मायाजाळ

Submitted by अलंकार on 19 July, 2020 - 06:16

मायाजाळ

बाजूलाच झोपलेल्या नवऱ्याला आवाज न येऊ देता हुंदके दाबत रडून रडून डोकं अतिशय गरम झालं होतं आणि ह्या क्षणाला मला श्वास देखील घेता येत नव्हता, तसं भांडण काही मोठं झालं नव्हतं पण तो जोरात ओरडला माझ्यावर, त्याचं खूप जास्त प्रेम आहे माझ्यावर कदाचित त्यामुळेच त्याचं ओरडणं मला सहन झालं नाही,खूप वाईट वाटलं आणि त्यापेक्षा जास्त वाईट ह्याचं वाटलं कि मी रडतेय आणि तो काहीही न बोलता झोपला.
माझी काहीही पर्वा नाहीये त्याला ह्याविचाराने मला अजून रडायला आलं, चक्कर आल्यासारखं झालं, अर्थातच मी जास्तच विचार करत होते.

मला मोकळा श्वास घ्यायची गरज होती, रात्रीचे पाउणेतीन वाजले होते, रात्री बारा नंतर घरातलं कुणीही एकटं बाहेर फिरत नाही, इतकंच काय तर अंगणात देखील जास्त थांबत नाही कुणी, असो.
मी शांतपणे दार उघडून बाहेर आले. एक वाऱ्याची थंड झुकून माझ्या गालांना स्पर्शून गेली. मी डोळे बंद करून दोन चार मोठे श्वास भरून घेतले,जरा बरं वाटलं.
डोळे धाव घेतील तिथवर अंधार त्यात अतीव शांतता मिसळली होती, थोडं थोडं अंधुक दिसत होतं, अंगणातील हिरवी झाडे मधून सळसळ करत होती, त्याच्यामध्ये माझ्या हौशीसाठी लावलेला झोपाळा दिमाखात उभा होता, त्याला पाहून मी काहीही विचार न करता पायऱ्या उतरून त्यावर बसले.

हलकासा झोका देऊन मांडी घालून मी डोळे मिटून शांततेत स्वतःला शांत करायचा प्रयत्न करू लागले पण कसलं काय त्याचं ओरडणं आठवून अजूनच रडायला आलं, मी गुढगे छातीशी घेऊन त्यात मान खुपसून पुन्हा रडायला लागले.
थोडावेळ असाच गेला, हळूहळू आजूबाजूला वातावरण बदलत चाललंय जाणवायला लागलं पण मी डोळे उघडले नाहीत, अचानक मनात त्याचं बोलणं आठवलं, काहीही झालं तरीही एकटं रात्री येऊन इथे बसायचं नाही, अंगणाबाहेर त्या इमारतीकडे जायचा विचार देखील मनात आणायचा नाही, कारण . . . त्याचं पुढचं वाक्य मनात पूर्ण होतही नाही तोच डोक्यावर थंडगार स्पर्श झाला, भीतीची सणक पूर्ण शरीरभर सळसळली आणि मी दचकून पाहिलं तर बाजूला तो बसला होता माझा नवरा, माझ्याकडे डोळे रोखून, मी काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहत राहिले.

माझ्या ओलावल्या पापण्या आणि सुजलेले डोळे पाहून कदाचित तो शांत झाला नाहीतर मला इथे ह्या वेळेला पाहून मी विचारही करू शकत नाही इतका ओरडला असता, तो माझ्या डोळ्यात थेट पाहत राहिला, मीही मोहित झाल्यागत त्याच्या डोळ्यांत काहीतरी ओळखीचं शोधू लागले, ज्या डोळ्यांत तासनतास हरवून प्रेमाचे कित्येक आठवणींचे क्षण साठवले ते डोळे आज कोरडे वाटले अनोळखी असल्यागत.
मी काही बोलणार तोच त्याने शांतपणे माझे हात त्याच्या हातात घेतले, किंचित स्वतःकडे खेचत म्हणाला, रागावलीस??
मी काहीच बोलले नाही, आजूबाजूचं वातावरण आधी होतं त्यापेक्षा कितीतरी वेगळं भासत होतं, त्याचा प्रत्येक स्पर्श अतिशय थंड आणि नजर थेट डोळ्यांत होती, झाडं सळसळत नव्हती कि वाऱ्याची झुळूक नव्हती, मी त्याच्याकडे फक्त पाहत राहिले.
ठीक आहे नको बोलूस मला माहित आहे तुझा अबोला कसा तोडायचा तो. त्याने मला उठवलं आणि कानाजवळ येऊन बोलला, माझा हात धरून कुठवर येऊ शकतेस??
तू नेशील तिथवर, मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलले.
तो गोड़ हसला, मला हायसं वाटलं, मग चल जरा त्या इमारतीपर्यंत फिरून येऊ, तुला जरा बरं वाटेल, मग शांत झोपशील, तो प्रेमाने म्हणाला.
ह्या वेळेला?? मी आश्चर्याने म्हणाले.पण तू तर म्हणाला होतास. . .
त्याने माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला मी असताना कसली भीती, निघायचं??
मी त्याचा हात पकडून दोन पाऊले पुढे चालले तोच, जोरात दार उघडलं, आणि मी दचकून तिकडे पाहिलं, दारात तो उभा होता माझा नवरा, माझ्याकडेच पाहत होता, पायऱ्या उतरून तो माझ्याकडेच येत होता,
तो आता येतोय मग हा कोण आहे ज्याचा मी हात पकडून चालली होते??? मला धाप लागली, क्षणात अंग थरथरू लागलं, आणि मान वळवून त्याच्याकडे पाहिलं, माझा हात एकटाच हवेत असल्यासारखा स्थिर होता, आजूबाजूला कुणी नव्हतं, काही विचार करायच्या आत मी समोर त्याच्या खांद्यावर भोवळ येऊन पडले.

क्रमशः:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!