted by वावे on 31 July, 2020 - 19:14

फार फार ह्रदयस्पर्शी प्रसंग. हीच त्या लोकांची खरी मिळकत होती. नाहीतर रफी कोणी राजकीय किंवा सामाजिक कार्य करणारे नेते नव्हते. तरीही त्याकाळात दहा हजारहून जास्त लोक भर पावसात छत्र्या घेऊन त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते. काय गरज होती त्यांना रफींच्या अंत्ययात्रेस जाण्याची.

तरीही त्याकाळात दहा हजारहून जास्त लोक भर पावसात छत्र्या घेऊन त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते. काय गरज होती त्यांना रफींच्या अंत्ययात्रेस जाण्याची.>> सध्याच्या काळासारखे पब्लिक फोरम असते तर हा आकडा कित्येक पटींनी मोठा असता. एकटेपणावर रफीसारखे औषध नाही. लोकांना त्यांच्या एकांतात ज्या आवाजाने आधार दिला त्या गंधर्वांला असा मानाचा मुजरा मिळणारच.

सॉरी पण वाचवले नाही. तुमच्या लिखाणाचा दोष नाही, तुम्ही हे प्रेमापोटीच लिहिले आहे पण एखाद्याच्या मृत्यूप्रवासाचे सविस्तर वर्णन का सांगावे आणि वाचावे असा प्रश्न पडला? अकस्मिक जाण्याने बसललेला धक्का समजू शकते पण हा नैसर्गिक मृत्यू असल्याने ही निससर्गक्रियाच झाली ना.
ज्यांच्याशी भावबंध जुळलेले असतात अशांच्या शेवटच्या प्रवासाबद्दल वाचणे तर फारच कठीण. चाहते म्हणून आपण आपल्या दैवताच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आयुष्याच्या आठवणी काढव्यात मृत्यूच्या नाही असे मला वाटते.

पूर्वी ह्रुदयविकाराचा झटका येणार्‍या सगळ्यांचेच (गरीब वा श्रीमंत, प्रसिद्ध वा सामान्य) आणि यांच्या परिवारातील सदस्यांचे शेवटचे काही तास असेच वेदनादायक जात असत. आताही फारसे वेगळे चित्र नाही. सुधारित ऊपचारपद्धतींमुळे रूग्ण वाचण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे 'बिफोर हिज्/हर टाईम' जाण्याने येणारे शोकप्रसंग कमी घडतात जे चांगलेच आहे.

जास्त बोलले असल्यास क्षमस्व!

>> लोकांना त्यांच्या एकांतात ज्या आवाजाने आधार दिला त्या गंधर्वांला असा मानाचा मुजरा मिळणारच.

+१११

>> Submitted by मी अश्विनी on 31 July, 2020 - 21:07

मी आपणाशी सहमत आहे. अर्थात हे Self contradictory होईल. पण मी दोन्ही बाजूनी सहमत आहे. त्याचे कारण रफींवरच्या इंग्रजी पुस्तकात या प्रकरणाचा समावेश आहे. मराठीमध्ये त्याबाबत कुठे फार लिहिलेले दिसले नाही म्हणून मायबोलीवर घ्यावे वाटले हा एक उद्देश्य. दुसरा म्हणजे जेंव्हा मी हे वाचले तेंव्हा नकळत त्या काळात ओढला गेलो. वाचून पूर्ण झाल्यांनतर काही क्षण ऐंशीच्या दशकात वावरलो. प्रत्यक्षात त्याकाळात मी फार जाणता सुद्धा नव्हतो तरीही हे सगळे को-रिलेट झाले. तीच अनुभूती हे वाचून इतर कोणाला येऊ शकते, हा दुसरा उद्देश. खरेतर यानंतर पुढचे जे प्रकरण आहे त्यावरून रफी किती लोकप्रिय होते ते पाहून अक्षरशः थक्क होतो, सद्गदित होतो, नतमस्तक होतो. माझ्यासाठी ती अनुभूती फार वेगळी होती.

मोहम्मद रफीचा मृत्यू आठवतोय. तेव्हा सोमि नसल्यामुळे पेपरात वाचले व फोटो पाहिले तितकेच. दूरदर्शनवर मात्र त्यांची गाणी तेव्हा परत परत दाखवली गेली, कित्येक मान्यवर येऊन श्रद्धांजली वाहून गेले. 'सुहानी रात ढल चुकी' हे गाणे अचानक प्रसिद्धीस आले. छायागीतात दिल एक मंदिरचे 'जानेवाले कभी आते नहीं, जानेवालेकी यादे आती है...' कित्येकवेळा दाखवले. हे सगळे पाहताना अश्रुधारा लागायच्या डोळ्याना..... Sad Sad नाते कसलेही नसूनही अगदी जवळचे नाते होते.

माझे वडील एकदा रफीसाहेबांच्या घरी गेले होते, हार्मोनियमच्या संदर्भात. घरी सेक्युरिटी होती पण एकदा आत गेल्यावर रफीसाहेब ज्या प्रेमाने बोलले, त्यांच्या वागण्याबोलण्यात जी ऋजुता व मार्दव होते ते बघून वडील आश्चर्यचकित झाले होते. इतका मोठा माणूस आणि इतक्या साधेपणाने बोलतो ह्याची सांगड घालणे त्यांना कठीण गेले होते. रफीन्नी वडिलांबरोबर फोटो काढवून तो दिला होता. नंतर कित्येक महिने रफीभेटीचा विषय आमच्या घरात चर्चिला गेला Happy Happy

लताच्या एका मुलाखतीत ऐकले की रफीना कित्येक महिने त्रास होत होता, उंच स्वरात गाताना श्वासाचा त्रास होत होता पण त्यांनी दुर्लक्ष केले व घरच्यांनाही काही कळले नाही. वेळीच उपचार झाले असते तर रफीचे अकाली निधन झाले नसते.

पण स्वतःकडे लक्ष देणे, स्वतःचे लाड करवून घेणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. वेगळेच मटेरियल होते ते. दुर्दैव की फार लवकर गेले.

Thanks for sharing.
If I had been old enough then, I certainly would have been there, among those thousands that day.
Great human. Great soul, he was.

छान लिहिलं आहे अतुल याबाबत माहिती न्हवती. ते सर्दर्भाचं पुस्तक मिळतं का बघतो इकडे.
ते हिंदु, ख्रिश्चन शीख हवंच आहे का? मी उगाच वर जाऊन कोण कोण असेल ते बघत बसलो, जे बघत बसण्याची खरतर काहीच गरज न्हवती. रफी काफी होतं. Happy

एका दु:खद घटनेचे चांगले वर्णन केले आहे.
दुर्दैवाने हा कलावंत खूप लवकर गेला असे वाटते. १९८० साली हृदयविकार हा एक जीवघेणा रोग आहे विशेषतः भारतीय लोकांमधे ह्याची जाणीवच नव्हती.
https://www.youtube.com/watch?v=Yaob3bAAbbw
शम्मी कपूर रफी साहेबांच्या निधनाविषयी.

ते हिंदु, ख्रिश्चन शीख हवंच आहे का? मी उगाच वर जाऊन कोण कोण असेल ते बघत बसलो, जे बघत बसण्याची खरतर काहीच गरज न्हवती. रफी काफी होतं.
>>>

केर्सी लॉर्ड पारशी होते.

लेखन आवडले.
रफी यांच्या खाजगी आयुष्याबाबतीत एवढेच माहिती होती की फाळणीच्या वेळेस त्यांना पाकिस्तानात रहायचे नव्हते / आवडत नव्हते पण त्यांच्या पहिल्या बेगम यांना भारतात यायचे नव्हते. तर तलाख घेऊन ते भारतात आले, तेव्हा त्यांना खूप मनस्ताप झाला होता. (खखोदेजा)
**
त्यांच्या आवाजा इतके मार्दव कुणातही जाणवतं नाही. मखमली जादू जी ह्रदयापर्यंत अलगद जाते.
ते अचानक गेले एवढेच माहिती होते. धन्यवाद.

आज मोहम्मद रफी साहेबांची जयंती आहे. चार वर्षांपूर्वी गूगलने एक सुंदर डुडल बनवले होते.

महान गायकास अभिवादन _/\_

प्रख्यात अभिनेते मोहन जोशी यांना झी गौरव पुरस्कार मिळाला तेंव्हा त्यांना सरप्राईज म्हणून रफी यांच्या निवासस्थानी नेले होते तो क्षण:
https://youtu.be/0G-qkmLwcso