कधी सांजवेळी

Submitted by द्वैत on 24 July, 2020 - 06:06

कधी सांजवेळी

कधी सांजवेळी नदीच्या किनारी कुणाचे तरी चित्र रेखाटले
तरूंचे फुलांचे नदीचे नभांचे किती रंग मी त्यामध्ये ओतले

तसा चेहरा ओळखीचाच होता तरी दुःख त्याचे कळेना मला
जरा खोल डोळ्यांमध्ये पाहिल्यावर खरे काय ते नीट धुंडाळले

तिला पावसाचे तसे वेड नाही मला आवडे चिंब भिजणे जरी
कधी अंगणी मेघ बरसून येता तिने एकटे ना मला टाकले

ग्रहांची दशा कोणती काय होती कधी वाटले ना जरुरी मला
उभा जन्म घामात गेला भिजूनी मला सौख्य दर्पात त्या लाभले

मला सांगते ती तुझी ही गजल रे किती स्पष्ट साधी सरळ वाटते
तिला काय ठाऊक मी शेर लिहिण्या किती काळजावर चरे ओढले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्वैत मित्रा ....

चीरलस मित्रा चीरलस
कसलं लिहिल आहेस
कोणत्या वृत्तातील आहे एवढं सांग फक्त
बाकी तोंडात बोटे घालूनच ठेवलि आहेत हा! हा !हा !

सुंदर...
ही गझ़ल वाचताना वृत्तामुळे पटकन "पृथ्वीचे प्रेमगीत" आठवली.
आणि अजून एकदा छान वाटलं..

चरे - वा वा

डोळ्यांमध्ये झाकल्यावर?