गायछाप चुनापुडी

Submitted by ध्येयवेडा on 14 July, 2020 - 04:18

बेल वाजली.
तो बेडरूम मधून गडबडीत बाहेर आला आणि त्यानं दार उघडलं.
समोर जित्या उभा होता.
"आधी हे तुझं जॅकेट घे बाबा. खूप दिवस झाले नेलं होतं, त्यावरून तुझ्या वहिनीनं माझं किती डोकं खाल्लं सांगू.." - जित्या हसत म्हणाला.
"अरे आत तर ये.. बाबा आहेत आतमध्ये..थांब बोलावतो"
"हम्म.. तुमची स्वारी कुठे?"
"असंच बाहेर चाललोय जरा.." - जित्याला उत्तर देणं टाळत तो आवरण्यासाठी आतमध्ये निघून गेला.

कारणही तसंच होतं. तो 'तिला' भेटायला निघाला होता.
"जित्या बाहेर पाऊस आहे का रे?"
"छे..अजिबात नाही"
"बरं झालं, ते जॅकेटचं ओझं नकोच..पाऊस नसला की भयानक उकडतं त्यात..
जित्या, तू बस. मी आलोच जाऊन"
तो निघाला.

त्याची आज तिच्यासोबत चवथी भेट. दीडएक महिन्यापूर्वी अनुरूपवर त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघंही एकमेकांना अधिकाधिक जाणून घेत होते. आणि आता जवळपास निर्णयावर आले होते.
वाडेश्वर मध्ये ठरलेल्या टेबलावर ती पाठमोरी बसलेली.
"हाय.. सॉरी थोडासा उशीर झाला मला .."- त्यानं हातातला लाल गुलाब आणि सिल्क पुढे करत माफी मागितली..
ते गुलाबाचं फुल बघून तिची नाराजी विरून गेली.
थोडावेळ त्यांच्यात बाकी राहिलेल्या औपचारिक गप्पा झाल्या.. एव्हाना त्यांच्या डोळ्यांनी एकमेकांना होकार कळवून टाकला होता.

"मला वाटतं गेल्या तीनचार भेटींमध्ये आपण एकमेकांविषयी पुरेसं जाणून घेतलंय .. हो ना ?" - तो
"राइट.... म्हणजे मोस्टली सगळंच .." - ती
"मोस्टली म्हणजे? अजून मला काही माहीत असावं असं काही असेल तर सांगून टाक..." त्यानं सौम्यपणे तिला विचारलं.
" अम्म्म्म मला नं ..जाऊ दे .. खरंतर मी सांगितलं तर तू म्हणशील ही किती टिपीकल मुलगी आहे .." तिनं आवाजात लाडाचा टोन आणत म्हटलं
"हे बघ असं काही नाही ... तू प्लीज नि:संकोच सांग... मला जाणून घ्यायचंय"
"ठीके, हे बघ पाहिलं म्हणजे मला व्यसन करणारी माणसं अजिबात आवडत नाहीत..
म्हणजे तू कसलंच व्यसन करत नाहीस ते तू मला आधी सांगितलंयस.. पण तरी.."
"अगं बाई आता कोणाची शपथ घेऊन सांगू तुला..खरंच मला कशाचंही व्यसन नाही.. विश्वास ठेव ..प्लीज?" - तो
तिनी होकारार्थी मान डोलवली
"अजून काही?..."
"माझ्याशी कोणी खोटं बोललेलं किंवा वागलेलं मला सहन होत नाही.. कोणी खोटं बोललं की खूप त्रास होतो मनाला.." तिनी एकदाचं सांगून टाकलं
"बस इतकंच ना? मी कोणत्याची परिस्थितीत तुझ्याशी खोटं बोलणार नाही ! आय प्रॉमिस.. अजून काही?"- तो
"उंहू.." स्वतःच लाजणं लपवत आणि आपल्या नाजूक हातांनी गुलाबाच्या फुलाला कुरवाळत तिनं एक गोड स्माईल दिली.
तिच्या मोहक डोळ्यात बघताना मनातल्या मनात त्यानं तिला मिठीत ओढलं.

"तू शनिवारी घरी येऊ शकशील का, आईबाबांना भेटायला? घरीच डिनर करूया. तुझ्या घरून परवानगी कशी मिळेल ते बाबा बघून घेतील"
"चालेल येते" ..

बेल वाजली तसा तो ताडकन उठला. अर्थात तो तिचीच वाट पाहत होता.
तिनं अबोली रंगाचा आणि सोनेरी जरीकाठ असलेला कुर्ता घातला होता. तिला बघून तिच्या उशिरा येण्याला त्यानं मनातल्या मनात माफ करून टाकलं.

त्याला ती पसंत होती. तिला तो पसंत होता. आणि आईबाबांना हे नातं पसंत होतं.
त्याच्या घरातलं मोकळं वातावरण तिला आवडलं.
गप्पा रंगत गेल्या.
तेव्हड्या वेळात घड्याळसुद्धा खूप धावलं.

"बाप रे..पावणे अकरा..ए मला निघायला हवं.." - ती अचानक भानावर आली.
"नीट जा हं, पोचलीस की मला एक मेसेज टाक.." त्याची आई.

तो तिला सोडायला पार्किंग मध्ये गेला. तेव्हडीच पाच एक मिनिटं अजून Happy ..
बाहेर पावसाची भुरभूर होती..
"ए थांब, माझं जॅकेट देतो... भिजू नकोस".. नवीन नातं तयार होत असताना मुद्दाम घ्यायची असते तशी त्याची ही काळजी.
"अरे इट्स ओके, जाईन पटकन.." त्याच्या काळजीची परीक्षा घेण्यासाठी तिचेही मुद्दाम नखरे.
"तू भिजलीस तर एकवेळ चालेल गं, पण इतका छान कुर्ता नको भिजायला..आलोच जॅकेट घेऊन.." त्यानं अजून एक पॉइंट कमावला.
धावत जाऊन दारामागे लावलेलं जॅकेट आणलं आणि तिला दिलं.
ती तिथून गेल्यावर काही वेळ तो तिथेच घुटमळत राहिला. त्याची वाढलेली anxiety त्याला जमिनीवर ठेवत नव्हती.

"हाय, थोड्या वेळात भेटू शकशील का ?.. एक महत्त्वाचं बोलायचं आहे.." दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा त्याला मेसेज.
"वाडेश्वर?" - तो
"नको, वाटेतच कुठेतरी भेटू, मला फार वेळ नाही थांबता येणार.." - ती
"ये खाली तुझ्या बिल्डिंगच्या .. मी निघालोय"

तो पोचला तेव्हा ती जॅकेट घेऊन उभी होती.
"हे बघ... इट्स ओव्हर, हे तुझं जॅकेट..." - ती
"व्हॉट? काय बोलतीयेस तू"
"मी तुला स्पष्ट म्हणाले होते की मी खोटं बोलणं आणि वागणं कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करू शकत नाही" ती शक्य तितक्या खालच्या स्वरात बोलली.
"अगं पण झालं काय? नीट सांगशील का ? आणि मी काय खोटं बोललो कळेल का?"
"ते तू तुझ्या जॅकेटलाच विचार ना ..इट्स ओव्हर..निघते मी" हे वाक्य त्याच्या तोंडावर फेकून ती निघून सुद्धा गेली !
"व्हॉट नॉन्सेन्स ! हि काय पद्धत आहे वागायची? नीट क्लिअर तरी सांग काय झालं ते.." तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ओरडला.
त्यानं पाच मिनिटं तिची वाट बघितली. एक आवंढा गिळून जॅकेट चढवलं आणि तो घरी आला.
सोफ्यावर डोकं ठेवून शांत पडला...आपण काय खोटं वागलो ह्याचा विचार करत..

तितक्यात मोबाईल वाजला. आतुरतेनं त्यानं मोबाईल बघितला.
"जित्या? हा कशाला आत्ता फोन करतोय.."
"हम्म.. बोल.." आवाजातील थरथर लपवत त्यानं फोन घेतला.

"अरे परवा माझ्या लक्षात नाही आलं.... त्या जॅकेटच्या डाव्या खिशात बहुतेक माझी गायछाप चुनापुडी राहिलीये.. ती तेव्हडी काढून फेकून दे...."
फोन कट करून त्यानं एक शीळ घातली, आणि गालातल्या गालातच खुदकन हसला.

समाप्त.
- ध्येयवेडा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काढ चुना, मळ पुन्हा!

-(दारू शिवाय व्यसन "समजल्या" जाणाऱ्या इतर कोणत्याच गोष्टीत न अडकलेला) राव पाटील!

जबरी.

वावे. खातात की, पार आयटीवाले एम एन सी मध्ये काम करणारेपण खाताना बघितले आहेत. फक्त ते लपून खातात..इतकचं..

कथा जबरी आहे पण एंड नाही आवडला. जे होते ते चांगल्याकरता होते. नाण्याची अशी एकच बाजू पहाणार्‍या मुलीशी हिरोने लग्न न केलेले बरे. Proud

वास्तवीक तिने त्याला विचारुन नीट खुलासा करुन घ्यायला हवा होता, पण ती वेडी असेल.

@अजिंक्यराव पाटील - खरंच आहे, दारूला व्यसन म्हणावे का आजकाल Happy
@वावे धन्यवाद. कित्त्येक ब्रँड आले आणि गेले, पण गायछाप ती गायछाप. (अर्थात हा माझा अंदाज, मी खात नाही Wink )

काही मूली अस्तातच फार संशयी, त्यामुळे नातं फार काळ टीकत नाही आणि खापर मात्र मुलांवर फोड़तात. जित्याचे खुप सारे आभार मानले पाहिजे हीरोने Wink अश्या दिखाऊ सौंदर्य पासून कायमचं वाचवलं म्हणून !

@ऋनिल धन्यवाद.
@रश्मी प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कथेचा शेवट वाचकांवर सोडला आहे. त्यांचे अरेंज मॅरेज होत आहे, त्यांना एकमेकांना ते आवडू लागले आहेत, पण प्रेम अजून घट्ट व्हायचं आहे. त्यामुळे तिची अशी रिअक्शन व्यवहारी वाटते.

@आशुचँप Happy

@एविता जित्याने मुद्दाम काहीच केले नाही. सर्व योगायोगच. जित्या तंबाखू खातो हे नक्की.
@अज्ञानी मला वाटतं तिची प्रतिक्रिया व्यवहारी आहे. त्याच्याशी भांडून खुलासा मागण्याइतकं त्यांचं नातं कदाचित मुरलेलं नाही.

आधीचा पार्ट?
एकाच भागात संपल ? *-‌*
जाम भारी लिहीलय ! गावातलीच वाटली ही स्टोरी
खूप हसलो...

हलकाफुलका गोष्ट

फोन कट करून त्यानं एक शीळ घातली, आणि गालातल्या गालातच खुदकन हसला.>>>> हे हसण्याचं कारण कळलं नाही. आता तिच्या चिडण्याच कारण कळलय आणि त्यामुळे तो तिला convince करू शकेल म्हणून?

@धनुडी हो, बरोबर.
त्याला कारण समजलं आणि आपण तिला कन्व्हिन्स करू शकतो असा विश्वास आहे. तिला गमावणार नाही ह्याचा आनंद.

कथा मस्त आहे, आवडली Proud

बाकी पान बिडी सिगारेट तंबाखू खाणारे बरेच असतात. सिविल ईंजिनीअरींग कॉलेजला तर मोक्काट.

फक्त ती कुठलेही व्यसन नसणारा मुलगा हवाय अशी अपेक्षा असणार्‍या मुली किती असतील हा प्रश्न आहे..

@ऋन्मेऽऽष -- धन्यवाद.
च्रप्स -- मुळातच भारतात स्त्रिया व्यसनाधीन कमीच आहेत असे दिसते (पुरुषांच्या तुलनेत). सध्या प्रमाण वाढलेले आहे खरे, पण स्मोकिंग आणि ड्रिंकिंग ह्या मॉडर्न सवयी दिसतात. आणि त्यातही एक हौस किंवा फॅशन म्हणून घेतात असं वाटतं.
बाकी तंबाखू आणि मिश्री लावणाऱ्या बायकाही असतातच (खासकरून धुणे भांडी अशी कष्टाची कामे करणाऱ्या).