स्पर्श 2

Submitted by मुक्ता.... on 28 June, 2020 - 00:56

स्पर्श....भाग दोन( जाणीव……… दुसरी)

जसे बंध,नाती कौटुंबिक आणि सामाजिक असतात तसेच स्पर्श नसतील का? आपण कालच्या आधीच्या लेखात आई आणि मूल,जोडीदार या दृष्टीने स्पर्शाचा विचार केला. स्पर्शाला वयपरत्वे येणारी आणि बदलत जाणारी जाणीव या विषयी विचार केला.आता कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर स्त्री आणि पुरुष असे दोन प्रवाह घेऊन काही मनोगत व्यक्त करते.
कुटुंब हा एक समाजातला छोटा समाज. याने मिळून एक स्वतंत्र व्यवस्था बनते. कुटुंबात स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन ही संस्था यशस्वी करतात.एका कुटुंबात जन्मलेली स्त्री दुसऱ्या घरात अनेक नव्या नात्यांचे धागे स्वीकारते. तिच्या मनात त्या नात्याचे स्पर्शविना स्पर्श ती अनुभवते. नवीन आस,आशा ती आणि तिचा पुरुष जोडीदार मनात ठेवून असतात. एक पुरुष लहानपणापासून आजी, आई,बहीण,काकू ,मावशी,
मामी या अनेक स्त्रैण नात्यांचे स्पर्श अनुभवत असतो.तेल लावणे म्हणा, आजारपणात केलेली शुश्रूषा म्हणा,अशिर्वचन इत्यादि अनेक निमित्ते स्पर्शसुख आणि त्यातून जिव्हाळा ,प्रेम, आत्मीयता अनुभवास मिळते. त्यातून त्याचे व्यक्तिमत्वात ओलसर भाव,मृदुता,कठोरता आदी भावनांची तीव्रता तयार होते. अशा स्पर्षसुखाने सिंचित व्यक्तिमत्व नक्कीच समृद्ध असते. आणि या स्पर्षसुखपासून वंचित रुक्ष असा माणूस कठोर असतो.
हे ढोबळमानाने लिहिलं आहे. परंतु इथवर हे समाप्त होत नाही. हे स्पर्श स्त्री कडून पुरुषाकडे यायला भावनिक,मानसिक,सामाजिक अनेक ठिकाणी महत्व आहे. पुरुष मात्र स्वतःकडून असे स्पर्श आपलं मूल,आई,बहीण,पत्नी यांच्याकडे कितपत मोकळेपणाने वाहू देतात,किंवा दिले जातात. 1950 ते 1960 च्या दशकातील पिढीने हे कौटुंबिक बंधनाचे साचेबद्ध आयुष्य जगले आहे. आज मी पस्तिशीत आहे. त्यामुळे आज्जी, आई,आजोबा, सासूबाई यांच्याकडून बऱ्याच मोकळेपणाने ही चर्चा ऐकली आहे.स्त्रियांकडे हे स्पर्श किती मोकळेपणाने येतात, अंक आले तर ते किती मोकळेपणाने स्वीकारले जातात? हा महत्वाचा मुद्दा आहे. स्त्री ही आपल्याला झालेले स्त्रियांचे स्पर्श आठवते आणि पुरुष देखील.
एक वडील सोडले तर कौटुंबीक आणि सामाजिक स्तरावर स्त्री पुरुषांकडून होणारे स्पर्श मोकळेपणाने आठवू शकत नाही.
समाजात म्हणजे कुटुंबाबाह्य नाती जेव्हा आपण म्हणतो,तेव्हा काही ठराविक अलिखित नियमावली आपण पाळतो. या सगळ्यात अत्यंत महत्त्वाचे असे नाते म्हणजे मित्र आणि मैत्रीण. इथे मैत्री हा मुद्दा घेतलाय कारण इथे स्पर्शाची मीमांसा होत असते. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया यांच्यात अगदी हलकी मिठी, हस्तांदोलन खूप दिलखुलास आणि सामान्य मानलं जातं. पण हाच मोकळेपणा स्त्री पुरुष मैत्री संदर्भात नाही. या दोघात ओघाने खेळीमेळीने स्पर्श आलेच तर त्यात निखळपणा आहे की नाही हे आसपासचे आपल्या विचारसरणीने ठरवत असतात. हे योग्य की अयोग्य हे त्या मैत्रीच्या सापेक्षतेवर ठरते. आपण किती ठरवावे तो आप प्रश्न आहे.
अनोळखी स्पर्श ,गर्दीत वावरताना या दोघांनाही अनेक अनुभव येतात. घृणास्पद स्पर्श हे केवळ स्त्रीला पुरुष नाही तर अनेक स्त्रियाही करत असतात पुरुषांना. असो हा विषय वेगळा, आपली गाडी दुसरीकडे वळायला नको. गर्दीत वावरताना आपण हे टाळू शकत नाही. म्हणून आपला बचाव आणि शक्य तिथे प्रतिकार गरजेचा.
कौटुंबिक स्तरावर स्त्री मात्र जिवाभावाच्या स्पर्शाकडून वंचीत राहते बहुतेकदा.( हे स्त्रीवादी लिखाण नाहीय.)आई मला तेल लावून दे'आई पाय चेपून दे'अग ए आज माझी पाठ दुखतेय जरा दाबशील का?,सुनबाई जरा पाय चेपून देतेस का ,फार वळताहेत इत्यादी गरजा पूर्ण करताना तिला निश्चित थकल्या भागल्यावर कुणीतरी आपल्यावर एक हात ,एक स्पर्श मायेचा द्यावा. बहुतांशी असं होतं नाही. एका पुष्कळ वर्षे चालू असलेल्या मराठी रियालिटी शो मध्ये 'हिला राग फार येतो','ही फार चीड चीड करते' असे आरोप आणि गमतीशीर प्रश्न विचारले जातात 'वहिनींना'. वहिनी डोळ्यातलं लपवून यापुढे नाही करणार असं वचन देतात,वचन घेतले जाते.
मला तरी या मागे 'स्पर्श' विन्मुख असणे, स्पर्श प्रेमाला मुकणे हे मुख्य कारण असावे असे वाटते. कौटुंबिक स्तरावर याचा सासर,माहेर हे बाजूला ठेवून विचार करण्याची वेळ आलीय. सासू काय आणि सून काय आणि कोणतीही स्त्री, नक्किच चिडणं, रागवणं हे प्रकार कमी करेल,नकळतच. फक्त एक स्पर्श काम करेल मायेचा. जसं रडणारी मूलं केवळ जवळ घेण्याने शांत होतात, तर हे सूत्र मोठ्या माणसांवर काम करणार नाही का? झप्पी नक्कीच काम करून जाते.

खूप काही लिहायला आहे. हा लेख कसा वाटला ते नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. काही वाटल्यास नक्कीच सुचवा. पुढच्या आणि शेवटच्या भागात अध्यात्मिक स्पर्श यावर मत मांडण्याचा प्रयत्न करेन.

(लेख शेअर झाल्यास आनंद वाटेल. नावासाहित झाला तर आनंद द्विगुणित होईल.)

मुक्ता
24/05/2019

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन आवडले. मागे एकदा तुमची मुलं मोठी झाली तरी दिवसातून किमान आठ वेळा त्यांना स्पर्श केला पाहिजे हे वाचले होते. मी खात्री करून घेतली होती की मी करत आहे का Happy

छान आहे.
.....
रत्नाकर मतकरी यांच्या ‘अस्पर्श’ या कथेतील एक सुंदर वाक्य:

आपण केलेला स्पर्श आणि आपल्याला झालेला स्पर्श यात महदंतर असतं. पहिलं आपलं कर्तृत्व असतं, दुसरं आपलं भाग्य असतं.