चंद्रोदय

Submitted by एविता on 20 July, 2020 - 06:18

चंद्रोदय.
त्या दिवशी, खरं म्हणजे रात्री, मी आणि ऋषिन् आमच्या घराच्या गॅलरीत उभे होतो. संकष्टी असल्याने माईंचा उपवास होता आणि माझाही. चंद्रोदय दहाच्या आसपास होता. आम्ही दोघं चंद्र दिसतोय का ते पाहत होतो.

"केंव्हा उगवणार हा चंद्र देव जाणे," मी बोलले.

"अगं दहाची वेळ आहे ना? अजून नऊ सत्तावन्न होतायत. येईल दोन तीन मिनिटात." तो म्हणाला.

"चंद्र दिसल्यावरच कुकर लावायची माईंची पद्धत, आणि मला तर जाम भूक लागली आहे रे...आणि या ढगाळ वातावरणात चंद्र दिसणार तरी का..?"

"एक काम करूया का?" तो म्हणाला.

"काय?"

"तू आणि माई एकमेकांना बघा आणि मग तू कुकर लाव."

" हा s s हा, " मला हसू दाबता येईना. "हा s s हा s s हा."

"का हसतेस?"

"माईना बाबा, "चांद सा मुखड़ा क्यों शरमाया..." असे म्हणायचे का काय असं वाटलं म्हणून... हा हा .."

"नाही. ते तिला दिलदार म्हणत. चलो दिलदार चलो चांद के पार चलो असे म्हणायचे.." ऋषीन् गंभीर झाल्याचा आव आणत बोलला.

मला हसू आवरत नव्हते. "हा हा हा..मग..? माई काय म्हणायच्या?"

"त्यांच्या पिढीत हो ला हो करायची पद्धत होती म्हणून ती पण हम हैं तैयार चलो म्हणायची. एकदा बाबांनी तिला काहीही सांगितलं की ती ते काम शेवटाला न्यायचीच. जरा जास्तच चांगलं करायची. नुसतं हम है तय्यार चलो नाही तर पुढे अगदी आओ खो जाये सितारों में कहीं छोड़ दे आज ये दुनिया ये ज़मीं असं ही ती म्हणाली. बाबा तिला फक्त दिलदार म्हणाले तर तिला नशाच चढली. हम नशे में हैं संभालो हमें तुम नींद आती है जगा लो हमें तुम असं ही ती पुढे म्हणाली."

मला कळला ऋषिनचा रोख. "मी पण म्हणाले असते हम हैं तय्यार चलो; तू चलो दिलदार चलो म्हंटला असतास तर.." मी जरासा, आवाजात जरब आणून बोलले.

"तू..?" ऋषीन् डोळे मोठे करत म्हणाला, " शक्यच नाही."

"का शक्य नाही?"

"तू आयआयएम मध्ये केस स्टडी करताना केसेसचं इतकं चिरफाड केलंयस ना की यू सफर फ्रॉम अँनलायसिस पँरालीसिस."

" हो का? देन एक्सप्लेन."

"तू म्हणाली असतीस, स्पेस सूट शिवाय आपण कसं जाणार? झीरो ग्राविटी झाली आणि मी तरंगायला लागले तर? रॉकेट फ्युअलचं काय? टॉयलेटची व्यवस्था कशी असणार? एलीयन्सनी मला पकडलं तर तुझा प्लॅन बी काय असेल?.. स्पेस सूट घातल्यावर मी कशी दिसेन रे.. शूजला मॅचींग असेल का रे स्पेस सूट.. स्पेस सूटच्या रंगाचं नेल पॉलिश मिळेल का रे ऋ...? हेअर कट कसला करू रे मी? रोमन हॉलिडे मध्ये ऑड्रे हेपबर्न करते तसं करू की स्टेप कट करू? वगैरे वगैरे..."

" हो? सांग बरं आता कुणी केली चिरफाड? सांग.. सांग," असं म्हणत मी त्याच्या पोटाला जोरात चिमटा काढला.

" अय्योअव्वा," तो कळवळला, " एलीयन्सनी तुला पकडलं तर असेच चिमटे काढ. ते सगळे तिथून थेट शुक्रावर पळ काढतील बघ." मी अजून एक चिमटा काढला.

" स्सस्सस्सस्सस्सस्स...." कुकरच्या शिट्टीचा आवाज.....! माईनी कसा काय कुकर लावला चंद्रदर्शन घेतल्या शिवाय? " माई..?" मी गॅलरीतून लगबगीनं आत किचनमध्ये येत बोलले. " अहो, तुम्ही कुकर लावून टाकला..? चंद्र दिसत नाहीये अजून माई...?"

"अगं दहा वाजले तसं कुकर लावायला मी तुला सांगणारच होते पण बेडरुमच्या खिडकीतून मी गॅलरीत तुला बघितलं, तुम्ही दोघं छान गप्पा मारत होतात, कशाला तुला डिस्टर्ब करायचं म्हणून मीच आत आले आणि कुकर लावला."

" पण चन्द्र...."

" अगं ढगाच्या मागे असेल तो दहा वाजता उगवलेला..." माई मला मध्येच तोडत बोलल्या.

" स्सस्सस्सस्सस्सस्स...." शिटीचा परत आवाज आला. "दुसरी शिटी का गं ही..? माईनी प्रश्न केला.

मी काय उत्तर देणार? मी स्वतः कुकर लावला तरीही माझाच गोंधळ होत असतो शिट्ट्या मोजताना..! आता माईनीं लावलाय तर..? " हो माई, दुसरीच शिटी असावी बहुतेक..." असं उत्तर देत मी हात पाय धुवायला बाथरूमकडे वळले. मी बाहेर आले तर पॅसेजमध्ये ऋषी आरश्यासमोर उभं राहून तोंड पुसत होता. " ये चांदसा रोशन चेहरा, जुल्फोंका..." तो गुणगुणत होता.

" स्वतःलाच काय चांदसा रोशन चेहरा म्हणतोयस ऋ.. दोन दिवसाची दाढी वाढ लीय..." मी नॅपकिन घेत बोलले.

" एवि," तो अगदी गंभीर होत म्हणाला, " तू आयआयटी खरगपूरची ग्रॅड असूनही सम टाईम्स यू अॅक्ट लाईक अ नर्सरी किड."

"का..? काय झालं..?" मी कपाळावर आठ्या चढवून प्रश्न केला.

" माई काय म्हणाली मघाशी कळलं नाही तुला, आठव?" त्यानं विचारलं.

" काय म्हणाल्या? त्यांनीच कुकर लावला असं म्हणाल्या ना..? मी उत्तरले.

" ती म्हणाली, ' दहा वाजले तसं कुकर लावायला मी तुला सांगणारच होते पण बेडरुमच्या खिडकीतून मी गॅलरीत तुला बघितलं,.... तुला बघितलं आणि कुकर लावला... तुला.. एवी तुला...! म्हणजे तू चंद्र झालीस की नाही सांग...!" ऋषी ने स्पष्टीकरण दिले.

मी त्याच्याकडे बघतच राहिले.

" म्हणून मी तुलाच ये चांदसा रोशन चेहरा म्हंटलं... येडे.."

"तू जास्त येडा. मॅड मॅक्स."

"तू नर्ड.."

"तू गीक.."

"तू डॉर्क.."

मी चिमटा काढायला त्याच्या पोटाला हात लावणार तेवढ्यात, "आरती म्हणायला या रे...", माईनीं हाक मारली. आम्ही पटकन् आत गेलो. समईत तेल घालतांना माई काही तरी गुणगुणत होत्या.

"काय गुणगुणतेस माई..? जरा वेगळंच, ओळखीचं म्युझिक वाटतेय गं.. हे आरतीचे स्वर नव्हेत.. " ऋषीन् म्हणाला.

"काही नाही रे.. ते पाकिझा मध्ये एक गाणं आहे बघ.. चलो दिलदार चलो... ते म्हणत होते..."

ऋषीनच्या आणि माझ्या हसण्याचा स्फोट झाला आणि त्यात माईही सामील झाल्या.

......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तं

हलकंफुलकं, छोटसं आणि गोड

खूृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृपच गोडुली आहे गोष्ट. खूप खूप छान.

ए एवी!! हे जर खरंच होत असेल ना तुझ्या आयुष्यात.. तर बाई लिंबू मिरची बांधून घ्या गळ्यात तिघे पण... किती गोड.. Happy :०

खूप छान.
तुमचा रंगलेँला संसार पाहून सुधीर मोघेंच्या ओळी आठवल्या.
"दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे"

@ नंबर १ वाचक. अगं मी इतके दिवस विचार करत होते की लिंबू मिरची गळ्यात बांधून हिंडायच कसं? आम्ही कसे दिसू? मग कल्पना सुचली की चांदीची मिरची आणि लिंबू करून गळ्यात घालावी. सराफाकडे दिलंय करायला! तुझी सूचना शिरोधार्य!!! Love you!