माळावरचा गुलमोहर मोहरला आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 May, 2020 - 06:09

शहरामधली वर्दळ पाहुन भुलला आहे
माळावरचा गुलमोहर धुसफुसला आहे

निळे-सावळे अंबर हाका मारत बसते
जमिनीमध्ये खोल-खोलवर जीवन धसते
मनस्थितीचा लंबकही गडबडला आहे
माळावरचा गुलमोहर धुसफुसला आहे

कधी विहरतो कधी धरेवर दाणा टिपतो
स्वच्छंदी पक्षांना पाहुन मनात झुरतो
स्वैर मुक्तसा वारा अंगी भिनला आहे
माळावरचा गुलमोहर धुसफुसला आहे

जमिनीवरती बागडणारा मनुष्य बघतो
उभ्या-उभ्याने मनात दिवसा- रात्री कुढतो
भटकंतीच्या ज्वरामधे फणफणला आहे
माळावरचा गुलमोहर धुसफुसला आहे

वादळ आले पक्षी सारे गायब झाले
मनुष्य प्राणी पुरात मेले, वाहुन गेले
परिस्थितीचे चटके सोसत तगला आहे
माळावरती गुलमोहर मोहरला आहे

शहरामधली वर्दळ पाहुन हसला आहे
माळावरचा गुलमोहर मोहोरला आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त