सूर निरागस हो

Submitted by Theurbannomad on 17 March, 2020 - 10:03

संगीताची आवड असलेला माणूस बरेच वेळा स्वतःला गाता गळा नसला तरी संगीताचा 'कान' असल्यामुळे सतत चांगल्या गायकांच्या आणि गाण्यांच्या संगतीत असतो. माझ्यासारख्या संगीत वेड्याला कुठेही गेलं तरी चांगलं संगीत कानावर पडल्यावरच खऱ्या अर्थाने त्या जागेशी नाळ जुळल्यासारखी वाटते. त्या संगीताला भौगोलिक अथवा व्याकरणात्मक बंधन नसतं. अरबी संगीतकारांच्या रबाबात अथवा मिझमारमध्ये उमटणारे सूर खरे असले, तर त्याची अनुभूती घ्यायला आपल्याला आपण अरबी नसल्याची अडचण भासत नाही. सिंगापूरमध्ये कोलिनटॉन्ग ऐकताना किंवा चीनमध्ये डिझीवर वाजवले जाणारे संथ सूर ऐकताना तंद्री लागतेच लागते. एका आफ्रिकेच्या 'ग्रुप' चा जेमबे आणि रॅटल्सच्या जुगलबंदीचा श्रोता होताना आपण आफ्रिकेत कधीही न गेल्याचा 'परकेपणा' जराही जाणवत नाही. याच वेडामुळे असेल, पण दुबईला आल्यावर माझ्या ओळखीतल्या एका मित्राच्या 'गायनाच्या' वर्गात मी पेटीवर सूर धरण्यासारखी छोटी छोटी कामं करायच्या निमित्ताने गेलो आणि तिथला एक श्रोता होऊन माझी 'ऐकण्याची' हौस भागवायला लागलो.

त्या वर्गाचे शिक्षक कर्नाटकी संगीताचे जाणकार असल्यामुळे बरेच वेळा तिथे अस्सल दक्षिण भारतीय पद्धतीचं शिक्षण दिल जायचं. एक एक सूर आणि त्याच्या आजूबाजूच्या श्रुती पक्क्या लागेपर्यंत ते शिक्षक तासंतास आपल्या विद्यार्थ्यांना नुसता तो एक सूर आळवायला लावायचे. जे विद्यार्थी सुगम संगीत शिकायला येत, त्यांनाही अर्धा तास सूर लावायची तालीम करावीच लागे. कधीतरी रंगात आल्यावर ते आपल्या मृदूंगम वर ताल धरून एकाच रागाचे आरोह अवरोह वेगवेगळ्या तालात कसे बसवायचे याच 'गणित' विद्यार्थ्यांना शिकवायचे. एकूणच काय, तर भारताबाहेर सुरु असलेलं हे 'संगीत गुरुकुल' माझ्यासाठी एक कानसेन म्हणून संगीत अनुभवायची एक हक्काची जागा झालेलं होतं.

एके दिवशी तिथे 'एम. एल. एस. श्रीनिवास ' अशा लांबलचक नावाचा तामिळ लहेजामध्ये बोलणारा एक उभा आणि तितकाच आडवा देह फी भरून गाणं शिकायला रुजू झाला. या माणसाचा अवतार इतका वाखाणण्यासारखा होता, की दिवसभर त्याचंच चित्रं माझ्या डोळ्यासमोर उभं राहात होतं. पांढरी शुभ्र लुंगी, पांढरा शुभ्र झब्बा, कपाळावर पांढऱ्या गंधाचे बोट, पायात पांढऱ्या चपला, गळ्यात जाडजूड सोन्याची चेन, उजव्या हाताच्या पाच बोटात पाच सोन्याच्या अंगठ्या, मनगटावर सोनेरी रंगाचं 'राडो' चं घड्याळ, मोठमोठे पुढे आलेले पिवळे दात आणि बोलायला लागल्यावर त्यातून लुकलुकणारा एक सोन्याचा दात, या सगळ्या गोष्टी वागवणारा तो अजस्त्र काळाकुट्ट देह आणि या सगळ्यावर 'कळस' म्हणून डोक्यावरचे ते तेल लावून चप्प बसवलेले भरघोस केस असा हा अजस्त्र माणूस अंगरक्षक किंवा चित्रपटांमधला खलनायक म्हणून जास्त शोभला असता, पण त्याला गायनाची आवड आहे आणि त्याला शुद्ध कर्नाटकी संगीताचं शिकायचं आहे, हे ऐकून माझी त्याच्याबद्दलची उत्सुकता चाळवली गेली.

आमच्या गुरुजींनी पहिल्या दिवशी ओळख पाळख झाल्यावर समोरच्या एका रिकाम्या आसनावर या श्रीनिवासला बसायला सांगितलं. आपल्या पोटाच्या विस्तारामुळे मांडी घालून बसणं त्याला अवघड जात होतं. शेवटी दोन्ही पाय एका बाजूला करून आणि एका हाताचा आधार घेऊन स्वारी कशीबशी 'टेकती' झाली. मला त्याची ती 'POSE ' बघून उगीच आमच्या गुरुजींच्या जागी लावणी अथवा मुजरा करायला एखादी नर्तकी उभी आहे कि काय, असं मला वाटून गेलं. गुरुजींनी आपल्या हार्मोनियमवर नेहेमीप्रमाणे एक फूल ठेवलं, दोन सेकंड डोळे मिटून हार्मोनिअमला नमस्कार केला आणि फूल बाजूला करून त्यांनी भात्याची खिट्टी काढली.

" आपण याआधी गाणं शिकला आहात?"

" येस्स्स्स..... मी कांचीपुरमचा आहे, संगीत आमच्या गावात प्रत्येकाच्या घरात आहे." श्रीनिवासने माहिती पुरवली.

" छान..... थोडा सांगा आम्हाला तुमच्या गाण्याबद्दल."

" मी १९७२ साली जन्माला आलो. माझी आई आणि वडील दोघे सरकारी नोकरीत होते. घरात तानपुरा होता, मृदंगम होता, मोरसिंग होतं.....आई सांगते कि मला लहानपणी गाणं ऐकून तंद्री लागायची. आपल्या घरात गाणार मूल जन्माला आलंय, हे त्यांना समजल्यावर ते अतिशय खूष झाले......" या श्रीनिवासने दहा-पंधरा मिनिटं आपले जन्मदाते, जन्मठिकाण, जन्मघर, जन्माचं कारण आणि जन्मापासून अवगत असलेलं संगीत या सगळ्याची माहिती पुरवली आणि गुरुजींच्या जन्माचं सार्थक केलं. हा माणूस स्वतःला नक्की काय समजत होता ते काही कळत नव्हतं, पण आपल्याला या पृथ्वीवर तिरुपती बालाजीने जगाच्या सांगीतिक उद्धारासाठी ' स्पेशल केस ' म्हणून पाठवलेलं आहे अशा पद्धतीने त्याची आत्मप्रौढी सुरु होती.

नमनाला घडाभर खोबरेल तेल ओतल्यावर श्रीनिवासने मुद्द्याला हात घातला. " आपण सुरु करूया?" गुरुजी बहुधा मनातल्या मनात देवाचा धाव करत असावेत, कारण त्या प्रश्नावर आधी ते दचकले आणि " ठीक आहे" असं म्हणत त्यांनी मांडी सावरून पेटीच्या भात्याला हात घातला.

" आपला सूर कोणता?" श्रीनिवासला हा प्रश्न ऐकल्यावर काय झाला कुणास ठाऊक, त्याने एकदम उजवा हात कानाला लावला. ज्या हाताच्या आधारावर तो देह अद्याप तरी सावरला होता, तोच नेमका निसटल्यामुळे बाकीचा डोलारा कोसळला आणि कसाबसा पुन्हा एकदा सावरत त्याने उत्तर दिलं, " डॉक्टर बालमुरलीकृष्णन यांचा जो सूर, तोच माझा."

आमच्या गुरुजींची हे उत्तर ऐकून दांडी उडालेली मला समजली. त्यांनी मनातल्या मनात डोक्याला हात लावला असावा, कारण भात्याची खिट्टी बंद केल्यामुळे त्यांनी हार्मोनियमचा नाद सोडून दिल्याचं मला समजलं. " म्हणजे कोणता?" त्यांचा प्रश्न इतक्या दबक्या आवाजात बाहेर आला, की आत्तापर्यंत या श्रीनिवासने आमच्या गुरुजींच्या मेंदूला मुंग्या आणल्याची माझी खात्री झाली. " कट्टाई चार.... काळी चार...." श्रीनिवासच्या तोंडून 'काळी' चार ऐकून मला त्याची पट्टी त्याला साजेशीच असल्याचं उगीच वाटून गेलं.

" काही ऐकवा ना...." गुरुजींच्या तोंडून अतिशय घाबरत घाबरत हे वाक्य बाहेर पडलं. एव्हाना त्यांचा घसा कोरडा पडलाय आणि चेहरा केविलवाणा झालाय हे मला दिसायला लागलेलं होतं. " मी तुम्हाला एक अनवट राग ऐकवतो. या रागाला नारायणगौला म्हणतात. मला शंभर पेक्षा जास्त राग येतात.... हा त्यातला एक " मी आणि गुरुजींनी एकमेकांकडे बघितलं. आता हा एक तर काहीतरी जबरदस्त गाणार, किंवा आम्ही जीव मुठीत घेऊन अत्याचार सहन करणार अशी आमची खात्री झाली.

श्रीनिवासने पहिला षड्ज लावला, आणि आमच्या गुरुजींचा चेहरा पडला. हार्मोनियमच काय, पण जगाच्या कोणत्याही वाद्यामधून असे सूर उमटवणं अशक्य होतं. त्याने आलाप घ्यायला 'आ' केला आणि मला त्याच्या तोंडातून त्याने बहुधा सकाळी खाल्लेल्या माशाचा ' सुगंध' आला. कदाचित त्याच्या अंगात असलेल्या शंभर रागांपैकी एक असलेला तो ' नारायणगौला ' अकाली त्याच्या तोंडात मृत्यू पावला असावा आणि त्याचाच वास मला आला असावा अशीही शंका माझ्या मनाला चाटून गेली. मधूनच अचानक हात वर करून तर्जनी उंचावून त्याने ' तार सप्तकातल्या' कुठल्याशा स्वराला स्पर्श करायचा प्रयत्न केला आणि काखेत त्याचा झब्बा थोडासा उसवला. त्या रंगाच्या सुरांची त्याने अशी काही चिरफाड चालवली होती, की आजूबाजूचे लोक आमच्या क्लासविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करतील अशी भीती आम्हाला वाटायला लागली. मधूनच मान छातीत घुसवून मद्र सप्तकातल्या आणि लगेच मान बगळ्यासारखी उंचावत तार सप्तकातल्या सुरांना तो स्पर्श करायचा आटापिटा करत होता , पण ऐकू येताना आम्हाला सुरांमध्ये विशेष काही फरक जाणवत नव्हता.

दहा मिनिटांनंतर धाप लागून त्याने आपलं ते दिव्य गायन आटोपतं घेतलं आणि आमच्या ' कानात ' जीव आला. गुरुजी आता निःशब्द झाले होते. कसेबसे धाडस एकवटून त्यांनी अभिप्राय दिला, " मिस्टर श्रीनिवास, आपल्याला थोडी रियाजाची गरज आहे. गाणं अजून तयार व्हायला हवं." मला ते ऐकून धक्काच बसला. गुरुजी भिडस्त आहेत हे माहित असूनही मला त्यांचा राग आला. " अहो त्याला सांगा ना, तू यापुढे कृपा करून गाऊ नकोस....माणुसकीच्या नात्याने इतकीच कृपा कर या पृथ्वीवरच्या माणसांवर, तुझी सगळी पापं माफ करून चित्रगुप्त तुझ्या पापपुण्याचं अकाउंट सेटल करून तुला थेट स्वर्गात जाऊ देईल. ज्या गुरूंनी अथवा उस्तादांनी तुम्हाला गाण्याचे धडे दिले त्यांची आण आहे तुम्हाला गुरुजी, तोंड उघडा...." मी मनातल्या मनात गुरुजींना सांगायचं प्रयत्न करत होतो. या रेड्याच्या तोंडातून वेद म्हणून घ्यायची आमच्या गुरुजीरूपी ज्ञानेश्वरांची पात्रता नाहीये हे मला अगदी स्वच्छ दिसत होतं.

माझ्या प्रार्थनेला त्या दिवशी यश आलं नाही. या श्रीनिवास आता दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी 'गायन' शिकायला येऊ लागला. त्याच्या मते त्याचे संगीताशी ३६ गुण जुळले होते. ते गुण नाहीत , तर तो ३६ चा आकडा जुळला आहे हे आडून आडून त्याला अनेकांनी सांगून बघितलं. आपल्या गायनाच्या आविष्काराने त्याने अनेकांच्या क्लासला यायच्या वेळा बदलल्या. त्याला साथ करायची म्हटली, की तबलजी किंवा तानपुरावाले विद्यार्थी औषध फवारल्यावर झुरळं इथे तिथे पळावी, तसे पळून जायचे. शेवटी त्याच्यासाठी तालाच यंत्र लावायची वेळ आली. त्याने ताना-मुरक्यांचा सराव सुरु केल्यावर गुरुजींच्या शरीरात एकाच वेळी आरोहाबरोबर उच्च आणि अवरोहाबरोबर नीच रक्तदाब सुरु व्हायचा आणि भर एसीमध्ये त्यांना दोन-तीन बाटल्या पाणी रिचवायला लागायचं.

श्रीनिवासच्या त्या संगीत-साधनेमध्ये गुरुजींचं आयुष्य कमी होतंय कि काय, अशी आम्हाला काळजी वाटायला लागली. त्यात त्याने " मी म्हणतो, तुमच्याकडून मृदंगम सुद्धा शिकेन हळू हळू...पुढच्या महिन्यापासून तो पण क्लास सुरु करूया?" असा प्रश्न करून गुरुजींच्या आधीच कमकुवत झालेल्या हृदयाला अजून एक धक्का दिला. काही विद्यार्थ्यांनी या माणसाला काही खायला घालून याचा आवाज कायमचा बंद करता येईल का याची चर्चा माझ्या समोर केल्यावर मात्र हे सगळं आता सगळ्यांना किती असह्य झालाय, याची मला कल्पना आली. मी त्या क्लासमध्ये केवळ एक हौशी श्रोता म्हणून जात असल्यामुळे आणि त्यासाठी माझ्याकडून क्लासचे लोक काहीही शुल्क घेत नसल्यामुळे मला थेट काहीही बोलणं अशक्य होतं.

एके दिवशी क्लास सुरु व्ह्यायचा आधी गाफीलपणे मी खालच्या तामिळ खानावळीत कॉफी घ्यायला गेलो, आणि तिथे नेमका श्रीनिवासच्या हातात सापडलो. तो तिथे अक्खी थाळी घेऊन उदरभरणाच्या कार्यक्रमात गुंतला होता. त्याच्या समोरचा भाताचा ढीग आणि ताटली भरून माशाचे तुकडे बघून त्या देहाच्या विस्ताराचं मर्म माझ्या ध्यानात आलं. सपासप भाताचे घास घेऊन मधूनच भाला मोठा माशाचा तुकडा टपकन तोंडात टाकत त्याचं अन्नग्रहण सुरु होतं. भुरके मारत जेवायची खोड असल्यामुळे आजूबाजूचे काही लोक त्या आवाजामुळे थोडेसे वैतागलेले पण मला दिसले.

" काय फिल्टर कॉफी आवडते वाटतं तुम्हाला?" भाताचे काही कण तोंडातून बंदुकीच्या गोळीसारखे उडवत आणि सोन्याच्या दातासकट बत्तीशी विचकून त्याने प्रश्न केला. " हो. आणि तुम्ही काय इतक्या उशिरा जेवता? तीन वाजलेत दुपारचे...." मी विचारलं. "आज उशीर झाला. म्हंटल, रिकाम्या पोटी कसा रियाज होणार....गाण्यावरचं लक्ष भुकेमुळे विचलित नको व्हायला....." तुमच्या गाण्यामुळे आमची तहानभूक मरते, त्याच काय? हा माझा प्रश्न मी कॉफीच्या कडू घोटाबरोबर गिळला. " सध्या कोणता राग चाललाय?" मी मुद्दाम विचारलं. " तीन राग चाललेत एकत्र.....तोडी रागाचे तीन प्रकार.... " भाताचा घास घ्यायला त्याने बोलणं थांबवलं आणि मी त्याला मुद्दाम दुसऱ्या दिशेला वळवायचा दृष्टीने विषय मद्रासी कॉफीवर आणला. तोडी रागाच्या तीन प्रकारांवर अंगावर भात उडवून घेत 'सखोल विवेचन' ऐकायची माझी तयारी नव्हती.

" माझं गायन कसा वाटतं?" गोणीमध्ये घालून लांब सोडून गाडीने घरी येऊनसुद्धा कुत्र्याचं पिल्लू जसं पुन्हा घराच्या दाराशी उगवतं, तसा श्रीनिवासचा विषय मद्रासी कॉफीच्या वाटेवरून दुसऱ्या मिनिटाला पुन्हा दुबईच्या गाण्यावर आला. " गाणं माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सूर माझ्यासाठी त्या जीवनातला श्वास आहे. मी कमावण्यासाठी सी.ए. झालो असेनही, पण माझा जीवन संगीताला समर्पित आहे. " आता हा माणूस माझा एक तास भाताबरोबर भुरकून टाकणार, याची भीती मला वाटायला लागली आणि शेवटी वाईटपणा पत्करूया पण याच्या डोळ्यावर चढलेली आत्ममग्नतेची झापडं काढूया असा विचार माझ्या मनात आला. मनाचा हिय्या करून मी शेवटी अनेक महिने क्लासच्या अनेकांच्या मनातली तळमळ बोलून दाखवली.

" श्रीनिवास, वाईट नको वाटून घेऊस. माझ्या बोलण्याचा हेतू तुला त्रास व्हावा हा नाहीये, पण कधीकधी वस्तुस्थिती समजायला कोणीतरी वाईटात शिरावच लागतं. तुझ्या गळ्यात गायन नाहीये. किंवा मी असं सांगेन, कि तुला गाणं शिकायचं असेल तर 'मला गाता येत नाही' ही वस्तुस्थिती तू आधी स्वीकारली पाहिजेस. तुझ्याकडे गाण्याबद्दलची माहिती असेल, त्यात अगदी तुझा व्यासंगही असेल, पण गळ्यावर गाणं नाही चढलेलं तुझ्या. आधी साधा भात तर करायला शिक, मग बिर्याणी करायच्या मागे लाग.... " श्रीनिवासला माझ्या बोलण्यामुळे राग आल्याचं मला दिसत होतं. " तू कशावरून बोलतोस हे सगळं? तुला किती गाता येतं ? तू किती शिकलायस गाणं इतकं ठामपणे माझ्या गाण्याबद्दल बोलायला?" रागारागात भाताच्या ठिणग्या अंगावर उडवत श्रीनिवास उखडला. " गाणं न शिकल्यामुळे मी गाण्याच्या व्याकरणाबद्दल काही नाही बोलू शकत, पण जे कानाला ऐकू येतं, त्यामुळे जर त्रास जास्त होतं असेल तर त्या गाण्यात काहीतरी कमी आहे हे नक्कीच कळत मित्रा....चिडू नकोस"

तावातावाने श्रीनिवास उठला. हात धुवून जिने चढत पहिल्या मजल्यावरच्या क्लासमध्ये शिरला. मी मागोमाग गेलो आणि मनातल्या मनात पुढे काय होणार याची खूणगाठ बांधायला लागलो. गुरुजींना बघून श्रीनिवासने त्यांना थेट प्रश्न केला, " मला तुम्ही तुमच्या गाण्याची शपथ घेऊन सांगा.....मी वाईट गातो?" गुरुजींनी माझ्याकडे बघितला आणि त्यांना साधारण काय झालं असावं याचा अंदाज आला. दोन सेकंद मनाची तयारी करून त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि आज दोन महिन्यांनी त्यांच्या कंठातून सत्यवचन बाहेर पडलं. त्यांच्या प्रत्येक वाक्यानंतर श्रीनिवास मनातल्या मनात अधिकाधिक कोलमडत होता. शेवटी मटकन तो तिथल्या एका खुर्चीत बसला आणि त्याने अतिशय खोल गेलेल्या आवाजात विचारलं, " माझे गुरु म्हणून तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करा. मी काय करू? आज मी खरोखर स्तंभित झालोय.....असं वाटतंय मी इतकी वर्ष मूर्खासारखं स्वतःच्या गाण्याचा अभिमान बाळगून होतो......"

" तुला एक विनंती करू? मला गाणं काहीही येतं नाही, असं विचार आधी कर. पुस्तकात वाचलेलं गाणं विसर. सूर ऐकले कि त्यातून व्यक्त होणारी भावना कशी आहे, याकडे लक्ष दे, त्या सुरांमध्ये कोणता राग दडलाय याचा विचार करू नकोस. तुला १०० राग आले नाहीत तरी हरकत नाही, पण एक राग १०० वेळा गायलास तर प्रत्येक वेळी त्याची वेगळी अनुभूती ऐकणाऱ्याला येऊ दे. रियाज स्वतःचा मोठेपणा दाखवायला नको करुस. अरे, सुरांवर प्रभुत्व नसतं मिळवायचं, सुरांची पूजा करून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं असतं. ते नेहेमी मोठेच राहणार.....आपण त्यांच्यासमोर पामरच आहोत....." त्या दिवशी नायर गुरुजींनी अक्षरशः आपल्या त्या पाच मिनिटाच्या समजावणीतून आमच्या सगळ्यांच्या काळजाला हात घातला.

दुसऱ्या दिवसापासून श्रीनिवासची खरी 'तालीम' सुरु झाली. एका महिन्यात खरोखर त्याच्या सुरांमध्ये फरक जाणवायला लागला. तासनतास एकाच सुराच्या परिपूर्णतेचा ध्यास घेऊन त्याला त्याच सुराचा रियाज करताना बघून आम्ही खरोखर सुखावलो. हॉटेलच्या चविष्ट वाटणाऱ्या पंधरा-वीस वाटयांनी भरलेल्या थाळीपेक्षा घरच्या सध्या वरण-भात-तूप-लिंबाच्या जेवणात खरी पोषणमूल्य असतात आणि त्यातून मिळणारं समाधान लाखमोलाचं असतं हे त्याला आता समजलेलं होतं.

काही महिन्यांनी क्लासचा वार्षिक समारंभ आला. सालाबादप्रमाणे वेगवेगळ्या गायक-वादकांचे कार्यक्रम आयोजित झाले. तामिळ चित्रपटांमध्ये भरभरून पार्श्वगायन केलेल्या खुद्द चित्राजी पाहुण्या म्हणून कार्यक्रमात आल्या होत्या। कार्यक्रमाच्या शेवटी श्रीनिवास स्टेजवर आला. त्याच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता होणार होती. त्याने कानात तानपुऱ्याचे सूर भरून घेतले आणि षड्ज लावला. पुढच्या वीस मिनिटात त्याने अतिशय तयारीने भूप राग सादर केला आणि शेवटच्या षड्जावर त्याचा आवाज स्थिरावल्यावर चित्राजींनी उत्सफूर्तपणे टाळ्या वाजवल्या. श्रीनिवासला समोरचं दृश्य बघून भरून आलं. त्याने थेट माईक हातात घेतला आणि नायर गुरुजींच्या त्या दिवशीच्या कानउघाडणीची कहाणी त्याने सर्वांना सांगितली. गुरुजींना सर्वांसमोर 'धन्यवाद' म्हणून तो आवंढा गिळत स्टेजच्या मागे गेला. पाच मिनिटं शांतपणे त्याने स्वतःच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आणि डोळे पुसून तो कार्यक्रमानंतरच्या चहापानात सगळ्यांबरोबर गप्पागोष्टींमध्ये सामील झाला.

आजूबाजूचे अनेक विद्यार्थी कार्यक्रमापुरते गाणं शिकत होते. सोन्याच्या पाणी चढवलेल्या दागिन्यांसारखे ते आज जरी लक्ख चमकल्यासारखे दिसत असले, तरी काही दिवसांनी ते तेज उतरणीला लागणार आहे, हे मला माहित होतं. त्या सगळ्यांमध्ये श्रीनिवास तेव्हढा एकटा मला शुद्ध सोन्यासारखा भासत होता. त्याला आपल्या सुरांची पट्टी गवसलेली होती, त्यासाठी त्याला डॉक्टर बालमुरलीकृष्णांच्या पट्टीचा मोजमाप चढवायची आता गरज उरली नव्हती!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा शिष्य मिळायला हवा. स्वतःमधे बदल करायची किती जणांची तयारी असते ?
खूप छान ओळख!

तुमचे काही लेख वाचले. छान आहेत..
कृपया सर्व लेखांची ग्रुप व्हीजीबलीटी पब्लिक कराल का? सर्वांनाच वाचता येईल. Happy

GROUP VISIBILITY OPTION कुठे आहे? मला या गोष्टींसाठी थोडी मदत लागेल।

तुमच्या लेखाच्या सुरवातीला अवलोकन आणि संपादन अशी दोन बटन आहेत. त्यावरील संपादन या बटनावर टिचकी मारा.
तिथे संपादनासाठीचे पेज दिसेल. त्याच पेजच्या शेवटी group visibility option दिसेल. त्यावर टिचकी मारा आणि public option select करुन save करा.

हा लेख खूपच आवडला.
मी स्वतः "माझ्या" पट्टीच्या शोधात आहे.
या लेखातून बरंच काही शिकायला मिळालं. हे नक्की.

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/

फारच छान लिहिलं आहे नेहमीसारखंच. श्रीनिवासला तुम्ही जे सांगितलंत ते सांगायची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. तुमचे आभार.