प्रजननविरोध

Submitted by प्रजननविरोधी on 21 July, 2020 - 13:30

कोणत्याही कृतीचे, विचाराचे किंवा विचारसरणीचे तर्कसंगत विश्लेषण करणे, हे एका विवेकी समाजाचं लक्षण आहे. कोणताही विचार आणि त्याच्या बाजूने किंवा विरोधात मत व्यक्त करण्याची मुभा समृद्ध सामाजिक व्यवस्थेसाठी आवश्यक असते. असं असूनही अनेक विषय आपल्याकडे अजूनही वर्ज्य आहेत. साधारणतः शाळा, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, मुलं, त्यांचे शिक्षण, त्यांची लग्ने, नातवंड, जमलेच तर पंत्वंड आणि शेवटी मृत्यू अश्या धोपट मार्गाव्यतिरिक्त काही पर्याय सुचवणाऱ्या विषयांना धार्मिक मुलामा दिल्याशिवाय उघडपणे चर्चेला सहसा मान्यता मिळत नाही. प्रजननाबाबतही ह्याच प्रकारची वृत्ती दिसून येते. आज भारताची लोकसंख्या सर्व जगात(चीनहूनही) जास्तं होऊ पहात असताना, दोन कोटींहून अधिक अनाथ मुलं असताना, जवळ जवळ १८कोटी भारतीय दारिद्र्यरेषे खाली आणि दोन तृतीआंश लोकं मूलभूत स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असताना लोकसंख्या नियंत्रण, संततिनियमन आणि त्या संदर्भात प्रजननाच्या मुद्द्यांवर आवश्यकतेपेक्षा अगदीच तोटकी जनजागृती होताना दिसते. ह्याउलट अजूनही प्रजननाला आपल्याकडे निर्विवाद महत्व आहे. प्रजनना च्या विरोधात बोलणे अजूनही विचित्र आणि निषिद्ध मानले जाते.

प्रजननाच्या विवेचनाबद्दल असलेल्या सामाजिक अनास्थेचे एक कारण हेही आहे, की सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी पर्येंत सहज, स्वस्त आणि विश्वसनीय गर्भनिरोधकांची अनुपलब्धता, धार्मिक गैरसमज आणि शिक्षणाच्या अभावामुळे, प्रजनन आणि संभोग ह्यांमध्ये फारकत करणे अवघड होते. परंतु आज लैंगिक सुखांवर कोणतीही मर्यादा न आणता प्रजननाचं नियंत्रण करणे सहज शक्य आहे. लोकसंख्येविषयी किंवा पर्यावरण संवर्धनाबाबत किंवा अगदी वैयक्तिक आर्थिक मर्यादेतून निर्माण होणाऱ्या प्रजननाच्या परिणामांची पुरेशी नसली तरी किमान थोडी तरी जागरूकता असल्याचे जरी मान्य केले, तरी देखील प्रजननाच्या तात्विक बाबींकडे किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक अडचणींकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले दिसून येते.

वास्तविक पाहता हिंदू आणि बौद्ध धर्मात प्रजननविरोधा बद्दल काही तात्विक अंगाने विचार मांडल्याचे म्हणले जाऊ शकते. Anti-Natalism: Rejectionist Philosophy from Buddhism to Benatar - ह्या "Ken Coates" अश्या टोपण नावाने लिहिलेल्या पुस्तकात रमेश मिश्रांनी हिंदू आणि बौद्ध धर्मात प्रजननविरोधा विषयी अप्रत्यक्षपणे मांंडलेल्या विचारांचा संक्षिप्त आढावा सादर केला आहे.

आधनुिक काळातील प्रजननविरोध
धार्मिक गैरसमज वगळून १९व्या शतकात आर्थर शोपेनहावर आणि त्यानंतर जैविक उत्क्रांतीचा शोध लागल्यानंतर अनेक नास्तिक तत्वज्ञांनी प्रजननविरोधा विषयी अनेकविध अंगांनी विचार मांडले आहेत. त्यात विशेष उल्लेखनीय मुद्दे दक्षिण आफ्रिकी तत्वज्ञ डेव्हिड बेनेटार ह्यांनी मांडले आहेत. प्रजननाच्या प्रक्रियेत आपण एक नवीन व्यक्ती अस्तित्वात आणत असतो. त्या अगोदर ती व्यक्ती अस्तित्वात नसते. अश्या अवस्थेत कोणीही आयुष्याच्या संभाव्य सुखांपासून वंचित नसते. एका नवीन व्यक्तीला अस्तित्वात आणून आपण तिच्या ठिकाणी सुख आणि दुःख, दोन्ही निर्माण करत असतो. म्हणजे ज्या सुखांपासून मुदलातच कोणीही वंचित नाही ती सुखं प्रदान करण्यासाठी आपण एक नवीन व्यक्ती तयार करून तिच्या ठिकाणी दुःख निर्माण करत असतो. इथे आयुष्यात सुख अधिक की दुःख अधिक ह्या वादाचा काहीही संबंध नाही. कितीही कमी किंवा अधिक सुख असले तरी जन्मा अगोदर त्यापासून कोणीही वंचित नसते आणि प्रमाण कितीही कमी असले तरी आयुष्यात गंभीर दुःख असतेच ज्यापासून वाचण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो.

जन्मा अगोदर कोणीही जन्मदात्यांच्या पायाशी जन्माची भीक मागायला आलेला नसतो. केवळ आणि केवळ आपल्या सुखांकरता जन्माला येणाऱ्या व्यक्तीवर आपण आयुष्य लादत असतो. प्रजननविरोधाच्या अनेक पैलूंपैकी हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे.

बऱ्याच जणांना वरील मीमांसा फारच नकारात्मक वाटेल. केवळ आयुष्यातल्या दुःखाकडे बघून केलेला एकांगी विचार असल्याचे काही जण म्हणतील. परंतु तसे आजिबात नाही. आयुष्यात भरपूर सुखे आहेत, जीवनात बरेच सौंदर्यही आहे ह्यात दुमत नाही. पण ह्या सुखांपासून जन्माला येणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणी वंचित नसते हा मुखबिंदू आपल्याला डावलून चालणार नाही.

प्रजननविरोध म्हणजे आत्महत्या नाही
डेव्हिड बेनेटार ह्यांच्या मते प्रजननाच्या प्रक्रियेतून जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हानी पोहोचत असते. ही हानी गंभीर स्वरूपाची असते. असे असल्यामुळे आपले अस्तित्व टाळण्याकरता आपल्याला आता जरी उशीर झालेला असला, तरीही भविष्यात जन्माला येणाऱ्या संभाव्य जीवांना आपण अस्तित्वाच्या हानीपासून वाचवू शकतो.

"अस्तित्वात असलेले आयुष्य चालू ठेवणे" आणि "नवीन आयुष्य सुरु करणे" ह्यात बेनेटार भेद करतात. समजा काही गंभीर व्याधीमुळे एखाद्या व्यक्तीचा एक पाय कापावा लागणार आहे. तसे केल्याने ती व्यक्ती उर्वरित आयुष्य जगू शकणार असेल, तर पाय कापण्याचा उपाय योग्य असल्याचे आपण मान्य करू. केवळ एका पाया करता त्याने जगणे थांबवावे असे कोणी म्हणणार नाही. ह्या उलट जर एखाद्या स्त्रीला भविष्यात आपल्याला होणारे मुल मगाशी म्हणलेल्या गंभीर व्याधींनी ग्रस्त जन्माला येणार असल्याचे ठाऊक असेल, तर तिने त्या मुलास जन्म न देणे योग्य असल्याचे बहुतेक जण मान्य करतील. म्हणजे सध्या सुरु असलेले आयुष्य थांबवण्याकरता वापरलेले नैतिक निकष नवीन आयुष्य सुरु करण्या अथवा नकरण्या करता वापरलेल्या निकषांपेक्षा अधिक कडक असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या (वेदनाक्षम)सजीवांमध्ये आपलं अस्तित्व पुढे सुरु ठेवण्याची (जैविक उत्क्रांतीच्या फलस्वरूप)ओढ असते. ती इच्छा भविष्यात जन्माला येणाऱ्या संभाव्य जीवाच्या ठिकाणी नसते. त्यामुळे प्रजननाचा विरोध करणे म्हणजे आत्महत्येचे प्रोत्साहन करणे असं होत नाही. सध्या अस्तित्वात असलेले आयुष्य थांबवणे आणि नवीन आयुष्य निर्माण न करणे ह्यात तफावत आहे आणि प्रजननविरोधात केवळ नवीन आयुष्य निर्माण करण्याला विरोध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

सुख-दुःखातील असमानता
बेनेटार ह्यांचा मुख्य मुद्दा सुखं आणि दुःखांमधील (इतर अनेकांपैकी)एक प्रमुख असमानता आहे. ही असमानता ४ गृहीतकांवर आधारित आहे.

  • १. दुःख/यातना असणे वाईट असते
  • २. सुखं असणे चांगले असते
  • ३. नसलेली दुःख भोगायला कोणीही नसले तरी देखील, दुःख/यातना नसणे चांगले असते
  • ४. नसलेल्या सुखांपासून कोणीही वंचित नसेल तर ती सुखं नसणे वाईट नसते

वरील गृहीतकांपैकी क्र.१ आणि क्र.२ सोपी आहेत परंतु क्र.३ऱ्या आणि क्र.४थ्या कडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्यात मांडलेले विचार एका उदाहरणा द्वारे समजावून घेऊ. समजा एका जोडप्याला मुल हवे आहे, परंतु काही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी कुटुंबनियोजन करून ५ वर्षांनंतर प्रजनन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची प्रतिकुल परिस्थिती आर्थिक, अनुवंशिक किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची असू शकते. उदाहरणा दाखल समजा मातेला काही आजार असेल जो बरा होण्या अगोदर प्रजनन केले असता मुल व्याधिग्रस्त अवस्थेत जन्माला येणार असल्यामुळे त्यास जबर यातना भोगाव्या लागणार असतील. तो आजार काही वर्षांनंतर बरा होऊन ते सर्वसामान्य बालकास जन्म देऊ शकणार असतील, तर तोवर थांबण्याचा निर्णय आपल्यापैकी बहुतेकांना योग्य वाटेल.

इथे २ वेगळे घटनाक्रम संभवतात -

  • १. त्यांनी जर थांबण्याचा निर्णय घेतला नसता तर त्यांना आत्ताच एक मुल झाले असते. उदाहरणा दाखल आपण त्याचे नाव "अमित" ठेऊया.
  • २. वर म्हणाल्या प्रमाणे आजाराचा उपचार पूर्ण करून मग जर त्यांनी प्रजनन केले तर होणाऱ्या मुलाचे नाव आपण "सुमित" ठेऊया.

सुमित आणि अमित दोन भिन्न वेळी, भिन्न शुक्राणू आणि बीजांडयांपासुन निर्माण होणाऱ्या व्यक्ती आहेत, तेंव्हा त्यांच्या अस्तित्वाची किंवा अस्तित्वात न येण्याची चिकित्सा आपण स्वतंत्र पणे करू शकतो. त्याच्या आईवडिलांच्या कुटुंबनियोजनाच्या निर्णयामुळे अमित अस्तित्वातच आला नाही. हे चांगले मानण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रतीकुल परिस्थितींमुळे होणारे त्याचे हाल आणि त्याच्या वाट्याला येणारे दुःख टाळले हे आहे. म्हणजे अस्तित्वात येण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या वाट्याला येणारे संभाव्य दुःख टळणे हे तो प्रत्येक्षात अस्तित्वात आला नसला तरी सुद्धा चांगले असल्याचे आपण मानतो. हाच मुद्दा गृहीतक क्र.३ मध्ये मांडला आहे. ह्या उलट तो अस्तित्वातच आला नसल्यामुळे आयुष्याच्या संभाव्य सुखांपासून वंचित राहिल्याबद्दल आपण शोक करत नाही. कारण अत्सितावत नसलेली व्यक्ती कशाही पासून वंचित राहू शकत नाही. म्हणजेच तो अस्तित्वात न आल्यामुळे संभाव्य सुखांना मुकणे आपण वाईट मानत नाही. हा विचार गृहीतक क्र.४ मध्ये मांडला आहे.
AsymmetryMarathi.png
ह्या चारही गृहीतकांची मांडणी आकृती १ मध्ये केलेली आहे. त्यात अस्तित्वात असलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची तुलना प्रजननातून भविष्यात येणाऱ्या परंतु सध्या अस्तित्वात नसलेल्या संभाव्य व्यक्तीच्या परिस्थितीशी केलेली आहे. (१) आणि (३) मध्ये दुःखांची तुलना केलेली आहे. इथे (३)ची स्थिती सरळ सरळ लाभदायक असल्याचे निष्पन्न होते. (२) आणि (४) मध्ये मात्र वरकर्णी (२)ची स्थिती लाभदायक असल्याचे वाटू शकते परंतु ते खरे नाही. त्यासाठी एक उदाहरण पाहू.

समजा सुनीता आणि अनिता दोन बहिणी आहेत. सुनीताला सतार वाजवण्याच्या छंद आहे आणि त्यात ती बरीच निपुणही आहे. रोज काही वेळ तरी सतार वाजवल्या शिवाय तिला चैन पडत नाही. ह्या उलट अनिताला ना असा काही छंद आहे न तिला सतार वाजवण्यात काही रुची आहे. अश्या परिस्थितीत सुनिताकडे सतार नसती तर ती तिचा छंद पूर्ण कारण्यापासून मुकली असती. ह्या उलट अनिताचे सतारी वाचून काहीही वाईट होत नाही. म्हणजे सतार नसण्याच्या तुलनेत सतार असणे जरी सुनीतासाठी लाभदायक असले तरी देखील तो अनिताकडे सतार नसण्याच्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे सुख नसण्याच्या तुलनेत सुख असणे हे अस्तित्वात असलेल्या व्यक्तीसाठी जरी चांगले असले तरी देखील तो सध्या अस्तित्वात नसलेल्या संभाव्य व्यक्तीच्या ठिकाणी सुख नसल्याच्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही. तेंव्हा आकृती १ मध्ये (२)ची स्थिती (४)च्या तुलनेत खरा लाभ होऊ शकत नाही.

ह्या तुलनांच्या परिणामांवरून असे दिसून येते की प्रजननाची प्रक्रिया जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी नेहेमीच अपायकारक असते. त्यामुळे तसे करणे नैतिक दृष्ट्या अयोग्य ठरते.

लाभ आणि हानी
सुख आणि दुःखाच्या असमानते ऐवजी शॉना शिफ्रीन लाभ आणि हानी ह्यांच्यातील असमानता मांडतात. त्यांच्या मते आपण करत असलेल्या क्रियांमुळे जर कुणा इतर वेदनाक्षम व्यक्तींवर परिणाम होणार असेल तर तिला होत असलेला लाभ आणि हानी विचारात घेतली पाहिजे. हा हिशोब करताना लाभ आणि हानी ह्यांतील एका प्रमुख असमानतेकडे लक्ष दिले पाहिजे.

  • १. समजा एक व्यक्ती अर्धवट शुद्धीवर आहे आणि तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही काहीच केले नाही तर ती व्यक्ती भीषण यातनांत तडफडून मरणार आहे. तिला वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे तिचा एक हात कलम करणे एवढाच आहे.
  • २. समजा एक सुदृढ व्यक्ती तुमच्याकडे आली आहे. त्या व्यक्तीला काहीतरी अनन्यसाधारण जादुई शक्ती प्रदान करण्याची तुमच्या क्षमता आहे. उ.दा. खूप मोठ्या प्रमाणात धन किंवा स्वेच्छेने अदृश्य होण्याची शक्ती ई. परंतु त्यासाठी तुम्हाला त्याव्यक्तीची परवानगी न विचारात तिचा एक हात कलम करावा लागणार आहे.

शिफ्रीन ह्यांच्या मते सदर व्यक्तीच्या परवानगीविना केवळ क्र.१. मध्ये क्रिया करणे नैतिक दृष्ट्या योग्य आहे. खरं तर दोन्ही संभाव्य घटनांमध्ये त्या व्यक्तीला पोहोचत असलेली हानी समान आहे. परंतु तिला क्र.१ मध्ये अजून मोठी हानी टाळण्यासाठी तुलनेनी छोटी हानी केलेली आहे तर क्र.२ मध्ये काही विशेष लाभ प्रदान करण्याकरता त्या व्यक्तीचा हात कापला गेला आहे. शिफ्रीन ह्यांच्या मते परवानगीशिवाय केवळ कोणतीतरी मोठी हानी टाळण्याकरता केलेली तुलनेनी छोटी हानी योग्य आहे परंतु काही विशिष्ट लाभ प्रदान करण्याकरता परवानगीशिवाय कितीही छोटी हानी करणे अयोग्य आहे.

त्यामुळे सुख-दुःखाची असमानता घटकाभर बाजूला ठेवली आणि जन्माला येणाऱ्या व्यक्तीला प्रजननाच्या प्रक्रियेतून लाभ होतो असे जरी मानले, तरी देखील शिफ्रीन ह्यांच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या परवानगी शिवाय आयुष्यातल्या दुःखांची हानी तिच्यावर लादून, तिला आयुष्याच्या सुखांचा लाभ प्रदान करणे नैतिक दृष्ट्या अडचणीचे होते. जन्मा अगोदर त्या व्यक्तीची परवानगी घेणे अशक्य असल्यामुळे प्रजनन करणे अनैतिक होऊन जाते.

शिफ्रीन ह्यांच्या मीमांसेवरून एक आणखीन मुद्दा उपस्थित होतो. आयुष्यात अनेक धोके असतात. अनेक प्रकारचे रोग, शारीरिक आणि मानसिक व्याधी, अपघात, अन्याय, गरिबी, कुपोषण, ई.ची जोखीम किंवा संभावना आणि मृत्यूची निश्चितता आपण दुसऱ्या व्यक्तीवर लादत असतो.

इतर
आयुष्यात बहुतेक सुखांसाठी आपल्याला झटावे लागते परंतु दुःख काहीही न करता चालून येतात. उ.दा. मी नुसताच बसून राहिलो तर तहान, भूक, कंटाळा, शारीरिक व्याधी न बोलावता येतात. सुखांच्या मागे मात्र मला सतत धावावे लागते. ही आणि अश्या अनेक असमानता आणि प्रजननविरोधा संदर्भात अनेक प्रश्न आहेत. प्रजननाचे व्यक्तीस्वातंत्र्य, गर्भपात, गर्भनिरोधक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन, नारीवाद, लैंगिक गरजा व प्रजनन, मानव प्रजातीचे भविष्य, लोकसंख्या विषयक प्रश्न, जैविक उत्क्रांती, मनुष्येतर प्राण्यांचे प्रजनन, नैसर्गिक प्रजनन, कृत्रिम रेतन, जीवनाचा अर्थ आणि मूल्य वगैरे बऱ्याच मुद्द्यांमुळे हा विषय खूप व्यापक आणि तितकाच खोल असला तरी वरील लेखातून प्रजननविरोधाची किमान तोंडओळख तरी व्हावी ही आशा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुका करून झाल्या. वेळ निघून गेली. त्यामुळे पटतंय पण काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. अन्यथा लोका सांगे..

लेख पटला, आवडला.

छान माहिती. आपल्या भारतात लग्न झाले की लगेच मूल जन्माला आले पाहिजे अशी भूमिका. जी जन्म देणार आहे तिच्या मताला कोणी विचारत नाही.

1) आपण मुलांना जन्माला घालून पालनपोषण केले तर ती मोठी झाल्यावर आपल्याला वृद्धावस्थेत सांभाळतील ही अपेक्षा पारंपारिक आहे. त्यापोटी जन्माला घालणे
2) मुल कुटुंबात असल्यावर कुटुंबाचे मानसिक आरोग्य चांगले राहते. आपण भुभु नाही का पाळत आनंदासाठी?
3) द्त्तक घेतल्यावर जेनेटिक्सचा पर्यायाने निरोगी, गुणवत्तेचा प्रश्न उभा राहतो
असेही काही मुद्दे असतात प्रजननात.

शिफ्रीन ह्यांच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या परवानगी शिवाय आयुष्यातल्या दुःखांची हानी तिच्यावर लादून, तिला आयुष्याच्या सुखांचा लाभ प्रदान करणे नैतिक दृष्ट्या अडचणीचे होते. जन्मा अगोदर त्या व्यक्तीची परवानगी घेणे अशक्य असल्यामुळे प्रजनन करणे अनैतिक होऊन जाते.
>>>> खतरनाक लॉजिक आहे हे...

पण मुळातच प्रजनन करण्यामागे हेतू एका जीवाला जगात आणून त्याला सुख दुख प्रदान करणे नसून निव्वळ आपल्यासाठी सुख मिळवणे हा असतो हे मान्य करायला हरकत नसावी.

त्यातही गंमत म्हणजे जिथे दारिद्र्य आहे तिथे यातूनच सुख मिळवूया म्हणत प्रजनन जोरात असते आणि जिथे सुबत्ता आहे आणि येणार्‍या जीवाला तुलनेत पोषक वातावरण मिळणार आहे तिथला बुद्धीजीव मनुष्य असे विश्लेषण करत प्रजननापासून दूर पळतोय.

वेगळा लेख. "अजूनही प्रजननाला आपल्याकडे निर्विवाद महत्व आहे" हे खरं नाही. एका विशिष्ट चौकटीत (लग्न झालेले नवरा-बायको) प्रजननाला मान्यता आहे. त्या चौकटीबाहेर सगळा प्रजननविरोधच आहे की.
"प्रजननाच्या विवेचनाबद्दल असलेल्या सामाजिक अनास्थेचे एक कारण हेही आहे"- की पूर्वी बालमृत्यूचे प्रमाण अधिक होते. ५-६ बाळंतपणे होवूनही पालकांना खात्री नसे की एक तरी आपल्या म्हातारपणी जिवंत असेल. मूल जगणे हा एक मोठा चमत्कारच होता. अशा परिस्थितीत कोण कशाला प्रजननविरोध करेल. आता जे काही एक-दोन जन्माला येतील ती आपल्या बरोबर वृद्धाश्रमातही येतील अशी बरीचशी खात्री असल्याने 'प्रजननविरोध' हा नवा/वेगळा विचार ऐकून घ्यावासा वाटतो.

Darvin must be turning in his grave !
ठीक आहे. सगळी मानवजात नष्ट झाली तर बरेच आहे. इतर जीव सुखा समाधाने नांदतील. निसर्ग पुन्हा बहरेल. जीवनाचे मुख्य उद्दिष्ट उत्क्रांती हे आहे ; हे आपण विसरून जाउया ! बाकी चालू द्या चर्चा .

वाढती वयात लग्न होत असल्यामुळे मुल होण्याची संख्या अशी पण कमी होत आहे.
वाढत्या वयात गर्भ धारणा होण्याची शक्यता कमी कमी होत जाते.
दुसरे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होत आहे असा पण निष्कर्ष आहे.
आणि मुल संभळायची कोणी हा बिकट प्रश्न उभा राहत असल्या मुळे ते नकोच अशा मताची संख्या वाढत आहे.
प्रजनन विरहित सेक्स निसर्ग नियमानुसार नाही.
खूप वर्ष प्रजनन विरहित सेक्स होत गेला तर काही वर्षात मानवी शरीरात बदल होवून सेक्स ची भावना नष्ट होवू शकते .
मुल होवू न देणे असा विचार समाजात वाढला तर ते वरदान च आहे.
एक पिढी संपली की तिची मालमत्ता बाकी लोकांच्या कामाला येईल.
विचार करा ekadhya अब्जा पती जोडप्याने मुल होवू दिले नाही तर त्यांची मालमत्ता त्यांच्या नंतर सरकार जमा होईल आणि त्याचा फायदा बाकी लोकांना मिळेल.

माझ्या माहीतीत बरीच तरुण मुलंमुली आहेत ज्यांना मुल होऊ द्यायचं नाहीये. जीव जन्माला घालून मग त्याला दुःख का द्यायचं हाच त्यामागे विचार आहे.

लेख पूर्ण डिटेल वाचला नाही .. पण एकूण कल्पनेशी फार पूर्वीपासून सहमत आहे ... स्वतः दारिद्र्यात राहत असताना पोरांची पैदास करून त्यांना त्याच खातेऱ्यात जगायला आणणाऱ्या लोकांविषयी मनात चीड आहे .. दारिद्र्यात राहणारे संततीनियमनाच्या साधनांपासून , मार्गांपासून अनभिज्ञ असतील असं एकवेळ धरून चाललं तरी 2 खोल्याच्या भाड्याच्या खुराड्यात राहणारी जोडपी - मूल होत नाही , मूल होत नाही म्हणून तडफडत डॉक्टरकडे उपचार घ्यायला जातात तेव्हा त्यांच्याविषयी फारशी चांगली भावना उत्पन्न होत नाही , अशी कोणती इस्टेट उतू चालली आहे तुमची , ज्यासाठी मूल हवं आहे ? येणाऱ्या जीवाच्या सुखाचा विचार करणारे फार थोडे आईबाप असतील , मूल जन्माला घालताना फक्त स्वतःच्याच सुखाचा विचार असतो बहुतेकांचा ... आपल्या तालावर नाचणारं , आपल्यावर अवलंबून असलेलं गोंडस बाहुलं हवं असतं .. जे भरभरून प्रेम करेल .. निदान सुरुवातीची 10 - 15 वर्षं तरी ... आम्ही मूल जन्माला घालू शकण्यास सक्षम आहोत हे सिद्ध करून दाखवायचं असतं , मग त्या मुलाच्या येण्याने कसं आमचं आयुष्य सुखाने भरून गेलं आहे , हे मिरवायचं असतं ... नंतर मातीच्या गोळ्याला आकार देण्यातून होणारी अहंकार तृप्ती अनुभवायची असते .. मी घडवलं ह्याला / हिला .. एवढे मार्क्स , अमके तमके स्किल्स , गातो छान , वक्तृत्व , अशी ऍक्टिंंग करून दाखवतो , पहिला नंबर , एवढे टक्के , तेवढा पगार .. सगळी अहंकार तृप्ती स्वतःची ... हे सगळं नसेल तर निदान मला मूल तरी आहे माझं स्वतःचं , ही कम्फर्ट देणारी भावना असते ...

युट्यूब वर एका आई - मुलाचा व्हिडिओ पाहिला , दोघे खूप खुश आहेत त्यांच्या आयुष्यात ... आईला खांद्यापासून हात नाहीत, मूल जन्माला घातलं तर तेही तसंच होणार हे कन्फर्म माहीत होतं .. तरी दत्तक निरोगी मुलापेक्षा "आपल्यासारखंच" मूल असेल तर ते आपल्याला नीट समजून घेऊ शकेल , आपल्याशी रिलेट करु शकेल , त्याला वाढवताना आपल्याला अधिक समाधान मिळेल म्हणून स्वतःचं मूल जन्माला घातलं .. तसाच हात नसलेला मुलगा ... पोरगा बिचारा कधीच आईला दोषी मानणार नाही , एवढं होऊनही निरपेक्ष प्रेम करत राहील तिच्यावर ... याक्षणी तो सुखी आहे .. पण तिचा सगळं माहीत असून घेतलेला निर्णय या लाईफटाइम मध्ये तरी माझ्या पचनी पडेल असं वाटत नाही .. आणि ही सुशिक्षित युरोपियन बाई .. तर अशिक्षित अडाणी अविकसित देशातील लोकांकडून काय अपेक्षा करणार मुलांना गरिबीच्या आयुष्यात न जन्माला घालण्याची ?? स्वतःचा स्वार्थ एवढा प्रबळ असतो की त्याला वात्सल्याच्या आवरणात लपेटून डिफेन्ड करतात ... गरीब असलो म्हणून काय झालं आम्हाला स्वतःच्या रक्तामांसाच मूल असण्याचा अधिकार नाही का .. etc etc

.. आणि ही सुशिक्षित युरोपियन बाई .. तर अशिक्षित अडाणी अविकसित देशातील लोकांकडून काय अपेक्षा करणार.
जीवन कसे जगावे हे ज्ञान. अनुभवातून मिळते आणि काही ज्ञान उपजत असते तिथे शिक्षण चा काही संबंध नाही.
अशिक्षित उद्योग पती कडे शिक्षित लोक नोकऱ्या करत असतात.
आणि अशिक्षित राजकारणी देशाचा कारभार करत असतात आणि शिक्षित ias , ips त्याच्या हुकमाने वागत असतात.
शिक्षण आणि शहाणपण, ह्याचा काहीच संबंध नाही.

माझ्या माहीतीत बरीच तरुण मुलंमुली आहेत ज्यांना मुल होऊ द्यायचं नाहीये. जीव जन्माला घालून मग त्याला दुःख का द्यायचं हाच त्यामागे विचार आहे.
>>>>
फारच नकारात्मक विचार करत आहेत ही मुले असे प्रथमदर्शनी तरी वाटते.
जगात सुखही आहे दुखही आहे. दुखाचे पारडे त्यांना खूप जड दिसतेय असे वाटते.

किंवा कदाचित ही मुले भविष्य बघत असतील. निसर्गाशी पंगा घेतल्याने आणि एकमेकांवर कुरघोडी करायच्या नादात येत्या तीसेक वर्षात मनुष्यजात तडफून तडफून मरताना बघत असतील.

हो ॠन्मेश. हेच कारण आहे. आपण त्यांना काय देऊ शकू ह्याचं उत्तर आज तरी त्यांच्याकडे नाही. हे करोनाचं संकट, व्यवसाय झालेलं शिक्षण, रॅट रेस, ग्लोबल वाॅर्मिंग वगैरे पाहून येत्या काळात पृथ्वीलाच भवितव्य नसेल तर नवं बाळ जन्माला का घालायचं आणि मग त्याला दुःख का द्यायचं असं वाटतं त्यांना.

>>>> दारिद्र्यात राहणारे संततीनियमनाच्या साधनांपासून , मार्गांपासून अनभिज्ञ असतील असं एकवेळ धरून चाललं तरी 2 खोल्याच्या भाड्याच्या खुराड्यात राहणारी जोडपी - मूल होत नाही , मूल होत नाही म्हणून तडफडत डॉक्टरकडे उपचार घ्यायला जातात तेव्हा त्यांच्याविषयी फारशी चांगली भावना उत्पन्न होत नाही , अशी कोणती इस्टेट उतू चालली आहे तुमची , ज्यासाठी मूल हवं आहे ?

पैसे नाहीत, घरात जागा नाही म्हणून मुलं जन्माला घालू नयेत असं असेल,
तर भरपूर जागा, मोठं घर, सात पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट असेल पण ज्यांचात माणुसकीचा अभाव असेल, जे विचारांनी क्रूर असतील, मत्सरी असतील, दुर्बल लोकांवर अत्याचार करणारे असतील, ज्यांना आपली संपत्ती हरवायचं टोकाचं भय असेल आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जायला तयार असतील अशा श्रीमंत लोकांनी मुले जन्माला घालावी का?

लॉजिक भारी आहे!
दोन्ही बाजूंनी मुद्दे मांडता येतील अजून. आपण (मानवजात) निसर्गाचे लोकसंख्या नियंत्रणाचे checks and balances पाळत नसल्याने हे असे कृत्रिम नियम निर्माण करणे अपरिहार्य झाले आहे. जरी आपण पळवाटा काढून आयुष्य वाढवत आणि माणसांची पृथ्वीवरची संख्या वाढवत असलो तरी पृथ्वीच्या inherent planetary boundaries बदलू शकत नाही (अजूनतरी). त्यामुळे त्या मर्यादा ओलांडल्यावर होणारे दुष्परिणाम अटळ आहेत. आणि त्यातला महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे मनुष्य जातीचा संख्यात्मक विनाश. We may not go extinct but we will go through a bottleneck in the form of climactic disaster which very few Homo Sapiens will survive through.

मुळात आपण ज्याला संपत्ती समजतो ती स्थिर आहे का.
रात्री 12 वाजता देशाचा प्रमुख दोन वाक्य बोलले की आपण ज्याला संपत्ती म्हणतो त्या संपत्ती ची किंमत भंगाराच्या भावात जाते.
आज रात्री पासून सर्व चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्या गेल्या आहेत.
ही दोन वाक्य फक्त बोलायचे अवकाश .
खरी संपत्ती स्वच्छ हवा,स्वच्छ पाणी,पृथ्वी चे योग्य तापमान,आणि माणुसकी, प्रेम ही आहे.

सई तुमच्या प्रश्नाला काही उत्तर आहे असं वाटत नाही .. एका गोष्टीचा दुसऱ्याशी संबंध नाही .

गरीबीवर मात करून स्वतःला सिद्ध केलेल्या मुलांचं खूप कौतुक होतं .. कारण ती मायनॉरिटी मध्ये असतात .. तल्लख बुद्धिमत्ता किंवा काही वेगळं टॅलेंट असल्याने परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून वर येणारी मुलं जर लाखो असतील तर कोट्यवधी सामान्य मुलं असतात .... या मुलांना सुमार दर्जाचं शिक्षण , सुमार सुविधा मिळतात .. त्यांच्यातून कशीबशी गुजराण करणारा एक नागरिक निर्माण होतो .. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी फार फार तर फेडण्यासाठी कर्ज ठेवलेलं असतं किंवा आपल्या म्हातारपणाची काहीही सोय स्वतः न करता ती जबाबदारी मुलांवर टाकलेली असते ... आणि तुटपुंज्या उत्पन्नात ती मुलं आईवडिलांना सांभाळतातही .. प्रेम असतंच .. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत नाहीत असं नाही .... आहे त्या परिस्थितीत सुख मानून जगण्याची माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते ... पण एक दरिद्री निकृष्ट आयुष्य , समोर अनेकांना जे सहज मिळतं आहे ते आपल्याला कधीच मिळू शकणार नाही हे पचवून त्यांना जगावं लागतं .. आजारपणं ही आर्थिक कंबरडं मोडणारी असतात ... गरिबांच्या किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वेगळे सांगायची गरज नाही ...

मूल हे अशाच काळवंडलेल्या आयुष्यात क्षणिक सुख आणतं , आशेचा किरण आणतं हे मान्य आहे , पण अंती मुलाच्याही माथी ते तसलंच दरिद्री , काबाडकष्टाचं जिणं मारतात .. नोकरीसाठी वणवण , लाचारी , अपमान , एक ना अनंत वेदना ..

काही वर्षांपूर्वी 4 मुलं असलेल्या एका माणसाची 6 - 7 वर्षाची मुलगी उंच बिल्डिंग मधून पडून मृत्युमुखी पडली .. बातमी मध्ये तिच्या वडिलांनी 3 - 4 दिवसांपासून ती गुलाबजामचा हट्ट करत होती पण आपल्याला परवडत नसल्याने तिची इच्छा पूर्ण करू शकलो नाही अशी हळहळ व्यक्त केली ....

किती मुलं साध्या साध्या इच्छा पूर्ण न होता जगत आहेत .. थोडी मोठी झाल्यावर हट्ट करायची बंद होतात , आपल्या आईबाबांची परिस्थिती नाही तो हट्ट पुरवायची समजल्यावर , आपण म्हणतो वा , किती समजूतदार आहे एवढ्या लहान वयात ... Do they deserve it though ?

धरून चला वय वर्षं 18 होईपर्यंत मूल आईवडिलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतं .. हा आयुष्याचा एक पंचमांश भाग झाला ... मला कोणाला त्याचं 1/5 आयुष्य सतत तडजोड करत , वेळोवेळी मन मारत काढायला लावण्याचा काय अधिकार आहे , हा विचार या लोकांपैकी कोणीही करत नाही ... मी जर माझ्या मुलाच्या अशा इच्छाही पूर्ण करू शकत नसेन ज्या त्याच्या वयाच्या अनेकांच्या सहज पूर्ण होत आहेत , तर मला मूल जन्माला घालण्याचा काय अधिकार आहे असा विचार कोणीही करत नाहीत ... अनेक आईवडील आहेत जे वाईट परिस्थितीतही मुलाला आपल्याकडून जमेल तेवढं बेस्ट देण्यासाठी आटापिटा करतात .. हेही मला माहित आहे ..

चांगले गरीब आईवडील किंवा वाईट श्रीमंत आईवडील अशी तुलना करण्यापेक्षा , चांगले गरीब आईवडील आणि चांगली आर्थिक स्थिती असलेले चांगले आईवडील यातून निवडण्याची वेळ आली तर कुणीही मूल गरीब घर जन्मण्यासाठी निवडणार नाही ..

मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपल्या अतिशय विकसित अशा मेंदूचा आणि दोन पायांवर उभे रहाण्याच्या क्षमतेचा मोठा वाटा आहे. मात्र याच दोन गोष्टींमुळे माणसाच्या बाळाचा जन्म ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होऊन बसली आहे.
दोन पायांवर उभे राहील्याने birth canal अरुंद झाला. त्यातून मेंदूच्या मोठ्या आकारामुळे मेंदू आणि इतर शरीर याचा रेशो इतर प्राण्यांच्या तुलनेत भलताच जास्त झाला. मग मेंदूची आवरणे जन्माआधी संपूर्ण टणक न राहता थोडी चेपली जाऊ शकतील इतपतच विकसित झाली ज्यामुळे आधीच अरुंद असलेल्या birth canal मधून डोके बाहेर निघू शकेल. यामुळे इतर कोणत्याही सस्तन प्राण्याच्या तुलनेत माणसाच्या बाळाचा जन्म अनेक पट अधिक धोकादायक आहे. आजही प्रसुतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण शून्य झालेले नाही कारण it is inherently risky procedure. माणसाचा जन्म होताना सिझेरियन सारख्या युक्त्या वापरायला लागतात जे इतर सस्तन प्राण्यांमध्ये गरजेचे नसते. शिवाय लहान बाळाचे डोके संपूर्ण टणक आवरणाशिवाय असल्याने त्याला जपणे प्रचंड आवश्यक असते. Humans have the longest parenthood among all species!
This is the price humans (more so female humans) pay for all the goodness of the evolutionary advantages.
Education is the best contraceptive असे म्हणतात ते खरेच आहे. कोणतीही शिकलेली स्री जिला बाळंतपणातल्या या धोक्याची कल्पना आहे, आपला जीव वारंवार पणाला लावणार नाही!

आपण एकवेळ असे मान्य करू की फक्त श्रीमंत असू तरच मुल जन्माला घालणे योग्य आहे आणि गरीब लोकांनी मुल जन्माला घालणे अयोग्य आहे.
आणि हा नियम तंतोतंत पाळला गेला तर काही वर्षात सर्व गरीब जगातून नष्ट होतील आणि फक्त श्रीमंत लोक राहतील.
सर्व गरीब लोक जगातून पूर्ण नष्ट झाली तर जागतिक अर्थ व्यवस्था कचऱ्याच्या डब्यात नक्कीच जाईल .
कष्टकरी वर्गच नसेल तर व्यवस्था चालवण्यासाठी माणसं कोठून आणायची.
कारखाने कसे चाललं नार.
सरक्षण यंत्रणा पोलिस,लष्कर,ह्या मध्ये भरती कोण होणार.
कारखाने बंद झाले तर कारखानदार गरीब होतील .
सर्व यंत्रणा बंद झाल्यावर रस्ते,पाणी पुरवठा,वीज निर्मिती आणि पुरवठा,भाजी पाला निर्मिती आणि वितरण,दूध निर्मिती आणि वितरण.
कायद्या सू व्यवस्था ,अतिरेकी हल्ले किंवा गुंडागर्दी नी संपत्ती ताब्यात घेतली गेली तर फक्त श्रीमंत मंडळी कोणाच्या भरवशावर राहणार.
फक्त श्रीमंत असलेले जग अस्तित्वात असूच शकत नाही.
खूप पैसा असेल तर नोकरी का करेल.
मग नोकरी कोण करणार ,

>>चांगले गरीब आईवडील किंवा वाईट श्रीमंत आईवडील अशी तुलना करण्यापेक्षा , चांगले गरीब आईवडील आणि चांगली आर्थिक स्थिती असलेले चांगले आईवडील यातून निवडण्याची वेळ आली तर कुणीही मूल गरीब घर जन्मण्यासाठी निवडणार नाही ..

पण असे चारच रकाने आहेत का?
चांगले गरीब आईवडील जे 18 वर्षांच्या कालावधीत कष्ट करून सुस्थितीत येतात.
वाईट श्रीमंत आईवडील जे 18 वर्षांत चांगले गरीब आईवडील होतात
वाईट गरीब आईवडील जे 18 वर्षांत अजून वाईट पण थोडेसे श्रीमंत होतात
आणि अतिशय श्रीमंत चांगले आईवडील जे 18 वर्षांत अतिशय गरीब पण चांगले आईवडील होतात.
हे आणि यातल्या आधल्या मधल्या अनेक छटा आहेत.

गरीब व्यक्ती ज्या इन्स्टिंक्टने मूल जन्माला घालते त्याच इन्स्टिंक्टने श्रीमंत व्यक्ती घालते. दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांची मुलं जन्माला घालायची उपकरणं आपल्या हातात नसतात. त्यामुळे कुणी मूल जन्माला घालावं आणि कुणी नाही हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न असावा. चर्चेसाठी आणि चिंतनासाठी प्रजनन करावे की नाही हा फिलॉसॉफिकल मुद्दा असला तरी त्याचे त्वेषाने गरिबांनी मुलं जन्माला घालू नयेत अशा चर्चेत रूपांतर होऊ नये.

नोकऱ्या करणारे हे सर्व गरीब लोकात च गणले जातात.
महिन्याला लाखो रुपये पगार घेणारे नोकरीतून काढून टाकले की गरीब होतात.
आता covid 19 मध्ये असे महिन्याला लाखो रुपयांची नोकरी असणारे नोकरी गमावून बसले आहेत आणि त्यांच्या पुढे कसे जगावे पुढचे आयुष्य हा प्रश्न आहे.
आत्महत्या चे प्रमाण येथून पुढे वाढेल आणि त्या आम्हत्या गरीब करणार नाहीत तर मोठ्या पगाराच्या नोकऱ्या गेल्या मुळे आणि दुसरी नोकरी मिळणे अवघड झाल्या मुळे होतील.

एक विनंती

मुळ लेखात आणि प्रजननविरोधी संकल्पनेत केवळ एखाद्या आर्थिक स्तरातील लोकांनीच प्रजनन करावे अथवा करू नये असे म्हणलेले नाही (तार्किक प्रयोगांकरता प्रतिकुल परिस्थितीचे उदाहरण आर्थिक आणि इतरही असू शकते. प्रतिकुल परिस्थितीचे कारण इथे महत्वाचे नसून, प्रतिकुल परिस्थिती असू शकते इतकेच त्या तार्किक प्रयोगांत महत्वाचे आहे).
आयुष्यात गंभीर दुःख राजांपासून रंकांपर्येन्त सर्वांना भोगायला लागतात, त्यांचे प्रमाण कमी जास्त असले तरी ते इथे महत्वाचे नाही.
केवळ विशिष्ट सामाजिक किंवा आर्थिक स्तरातील लोकांच्या प्रजननाला विरोध करणे म्हणजे प्रजननविरोध(Antinatalism) नव्हे, त्याला Eugenics असे म्हणतात आणि त्याचे समर्थन करणे कोणत्याही नैतिक मोजमापात शक्य नाही.
तेंव्हा कृपया गरीब विरुद्ध श्रीमंत असे स्वरूप ह्या विषयास देऊ नये ही नम्र विनंती

प्रजनन होवू द्यायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे .
मुल का नको
1) त्याला आपण सर्व सुख देवू शकणार नाही(संपत्ती)
2) माझे आयुष्य हे माझे आयुष्य आहे आणि ते मी मुल सांभाळणे आणि त्यांचे पालनपोषण करण्यात वाया घालवू इच्छित नाही.
३) किंवा लेखात व्यक्त केलेल्या मता प्रमाणे .
आता मुल न होवू देणे ह्या विचार मागे माझे आयुष्य माझे आहे आणि त्या मध्ये मुलांना जागा नाही हा विचार प्रबळ आहे.
आणि तो चूक आहे असे पण नाही व्यक्ती स्वतंत्र मान्य.
पण मुल होण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघे लागतात .
आणि दोघांची मत भिन्न असतील तर संघर्ष अटळ.
आणि सुख म्हणजे काय ह्याची काही फिक्स व्याख्या नाही.
कोणाला कशात सुख वाटेल हे सांगता येणार नाही
काही ना निसर्ग रम्य ठिकाणी एकटे बसण्यात सुख वाटत तर काही लोकांना पब डिस्को मध्ये.
मानवी इंद्रिय ना सुखाची अणुभाती देणारे प्रसंग व्यक्ती नुसार वेगळे असतात.
आणि प्रजनन चे मूळ सेक्स मधून मिळणारे सुखाचे अनुभव हेच आहे.
सेक्स हा त्रास दायक असता तर फक्त मुल होण्यासाठी कोणी ती केला पण नसता.
हे निसर्गाला माहीत आहे म्हणूनच सेक्स हा सुख कारक आहे.
सेक्स ची भावना नष्ट झाली तर प्रजनन हा प्रश्न राहणारच नाही .
स्त्री विषयी आकर्षण चे मूळ च नष्ट झाले तर कुटुंब शिल्लक राहूच शकत नाहीत.
हळू हळू तसे बदल होत आहेत .
पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होत आहे काही वर्षात सेक्स ची भावना पण कमजोर होवू शकते.
स्त्री ची पण तीच स्थिती आहे चार ते पाच मुलांना जन्म देण्याची स्त्री ची शारीरिक क्षमता कमी झाली आहे
नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे..
निसर्ग त्याचेच नियम सर्वांना लावणार त्या मधून माणूस वगळला जाणार नाही.

Pages