शेगाव कचोरी (मूग डाळीचं सारण)

Submitted by भानुप्रिया on 2 July, 2020 - 01:35
Shegaon kachori
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पारीसाठी:

२ कप मैदा
१/४ कप कणिक
१/३ कप तेल (कडकडीत तापवून, मोहन म्हणून)
मीठ, चवीनुसार

सारणासाठी:

१ कप मूग डाळ (पिवळी, साल विरहित)
१०-१२ तिखट हिरव्या मिरच्या
१-१/२ इंच आलं
१०-१२ पाकळ्या लसणाच्या
बचकाभर कोथिंबीर
२ छोटे चमचे बडीशोप
१ छोटा चमचा हळद
२ छोटे चमचे धणेपूड
अर्धा चमचा हिंग
चवीनुसार मीठ
चवीनुसार लिंबू रस
परतण्यासाठी तेल

--

तळण्यासाठी तेल - लागेल तितकं

क्रमवार पाककृती: 

पाकृ पोस्टस् मध्ये नमनाला घडाभर तेल हल्ली 'मस्ट' असल्यामुळे मी त्याला अपवाद असू इच्छित नाही!

तर, माझा जन्म मुंबईत झाला पण मी मूळची खानदेशी. जळगाव जिल्ह्यातल्या एका खेड्यात (आमचं मूळ गांव!) माझं ऑल्मोस्ट सगळंच बालपण गेलं. हॉटेल म्हणावं असं एकच काय ते छोटसं खोपट आमच्या गावाच्या मेन चौकात होतं. आणि बाहेरचं खाणं हे फक्त मुंबईला, उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गेल्यावरच असायचं. मात्र विदर्भ एक्सप्रेसने घरी परत येताना नांदुरा स्टेशनवर शेगाव कचोरी ठरलेली असायची. (शेगांवपासून दोन-तीन स्टेशन सोडून नांदुरा आहे आणि आमच्या गावात जाण्यासाठी सगळ्यात जवळचं रेल्वेस्थानक ही हेच.)

आमचं खेडं हे अगदीच खेडं असल्याने खाऊ सदृश सगळ्याच गोष्टी घरातच केल्या जायच्या. माझ्या आठवणीत पाणीपुरीच्या पुरीसाठी लोखंडी खलात लोखंडी बत्त्याने राव मैदा कुटतानाच्या आई आणि आजीची इमेज अजूनही ताजी आहे. पण मोप सुगरण असल्या तरी हॉटेलची चव काही दोघींना गावली नव्हती. त्यामुळे कचोरी कितीही आवडत असली, तरी ती खाण्याचा योग लिमिटेड असायचा. (आणि हो, आमच्याकडे कचोरी बेसनाची आणि बटाट्याची आणि कांद्याची नसते बरं का! मुगडाळीची असते, पचायला हलकी वगैरे!)

पण मग काही वर्षांनी आमच्या घरात एक भाडेकरू आला आणि योगायोग असा की तो ह्या हॉटेलमध्ये आचारी होता. अतिउत्साही असणाऱ्या आई आणि आजीला आयतीच संधी चालून आलेली. त्या दोघींनी ह्याला पकडलं आणि त्याच्याकडून हॉटेलवाली काचोरीची रेसिपी शिकून घेतली.

माझ्या उष्टावणापासूनच माझं खाण्यावरचं प्रेम मी जाहीर केल्याने मला ही रेसिपी आंदणात मिळाली, हे वेगळं सांगायला नकोच!

हुश्श! झालं घडाभर तेल वापरुन. हे तेल लागणाऱ्या जिन्नसात धरलेलं नाही बरं का!

--

कृती:

सर्वप्रथम मुगाची डाळ धुवून दोन एक तास तरी भिजत घालावी. (हा वेळ लागणाऱ्या वेळात धरलेला नाही.)
डाळ भिजतीय तोवर आपण बाकी तयारी करून घेतली तरी चालेल, पण तसं mandatory नाही.

सगळ्यात आधी पारीसाठी मैदा भिजवून घेऊयात. मैदा, कणिक, मीठ एकत्र करून त्यात मोहन घाला. तेल खूप कढत असेल तर हात जळू शकतो (माझ्या भाजला आहे!) त्यामुळे ती काळजी ज्याने त्याने आपापली घ्यावी. तेल घातल्यानंतर पण्याशिवायच मैदा नीट मळून घ्यावं, तेल नीट सगळीकडे लागलं पाहिजे, पीठ मुठीत घट्ट धरलं तर तसंच मुठीचा आकार धरून ठेवेल इतकं. ह्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या. पारीची कणिक सारण भरल्यावर सहज पसरवता येईल, इतपत सैल ठेवायची आहे. सारणाची तयारी होईपर्यंत कणिक मुरू द्यावी.

आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि बडीशोप खलबत्त्यात घेऊन छान बारीक खलून घ्यावं. शोप थोडी भरड राहिली तरी चालतं. मात्र, आल्याचे तुकडे घासात आल्याने जर डोक्यात संतापाची तिडिक जात असेल, तर ते लक्षपूर्वक बारीक करावं. मिक्सर वापरण्याला माझ्या विरोध नाही, पण खलबत्त्यात खललेल्याची चव मिक्सर मध्ये येत नाही म्हणून हा आग्रह.

तर, हे वाटण नीट काढून बाजूला ठेवून द्यावं.

डाळ भिजल्यानंतर ती मिक्सर मधून blitz करून घ्यावी. म्हणजे, भरड वाटून घ्यावी. आपल्याला मूग डाळीची पेस्ट नको आहे, हे लक्षात असू द्यावं आणि मिक्सरच्या तलवार बेभान न होता सजगपणे फक्त भरड वाटावं.

एक कढईत परतण्यासाठीचं तेल घेऊन ते तापलं की त्यात आलं लसूण इत्यादीचं वाटण घालावं, ठसका लागू शकतो त्यामुळे वेळीच exhaust fan सुरू करावा. त्यात हिंग, हळद आणि धणेपूड घालावी, आणि मग भरड वाटलेली मूग डाळ घालावी. (हे सारण चवीला थोडं स्ट्रॉंग असणं अपेक्षित आहे, त्यानुसार वाटलं तर वाटण वाढवावं.) सगळं मिश्रण कोरडं होईपर्यंत नीट परतून घ्यावं आणि मग ते गार होईपर्यंत आपण वरमानेनी टाइमपास करावा. गार झाल्यावर लिंबाचा रस घालून नीट एकत्र करून घ्यावं.

साधारण १०-१५ मिनिटात सारण वापरण्याइतकं गार होतं, त्यामुळे आता भराभर कचोऱ्या करायला घ्याव्या.

पुरीसाठी घेतो त्याहून किंचित मोठा गोल घेऊन थोडा लाटून घ्यावा, मग त्यात अजिबात कंजूसपणा न करता सारण भरावे, गोळा नीट बंद करून नीट, हलक्या हाताने लाटून घ्यावा आणि कडकडीत तापलेल्या तेलात सोडावा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर टाळून घ्यावा आणि नंतर टिशू पेपरवर काढून घ्यावा.

ह्याच पद्धतीने होतील तेवढ्या कचोऱ्या कराव्यात. (साधारण १५-२० होतात!)

आवडत असल्यास बरोबर तळून मीठ लावलेल्या मिरच्या, केचप, चिंगु चटणी ह्यातलं काहीही घ्यावं.

वाढणी/प्रमाण: 
१५ - २० . आम्ही २ लोकांमध्ये संपवल्या. तुम्ही तुमचं बघा. (पोट बिघडल्यास मी जबाबदार नाही.)
अधिक टिपा: 

१. आधाशीपाणे खाऊ नका.
२. मध्ये मध्ये वाट बघण्याचा वेळ ह्यात धरलेला नाही.
३. कचोऱ्या टंब फुगल्या नाहीत तर चिडू नका, ह्या थोड्या फ्लॅटच असतात.
४. तळणाऱ्याने करत असतानाच खाऊन घ्या, नंतर मिळण्याची काही एक खात्री नाही.

माहितीचा स्रोत: 
मम माता
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच!
किती कचोर्‍या होतात? >>>>

माझ्या साधारण १५-२० झाल्या होत्या, पण मध्यम आकाराच्या.

मी करून बघितल्या होत्या , खादाडी म्ध्ये कोणीतरी दिली होती.
सारण मस्त झालेलं चविला , पण वरच कवर मउ पडल होतं .
काही युक्त्या आहेत का ?

दरवर्षी , जून महिन्यात आमची शेगावला फेरी असते . यावर्शी जाणं होणार नाही Sad .

मी करून बघितल्या होत्या , खादाडी म्ध्ये कोणीतरी दिली होती.
सारण मस्त झालेलं चविला , पण वरच कवर मउ पडल होतं .
काही युक्त्या आहेत का ?

स्वस्ति, माझ्यामते मोहन नीट असेल तर absolutely खुसखुशीत होते पारी सुद्धा!

सारण मस्त झालेलं चविला , पण वरच कवर मउ पडल होतं .>>>

वर दिलेय मोहन किती व किती गरम घालावे व पीठ कसे मळावे हे. कडकडीत मोहन घालून त्याने पीठ मळल्याने फरक पडतो.

कचोर्‍या मस्त दिसताहेत.
गुजराती कुकरी शोजमध्ये मुठ्ठीपडतू मोहन म्हणायचे त्याचा अर्थ ही रेसिपी वाचून कळला.

माझ्या साधारण १५-२० झाल्या होत्या, पण मध्यम आकाराच्या. >> इतक्या पुरे होतील Happy
रविवारी करुन बघेन नक्की

धन्यवाद आनंदिनी आणि साधनाताई . परत करून बघण्यात येइल.
जरा जोरदार पाउस पडू दे >>>>> रच्याकने, नाव आनंदनंदिनी आहे!

माझ्या साधारण १५-२० झाल्या होत्या, पण मध्यम आकाराच्या. >> इतक्या पुरे होतील Happy
रविवारी करुन बघेन नक्की >>>>

असं वाटतं खरं, विनीता, पण मग नंतर 'अजून पाहिजे' काही जात नाही मनातून!

पण मग नंतर 'अजून पाहिजे' काही जात नाही मनातून! >>> मग परत काही दिवसांनी करायच्या Happy
लिंबूरस विसरलीस का रेसीपी कृतीत लिहायला?

मूगडाळ मिक्सरमधून काढण्यापेक्षा खलबत्त्यात थोडी बारीक करुन घेतली तर?

पण मग नंतर 'अजून पाहिजे' काही जात नाही मनातून! >>> मग परत काही दिवसांनी करायच्या Happy
लिंबूरस विसरलीस का रेसीपी कृतीत लिहायला? >>>>>

अय्या, हो की!

मूगडाळ मिक्सरमधून काढण्यापेक्षा खलबत्त्यात थोडी बारीक करुन घेतली तर?

खूप वेळ जाईल करण्यात, बाकी न चालायला काय झालंय !

मस्त ! लिहीण्याची पध्दतही आवडली. खस्ता कचोरी साठी खूप खस्ता खाव्या लागत नाही फक्त मंद आचेवर तळायच्या अजिबात ग्यास मोठा करायचा नाही.

जरा जोरदार पाउस पडू दे >>>>> रच्याकने, नाव आंदनंदिनी आहे!

Submitted by आनंदनंदिनी on 2 July, 2020 - 14:13>> > अहो जे नाव तुम्हाला स्वतःला लिहायला कठीण जातेय, त्यात त्या चुकल्या तर त्यात काय एवढे Wink

जरा जोरदार पाउस पडू दे >>>>> रच्याकने, नाव आंदनंदिनी आहे!

Submitted by आनंदनंदिनी on 2 July, 2020 - 14:13>> > अहो जे नाव तुम्हाला स्वतःला लिहायला कठीण जातेय, त्यात त्या चुकल्या तर त्यात काय एवढे Wink >>>>

लोल!!!!
ह्या मराठी किबोर्डचं आणि माझं जाम वाकडं आहे!

Submitted by आनंदनंदिनी on 2 July, 2020 - 14:13>> > अहो जे नाव तुम्हाला स्वतःला लिहायला कठीण जातेय, त्यात त्या चुकल्या तर त्यात काय एवढे Wink >> VB Happy

रच्याकने, नाव आनंदनंदिनी आहे! >>> ok . noted Happy मलाही सुरुवातीला नजरचुकीने काहीजण स्वाती म्हणायचे , ते आठवलं .

आवडली रेसिपी... खूप दिवसांपासून करून पहाण्याचे मनात आहे. धन्यवाद Happy

नमनाचे घडीभर तेल एकदम झकास !!

आमच्याकडे पण कचोरी मूग डाळीचीच आणि तिखट बनते. फक्त थोडा मसाला बदल असतो बहुतेक. पण ही कृती एकदम भन्नाट आहे. आता धीर करून कचोरी करून बघायलाच हवी !!

बेश्ट! कितीक वर्षे झालीत खाऊन आता.

कुठेतरी वाचलेलं - कचोरी/कचौडी चं पीठ भिजवतांना २००-२५० ग्रॅम मैदा-कणीक असेल तर ५०-६० मिली फॅट हवं. वाटीच्या मापात - २ वाट्या पीठ असेल तर पाव वाटी फॅट. थोडक्यात १/४ भाग फॅट हवं.
माझ्यामते कुठल्याही (गोड/तिखट) फ्लेकी पदार्थांच्या पिठात एवढं फॅट जनरली असतं.

Pages