कथा भैरवी

Submitted by Kavyalekha on 10 June, 2020 - 16:34

कथा भैरवी
भैरवी संपली आणि माँ नी सतार बाजूला ठेवली. माँपाठोपाठ नंदिनीही थांबली. रोजच ती माँ सोबत रियाजाला बसे. ह्या नियमात अजून तरी खंड पडला नव्हता . ती माँची केवळ मुलगीच नसून त्यांची आवडती शिष्या ही होती. तिची पहिली गुरु माँ होती. तिला कळायला लागल्यापासून माँ नी तिची ओळख सुरांशी करून दिली होती. तिला कधी जबरदस्तीने शिकवावं लागलंच नाही. माँचं गोड गाणं तिच्या गळ्यात आपसूक उतरत गेलं आणि अधिक मधुर बनत गेलं. पुढे पुढे मग माँ बरोबर प्रत्येक दौऱ्याला जाणं, तिच्या हर एक मैफिलीत कधी सतारीची साथ करणं, तर कधी फक्त प्रेक्षक बनून मैफिली ऐकणं यातून तिचं गाणं अजून सुंदर होतं गेलं. त्यात एक परिपक्वता आली. एक आर्तता आली. त्याची खोली मग वाढतच गेली. तिच्याही मैफिली रंगू लागल्या. तिलाही लोकांची वाहवा मिळू लागली. माँचे इतर शिष्य, तबलजी, आयोजक इतकंच काय तर तिचे कितीतरी चाहते तिला माँचीच मूर्ती म्हणत. माँचा वारसा चालवण्याची जबाबदारी तिच्या शिरावर आतापासूनच ठेवली जाऊ लागली.
एव्हढे असूनही माँ बरोबरचा रियाज ती कधीच चुकवत नसे. किंबहुना तिला चुकवावासा वाटत नसे. खास करून हा पहाटचा रियाज ! जो इतर रियाजानंपेक्षा तिला नक्कीच वेगळा वाटे. तिच्यातल्या सुरांना रोज नव्याने जागवणारा तिच्या गाण्याचा श्वास ! श्वास घ्यायला कधी कुणी विसरत का?....
रियाज संपवून दोघी नाष्टयासाठी गेल्या. ज्युसचा ग्लास तोंडाला लावत नंदिनीने विचारलं, “ माँ झालं का तुझं पॅकिंग? जीजीला फोन केलास का आपण येतं आहोत म्हणून? तुझ्यानावे कसलंस लेटर आलं आहे बघितलंस का ते? संध्याकाळी चार वाजता फ्लाईट आहे आपली माँ…… “
“अगं हो हो…. एकावेळी किती प्रश्न विचारशीलं? … पॅकिंग केलंय.. जीजीला फोन पण केलाय. ते लेटरही वाचलंय. पण फोन केलाय तो तू तिथे येणार आहे म्हणून…. आणि माझं पॅकिंग केलंय ते पुण्याला जायचं. … वाहिनीचा फोन आला होता… दादाला थोडं बरं वाटतं नाही आहे. तेंव्हा तुला एकटीलाच जावं लागेल गोव्याला… “
“का… काय झालंय मामाला? काही सिरीयस तर नाही आहे ना?मीही येते तुझ्याबरोबर पुण्याला. “
“नको… तुझा प्रोग्राम कॅन्सल अजिबात करू नकोस. फार काळजी करण्यासारखं नाही आहे काही…. नाहीतर मीच तुला जाऊ नको म्हणून सांगितले असते. “
“ठीक आहे. जाईन मी एकटी आणि तसंच काही असेल तर कळव मला नक्की. पण तू सोबत असतीस तर बरं झालं असतं.. “
“अग पण जीजी आहे ना तिथे.. आणि तू काय आता लहान नाही आहेस. गोवा काय तुला नवीन आहे का? “
“जीजी असेलच गं तिथे पण तरीही…. “
“आता तरीही काय? शिवाय तुला आता ह्या साऱ्याची सवय करून घ्यावी लागेल. मी काही आयुष्यभर नाही पुरणार आहे तुला. “
“ओह प्लीज माँ. . आता हे काय नवीन काढलंस? “
“नवीन काही नाही. पुढे मागे तुझं लग्नं होईल तेव्हाच म्हणतेय मी “
“तेव्हाच तेव्हा बघू गं. आणि मला इतक्यात लग्नं वगैरे करायचं नाहीए “
“तेव्हाच तेव्हा नाही. मला माहित आहे तुला का लग्न नकोय ते. कमॉन नंदू you have to move on ! विशाल तुझा भूतकाळ होता. तसाही तो तुझ्या बरोबरीचा नव्हता.”
“माँ प्लीज… जाऊंदे ना तो विषय… “
“अगं पण कधीतरी करावंच लागणार आहे तुला लग्न !. आणि लग्नं झाल्यावर आपल्या प्रायॉरिटीज बदलतात. तसंच तुझं आयुष्य आता कुठे सुरु होतंय. माझं काही सांगता येतं नाही. “
“ए. प्लीज.. तू असं काही बोलणार असशील ना तर मी जाणारच नाही गोव्याला “
“ठीक आहे.. नाही बोलत असं काही. तू नाश्ता कर. मी जरा बँकेत जाऊन येते. आणि हो तू तिथे जाशील तेव्हा जीजीला दादाबद्दल काही सांगू नकोस. उगाच टेन्शन येईल तिला. तशीही ती आपली सारखी काळजी करत असते. तुझा बाबा गेला तेव्हा तिचाच तर केव्हढा तरी आधार होता. नाहीतर सगळे आपापल्या दुनियेत मश्गुलं होते. तू तर किती लहान होतीस. पण तू, जीजी आणि माझं गाणं ह्यांनीच मला जगायचं बळ दिलं. म्हणून तर इथंवर येऊन पोहोचले.”
“ आता तू एव्हढी इमोशनल नको होऊस. जाईन मी एकटी. “
ठरल्याप्रमाणे नंदिनी एकटीच गोव्याला गेली. जीजी गाडी सहित आली होती. “जीजी”.. नंदिनी जवळ जवळ किंचाळतच जीजीच्या गळ्यात पडली.
“किती वाळलीस गं नंदू…. नवीन डाएटिंगच फॅड तर नाही ना डोक्यात घेतलंस?”
“ अजिबात नाही. “
“ठीक आहे. चल गाडीत बस. तुझी माँ का नाही आली? मला फोनवर महत्वाचं कामं आहे असं म्हणत होती . “
“ अं.. हो हो.. तिचं काहीतरी कामं निघालं. मी विचारलं नाही. चल लवकर घरी जाऊ. मला खुप भूक लागली आहे. “
“ बरं बाई चल. कार्यक्रम कधी आहे म्हणालीस? परवा ना? “
“ हो. तू यायचं आहे हां. “
“ हो बाई. तुझा कार्यक्रम मी कसा चुकवेन. “
….
पुढचे काही दिवस कार्यक्रमाच्या गडबडीत गेले . नंदिनी आज ठरवून माँ ला फोन करणार होती. तोच तिचा सेल वाजला.
“हॅलो..हां माँ बोल. अग तुलाच फोन करणार होते मी. तू कशी आहेस? आणि मामा कसा आहे? तसा तुझा मेसेज मिळाला होता. तू मुंबईला कधी जाणार आहेस? “
“मामा ठीक आहे. मी उद्या सकाळी निघणार आहे. तुझा प्रोग्राम कसा झाला? पाहिजे तर राहा दोन दिवस… “
“ प्रोग्राम as usual चांगला झाला. त्यांचे पुढचे काही प्रोग्रॅम्स पण मलाच मिळाले. सो I am very happy ! तेच तर तुला सांगायचं आहे. पण फोन वरून नाही. मी उद्या संध्याकाळी निघते आहे. आपण भेटून बोलूच. चल इथं मला रेंज नाहीए बरोबर. मी ठेवते आता फोन. “
इतक्यात जीजी आली.
“ अगं नंदू कोणाशी बोलत होतीस?”
“ माँ बरोबर बोलत होते गं.”
“ माँचा फोन होता मग मला का नाही बोलावलंस? “
“ अगं ती परत फोन करणार आहे. “
“ आणि हे उद्याच जायचं काय काढलंयस? राहा ना आणखी दोन दिवस ‘
“ अहो जीजी साहेबा.. किती दिवस झाले मला इथे येऊन. “
“ मग काय झालं.. आजीच आहे ना मी तुझी. “
“ असं करुयात आपण जीजी. तूही चल माझ्याबरोबर मुंबईला. “
“ नको गं बाई. मला नाही आवडत ती मुंबईची गर्दी, तो गोंगाट. पुण्याला सुद्धा चार दिवसांपेक्षा जास्त नाही राहू शकत मी. मी माझी इथेच बरी आहे.”
“ आणि मला मुबंईच आवडते. “
“ बरं बाई राहिलं. जा बाई तू आपल्या मुंबईला तुझ्याशी कोण वाद घालणार. “
“बरोब्बर. “
“ पण कशी जाणार आहेस?”
“ मला ना वाटेत एका मैत्रीणीकडे जायचंय. तेव्हा तुझी गाडी घेऊन जाणार आहे. चालेल ना?”
“मुंबईपर्यंत तू गाडी घेऊन जाणार?”
“त्यात विशेष काय ! आधी नाही का एक दोनदा मी आलेले अशी. “
“ ते ठीक आहे. पण रात्रिच असं गाडीने….? “
“chill जीजी. किती काळजी करतेस तू. मी गाडी सेफ चालवेन. “
“पण सांभाळून जा. ड्राईव्हर देऊ का बरोबर? नको घेऊनच जा तू ड्राईव्हर. “
“अगं जीजी.. नको.. मी जाईन गं… प्लीज ना. “
“तू सांगितलेलं कधी ऐकलं आहेस का? नीट जा बाळा. “
……
नंदिनी निघून गेल्यावर इतक्या दिवसांची राहिलेली कामे आठवू लागली. ती उरकण्यात रात्र कधी झाली कळलंच नाही. त्यामुळे अंथरुणाला पाठ टेकताच जीजीचा डोळा लागला. पण अचानक पहाटे तीन वाजता फोन वाजू लागला. जीजी दचकून उठली. फोन माँचा होता. ताबडतोब गाडी आणि ड्राईव्हर पाठवून निघायला सांगितले तिने. मुंबईला गेल्यावर कळले की नंदिनीचा अपघात झाला होता. तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं. नंदिनीच्या अपघाताची बातमी म्हणजे माँ आणि जीजीसाठी एक मोठ्ठा धक्का होता. अजूनही ती शुद्धीवर आली नव्हती. माँची अस्वस्थता वाढत होती. जीजीची काही वेगळी स्थिती नव्हती. “नंदू कधी शुद्धीवर येणार? “ हा एकच धोशा तिने लावला होता. त्यासाठी तिने घरच्या देवांना पाण्यात राहण्याची शिक्षा केली होती.
“अं.. अं… माँ.. “
“अगं जीजी…नर्सला बोलाव तिला शुद्ध येतेय.”
“माँ… जीजी.. मी कुठे आहे? आणि तुम्ही इथे कसे?”
“थांब… थांब.. इतक्यात उठू नकोस. जास्त काहीही बोलू नकोस. आताच तर शुद्धीवर आली आहेस. तू मुंबईत हॉस्पिटल मध्ये आहे. आम्ही आहोत सगळे इथे. डोण्ट वरी… बेटा.. “
“पण… मी.. “
“तरी मी तुला सांगत होते की ड्राइव्हर घेऊन जा म्हणून.. ऐकलं नाहीस ना माझं… नेहमी तुला वाटत तेच करतेस तू… “
“मला काही होतं नाही जीजी. “
“पुरे.. तुझं तत्वज्ञान ना तुझ्याकडेच ठेव. धड बोलताही येतं नाहीए तुला. आम्हालाच माहित आहे आमची काय स्थिती झाली होती ती !... अगं… किती तास तू गाडीत रक्ताळलेल्या अवस्थेत पडून राहिली असतीस… शिवाय तू नेहमी सारखी न सांगता जाणार होतीस ना तुझ्या त्या मैत्रिणीकडे… मग कोणाकडून मिळाली असती तुझी खबरं? कोण देवमाणसं होती ती काय माहित… त्यांनी तुला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. अपघाताची केस पण तरीही पोलीस ऐनवेळी तिथे होते म्हणून तुझी ट्रीटमेंट तरी सुरु झाली. त्यांनीच आमचा नंबर मिळवला. मग आम्ही तुला इथे मुंबईत आणलं. मी आणि माँ कोण कोणाला सांभाळत होतं हे त्या देवालाच माहित! आणि तुझं आता आम्ही काही एक ऐकणार नाही आहोत. औषधं घेऊन परत झोप बघू. “
“बरं बाबा दे ती औषधं.. “
……
थोड्या दिवसांनी नंदिनी हॉस्पिटल मधून घरी आली. काही महिने असेच गेले. नंदिनीच्या जखमा जवळ जवळ बऱ्या होतं होत्या. पण माँ ने तिला जास्त दगदग करू दिली नव्हती. ती पुन्हा आपल्या रुटीन मध्ये गुंतते आहे तोच या तापाने डोकं वर काढलं.
“अगं नंदू आज कशाला बसलीस रियाजाला?”
“हे काय गं माँ.. कंटाळा आलाय झोपून. कालपासून बरं वाटतंय म्हणून तर बसले. “
“ok. पण तब्येत संभाळलीस तर सगळं करू शकशील ना ! ते काही नाही कितीही बरं वाटत असलं तरी डॉक्टरांकडे जाऊन ये. दोन दिवस अंगावर काढलं ते बास झालं. आणि हो सध्या मलेरियाची साथ आहे. तेव्हा ब्लड टेस्ट पण करून घे. उगाच आपण दुर्लक्ष करू आणि अजून वेळ वाया जायचा या आजारपणात.”
पुढचे काही दिवस खूप धावपळीत गेले. दोघीही बिझी होत्या .आज कुठे दोघी निवांत भेटल्या.
“माँ काय म्हणतेय तुझी नवीन शिष्या? काय गोड आहे गं. नो डाउट गातेही सुंदरच !!marvellous !!
“हो.. अगं बिचारी अनाथ आहे. पण तिला आवडत नाही कुणी तिला दया दाखवलेली. “
“she is right माँ.. she is so talented ! मग केवळ आई बाप नाहीत म्हणून उदास व्हायचं की जे आहे त्याचा विचार करायचा? “
“मलाही खूप आवडली आहे ती. एक बाकी खरंय, तुझी आई म्हणून सांगत नाही पण तुझ्यानंतर मला कोणाचं गाणं रुचलं असेलं, पटलं असेलं तर ते हिचं… अगं पण तू गेलेलीस का डॉक्टरकडे? “
“हो.. काय म्हणाले होते मी everything is normal म्हणून. पण तरीही टेस्टस केल्या मी. “
“बघ विसरलेच .. “
“का.. काय झालं? “
“अगं एक फोन येणार आहे. ते पुण्याच्या प्रोग्रामचं म्हणाले होते ना तुला… तेच सगळं नक्की करायचं आहे.तू जा जाऊन जरा आराम कर. आधी काहीतरी खाऊन घे.”
नंदिनी तिच्या रूम मध्ये आली. तिने सेल टेबलावर ठेवायचा अवकाश इतक्यात तो वाजला.
“हॅलो नंदिनी… “
“हॅलो डॉक्टर अंकल . How are you?”
“well. I am fine.. पण तुझे रिपोर्ट्स… “
“आले का?... पाठवू का कोणाला ते घ्यायला?”
“see नंदिनी…, actually.. I want you to come and see your reports.. “
“का डॉक्टर..? काही सिरीयस??? “
“तू आल्यावर आपण बोलू.. “
“ठीक आहे मी आता लगेच येते… “
असं का म्हणाले डॉक्टर ???.... पण जाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हाच विचार करत तिची गाडी हॉस्पिटलच्या आवारात आली.
“डॉक्टर मी आत येऊ..? “
“ये बेटा नंदिनी.. “
“काय झालंय डॉक्टर??... everything is normal or…. “
“हे बघ मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे.”
“जे काही असेलं ते स्पष्ट बोला प्लीज… “
“ठीक आहे… तू पहिल्यांदा जेव्हा आलेलीस तेव्हा आपण तुझी ब्लड टेस्ट केली होती…मी तुला सांगितले होते की तुझा परत परत येणारा ताप मला साधा नाही वाटतं आहे… “
“हो मग… “
“त्यानंतर तुला आठवत असेलं मी पुन्हा काही टेस्ट करेन असे तुला म्हणालो होतो फोनवर… आणि गडबडीत तू जास्त काही विचारलं नाहीस…त्या सर्व टेस्टचे रिपोर्ट्स आले आहेत.. and even I am shocked… !!!... मी प्रथम विचार केला की माझे तुमच्या फॅमिलीशी असलेले संबंध पाहता या साऱ्याची कल्पना माँना द्यावी. But you are also an adult and its your right to know this first … म्हणून मी हे तुलाच सांगायचे ठरवले. So I don’t know.. how will you take this…? !? “
“काय झालंय डॉक्टर मला…? असं काय आहे.. प्लीज tell me…“
“sorry to say this…but.. you are HIV पॉसिटीव्ह… नंदिनी… !!!....”
“what…? तुम्ही हे काय बोलताय….??...हे कसं शक्य आहे… तुमची काहीतरी चूक होतेय डॉक्टर…. This is impossible…. हे नाही होऊ शकत….तुम्ही परत चेक करा सर्व reports…. “
“calm down… नंदिनी… शांतपणे याचा विचार कर…हे पाणी पी…नंदिनी ऐकतेस ना…. “
“मी…. मला… घरी…. हे असं कसं…. नाही… नाही… “
“चल बेटा .. lets go home…मी तुला ड्रॉप करतो… “
नंदिनी घरी आली.. तिला रडताना… आणि डॉक्टर ना तिच्यासोबत पाहून माँना आश्चर्य वाटलें….
“अगं… काय झालंय इतकं रडायला…??? डॉक्टर काय झालंय…? काही सिरीयस आहे का?...काय झालंय काय…????... “माँला कसलीतरी अभद्र शंका आली.
“माँ.. माँ… “…….
काहीही न बोलता रडत रडत ती माँच्या कुशीत विसावली.
एकच हक्काची जागा !....विश्वासाची सावली… !माँ हे काय झालं..? हे कसं सांगणार आहोत माँला आपण???... पण अजूनही हे खरं आहे की एक दुःस्वप्न हे आपल्याच मनाला कळत नाहीये..
खरंच मी HIV पॉसिटीव्ह आहे…. याचा अर्थ… मी….मला…
काही क्षणापूर्वीच आपलं जग आणि आताच जग… विलक्षण बदललय सगळं !!. सगळीच उलथापालथ झालीए…खूप कठीण आहे हे सारं…..
….आकाशाच्या अफाट छत्राखाली झाडं, पिक किती आनंदात डोलत असतात. बरोबर वाऱ्याची मंद साथ असतें….आपल्याच धुंदीत.. आपल्याच नादात असतात ती… अपेक्षा असते ती धुंद पावसात न्हाऊन तृप्त होण्याची…. कुठे असतात हिरवीगार पिक…. वाऱ्याच्या लयीत नाचणारी…. कुठे असतात पावसाची आतुरतेने वाट पाहणारे वृक्ष…. अशाच एका बेसावध क्षणी गारपीट येऊन धडकतो… आपण येणार हे न कळवताच !....एखाद्या आगंतुकासारखा …. आणि पापणी मिटायच्या आत सगळ्याचा चक्काचूर होतो…. सगळं उध्वस्त होतं…. नुकतंच पेरलेलं बी.. त्याच्या वाढी बरोबर पाहिलेली असंख्य स्वप्नं…. त्याच्या साठी घेतलेले अगणित प्रयास…त्याच्याशी निगडित असलेले आपलं जीवन… सारं सारंच संपतं…. एका इवल्याशा बीजापासून ते भल्या मोठ्या महावृक्षापर्यंत कोणीही वाचत नाही… सगळ्यांची शक्ती कमी पडते त्याच्या सारख्या बलाढ्याशी चारहात करण्यात…. मग कोमल हास्याची जागा अचानक क्रूर अश्रू घेतात ….कशालाच काही किंमत उरत नाही… उरतात त्या फक्त आठवणी !... तो आक्रोश… ! आणि त्या विनाशाच्या खुणा !..
.. .. एखाद्या अंधांसाठी सारं जग म्हणजे अंधारच असतो.. त्याच्यासाठी काय दिवस आणि काय रात्र !...पण आपलं काय???. . आपल्याला डोळे असूनसुद्धा समोर काळोख पसरलाय….!
काय होतंय काही कळत नाहीए…डोकं सुन्न झालंय….. कदाचित ते दुसऱ्या कुणाचे तरी रिपोर्ट्स असतील…. हो… असचं असू देत….माँ… जीजी…. आं…. काय होतंय मला हे…. !
नंदिनीला झोप लागलेली पाहून माँनी डॉक्टर ना फोन लावला. जे काही डॉक्टर घरी असताना सांगून गेले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते….
“हॅलो डॉक्टर…. हे सर्व काय आहे… “
“हे बघा…हे सर्व तुम्हाला शांतपणे घ्यावे लागेल. मला माहित आहे हे इतकं सोपं नाहीये…. पण आहे हे असेच आहे….she is HIV पॉसिटीव्ह….your daughter is HIV पॉसिटीव्ह…. I am so sorry.”…
“अहो डॉक्टर तुम्ही काय बोलताय मगापासून …..अहो मी सांगते तिला काही दिवस फक्त सारखा ताप येतं होता…. साधा ताप होता हो…. आणि तुम्ही हे काय….?? “
“हे पहा माझ्यासाठी सुद्धा हा मोठाच धक्का आहे…. मी स्वतः तिच्या टेस्ट दहादा तपासून पहिल्या आहेत…. कदाचित आम्ही कुठे चुकत असू … पण जे आहे ते बदलेलच नाही…हॅलो… हॅलो…. माँ…… “
फोनचा रिसिव्हर तसाच लोम्बकळत राहिला… कुणीतरी सावरण्याची वाट पाहत…. आणि कितीतरी वेळ तो तसाच अधांतरी राहिला… आधाराला कुणी आलंच नाही त्याच्या…..
……........
थोडीशी सावरल्यानंतर आठवड्याभराने नंदिनी परत डॉक्टर कडे गेली.
“डॉक्टर… मी आत येऊ का…? “
“ये बेटा.. नंदिनी…. बस.”
“डॉक्टर.. तशी अजून मीच काय… पण माँ सहित आमचं अख्ख घरं यातून सावरलं नाहीए…. रडून रडून डोळे थकले… पण हे विचार काही पाठ सोडत नाहीत… मला वेड लागेल अशाने…. तेव्हा मला तुम्हाला काही विचारायचं…डॉक्टर मी कधीच कुणाबरोबर…. Inspite of my past relationship…. “
“see नंदिनी… I can understand this… HIV virus च्या संक्रमणाचे अजूनही काही मार्ग आहेत. हा virus आपल्या शरीरातील स्रावांमध्ये आढळून येतो. त्यामुळे शारिरीक संबंधांव्यतिरिक्त बाधित व्यक्तीच्या needles वापरल्याने – जे ड्रग्स घेणाऱ्यां मध्ये सर्रास बघायला मिळते- हे इन्फेकशन होऊ शकते. तसेच जगातील 5 ते 10% HIV संक्रमण हे दूषित रक्त आणि रक्त घटकांच्या वापरामुळे होत आहे. ह्या सर्वांचा अभ्यास करता तुझ्याबाबतीत मला एकच शक्यता दिसते आहे. मागे जो तुझा रोड ऍक्सीडेन्ट झाला होता. तेव्हा तुला रक्ताची गरज भासली असणार …”
“एक मिनिट डॉक्टर… माझ्या लक्षात येतय सारं ….आता मला सर्व क्लिक होतंय. तुम्ही बरोबर बोलताय. माझा ऍक्सीडेन्ट झाला तेव्हा मी ज्या हॉस्पिटल मध्ये होते तिथल्या सुविधा काही बरोबर नव्हत्या. म्हणून माँने मला नंतर मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये हलवले होते. Exactly हेच एक कारण असू शकत… “
“so नंदिनी… कदाचित तिथल्या निष्काळजी पणामुळे तुला जे रक्त दिले गेले.. ते व्यवस्थित चेक न करता…हे बघ… आता we have to be practical.. मी सोशल वर्क म्हणून ह्या क्षेत्रात कामं केलं आहे… आणि अजूनही करतोय. HIV positive आणि एड्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. HIV बाधित वक्तीला एड्स होतोच असे नाही. काही HIV बाधित रोगी योग्य ट्रीटमेंट घेऊन बऱ्याच प्रमाणात नॉर्मल जीवन जगू शकतात.
हे सर्व त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती वर अवलंबून असते. काहींमध्ये ह्या रोगाची लक्षणे दिसायला खूप वर्ष जातात तर चक्क काही अशाही वक्ती आहेत ज्यांना HIV पॉसिटीव्ह असूनही कधीच एड्स होत नाही. आम्ही त्यांना elite controllers म्हणतो. So you have to be positive and brave ! ह्या रोगाशी आता तुला लढायचे आहे. मला माहित आहे की वास्तव खूप भयानक आहे. हा रोग आधीच इतका डागाळलेला आहे. त्यातून समाजाची मानसिकता आपण इतक्यात बदलू शकत नाही.माझे स्वतःचे असे कित्येक सहकारी मी पाहिले आहेत, जे अशा रोग्यांना हातही लावत नाहीत. पण ह्या वरून मी तुला सांगू शकतो… that you are very lucky….नंदिनी.. तुला माँ सारखी आई मिळाली. तेव्हा तिच्या साथीने तू तुझ्या आयुष्याची ही लढाई नक्कीच जिंकशील. तुला खुप मोठा पाठिंबा आहे त्यांचा… so ऑल द बेस्ट… !”
“अं… डॉक्टर मी निघू?”
“OK…पण जाशील ना सांभाळून..? “
“हो.. हो जाईन मी… तेवढी हिम्मत तरी अजून बाकी आहे माझ्यात… “
……......
त्या दिवशीच डॉक्टरांच बोलणं… म्हणे मी ‘lucky ‘..की मला माँ सारखी आई मिळाली.. तिच्या साथीने… हूं… तिची साथ..कोणतं luck….कुठली साथ.. सगळे फक्त शब्द..पोकळ शब्द.. अर्थहीन..भावहीन..बोलण्यापुरते उरलेले..हे कळलं तेव्हा पाहिले दोन दिवस माँच आपल्याला धीर देत होती. तिलाही तेवढाच धक्का बसला होता. पण तरीही ती आपल्याला सावरत होती. किती रात्री आपण तिच्या कुशीत रडत जागून काढल्या. आपण काही ऐकायलाच तयार नव्हतो. तरीही ती समजावत राहिली की नंदू धीर धर… यातून ही काही मार्ग सापडेल…बळेच दोन घास भरवायची…
पण त्यानंतर ‘नंदू’ च परत ‘नंदिनी’ कधी झालं कळलंच नाही. ते तसं का झालंय हे तर अजून नीटसं कळलं नाहीए…पुढच्या दोन-तीन दिवसात तर माँ वीस वर्षांनी दूर गेल्यासारखी वाटली.
आणि जीजीच काय.. तिची तर गोष्टच नको…!
काय काय आठवायचं आणि काय काय विसरायचं..!
आभाळच फाटलंय इथे… कुठे कुठे शिवायचं त्याला….?
त्या दिवशीचा तो प्रसंग.. !...आपण काही कामासाठी हॉल मध्ये जाणार तोच, माँ आणि जीजीच बोलणं ऐकून आपले पाय थबकले होते….जीजी…माँला विचारत होती….
“अगं माँ.. पण झालंय काय एवढी चिडचिड करायला…?”….
“काय व्हायचं बाकी राहिलंय?.. जे काही व्हायचंय ते तर होऊन गेलंय… आणि आता यापुढे काही घडलं तरी ते याच्या पेक्षा भयंकर नसणार. पण मला एक कळत नाही, की ही गोष्ट बाहेर गेलीच कशी..? तुला माहितेय आयुष्यात आज पहिल्यांदा कोणासमोर तरी रडावं लागतंय मला… शी.. हे असं काहीतरी मी करतेय, मला विश्वास बसत नाहीये..जे लोक माझ्या मैफिलींसाठी माझ्या तारखा मिळाव्यात म्हणून दोन-दोन महिने आधीपासून फोनाफ़ोनी करायचे त्याच लोकांकडून आज मला प्रोग्रामस मागावे लागताहेत….तेसुद्धा त्यांच्या मिनातवाऱ्याकरून.. “
“आज हे लोक असं वागताहेत.. उद्या विध्यार्थी काही वेगळं वागणार नाहीत. त्यांच्याही कानावर गेलंच असणार सगळं… अशाने माझं गाणं… माझं करियर… माझी प्रतिष्ठा.. सगळ्याचा बट्ट्याबोळ होईल.लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील ती वेगळीच… काय काय वाढून ठेवलंय पुढे कोणाला माहित??... तरी बरं मीडिया ह्या गोष्टीपासून दूर आहे ते.. पुण्याला ही मी अजून काही कळवले नाहीए… “
“हो… माँ.. एवढ्यात कळवायची गरज नाहीए…”
“अगं पण जीजी.. किती दिवस आणि किती लोकांपासून आपण ही गोष्ट लपवणार आहोत?... “
“ते सारं ठीक आहे माँ.. तरी मला सांग कोणाकोणाला काय-काय स्पष्टीकरण देणार आहोत आपण?.. कोण कितपत विश्वास ठेवणार आहे आपल्यावर…?”
“हो. पटतंय मला… बरोबर आहे तुझं..मला ही ह्या सगळ्याचा आता मनस्ताप झालाय. इथे तर आयुष्यचं एक प्रश्न होऊन बसलंय…तिचं ही आणि आपलं ही !!...आताच एवढे प्रॉब्लेमस येताहेत… पुढे जगाला कळल्यावर तर बघायला नको… “
“जीजी… कधी कधी तर मला अजून एक भीती वाटते की.. पुढे-मागे काही छोटंसं निमित्त व्हायचं आणि आपल्याला सुद्धा हा रोग…. कदाचित.. फार वेडगळ कल्पना असेलं ही.. पण तरीही विचारच करवत नाही. …पोटात गोळा येतो.. मरायचं तर सगळ्यांनाचं आहे जीजी.. पण हे असं मरण नको… कधीच नको… कुणालाच नको.. “
“ते तर आहे माँ.. परंतु आपण ज्या समाजात राहतो, त्याला सोडून नाही जगता येत. कुठेतरी आपल्याला लोकांची सवय म्हण की गरज म्हण असतेच.. मी खुप विचार केला माँ …एकासाठी सर्वांना सोडणं बरोबर नाही वाटत.. तेही अशा एकासाठी ज्याच्या स्वतःच्या आयुष्याची काही शाश्वती नाहीए.. “
“जीजी.. मलाही आताशा पटायला लागलंय हे सर्व ..या प्रसंगात आपण थोडा व्यवहारी निर्णय घेतला तर पुन्हा सगळं पूर्ववत होऊ शकतं.. परंतु अर्थात नंदिनीला वगळूनच !..एक आई म्हणून मी कुठे चुकत तर नाहीए ना जीजी..????? माझ्या नंदूला मी दूर ठेवायचा विचार करते आहे. ती कशी राहील गं माझ्याशिवाय?.. कोण काळजी घेईल गं माझ्या मुलीची??... मनात नुसतं वादळ उठलंय… परत सगळं शांत होऊन किनारा दिसायची वाट बघतंय… दिसेल ना तो किनारा मला…??? सांग ना जीजी..??
पण काय करू गं.. एका आईशिवाय मी बाकीही कुणीतरी आहेच ना.. माझंही असं काही अस्तित्व आहे.. इतक्या वर्षांची ही सारी तपश्चर्या… हे सारं उभारलेलं.. असं एका क्षणात कसं उधळवून लावू…?... मी खुप हेल्पलेस झालेय गं… खुप कोंडी होतेय माझी… जीव गुदमरतोय… खुप त्रास होतोय… अगं दुसरं काही असतं ना अगदी जन्मभरच अपंगत्व… किंवा मतिमंदत्व… तरी ही कदाचित मी ते स्वीकारलं असतं.. पण हे असलं काही स्वीकारायला माझ्यातली आई सुद्धा कमी पडतेय…
ह्या बाबतीत एका गायिकेवर… एक आई कदाचित नाही मात करू शकली…”
कानात शिसाचा रस ओतल्यासारखा होता तो संवाद…. नंतर तो विषय तिथेचं थांबला.. जसं की आपलं आयुष्य थांबलय..
माँ आणि जिजीचा हा एक नवीनच चेहरा आपण बघत होतो..
परिस्थिती माणसाला बदलवू शकते आणि माणूस बदलतोही… पण इतका की आपलं माणूस आपलं राहत नाही…
एका सुंदर चित्रावर कुणीतरी पाणी सांडतं… मग त्याचा नूरच पालटतो.. तोही असा की त्यातल्या रेषा पुसट होतात.. रंग भेसूर बनतात….
माँ आणि जीजी उठून निघूनही गेल्या.. तेही आपल्याला कळलं ते आपल्या हातातून सेल गळून पडल्यावर… पण त्याचा आवाज आपल्या तुटलेल्या स्वनांपेक्षा.. आपल्या मोडकळलेल्या आयुष्यापेक्षा नक्कीच मोठा नव्हता….
त्याच्यानंतर बोलण्यासारखे काही उरलेच नाही… सगळे विषयच जसे संपले होते…. पुढे मग असच काही ना काही घडत गेलं.. आधी नाश्ता मग जेवण खोलीत येतं गेलं..खाली जाणं व्हायचच नाही.. कळत नकळत जाणवत गेलं की आपण या घरात कोणाला नको आहोत ते.. आपली गरज संपलीये आता… आपल्या शिवाय कोणाचं काय अडणार आहे. परवाच नाही का जीजी माँ ला म्हणत होती, की नंदिनी बाबत काहीतरी विचार करायला लागेल… माँ च्या त्या अनाथ विद्यार्थिनीला घरी आणायचं म्हणत होती ती… म्हणे तिची ही सोय होईल आणि आपलीही… पुढचं काहीच ऐकू गेलं नाही…. ही च जीजी जिने ‘पहिली नातं’ म्हणून आपलं कोण कौतुक केलं होतं …कोण म्हणतं नातवंड आजीला दुधावरच्या सायीसारखी असतात… आजी-आजोबा होण्यासारखं सुखं नाहीए या जगात… खोटं आहे हे सर्व…. पण जीजीचा तरी यात काय दोष.. जिथे माँ.. आपली सख्खी आई कचरतेय आपला हात धरताना.. तिथे जीजीचं काय??? ती तर आजी आहे आपली…
एका गोष्टीमुळे सारेच संदर्भ बदलतात ना !!…. आज घरात आपण परके झालो आहोत…. आपलं ही काही वेगळ नाहीए.. आपल्याला सुद्धा सारे अनोळखी वाटायला लागले आहेत …
घुसमट वाढायला लागली आहे… संपवावंसं वाटतं हे सगळं… कुठेतरी याचा शेवट व्ह्यालाच पाहिजे…
नात्यात प्रेमाचा ओलावा असतो तेव्हाच ती बहरतात…. पण जेव्हा तो निघून जातो… तेव्हा ती रुक्ष होतात…. मग आयुष्य वैराण वाळवंटासारखं बनतं… दूरदूर क्षितिजापर्यंत ओसाड भासणारं… उरून उरतो एकच भकासपणा… त्याचा अंत केव्हा काय माहित…???
आजकाल तर माँ ने बोलणंच टाकलंय ….काही विचारायला जावं तर म्हणते..कारण काही असो शेवट तर एकच होणार आहे… जुनं उगाळल्याने आता काही साध्य होणार नाही… मग कशाला काही बोला… मला हेच योग्य वाटतं…
तू नेहमीच योग्य असतेस माँ…
तुझं यशस्वी आयुष्य याची साक्ष देतं ना… खरंच माँ काय चुकीचं म्हणाली…नवऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर ही मला जन्म देणारी… मला एकहाती वाढवणारी ….मला गाणांच्या दुनियेत घेऊन जाणारी… माझी मैत्रीण… माझा आधार… माझं सर्वस्व असणारी माझी माँ नाही चुकू शकत…
मग कोण चुकलं…??
आपल्या कलेला… आपल्या गाण्याला सोडू न शकणारी एक गायिका चूक ठरली… की आपल्या प्रतिष्ठेला महत्व देणारी एक प्रसिद्ध व्यक्ती चुकली…. की मग लोकापवादाला घाबरलेली एक सर्वसाधारण बाई चुकीचं वागली….
पण माँ तिच्या जागी बरोबर आहे… खरंच माँ ज्याने काही साध्य होणार नाही ते उगाळण्यात काय अर्थ आहे…. !!
पण मग माझा दोष काय???...
हाच की मी जीजीचं न ऐकता त्यादिवशी एकटी कार घेऊन गेले… की मग दोष त्या ट्रक ड्राईव्हरचा.. जो बरोबरीने जबाबदार होता या ऍक्सीडेन्ट मध्ये… की दोष त्या हॉस्पिटलचा, तिथल्या सुविधांचा.. ज्यांची बळी ठरले मी… आणि अशी कितीतरी माणसं… मग खरंच दोष कुणाचा..???? कोण उरलं आता..??
हां.. ती वेळ…होत्याच नव्हतं करून टाकणारी ती वेळ… !...जिने माझं आयुष्य मुळापासून उखडून टाकलं…. त्या वेळेचा तरी दोष आहे का..?..?..
शेवटी जुनं उगाळण्यात काय अर्थ आहे..??
पण माँ नाही चुकू शकत…. अनेकांची गुरु… आपल्या मैफिलींना तुफान गर्दी खेचणारी… शासनाने गौरवलेली… एक विख्यात श्रीमंत गायिका… किती चपखलपणे बसते माँ या चित्रात…. पण याच्या जोडीला ‘ एका रोगट मुलीची आई.. ‘….तेही एक भयानक रोग झालेल्या मुलीची… हे फारचं विचित्र वाटतं…. !
हो बरोबरचं केलं तिने.. जे या रोगट मुलीच्या आईला कायमचं संपवून टाकलं… माँ नाही चुकली…. नाही चुकली ती….
नंदिनीने डोळे मिटले…. तिला लहानपणी कुठेतरी वाचलेली गोष्ट आठवली…
त्या गोष्टीतली ती माकडीण.. पिल्लांबरोबर पाण्यात अडकलेली…. जेव्हा पाण्याची पातळी वाढते आणि पाणी गळ्यापर्यंत पोहोचते.. तेव्हा स्वतःच्या पिल्लाला पाण्यात तसेच सोडून, त्याच्यावर पाय ठेवून आपण बाहेर येते…. तसे पाहिले तर ती पिल्लाला बाहेर काढायचा प्रयन्त करतेही… पण जेव्हा गळ्याशी येतं… तेव्हा प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो..
आपण असतो माँच्या जागी तर केलं असतं तिला एकसेप्ट..??? कदाचित हो…. कदाचित नाही…!!
शीण आलाय या विचारांचा आता…माँने तर तिचा निर्णय घेतलाय…. आता वेळ आपली आहे… पण निर्णय तर आपण कधीचाच घेतलाय.. फक्त तो प्रत्यक्षात यायचा बाकी आहे….
हो… खूप दूर जायचंय या सर्वांपासून… माँ.. जीजी… इथले लोक… ते मंतरलेले दिवस… सगळंच संपलं… सगळंच इथे सोडून जायचंय…. एका नव्या देशात.. नव्या विश्वात… नवं जग.. नवी माणसं…. नवं आयुष्य…
आणि विशाल… हो… किती सहज आला तो आपल्या मदतीला धावून … मागचं सगळं विसरून…. माँ आणि जीजीने केलेला अपमान बाजूला ठेवून…. याही वेळेस त्याने आपल्याला समजावून घेतलं….सगळ्या arrangements केल्या….नशीब काही सगळंचं नेत नाही एख्याद्याकडून …. काहीतरी मोठ्ठसं देऊनही जात….
आपण ही माँ सारखंच करायचं… नाही सोडायचं गाणं…. जाता जाता ही खुप मोठा प्रॉब्लेम सोडवलास गं तू माँ…. तू नाहीस आता माझ्या आयुष्यात याचं दुःख मानू? की शेवटच्या क्षणी जिथे सगळे रस्ते बंद झालेले तिथे अप्रत्यक्षपणे का होईना मला मार्ग दाखवलास याचा आनंद मानू…. ! थँक्स माँ ..थँक यू व्हेरी मच !!..
मी ही माझ्यातल्या गायिकेला नाही मरू देणार…. आता यानंतर गाणं हेच आपलं आयुष्य… ! यापुढे मागे वळून बघायच नाही…. आणि इथे उरलंय कोण आपलं …त्या दोघीनी तर कधीच त्यांच्या आयुष्यातून काढून टाकलंय आपल्याला… आज सुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना सांगायला गेले… एक वेडी आशा होती.. त्या ‘थांब’ म्हणतील अशी…. पण ‘काळजी घे’ आणि ‘फोन कर’ असं उपचारापुरतं बोलल्या जरूर !!!..
किती कोरडे वाटतात हे शब्द या क्षणाला… !
एक दिखावा उरलाय आपल्यात.. एक प्रकारचं अवघडलेपण आलंय…
चलो…. आता निघायला हवं… आज आधी सामान विशालच्या घरी शिफ्ट करायचं आहे….
एक मैफल.. एक रियाज… अर्धवट सोडून दुसरं नवं गाणं सुरु करायचं आहे…. !!!
ही भैरवी इथेच संपली… आता पुन्हा मारवा गायचाय… !
दूर कुठेतरी छेडलेल्या सतारीचे सूर तिच्या कानात गुंजले…. आणि तिच्या गाडीने वेग घेतला अगदी पूर्वीसारखाच…. !!!!
……..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कथा.
पण खरंतर एचआयव्हीबद्दल पूर्वी इतके गैरसमज राहिले नाहीत. रक्तातून ट्रान्सफर झाल्याने मुलीचा काही दोष नाही. त्यामुळे माँची भूमिका नाही पटली. आई व आजीने तिच्या मागे भक्कम उभं राहायला हवं होतं असं वाटून गेलं.

कथेसाठी उत्तम विषय निवडलाय.. सरकारने जनजागृतीचा वापर HIV बद्दल लोकांची मानसिकता हळुहळु बदलण्यात यश मिळविले असले तरी माँ-जीजीच्या कॅटेगिरीत मोडणारे काही टक्के लोक आजही बघायला मिळतात.. होप येत्या काळात ती परिस्थिती बदलेल..
महत्वाचं म्हणजे कथानायिका रडत न बसता शेवटी यातुन बाहेर पडलेली दाखवलीत.. यासाठी तुमचं कौतुक वाटल..
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत! शुभेच्छा! Happy

छान लिहिलंय. सुरेख एकदम.
काही गोष्टी खटकल्या. राग मानू नका.
१. बऱ्याचदा कोण बोलतंय याचा गोंधळ उडतोय. मला काही परिच्छेद दोन तीनदा वाचावे लागले. ते थोडस ओघवतं करता येईल.
२. एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाताना ते रूपांतरण अवघडलेलं वाटतंय.
३. शेवटचे काही परिच्छेद अगदी पटापट उरकल्यासारखे वाटले. ते खुलवता आले असते.

Thank you... Happy @रुपाली, @चैत्रगंधा - एक वेगळा प्रयन्त करून पहिला माँ ला नेगेटिव्ह दाखवून
Thank you @मन्या @अजय @अज्ञातवासी - तुमचे suggestions लक्षात राहतील Happy