याचना

Submitted by दिव्यल on 24 July, 2020 - 13:37

याचना

आर्त

घोघावत झंझावत नको पण झुळूक होऊन ये,
ह्या चैत्रातल्या धर्तीवर श्रावण होऊन ये,
सरी वर सर नसेल तरी उडून तुषार ये,
माध्यन्हेच्या पांथाला संध्या होऊन ये,
कोरड्या रुक्ष आयुष्यात पालवी फुटून ये,
चातकाला ह्या चंचूत थेंब होऊन ये,
प्रेमाने ओले करून सगळे-सगळे द्यायला ये.

चिंतन

शोधले मी खूप चुकीच्या ठिकाणी,
पद्धतही जरा चुकलीच म्हणायची.
तरीच म्हंटलं तू सापडली कशी नाही,
होतीस अवती भवतीच मीच डोळस नाही.
वेगळ्या रुपात होतीस हे मात्र खरे,
ते कळण्याची, माझी बुद्धीच नव्हे.
आता मात्र सुधारतोय,
पाडसपणा सोडून शोधतोय.
तरी तू काही सापडत नाही,
आता भेटशील असं वाटत नाही.

तृप्ती

मधेच वाटतं कधी अनावधानाने भेटशील,
मुकलेल्या अनुभवांना मला देऊन टाकशील.
जाणून बुजून, अशी गोष्ट कशी होईल,
कृत्रिमता, निसर्गाची जागा कशी घेईल.
पाणी शिंपडून मातीला फक्त वास येतो,
स्वच्छंद पाऊस पडल्यावरच तर त्याचा मृदगंध होतो.

-दिव्यल बागुल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users