बाईची जात

Submitted by Kajal mayekar on 1 July, 2020 - 14:18

तो तिच्यावरून बाजूला झाला व आपला शर्ट घालू लागला. त्याने एकदा तिच्याकडे बघितल कदाचित ती बेशुद्ध पडली होती. बाजूला झाडीत मगाशी फेकलेली तिची ओढणी त्याने तिच्या अंगावर फेकली आणि तो निघून गेला तिला त्या भयाण अंधाऱ्या जंगलात मरणाच्या दारात सोडून....

रात्र पुढे सरत होती. वारा वेगाने वाहत होता. टिटवीचा आवाज काळजाचा वेध घेत होता. मध्येच रातकिड्यांचा आवाज अंगावर काटा आणत होता. रात्रीच्या गारव्यामुळे तिच्या शरीरावरच्या जखमा झोंबायला लागल्या. जखमांतुन येणाऱ्या रक्तावर माश्या घोंघवू लागल्या होत्या.

शरीरावरच्या वेदनेने तिला हळूहळू शुद्ध येऊ लागली आणि क्षणार्धात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या पाण्याबरोबर तिच्या शरीरावरच्या जखमांतुन वाहणार रक्त वाहून मातीत मिसळून जात होत. तिने कसातरी उठण्याचा प्रयत्न केला तर पायांच्या मधून जोरात कळ आली त्याबरोबर तिच्या डोळ्यांतून अश्रू निघाले. ती तशीच त्याच अवस्थेत पडून राहिली.

सकाळ झाली तरी पोरगी अजून घरी आली नाही म्हणून शारदाची आई चिंतेत होती.

अहो सुर्य कधीच डोक्यावर आला तरी पोरीची घरी यायची काही लक्षणे दिसत नाही... बाईच्या जातीला अस रात्रभर बाहेर राहण शोभत का...कायतर म्हणे मैत्रीण लग्नानंतर माहेरी आलेली आहे तर भेटायला जाते.. अहो मी म्हणते रात्रभर इतक काय बोलणार.. तुम्ही तर नुसत लाडवून ठेवल आहे पोरीला... ते काही नाही तुम्ही जाऊन या तिच्या मैत्रिणीच्या घरी आणि तिला घेऊन या... आजकाय तिच खर नाही... किचनमध्ये आदळआपट करत शकुंतलाबाई आपल्या नवरा शंकररावांना म्हणाल्या.

शंकरराव काही न बोलता त्यांनी आपल्या चपला घराबाहेर टाकल्या. समोरून त्यांना त्यांची मुलगी शारदा येताना दिसली. आपल्या पोरीची अशी अवस्था बघून शंकरराव जागेवरच थबकले.

मैत्रीणीला भेटायला जाताना घातलेला शारदाचा पांढराशुभ्र ड्रेस रक्ताने आणि चिखलाने माखलेला होता. ड्रेस आपला पांढरा रंग कुठेतरी टिकवून होता. तिचा ड्रेस जागोजागी वरून फाटला होता. तिच्या शरीरावर ओरबडण्याचे निशाण स्पष्ट दिसून येत होते. मख्ख चेहर्‍याने शारदा चालत अंगणात आली. शारदाची अवस्था बघून शकुंतलाबाईंनी जोरात हंबरडा फोडला.

शारदे.. ए शारदे काय झाल ग हे.. कोणी केल.. बोलना.. तु तर तुझ्या मैत्रीणीला भेटायला गेली होतीस ना.. मग हे सगळ... शकुंतलाबाई रडत शारदाला प्रश्न करत होत्या.

शारदे ज्याने हे कृत्य केले आहे त्याला त्याच्या पापाची शिक्षा देऊन ये.. केस तुझा बाप लढेल... शंकरराव म्हणाले

गप्प बसा तुम्ही. हजारवेळा तुम्हाला सांगितल पोरीची जात आहे नका एवढी सुट देऊ पण माझ कधी ऐकलंय तुम्ही.. काल जर तुम्ही तिला जायची परवानगी दिली नसती तर आज हे घडलेच नसते आणि आता तोंड वर करून सांगताय केस तुझा बाप लढेल म्हणून.. शकुंतलाबाई रागात तोंडाला येईल ते बरळत होत्या.

एवढ्यात शेजारीही जमा झाले होते.

शारदे कोण आहे तो.. बोल कोणी केल हे कृत्य... शकुंतलाबाईंनी शारदाला विचारले.

सुधाच्या ( शारदाची मैत्रीण) घरी गेल्यावर कळले की ती दोन दिवसांनी येणार आहे म्हणून मी घरी यायला निघाले तर काकीने ( सुधाची आई) रात्री तिथे थांबायला सांगितले पण मला सुधाशिवाय ते घर रिकामे वाटत होते म्हणून मी घरी यायला निघाले. जंगलाच्या वेशीवर रोहनने ( सरपंचा चा मुलगा) मला ही शिक्षा दिली कारण मी त्याचे प्रेम नकारले... शारदा शुन्य मनाने बोलत होती. तिच्या बोलण्यात कुठेही राग, दु:ख, वेदना जाणवत नव्हत्या. नाही तिच्या डोळ्यात अश्रू होते कदाचित रडून रडून डोळ्यांतले अश्रूही आटले होते.

सरपंचाच्या मुलाचे नाव ऐकून शेजारांच्या मनात संतापाची जागा भितीने घेतली. सगळ्यांनी शारदासाठी सहानुभूती दाखवली व आपापल्या घरी परतले. शकुंतलाबाई सगळ काही संपल्यागत शारदाकडे बघत होत्या तर शंकरराव संतापाने भडकले होते.

हे बघ पोरी जे व्हायच ते होऊन गेल.. सगळ परमेश्वराच्या हाती असत बघ.. वेळेअभावी सगळ ठिक होईल.. पोलिसांकडे जाऊन काहीएक होणार नाही.. तो पाताळयंत्री सरपंच पोलिसांना पैसा खिलवून सगळे प्रकरण दाबून टाकेल. आणि तो संरपंचाचा मुलगा रागाच्या भरात परत काहीतरी वेडेवाकडे करायचा.. त्यापेक्षा तु हे सगळ विसर... शकुंतलाबाईंच्या ह्या बोलण्यावर शारदाने मान वर करून त्यांच्याकडे बघितले.
शेवटी आपली बाईची जात आहे शारदे.. पडती बाजू आपल्याला घ्यावी लागेल.. सगळा अपमान, अन्याय सहन करावा लागेल.. आपण त्यांना शिक्षा नाही देऊ शकत त्यामुळे हे सगळ तुला विसरावे लागेल.. तुझ्या मामाला सांगुन लवकरच तुझ लग्न लावून देऊ आम्ही... शकुंतलाबाई शारदाला समजावत घरात घेऊन गेल्या. पण शंकररावांना शकुंतलाबाईंच म्हणणे अजिबात पटले नाही.

वर्षभर शारदा घरातून बाहेर आली नाही. शरीरावरील जखमा तर आठवड्याभरात भरल्या पण तिच्या मनावर झालेल्या जखमा मात्र काही केल्या भरत नव्हत्या. वर्षभर शकुंतलाबाई तिला बाईच्या जातीने कस वागाव, कस बोलाव, काय करावे, काय करू नये ह्याचा उपदेश दिला तर काल शंकररावांनी सांगितलेले शब्द तिच्या कानात घुमू लागले... शारदे काही झाले तरी त्या पापी माणसाला त्याच्या कृत्याची शिक्षा भेटलीच पाहिजे. अशी हारून जाऊ नकोस.. हि तुझी लढाई आहे.. ती तुलाच लढावी लागेल.. पण प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नकोस.... शारदा शंकररावांच्या बोलण्याचा विचार करत होती.

तुझी मेजवानी तयार आहे.. जंगलाच्या वेशीवर ये.. सोबत ही चिट्ठी आणायला विसरू नकोस... काही महिन्यांनी अशी चिट्ठी लिहून शारदाने ती चिट्ठी रोहनच्या रुममध्ये फेकली. तिला खात्री होती तो वासनांध माणूस नक्की येणार. ती जंगलाच्या वेशीजवळ झाडांच्या आड लपून त्याची वाट बघत होती. आज तिच्या डोळ्यात अंगार होता. ती डोळ्यात तेल घालून त्याची वाट बघत होती.

दुरूनच तिला रोहन चालत येताना दिसला. त्याच्या चालण्यावरून तो प्यायलेला आहे हे समजत होते. त्याला बघून तिच्या संतापाने हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. रोहन जिथे शारदा लपून होती तिथे येऊन तो आजुबाजूला बघू लागला. तशी शारदा झाडीतून बाहेर आली. समोर शारदाला बघून रोहनला आश्चर्य वाटले.

त्या रात्री तुला फारच मज्जा आली वाटत म्हणूनच मला इथे पुन्हा बोलवलस... रोहन नशेत बरळू लागला.

आता तिच मज्जा मला तुला द्यायची आहे अस म्हणत शारदाने त्याच्या पुरुषार्थावर खच्चून लाथ मारली.

आपला जीव जातो की राहतो अस झाल रोहनला... त्याच्या चेहर्‍यावर त्या वेदना बघून तिला झालेल्या त्या वेदना आठवल्या. रोहन आपले दोन्ही हात दोन पायांच्या मध्ये दाबत खाली कोसळला. एवढ्यात पावसालाही सुरवात झाली होती.

क्षणाचाही उसंत न देता शारदाने आपली नखे रोहनच्या दंडावरून जोरात ओरबाडून काढली त्याबरोबर रक्तासोबत त्याचे काही मांसही तिच्या नखां मध्ये अडकले. शारदाला प्रतिकार करण्याची ताकदही रोहनमध्ये उरली नव्हती कारण तिने लाथच अशा ठिकाणी मारली होती की त्याची सगळी ताकद आणि नशा पावसाच्या पाण्यात गळून गेली होती. तो भेसूर रडत ओरडत तिच्यासमोर हात जोडू लागला. त्याची ती अवस्था बघून शारदाला स्वतःची आठवण झाली तीही अशीच त्याच्यासमोर हात जोडत होती... जशी रोहनने तिच्या गळ्यातील ओढणी काढून फेकली होती त्याचप्रमाणे तिने त्याचा शर्ट काढून फेकला. तिने पुन्हा एकदा त्याच्या पुरुषार्थावर पुर्ण ताकदीनिशी लाथ मारली ह्यावेळी मात्र रोहन बेंबीच्या देठापासून ओरडला पण पावसाने त्याचा तो आवाज गिळंकृत केला. ज्याप्रमाणे रोहनने तिला त्या डांबरी रस्तावरून ओढत जंगलात नेल होत त्याचप्रमाणे तिने त्याच्या पायाला पकडून खेचत त्याला जंगलात नेले. डांबरी रस्तावरून खेचत नेल्यामुळे रोहनची पाठ चांगलीच सोलली गेली. जंगलात एका दगडावर तिने रोहनचे डोके जोरात आपटले व पुढे त्याच गतीने आपटत राहिली जस त्या रात्री तो तिच्यावर अमानुष अत्याचार करत होता. शेवटी रोहनची प्राणज्योत विझली. तिने त्याच्या खिशातील ती चिट्ठी काढून घेतली व शांत मनाने घरी जायला निघाली.

दुसर्‍या दिवशी सकाळी सरपंचाच्या मुलाच्या मृत्यूची (खुनाची ) खबर संपूर्ण गावात वार्‍यासारखी पसरली.

शकुंतलाबाई भुत बघितल्यासारखे शारदाकडे बघत होत्या तर शंकरराव अभिमानाने शारदाकडे बघत होते.

तपासणीत पोलिसांना कळेल की हा खुन आहे आणि संशयाची पहिली सुई तुझ्याकडे येईल... शकुंतलाबाई शारदाच्या डोळ्यातले तेज पाहून म्हणाल्या.

हो माहित आहे पण जोपर्यंत त्यांना ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मला अटक होणार नाही आणि मी मागे कोणताही पुरावा सोडला नाही.... बाईची जात आहे ना मी.. शेवटी सगळ विचारपूर्वक केल आहे... शकुंतलाबाईंकडे बघत शारदा म्हणाली.

शेवटी गोष्ट जेव्हा बाईच्या इज्जतीवर येते तेव्हा बाईची जात काय करू शकते हे शारदाने दाखवून दिले होते.

समाप्त

Group content visibility: 
Use group defaults