भगवंताची कृपा

Submitted by बिपिनसांगळे on 26 June, 2020 - 10:34

भगवंताची कृपा
----------------------------------------------------------------------------------------------------

सकाळची वेळ होती. रस्त्याच्या दुतर्फा दुकानं असलेल्या त्या बाजारपेठेत अजून गजबज सुरू व्हायची होती. सूर्याची किरणंही जरा रेंगाळून खाली उतरत होती.
बहुतेक दुकानं कपड्यांची. पण त्यातही स्त्रियांच्या वस्त्रांची जास्त. पार रंगीबेरंगी कटपीसपासून ते भरजरी शालू-पैठण्यांपर्यंत.दुकानं सुरू झालेली नव्हती. पण आतून मात्र साफसफाई आणि आवराआवर सुरू होती. उत्तरा फॅशन्समध्येही तयारी सुरू होती.
वेडेवाकडे केस कापलेला लोक्या मोठ्याश्या, पूर्ण उंचीच्या शोकेसमध्ये कोणाला मिठीत घेऊन उभा होता. मागून ते नीट दिसत नव्हतं.
तो म्हणाला, “गुडमॉर्निंग डार्लिंग!”
आणि मागून कपाळाला टिळा लावलेले माऊली आले. त्यांनी हातातल्या, शटर वर करायच्या लीव्हरने लोक्याला ढोसलं. त्यासरशी लोक्या एकदम दचकलाच.
त्याच्या हातातली त्याची डार्लिंग धाडकन खाली पडली. तो एक माणसाच्या उंचीचा ,काळ्या रंगाचा, मॉड तरुणीचा पुतळा होता. मॅन्युक्वीन ! पूर्ण उघडाच.
हा सगळा प्रकार पाहणार्या चंद्याला हसू आलं.
“नाही मेंदू रे डोक्या - काय करील लोक्या!” , हभप माऊली म्हणाले.
त्यावर चंद्याला आणखीच हसायला आलं.
“लोक्या, तो मॅनकीन तुटला ना मालक पगारातून कापून घेईल हां पैसे,” माऊली म्हणाले आणि दुसऱ्या कामाकडे वळाले.
लोक्याने खाली पडलेला पुतळा उचलला. त्या पुतळ्याच्या डोळ्यांमध्ये बघत तो, “सॉरी डार्लिंग!” म्हणाला व त्याने त्या पुतळ्याच्या ओठांवर ओठ टेकले.
“कधीतरी सुदर साल्या!” चंद्या त्याला म्हणाला, “रोजचे नखरे तुझे. पुतळे मिठीत काय घेतोस, वाट्टेल ते करतोस.”
त्यावर लोक्या म्हणाला, “तुझं काय नुकतंच लग्न झालंय. रोज रात्री मस्त बायकोला चिकटून झोपत असशील. आमचं दु:ख तुला काय कळणार, सिंगल लोकांचं ! तुझं बरंय !”
त्यावर चंद्याचा चेहरा पडला. त्याला वाटलं, या शहाण्याला माझं दु:ख काय कळणार ?
तो काही न बोलता, त्याच्या हातातल्या पुतळ्याला सोनेरी ,ब्रायडल लेहेंगा नेसवू लागला. त्या भल्यामोठ्या प्रशस्त दुकानात, फुल लाईट्समध्येही त्याला अगदी भकास वाटलं.

***

त्याचं झालं होतं असं –
चंद्याचा बाप त्याच्या लहानपणीच वारला होता. त्याच्या मागे सरस्वतीबाईने त्याला वाढवलं होतं. खूप काबाडकष्ट करून. तिने त्याला खूप लाडात वाढवलं होतं. तोही तिच्या शब्दाबाहेर कधीच नसायचा.
दहावीमध्ये चार गटांगळ्या खाल्ल्यावर त्याने शिक्षण सोडलं.इथे तिथे काम करत शेवटी तो उत्तरा फॅशन्समध्ये लागला होता. ते स्त्रियांचं प्रसिद्ध वस्त्रदालन होतं.
लोक्या त्याचा दुकानातला खास मित्र होता . त्याच्या नादी लागून चंद्याने स्मार्ट फोन घेतला. व्हॉटस्अपही घेतलं. झालं !
एके दिवशी सकाळी, सरस्वतीबाई पोहे करत होती. लोक्याने चंद्याला एक मेसेज पाठवला. त्याने तो पाहिला. एका फटाकड्या पोरीचा तो टिकटॉक मेसेज होता-

पोरा तुझा माझ्यावर
भरोसा नाय का- नाय का
प्रॉमिस माझं नाही रे गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल

तुझ्या पोरांची आई होईन रे ढोल ढोल
आता तरी माझ्याशी गोड बोल

ते पोरीच्या गोड आवाजातलं गाणं ऐकलं मात्र, ती आतल्या खोलीतून तरातरा बाहेर आली.
“चंद्या, कोण बोलत होतं आता ?”
“कुठंय कोण ?”
“खोटं बोलू नगंस द्वाडा. पहिला बोल , कुठंय ती पोरगी ?”
“पो-र-गी ?”
आता चंद्याची ट्यूब पेटली. त्याने ‘ती पोरगी’ आईला दाखवली. ते गाणं मोबाईलवर परत लावलं.
ती पहातच राहिली. गोरीपान, फटाकडी, शेलाटी, एक नखरेल पोर ! त्यात कमी कपड्यातली, गोऱ्या गोऱ्या मांड्या दाखवणारी … आणि ती म्हणते कशी- पोरा तुझा माझ्यावर भरोसा नाय का?
सरस्वतीबाई अडाणी ! ती हतबुद्धच झाली. हे मोबाईल, व्हाट्सअप अन टिकटॉक प्रकरण तिच्यासाठी नवीन आणि अवघडच होतं. ती हे पहिल्यांदाच पाहत होती.
“कोण ही रे ? कुठं लफडं केलंयस मेल्या ? आन् फसवलंय काय तू हिला ? “ अन् बिचारीच्या डोळ्यात पाणीच आलं. “पोटशीबिटुशी हाय का काय ती ? तेबी तुज्यापासून ?”
मग चंद्या हसतच सुटला.
त्याला ही गोष्ट आईला समजावून सांगणं अवघड होतं. अशक्य ! शेवटी रात्री लोक्या घरी आला. त्याने त्याचा मोबाईलही चंद्याच्या आईला दाखवला.
“आरं, तुज्याबी मोबाईलमधी तीच पोरगी ? किती जणांना नादाला लावलंय मेलीने कोणास ठाऊक ? चवचाल कुठली !” सरस्वतीबाई म्हणाली.
मग ना, लोक्याही हसत सुटला.
हसायचं थांबल्यावर त्याने सगळी भानगड समजावून सांगितली. टीव्हीसारखाच हा एक प्रकार आहे, हे कळल्यावर सरस्वतीबाई शांत झाली.
पण तिने चंद्याला सांगून टाकलं, “आता मी लवकरच तुजं लगीन करून टाकणार.”
“का गं आई एवढी घाई?”
“ती पोरगी खरी आसंल, खोटी आसंल, पर आता माजा तुज्यावर भरोसा नाय म्हणजे नाय!”

***

सरस्वतीबाईने लवकरच चंद्याचं लग्न उरकलं. सुलभा बारीक अंगकाठीची असली तरी एक चटपटीत पोरगी होती . सुलभा घरात आली. तिची चंद्रिका झाली. कोरीव दाढी राखलेला , हसऱ्या चेहऱ्याचा चंद्रकांत आणि चंद्रिका लक्ष्मीनारायणाचा जोडा झाला.
मग सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी लोक्या म्हणाला, “वैनी नाव घ्या मस्त.”
आणि चंद्रीने एकदम स्मार्ट नाव घेतलं-

पोरगी वाचवा पोरगी शिकवा
चंद्रकांतरावांचं नाव घेते
सरकारी धोरण टिकवा

एकच हशा पिकला. पोरांनी टाळ्या पिटल्या. आणि तिथेच घोळ झाला.
रात्री झोपायच्या आधी सरस्वतीबाईने चंद्याला सांगितलं, “काय बोलती रे ही आगावसारकी, हां ? ते काय नाय चंद्या, मला नातूच पाहिजे. पोरगी-बिरगी जमणार नाय, सांगून ठेवते.”
घोळ झाला आणि वाढतच गेला.
त्यामुळे सकाळच्या पारी लोक्याने दुकानात केलेली चेष्टा कितीही खरी असली तरी अंदरकी बात वेगळीच होती . त्यामुळे चंद्याला उदास वाटलं होतं , भकास वाटलं होतं .

***

एका हव्याशा वाटणाऱ्या रात्री नवरा-बायकोच्या गप्पा रंगल्या होत्या.
त्यांचं घर एका जुन्या, साध्या वाड्यातलं. दोन खोल्यांचं. सरस्वतीबाई आतल्या खोलीत झोपायची. म्हातारीला काही झोप येत नव्हती.
“आईला नातू पाहिजे आणि तुला मुलगी, असं का?” चंद्याने विचारलं.
ती म्हणाली, “मला वाटतं ,एक गोड मुलगी असावी. तिचे लाड करावेत. कोडकौतुक करावं. तर आईंचं आपलं वेगळंच ! म्हणे नातू पाहिजे. कशासाठी? जन्म देणार मी ! मग मी कोणाला जन्म द्यायचा आहे ही गोष्ट ह्या का सांगणार?” तिचा आवाज वाढलेला.
झालं !... सरस्वतीबाईंचं डोस्कंच फिरलं.
ती आतून ओरडली, “चंद्या, नातूच व्हायला पाहिजे सांगून ठेवते.”
चंद्या चमकला. चंद्री उचकली.
“ही काय वेळ आहे होय, असं दुसऱ्याचं बोलणं ऐकण्याची? “चंद्री कडाडली.
त्यावर सरस्वतीबाई बाहेरच आली.
“काय बोलतीस गं भवाने, हां ? - हे माझं घर आहे , कळलं ? आणि तिच्या डोळ्यांत पाणी आलं. “अन् काय मागते रे मी ? फक्त नातूच ना, मग ? माझं काय ? थोडेच दिवस तर राहिल्यात...”
त्यावर चंद्रीही म्हणाली, सासूच्याच स्टाईलमध्ये, “हां, ते बी खरंच म्हणा !”
तिच्या वाक्यावर म्हातारीचा भडका उडाला, साहजिकच. आणि त्या भडक्याची आग झाली. जी शमता शमेना.

***

सरस्वतीबाईंला नातू हवा होता. तोही लगेच. वंशाला दिवा ! तर चंद्रीला मुलगी हवी होती. एका बाजूला आई होती. जिचं मन त्याला मोडवत नव्हतं. एका बाजूला लाडाची बायको होती.
पण त्या दोघींमध्ये 'सँडविच ' झालं होतं ते चंद्याचं.
अवघड काम झालं होतं गड्याचं. मुलगा की मुलगी हा प्रश्न गलवानपेक्षा अवघड झाला होता. मग बिचारा तस्साच झोपायचा. प्रश्न न सोडवताच.
एकदा चंद्री लाडाने म्हणाली , " अहो , तुम्ही बाबा कधी होणार ? "
चंद्या म्हणाला , " कधीही ! "
" कधीही ? कसं काय ? काहीच न करता तुम्हाला फळ हवं आहे होय ? "
" होतं उशीरा बाई ! आता बघ, आमच्या दुकानातल्या प्रकाशला एवढ्यात मुलगा झाला . पण कधी ? तर चार वर्षांनी ."
त्यावर चंद्री लाडीकपणे म्हणाली ," मग तुमचा प्रकाश कधी पडणार चंदूबाबा ? "
"पडेल गं बाई !" तो त्रासून म्हणाला .
"अहो , आयाबाया विचारात असतात सारख्या . "
त्यावर तो कातावला , " ज्या बायका व्यायल्या आहेत ना , त्यांना ह्या असल्या गोष्टी जास्त सुचतात ! ... "
त्यावर चंद्री रडू लागली . चंद्या ते पाहून विरघळला . तर आतमध्ये सरस्वतीबाईला वाईट वाटलं .

***

सकाळची वेळ, उत्तरा फॅशन्समध्ये चंद्या आणि लोक्या रोजच्यासारखे आवरत होता. पुतळ्यांना कपडे चढवत होते.त्यांच्या वस्त्रदालनात एक विभाग खास प्रेग्नंट बायकांसाठीच्या वस्त्रांचा होता. वेगळ्या फॅशन्सचा आणि वेगळ्या फिटिंग्सचा !
लोक्याच्या हातात एक पूर्ण उघडा, गरोदर बाईचा पुतळा होता. तो तिच्या पोटावरून रोजच्यासारख्या हात फिरवत होता.
तो वात्रटसारखा म्हणाला, “ही बया बघा, आल्यापासून हिला आठवा महिना लागलेला आहे. पण पुढे सरकतच नाही. कधी मोकळी व्हायची ही?”
पलीकडून माऊली आले. त्यांनी लोक्याकडे रागावून पाहिलं.
चंद्याला हसू आलं. माऊली पुढे गेले.
लोक्या काय शांत बसतो होय, तो चंद्याला म्हणाला, “चंदूराव, तुमचं असं कधी होणार?”
त्याच्या त्या वाक्यावर चंद्या चपापला. नंतर तो लोक्याच्या जवळ जाऊन दबक्या आवाजात म्हणाला,
“लोक्या, प्रॉब्लेम आहे!”
मग लोक्याचा नूर बदलला.
“काय प्रॉब्लेम आहे?”
चंद्या त्याला कसं सांगणार, तो म्हणाला, “आहे.”
“वैनींचा प्रॉब्लेम आहे का?”
“नाही.”
“मग तुझा प्रॉब्लेम आहे का? एवढा जानजवान गडी तू. लेका, पावली कमी आहेस का काय ? लोक्या डोळे मिचकावून म्हणाला.
“लोक्या”, चंद्या रागवून ओरडला, “साल्या काहीपण बोलतोस?
त्याच्या त्या अवतारामुळे लोक्या गप्प झाला. त्याला कळालं काहीतरी गडबड आहे. तो सॉरी म्हणाला .
मग चंद्याने आज पहिल्यांदाच, त्याच्याजवळ स्वतःचं मन मोकळं केलं .
लोक्याने त्याची पाठ थोपटली अन म्हणाला , " भाई , होईल सारं नीट . तू नको टेन्शन घेऊ ! " आणि तो हसत गुणगुणला - " देवाक काळजी रे , माझ्या देवाक काळजी रे ! "
चंद्याचा जीव जरा हलका झाला .

***
सरस्वतीबाईला काळजी लागून राहिली होती . ती कमलाताईंकडे कामाला जायची. त्या स्वभावाने चांगल्या होत्या . म्हणून तिने एकदा चंद्रीला त्यांच्याकडे पाठवलं .
त्यांनी तिला बसवून घेतलं. लाडू - चिवडा दिला . मग त्या म्हणाल्या , " काय प्रॉब्लेम आहे गं तुझा ? मुलं होत नाहीत , त्याच्यावर आता खूप उपाय निघाले आहेत . एक डॉक्टर आहेत , दशपुत्रे नावाचे ... "
त्यावर चंद्री ठसक्यात म्हणाली ," माहितीये मला , लोकांची मुलं जन्माला घालतात -पण त्यांना स्वतःलाच मुलबाळ नाहीये ! “
कमलाताईंचे डोळेच मोठे झाले . चंद्री पुढे म्हणाली , " अहो ,सगळा पैशाचा खेळ ! पण मला ना याची काही गरज नाही . आमच्या शेजारची गीता जाते ना त्यांच्याकडे कामाला . ती सांगते सगळं . आईंना नातू हवा आहे . ताई , तुम्हीच सांगा , कशाला पाहिजे मुलगा ? तुमचा मुलगा तुम्हाला सोडून राहतो ना ? आई सांगत असतात . तुम्हाला कित्ती वाईट वाटतं ते . "
ताईचे डोळे आता मात्र बटाट्या एवढे मोठे झाले .
ती पुढे बोलतच राहिली , " अहो ताई , प्रॉब्लेम आहे तो आईंचा . त्यांनी घातलाय हा खोडा . मुलगा अन मुलगी - त्यामुळे माझे मिस्टर ... "

***
कमलाताईंनी सरस्वतीबाईला हे सारं सांगितलं . त्याच्या दुसऱ्या दिवशी-
सरस्वतीबाई घुश्श्यातच होत्या.
“चंद्या, आज मी जागृत मरीआईला जाणार आहे. तिला नवस बोलणार आहे- मला नातू होऊ दे म्हणून.”
चंद्याला आईच्या स्वरातली नाराजी, कळकळ जाणवली.
“जा की आये! तुला कोणी अडवलंय.”
“जाणारच आहे. नातवाचा नवस बोलणारच आहे.”
चंद्या आवरून कामाला गेला. पण त्याला माहिती नव्हतं, चंद्री कित्ती म्हणजे कित्ती रागावलीये त्याच्यावर.
दुकानात बायकांची गर्दी सुरू होण्याआधी चंद्याला चंद्रीचा फोन आला.
“मी पण चाललीये जागृत मरीआईला.”
“काय?”
“चाललीये म्हणजे चाललीये. कळत नाही का तुम्हाला ? आईने बोललेलं सगळं ऐकायला येतं, सगळं कळतं तुम्हाला.”
“पण कशासाठी?”
“शेजारच्या गंगीला पोर होण्यासाठी, कळलं ? तिच्या पोराचा नवस मी बोलणार आहे.”
“ए चंद्रे, काही पण बोलू नकोस.”
“मग ? जागृत मरीआईला बोललेला नवस पुरा होतो म्हणतात. सकाळी तुमची आई गेली ना नातवासाठी. मग मला जायलाच पाहिजे ना मुलीसाठी. बघू आजीचा नवस जास्त पॉवरफुल आहे - का एका आईचा ?”
चंद्रीने फोन कट केला.
चंद्याचा मूडच गेला.
माऊलींच्या ते लक्षात आलं. ते म्हणाले, “चंद्या , आजकाल तुझी काय तरी गणगण दिसतीये ! लई दिवस झाले मी बघतोय. एक काम कर. आज तू कामावरून सुटल्यावर माझ्याबरोबर कीर्तनाला चल . जरा मन तरी शांत होईल तुझं .”
तो हो म्हणाला. त्याला वाटलं- या सासू,सुनेने मिळून आता तर त्या देवीलाच कोड्यात घातलंय. आता कसं होणार ?

***

माऊली रोज कामावरून सुटल्यावर कीर्तनाला जायचे. मगच घरी जायचे.
चंद्या त्यांच्या बरोबर गेला. रात्रीची वेळ होती. गजबज हळूहळू शांत होऊ लागलेली . देवळात प्रसन्न वाटत होतं.
त्या विठोबाच्या मंदिरात कीर्तन चालू होतं. माऊली देवाच्या पाया पडले. मग श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. चंद्या त्यांच्या मागे.
कथेकरी बुवांनी गीतेतल्या अध्यायाचं निरुपण चालवलं होतं-
“कुरूक्षेत्रावर कौरव-पाडवांची सेना आमनेसामने खडी ठाकली होती. युद्ध सुरू होणार होतं. पण आपलेच आप्तस्वकीय पाहून अर्जुन गर्भगळित झाला होता. हतोत्साह झाला होता. त्याने त्याचं धनुष्य खाली ठेवलं.
तेव्हा प्रत्यक्ष भगवंताने त्याला सांगितलं.

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषु कदाचन-

फळाची अपेक्षा न करता तू तुझं काम करत रहा!”

ते ऐकून चंद्याचं मन घरच्या कुरुक्षेत्रावर पोचलं.

***

कीर्तन संपलं. चंद्या आता जरा शांत दिसत होता. माउलींना ते कळलं. ते त्याचा निरोप घेऊन गेले.
चंद्या घरी गेला. आवरलं. निजानीज झाली.
“काहो, आज उशीर केलात?” चंद्री जवळ येत म्हणाली.
“किर्तनाला गेलो होतो माऊलींबरोबर. बरं झालं.”
“बरं झालं ? आता देवदेव करायला लागा ! म्हणजे मी कुठल्याही देवाला नवस केला तरी काही होणारच नाही !”
“कोण म्हणतं असं, हां ? अगं प्रत्यक्ष भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय. फळाची अपेक्षा न करता काम करत रहा म्हणून ! ”
“म्हणजे ?”
“म्हणजे आता आपण फळ कुठलंय याची अपेक्षा न करता काम करू या...” चंद्याने असं म्हणत तिला जवळ ओढलं. कितीतरी दिवसांनी त्यांच्या आयुष्यात सुखाची मधुर रात्र उगवली होती.

***

फळाची अपेक्षा न करता चंद्या त्याचं कर्तव्य करत राहिला. लवकरच चंद्री गर्भवती राहिली.
यथावकाश तिला गोड , जुळी मुलं झाली. एकदम दोन ! एक मुलगा आणि एक मुलगी. सरस्वती मुलाला घेऊन बसते. चंद्री मुलीला. चंद्याचा प्रश्न चक्क असा सुटलाय !
त्याला मात्र दोन्ही पोरांना घ्यावंच लागतं. ती दोन्ही पोरं लई द्वाड आहेत ! त्या दोघांचं एवढे लहान असून पटत नाही ,अगदी चंद्री आणि सरस्वतीबाईसारखं ! त्या दोघांना वाटतं की चंद्याने फक्त आपल्यालाच घ्यावं . मग त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ती दोन्ही पोरं रडतात, ओरडतात, भोकाड पसरतात !
मग तो कातावतो. तसं झालं की सरस्वतीबाई आणि चंद्रीला हसू फुटतं.
सरस्वतीबाई आता अगदी खुश आहे .ती आल्या गेलेल्याला सांगत असते " आवं , ही सारी जागृत मरीआईची कृपा हाय ."
त्यावर चंद्या नुसता हसतो अन मनात म्हणतो ' ही तर सारी भगवंताची कृपा !’

----------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भगवंतावर इतका भार! Lol

बिपिनदा, तुम्ही लिहिलेल्या इतर कथांपेक्षा पुर्णतः वेगळी अशी लेखनशैली आज वाचायला मिळाली.. हा बदल मनापासुन आवडला.. Happy असेच लिहिते रहा..

च्रप्स
सस्मित
मंजूताई
मंडळी आभार

मन्या
विशेष आभार

पण हे असं लिहिणं खरंच अवघड आहे
मला तरी वाटत