ब्रेकिंग न्युज (लघुकथा)

Submitted by nimita on 29 June, 2020 - 07:58

भल्या पहाटे फोनच्या रिंगमुळे संजयची झोप उघडली. पहाटेच्या त्या शांततेत जरा जास्तच कर्कश्श वाटत होता तो आवाज . संजयनी साईड टेबलवर चार्जिंग ला लावलेला फोन उचलून बघितलं...त्याच्या चीफ एडिटर चा - मकरंदचा फोन होता. 'इतक्या पहाटे ?' संजय क्षणभर विचारात पडला. 'नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार,' असं म्हणत त्यानी अर्धवट झोपेतच कॉल घेतला.

पलीकडून मकरंद खूप घाईघाईत काहीतरी सांगत होता... कुठेतरी काहीतरी घडलं होतं... खूप महत्त्वाचं आणि तितकंच गंभीर... त्यांच्या न्युज चॅनेल साठी एक जबरदस्त 'ब्रेकिंग न्युज' ठरेल असं काहीतरी..... 'ही exclusive माहिती सर्वात प्रथम आमच्या चॅनेलवर'.... असा दावा करता येईल इतकी मोठी खबर ! आणि मकरंद ची इच्छा होती की ही न्युज संजय नी कव्हर करावी.. अगदी 'अथ पासून इति पर्यंत'....आणि त्याला कारणही तसंच होतं - संजय हा त्याच्या न्युज चॅनेल चा स्टार रिपोर्टर होता. समोरच्या व्यक्तीला बोलतं करून आपल्याला हवी ती माहिती त्या व्यक्तीच्या तोंडून वदवून घ्यायचं कसब होतं त्याच्याकडे. मकरंद नेहेमी म्हणायचा -" तुझ्या आईवडिलांनी तुझं नाव अगदी योग्य ठेवलंय .... तू खरोखरच कलियुगातला संजय आहेस. स्टुडिओत बसल्या बसल्या एखाद्या घटनेची अगदी इत्थंभूत माहिती मिळते तुझ्याकडून ."

आणि म्हणूनच आजची न्युज पण संजयनीच कव्हर करावी असं मकरंदला वाटत होतं. त्याचं बोलणं ऐकून संजय मनातून चांगलाच सुखावला; पण वरवर आपला नकार दर्शवत म्हणाला,"अरे, मागचे दोन दिवस बाहेरच होतो की मी... त्या सेलिब्रिटी नवरा बायकोची घटस्फोटाची सगळी डिटेल्स गोळा करण्यात खूप दमायला झालंय रे मला.. आणि तसंही- हा मामला जरा वेगळा आहे...इथे सगळा खाकी कारभार असणार....सगळा मिलिटरी खाक्या ! या अशा प्रकारच्या घटनेवर मी आजपर्यंत कधीच रिपोर्टिंग केलेली नाहीये. त्यामुळे मला तो अनुभव नाहीये. प्लीज आज दुसऱ्या कोणाला तरी पाठव."

पण मकरंद त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्यानी संजयला झालेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली. न्युज खरंच खूप sensational होती. चॅनेल चं TRP वाढवणारी ठरेल इतकी महत्वाची होती... "तुला नक्की जमेल बघ.. फार काही वेगळं नाहीये रे... पीडित व्यक्तींच्या भावना टिपायच्या आहेत.... थोडी इमोशन्स, थोडे अश्रू , सिस्टिम ला दोष देणं.... सगळा स्टॅंडर्ड फॉर्म्युला आहे.... आणि तू तर या सगळ्यात एक्स्पर्ट आहेस.." मकरंद चं बोलणं ऐकून संजय अजूनच सुखावला ...मग काय..पुढच्या अर्ध्या तासात संजय संपूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडला.

आता हळूहळू उजाडायला लागलं होतं. रस्त्यांवर अजून म्हणावी तेवढी वर्दळ नव्हती. जेव्हा संजय लोकेशन वर पोचला तेव्हा कॉलनी च्या गेट वरच्या security नी त्याला अडवलं. त्या गणवेश धारकाला आपलं 'प्रेस' चं ओळखपत्र दाखवून संजय आत शिरला. संपूर्ण कॉलनीत एक जीवघेणी शांतता होती...पण त्या शांततेला गांभीर्याची किनार होती... आणि तेच गंभीर भाव आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या चेहेऱ्यांवर दिसत होते ; त्यांच्या हालचालीतून जाणवत होते. संजय थोडासा बेचैन झाला. पण ही बेचैनी त्यानी आधीही काहीवेळा अनुभवली होती.... 'जिथे मृत्यूची सावली पडते तिथे दुसरं काय जाणवणार?' संजय स्वतःला समजावत होता. त्यानी कॉलनी मधे नजर फिरवली. सगळी घरं एकसारखीच होती....यातलं नेमकं घर कोणतं ? तेवढ्यात त्याला एका घरासमोर लोकांची वर्दळ दिसली. काही मिलिटरी च्या गाड्याही थांबलेल्या दिसल्या... त्यात दुसऱ्या न्यूज चॅनेल्स च्या पण एक दोन गाड्या होत्या. ते बघून संजयची लगबग वाढली. त्याची नजर त्याच्या कॅमेरामन ला - शेरी ला शोधत होती... तेवढ्यात समोरून त्याला शेरी येताना दिसला. शेरीनी त्याला जुजबी माहिती दिली आणि दोघंही समोरच्या घराच्या दिशेनी चालायला लागले.

वातावरणात अजूनही तीच अजीबशी - बेचैन करणारी शांतता होती..आजूबाजूला इतके लोक फिरत होते तरीही कुठेही कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा गडबड दिसून येत नव्हती. सगळं कसं अगदी शिस्तबद्ध पद्धतीत चालू होतं. इतकं अघटित घडून गेलं होतं तरीही कुठे भावनांचा उद्रेक दिसून येत नव्हता. संजय सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत होता. त्याची अनुभवी नजर आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांमधून नेमकं सावज शोधत होती....शेरीनी जुजबी चौकशी करून ठेवली होती ; त्यामुळे पीडित परिवारातले सदस्य शोधून काढणं सोपं झालं होतं. आता फक्त त्यांना गाठून त्यांच्याशी संवाद साधायचा होता... त्यांना बोलतं करायचं होतं.... पण नुसतं बोलतं करून चालणार नव्हतं....त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या भावना, त्यांचं दुःख लोकांपर्यंत पोचायला हवं होतं.... त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू लोकांना दिसणं गरजेचं होतं....

हेच तर बघायचं असतं प्रेक्षकांना... अशा प्रकारे आघात झालेल्या लोकांना नक्की काय वाटतं ? या दुःखद प्रसंगी ते कसे वागतात? किती अश्रू ढाळतात ?? या सगळ्यावरूनच तर चॅनेलची TRP ठरत असते.

संजय आपलं चॅनेल चं I- Card दाखवत घरात शिरला. घरात बरीच माणसं वावरत होती. पण कोणीच कोणाशी फारसं बोलत नव्हते. जणू काही आधी बऱ्याच वेळा रंगीत तालीम केल्यासारख्या सगळ्यांच्या हालचाली सुरू होत्या. कोणी काय करायचं हे प्रत्येकाला ठाऊक असावं ! संजयनी चौफेर नजर फिरवली..... त्याला त्याचं सावज दिसलं ... त्याच्या अनुभवी नजरेनी बरोब्बर ओळखलं... संजय त्या दिशेनी निघाला. चेहेऱ्यावर प्रसंगानुरूप असा आणि आवश्यक तेवढाच गंभीर भाव ठेवून त्यानी आपली ओळख करून दिली आणि संभाषणाला सुरुवात केली. शेरी आपल्या कॅमेराचा अँगल सेट करून तयारच होता.

संजय नी पहिला प्रश्न विचारला," मॅडम, तुमच्या बरोबर आज इतकी दुःखद घटना घडलीये... पण तुम्ही काळजी करू नका....देशाचा प्रत्येक नागरिक आज तुमच्यासोबत आहे... तुमच्या दुःखात सहभागी आहे. आम्हांला खूप अभिमान आहे तुमच्या सारख्या वीरपत्नीचा.... पण तुम्हांला जेव्हा तुमच्या पतीच्या मृत्यूबद्दल समजलं तेव्हा तुम्हांला नक्की काय वाटलं?" समोरच्या स्त्री ने संजय कडे एक कटाक्ष टाकला. तिच्या चेहेऱ्यावर काही क्षणांसाठी एक विषण्ण हसू दिसलं, पण तिनी लगेचच स्वतःला सावरलं. संजयच्या डोळ्यांत बघत ती निर्विकारपणे म्हणाली,"आपल्या माणसाच्या मृत्यूची बातमी कळल्यावर आणि तीही अशी अनपेक्षित रित्या.... तुम्हांला आणि या देशाच्या प्रत्येक नागरिकाला जे वाटेल तेच मलाही वाटलं ."

त्या मनस्थितीतही त्या स्त्रीचं ते स्पष्ट पण तितकंच संयत विधान ऐकून संजय चपापला.. आजपर्यंत त्यानी अशा प्रकारचे दोन तीन interviews घेतले होते.... पूरग्रस्त लोकांच्या वस्तीत जाऊन !! प्रत्येक वेळी त्याच्या अशा प्रश्नानंतर उत्तरादाखल समोरच्या व्यक्तीचं भावुक होणं आणि रडणं हेच अनुभवलं होतं त्यानी. आणि इथेही त्याला तेच अपेक्षित होतं. पण त्या स्त्रीच्या उत्तरानी सगळीच गडबड केली होती. पण संजय सुद्धा काही कच्चा खिलाडी नव्हता. त्यानी आपला प्रयत्न चालू ठेवत पुढचा प्रश्न विचारला," हो, बरोबर आहे तुमचं.... आणि म्हणूनच मी आधीच म्हणालो की आज सगळा देश तुमच्या दुःखात सहभागी आहे. पण तुमच्या पतीच्या या अशा अकाली मृत्युला कोण जबाबदार आहे असं तुम्हांला वाटतं? " संजय अगदी बारकाईने बघत होता.. त्याच्या प्रश्नानी अचूक नेम साधला असावा कारण आता त्या स्त्रीचे हावभाव थोडे बदलले होते. तिच्या नजरेत एक प्रकारची अधीरता होती...काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं होतं बहुतेक तिला..... संजय मनातून स्वतःवरच खुश झाला. आपल्या हातातला माईक तिच्या समोर धरत तो पुढे म्हणाला," तुम्ही अगदी निःसंकोचपणे आपलं मन मोकळं करा मॅम, तुमचा आवाज आम्ही जनतेपर्यंत पोचवू."

तोपर्यंत अजूनही दोन तीन चॅनेलवाले आपापले माईक्स घेऊन पुढे सरसावले होते. ती स्त्री आधीच्याच शांतपणे म्हणाली,"जर तुमची हरकत नसेल तर आपण नंतर बोलूया का? आत्ता मी जरा busy आहे ; आता थोडयाच वेळात माझे पती घरी येणार आहेत आणि आमच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे जर गाडीतून उतरल्यावर त्यांना मी दिसले नाही तर ते खूप नाराज होतील."

आणि कोणत्याही प्रतिक्रियेची वाट न बघता ती वीरपत्नी मुख्य दाराच्या दिशेनी जायला लागली....तिच्या चेहेऱ्यावरचे ते शांत पण तरीही कणखर भाव बघून प्रेक्षकांना नक्कीच हळहळ वाटणार होती...संजय नी शेरी ला इशारा केला. ते दोघंही तिच्या मागे जायला निघाले... अर्थात बाकी चॅनेल्स वाले पण होतेच बरोबर ! तेवढ्यात त्यांना मागून कोणीतरी हाक मारली...." सर, तुम्हांला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते मला विचारा. मी अगदी सविस्तर उत्तरं देईन." सगळ्यांनी चमकून मागे वळून पाहिलं - समोर सतरा अठरा वर्षांचा एक चुणचुणीत तरुण उभा होता. चेहेऱ्यावर जरी तेच शांत , गंभीर भाव असले तरी त्याच्या सुजलेल्या, लाल झालेल्या डोळ्यांतून त्याचं दुःख जाहीर होत होतं. सगळ्यांकडे बघत तो पुढे म्हणाला ,"माझं नाव चिराग आहे. तुम्ही ज्यांच्या मृत्युची बातमी ऐकून आला आहात त्यांचा मुलगा आहे मी !! तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन; पण प्लीज माझ्या आईला नकोनको ते प्रश्न विचारून अजून दुःख देऊ नका." हे म्हणत असताना त्या मुलाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. 'बस्स् , हेच तर हवंय आपल्याला..' संजयच्या मनात आलं....आणि फक्त त्याच्याच नाही तर तिथे उपस्थित प्रत्येक मीडिया वाल्याला हेच वाटलं असावं.... क्षणार्धात सगळ्यांनी त्या मुलाच्या दिशेनी मोर्चा वळवला.

"तुझे वडील आज हे जग सोडून गेले. नक्कीच तुला खूप दुःख झालं असणार. त्यांच्या बद्दल काही सांगू शकशील का ?"

"एक वडील म्हणून ते कसे होते? त्यांच्या काही आठवणी ?"

"त्यांच्यासाठी शेवटचा काही संदेश?"

"त्यांच्या युद्धाच्या काळातल्या काही रोचक घटना आठवतायत का तुला ?"

प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

चिराग थोडासा गोंधळला. पण स्वतःला सावरून घेत त्यानी बोलायला सुरुवात केली. "माझे बाबा सीमेवर असलेल्या एका पोस्ट वर तैनात होते. परवा त्यांच्या गस्त घालणाऱ्या पथकातला एक जवान वितळलेल्या बर्फावरून पाय घसरून रस्त्याशेजारी असलेल्या खोल घळीत जाऊन पडला. ती जागा अगदी सीमेला लागून होती. जेव्हा ही गोष्ट इतरांच्या लक्षात आली तेव्हा पथकातील इतर सगळे जण त्या सैनिकाला त्या घळीतून बाहेर काढायचा प्रयत्न करायला लागले. तेवढ्यात सीमेपलीकडून त्यांच्या दिशेनी गोळीबार सुरू झाला.पण आपल्या साथीदाराला तिथे एकटं सोडून परत येणं आपल्या सैनिकांना मान्य नव्हतं. शत्रूच्या हल्ल्याची पर्वा न करता त्यांनी आपला प्रयत्न चालूच ठेवला. त्याला सुखरूप वर आणण्यात त्याच्या साथीदारांना यश मिळालं पण तेव्हा झालेल्या चकमकीत माझ्या बाबांना गोळी लागली आणि त्यातच त्यांना वीरमरण आलं." चिरागनी एका दमात सगळं काही सांगून टाकलं....रिपोर्टर्स नी विचारलेल्या चित्रविचित्र प्रश्नांची पण त्याला जमतील तशी उत्तरं दिली. पण त्यातला प्रत्येक शब्द उच्चारताना त्याला होणारा मानसिक त्रास त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

त्याचा तो हृदय पिळवटून टाकणारा वृत्तांत ऐकून क्षणभर सगळेच सुन्न झाले. संजयचं मनही हेलावलं. पण तेवढ्यात शेरीनी त्याला इशारा केला आणि संजय भानावर आला. आत्तापर्यंत तरी सगळं काही मनासारखं झालं होतं. एका मुलाच्या तोंडून त्याच्या वडिलांची बहादुरी ऐकताना प्रेक्षकांचे डोळे नक्कीच पाणावणार होते !

चिराग कडून हवी असलेली सगळी माहिती मिळाल्यावर त्याच्यापाशी बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे एक एक करून सगळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. आता सगळ्यांचं लक्ष मुख्य रस्त्यावर लागलं होतं.

पण संजयला राहून राहून एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं.... चिराग आणि त्याच्या आईनी दाखवलेला संयम.... आपल्या प्रिय व्यक्तीच्या अशा अचानक मृत्युमुळे त्यांनाही दुःख झालंच असणार की !! पण तरीही त्यांचं दोघांचं वागणं ,बोलणं इतकं संयत कसं ? कुठल्याही प्रकारचा राग, उद्वेग, मनस्ताप काहीच जाणवू देत नाहीयेत दोघंही.... हा विचार संजयला स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी त्यानी चिरागशी बोलायचं ठरवलं. त्याच्या आतल्या पत्रकाराला इथेही एक 'ब्रेकिंग न्युज' दिसत होती. त्यामुळे तो चिरागच्या जवळपास च रेंगाळत राहिला. जेव्हा इतर चॅनेल्स चे लोक बाहेर गेले तेव्हा त्यानी शेरीला इशारा केला आणि तो पुन्हा चिराग जवळ गेला. आपलं सगळं शाब्दिक कसब पणाला लावत त्यानी योग्य त्या शब्दांची जुळवणी करत म्हटलं -"कोणताही सैनिक हा आपल्या देशासाठी आपले प्राण द्यायला मागेपुढे बघत नाही. प्रत्येक वेळी आपला युनिफॉर्म घालून ड्युटी वर जाताना तो आपल्या मनाची तशी तयारी करूनच घराबाहेर पडत असतो, नाही का ? अर्थातच, त्याच्या प्राणांची काही शाश्वती नाही - हे सत्य त्याच्या आप्तेष्टांना पण ठाऊक असतं; त्यामुळे तेदेखील अशा अवघड परिस्थिती ला सामोरं जाण्यासाठी त्यांच्याही मनाची तयारी करतच असणार. त्यांची देशभक्ती च त्यांना हे मानसिक बळ देत असावी. तुमच्या बाबतीतही...."

संजयचं वाक्य मधेच तोडत चिराग म्हणाला," सर, तसं पाहिलं तर या जगातल्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवाची शाश्वती देता येत नाही. आता तुमचंच उदाहरण घ्या ना....तुम्ही सकाळी घराबाहेर पडता तेव्हा संध्याकाळी सुखरूप घरी परत जालच याची खात्री कोणी देऊ शकतं का? पण म्हणून तुमच्या घरचे लोक रोज तुम्ही बाहेर पडल्यावर त्यांच्या मनाची तयारी करून बसतात का ? नाही ना ? उलट तुम्ही सुखरूप घरी पोचावं म्हणून ते देवाची प्रार्थना करतात.... सैनिक आणि त्याचा परिवार पण तुमच्यासारखीच माणसं आहेत सर.... त्यांचीही काही स्वप्नं असतात, आशा आकांक्षा असतात !

अजून एका बाबतीत तुमची गल्लत होतीये.... प्रत्येक सैनिक जरी देशासाठी मरायला तयार असला तरी त्याहीपेक्षा जास्त त्याला देशासाठी लढायचं असतं... शत्रूला सामोरा जाताना तो मरायला नाही तर शत्रूला मारायला म्हणून जातो."

चिराग जरी कितीही शांत राहायचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या बोलण्यातून त्याच्या मनातली खळबळ जाणवत होती.

संजयचा चेहेरा मात्र चपराक मारल्यासारखा झाला होता. चॅनेल ला ब्रेकिंग न्युज देण्याच्या नादात त्याला स्वतःला मात्र हे सगळं ऐकून घ्यायला लागलं होतं...हा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता. जे आजपर्यंत कोणीही केलं नव्हतं ते आज या कोवळ्या वयाच्या मुलानी केलं होतं.... शाब्दिक आणि वैचारिक युद्धामधे त्यानी संजयला हरवलं होतं !!

आणि हे सत्य संजयला अस्वस्थ करत होतं. त्यानी थोडं कुत्सितपणे म्हटलं," पण तुझ्या वडिलांनी स्वतःच आपलं मरण ओढवून घेतलं असं नाही का वाटत तुला ? तो घळीत पडलेला जवान शत्रूच्या सीमेपासून किती जवळ होता, त्यात भर म्हणून पलीकडून गोळीबार ही सुरू होता. अशा परिस्थितीत तो जवान सुखरूप परतण्याची शक्यता अगदीच नगण्य असणार. तरीही त्या एका सैनिकासाठी तुझ्या वडिलांनी स्वतःचे प्राण धोक्यात घातले. काय गरज होती त्यांना अशी स्वतःच्या जीवावर उदार व्हायची?"

संजय चा तो प्रश्न ऐकून चिराग खेदपूर्वक हसला आणि म्हणाला," माझ्या बाबांसारखे आपल्या जीवावर उदार होणारे लोक या जगात आहेत म्हणून तुम्ही इथे बसून इतक्या निर्धास्तपणे हे सगळं बोलू शकताय.... त्यांच्या या अशा वागण्या मागचं कारण तुमच्या सारख्यांना नाही समजणार सर !! आणि तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न ही नका करू.....तुमच्या कुवती बाहेरचं आहे ते ; झेपणार नाही तुम्हांला !"

आता मात्र संजयला तिथे थांबणं अशक्य झालं. चिराग नी त्याच्यासमोर धरलेल्या त्या जाणिवेच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघायची हिम्मत संजय कडे नव्हती.तो काही न बोलता तिथून उठला. त्याला उद्देशून चिराग म्हणाला," एक गोष्ट सांगू का सर? मी ठरवलं होतं की मी पण माझ्या बाबांसारखाच सैन्यात भरती होईन....कारण आपल्या देशाला सैनिकांची गरज आहे. पण आता मला वाटतंय की मी तुमच्याप्रमाणे एक पत्रकार व्हावं.... कारण आज मला जाणवतंय की चांगल्या पत्रकारांचीही तेवढीच गरज आहे देशाला !"

संजयच्या ओठांवर फुललेलं हसू बघून चिराग म्हणाला," इतके हुरळून जाऊ नका सर ... मी 'तुमच्या प्रमाणे' पत्रकार होईन असं म्हणालो... 'तुमच्या सारखा' नाही ."

इतकं बोलून चिराग उठला आणि त्याच्या आईजवळ जाऊन उभा राहिला - त्याच्या बाबांची वाट बघत ....

संजय आणि शेरी पण बाहेर कॉलनी च्या गेटपाशी जाऊन थांबले होते...झालेल्या अपमानामुळे संजय खूपच बेचैन झाला होता. पण त्याहीपेक्षा - 'चिराग समोर आपण निरुत्तर झालो'- या सत्याचं शल्य जास्त बोचरं होतं.

आता सगळ्यांच्या नजरा रस्त्यावर लागल्या होत्या. तेवढ्यात संजय ला एक माणूस आत येताना दिसला - कुठल्यातरी होम डिलीव्हरी कंपनीचा वाटत होता. त्याच्याकडे एक भलं मोठं पार्सल होतं. तो गेट पाशी उभ्या असलेल्या गार्डला पत्ता विचारत होता. त्याच्या तोंडून 'चिराग' हे नाव ऐकून संजय त्याच्या जवळ गेला. त्याच्याशी बोलून चौकशी केल्यावर तो पार्सल वाला माणूस म्हणाला," मिस्टर चिराग च्या नावानी त्यांच्या वडिलांनी पाठवलंय ." "चिरागच्या वडिलांनी? पण ते तर..." संजय अचंबित होत म्हणाला. त्यावर स्पष्टीकरण देत तो पार्सल वाला म्हणाला," हो, आज मिस्टर चिराग चा अठरावा वाढदिवस आहे. म्हणून त्यांच्या बाबांनी परवा सकाळीच आम्हांला फोन करून या केकची ऑर्डर दिली होती. ते बाहेरगावी असतात बहुतेक."

त्याचं बोलणं ऐकून संजयचे डोळे पाणावले. त्यानी मागे वळून बघितलं....चिराग आणि त्याची आई रस्त्याकडे डोळे लावून उभे होते.... ते दृश्य बघून संजयच्या हृदयात कालवाकालव झाली. हृदयाच्या तळाशी निपचीत पडलेली माणुसकी जागी होऊ बघत होती.

पण पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक आली. त्यानी अर्थपूर्ण नजरेनी शेरीकडे बघितलं....या नव्या कोऱ्या ब्रेकिंग न्युज मुळे त्यांच्या चॅनेलची TRP चांगलीच वाढणार होती.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच संताप वाटतो या न्युज रिपोर्टर्सकडे बघून कधी कधी. प्रत्येक घटनेचं भांडवल करायचं असतं यांना. त्यांचा तो "काय सांगाल?" हा दळभद्री प्रश्न. अशा न्युज "चवीनं" बघणारेही धन्यच, आणि अत्यंत दु:खाच्या प्रसंगी अत्य़ंत चवीनेच प्रतिक्रिया देणारेही.

छान लिहिलंय.
ब्रेकींग न्युज देण्यासाठीची धडपड छान टिपली आहे.

अगदी निरुत्तर झालो.... सुरुवातीला साधारण वाटणारी कथा इतकीही भावनात्मक होईल याचा विचारच केला नव्हता..... अप्रतिम लिखाण....

छान आहे. ह्या चॅनेल्सवाल्यांना असेच लोक भेटायला हवेत. म्हणजे अक्कल येईल थोडीतरी. पण ते असं करतात कारण हे असं चवीने पहाणारे लोक आहेत. म्हणजे एक समाज म्हणून कुठेतरी आपणच जबाबदार आहोत ह्या सगळ्याला, नाही का?