असाही एक लॉक डाऊन

Submitted by nimita on 30 May, 2020 - 05:43

भल्या पहाटे कोंबड्याच्या आरवण्यानी दुर्गाची झोप चाळवली. तिनी हळूच डोळे किलकिले करून खिडकीच्या दिशेनी बघितलं. बाहेर अजून बऱ्यापैकी अंधारच होता. तिनी अजून थोडा वेळ झोपायचं ठरवलं आणि पुन्हा स्वतःला पांघरुणात गुरफटून घेतलं. 'आत्ता मिळतंय झोपायला तर झोपून घे.' दुर्गा स्वतःलाच म्हणाली. पण रोजची लवकर उठायची सवय ...त्यामुळे परत काही झोप लागेना ! उगीच लोळत पडण्यात अर्थ नाही- असा विचार करत शेवटी ती उठलीच. सवयीनुसार हाताबरोबर अंथरूण- पांघरूण आवरून ठेवलं आणि ती स्वैपाकघरात शिरली. आज किती छान वाटत होतं...पहाटेची ही शांत वेळ दुर्गाला नेहेमीच आवडायची. हवेत एक हवाहवासा वाटणारा हलकासा गारवा असायचा. रात्रभर दरवळणारी रातराणी आपला सुगंधाचा वसा उमलत्या प्राजक्ताला सोपवून निरोप घेत असायची. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकत रहावासा वाटायचा.
पण रोजच्या कामाच्या धबडग्यात या सगळ्या सुखद अनुभवांकडे लक्ष द्यायलाही फुरसत नसायची दुर्गाला... पहाटेपासून जी कामांना जुंपली जायची ती थेट रात्रीपर्यंत ! तसं पाहता घरात इन-मिन तीन माणसं... दुर्गा आणि तिचे सासू सासरे...मंगलाताई आणि वसंतराव ! पण तरीही दुर्गाच्या मागची कामं काही संपायची नाहीत. म्हणजे..तिची सासू ती कधी संपूच द्यायची नाही. एक काम झालं की पुढचं हजर! जणू काही तिला एक बिनपगारी नोकरच मिळाली होती दुर्गाच्या रुपात.
आणि दुर्गाही निमूटपणे सगळं काही सहन करायची. तिचं नाव जरी दुर्गा असलं तरी स्वभावानी ती अगदी गरीब गाय होती... अगदी 'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' अशी गत होती. त्यात तिच्या बाजूनी बोलणारे, तिला पाठिंबा देणारे कोणीच नव्हते तिच्या आयुष्यात! जोपर्यंत जगदीश- तिचा नवरा होता तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण वर्षभरापूर्वी शहरातून त्यांच्या गावी परत येताना त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्याचा बळी गेला.
दुर्गाचं पूर्ण विश्वच कोसळलं होतं तेव्हा. आता या जगात तिचं हक्काचं म्हणता येईल असं कुणीच उरलं नव्हतं. आणि त्याला कारणही तसंच होतं. जगदीश आणि दुर्गानी प्रेमविवाह केला होता आणि तोही आंतरजातीय! दुर्गाच्या आई वडिलांनी तर तेव्हाच तिच्याबरोबरचे त्यांचे सगळे संबंध तोडून टाकले होते. एका गावात असूनही लग्न झाल्यापासून तिचं तोंडही नव्हतं बघितलं त्यांनी...अगदी जगदीशच्या मृत्यू नंतर सुद्धा! जगदीशच्या आई वडिलांना सुद्धा हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. पण जेव्हा जगदीशनी घर सोडून जायची धमकी दिली तेव्हा केवळ आपल्या मुलाच्या प्रेमापोटी त्याचे आई वडील तयार झाले होते. कारण त्यांचा मोठा मुलगा आधीच गावाला रामराम ठोकून कायमचा शहरात राहायला गेला होता.
जेव्हा जगदीश हे जग सोडून गेला तेव्हा खरं म्हणजे त्याच्या आईला वाटलं होतं की दुर्गालाही आता घराबाहेर काढावं. पण लोकलाजेस्तव त्यांनी ते धाडस केलं नव्हतं. गावात त्यांचं प्रस्थ मोठं होतं. खूप प्रतिष्ठित कुटुंब होतं त्यांचं ... आणि तेवढंच सुखवस्तू !त्यामुळे जर दुर्गाला घराबाहेर काढलं तर आपल्या प्रतिमेला डाग लागेल, आपली नाचक्की होईल या भीतीनी तिच्या सासूनी तिला आश्रय दिला होता...पण आपल्या मनातला राग दुर्गापासून कधी लपवूनही नव्हता ठेवला त्यांनी. पुढच्या काही दिवसांत दुर्गाची रवानगी देवघरा शेजारच्या छोट्याशा खोलीत झाली. तिच्या सासूनी जणू काही तिला तिची जागा दाखवून दिली होती. "या घरात राहायचं असेल तर मुकाट्यानी पडेल ते काम करावं लागेल," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी दुर्गाला सुनावलं होतं.
आणि त्यांचं सगळं म्हणणं निमूटपणे ऐकून घेण्याशिवाय दुर्गाकडेही दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पण कालपासून दुर्गा जरा मोकळा श्वास घेऊ शकत होती....तिचे सासू सासरे शहरातल्या त्यांच्या मोठ्या मुलाकडे- सतीशकडे गेले होते - प्रयोजन होतं- त्याच्या नव्या घराची वास्तुशांती पूजा! गुढी पाडव्याचा मुहूर्त होता*. पूजेनंतर पाच सहा दिवस तिथेच राहून मग दोघं पुन्हा गावी येणार होते....अर्थातच जरी घरचंच कार्य असलं तरी दुर्गाला बरोबर घेऊन जायचा प्रश्नच नव्हता....आणि खरं तर तिलाही नव्हतंच जायचं ! थोडे दिवस का होईना पण तिला स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगायला मिळणार होतं.. आणि ही संधी तिला अजिबात गमवायची नव्हती.... म्हणूनच आज सकाळी नेहेमीची सगळी कामं बाजूला ठेवून ती आधी स्वैपाकघरात गेली. मस्तपैकी तिच्या आवडीचा चांगला कपभर चहा करून घेतला... दुधाळ, आलं घातलेला....चहाचा कप घेऊन ती मागच्या अंगणात गेली. तिनी अंगणात सगळीकडे एक दृष्टी टाकली...कुंपणाला लागून आंबा, जांभूळ, लिंबू, आवळा अशी डेरेदार झाडं होती. तिच्या सासऱ्यांनी कधी काळी लावलेली; पण आता फळं आणि सावली देणारी ! अंगणाच्या मधोमध पारिजातक बहरला होता. आणि त्याला लपेटून एक नागवेल वर चढली होती.... ही नागवेल सुद्धा तिच्या सासऱ्यांनी मुद्दाम लावली होती....त्यांना रोज विडा करायला घरचीच पानं मिळावी म्हणून! त्या पारिजातकाखाली बसायला म्हणून जगदीशनी हौसेनी एक छोटासा पार बनवून घेतला होता. त्याची सगळ्यात आवडती जागा होती ती. दुर्गा त्या पारावर जाऊन बसली. उगवत्या सूर्याची किरणं जणू हळुवारपणे झाडावरचं एक एक फूल खुडून तिच्या पायांशी टाकत होती. त्या फुलांच्या सुगंधाच्या लाटांवर स्वार होत दुर्गा भूतकाळात जाऊन पोचली. जगदीशला खूप आवडायची ही फुलं... आणि म्हणूनच रोज पहाटे तो उठायच्या आधी दुर्गा मागच्या अंगणात जाऊन परडीभरून फुलं गोळा करायची आणि त्यांच्या खोलीत आणून ठेवायची. त्या फुलांच्या सुवासानी त्या दोघांचा पूर्ण दिवस गंधाळून जायचा.... त्या सगळ्या आठवणी मनात दाटून आल्या आणि दुर्गाच्याही नकळत तिच्या गालांवर अश्रू ओघळले....बघता बघता तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या सरींवर सरी कोसळायला लागल्या... आणि दुर्गाला जाणवलं - 'खरंच,गेल्या वर्षभरात मी असं मोकळेपणी रडूही नाही शकले !' थोड्या वेळानी मनातलं दुःखाचं मळभ दूर झालं आणि दुर्गाला हलकं हलकं वाटायला लागलं. ती केशरदांड्याची पांढरी फुलं आपल्या पदरात गोळा करून दुर्गा घरात गेली. तिच्या खोलीतल्या जगदीशच्या फोटोला त्या फुलांचा हार घालताना तिच्या मनात एक विचार आला आणि बघता बघता त्या विचारानी मूळ धरलं...'आता हे पुढचे चार पाच दिवस फक्त माझे आणि जगदीशचे ! या काही दिवसांत मी माझं सगळं आयुष्य जगून घेणार आहे...मी आणि जगदीशनी मिळून बघितलेली स्वप्नं पुन्हा बघणार आहे... आमच्यातले ते सुखाचे क्षण पुन्हा अनुभवणार आहे.... ही अशी संधी पुन्हा मिळेल की नाही काही खात्री नाही.... ' या नुसत्या कल्पनेनीच दुर्गा सुखावली. अचानक एक वेगळाच उत्साह संचारला तिच्या तना-मनात!
ती उठून स्वैपाकघरात गेली. पुन्हा एकदा मस्तपैकी चहा केला ... यावेळी जगदीशला आवडायचा तसा - पूर्ण दुधाचा आणि जास्त साखर घातलेला! आणि जोडीला खारी बिस्किटं!! पण जगदीश गेल्यापासून सासूनी कधी खारी बिस्किटं आणलीच नाही. चहाचा कप घेऊन ती घराबाहेरच्या ओसरीत आली आणि तिथल्या मोठ्या शिसवी झोपाळ्यावर हलकेच विसावली. एकीकडे पायानी हळूहळू झोका घेत तिनी आपला चहाचा कप तोंडाला लावला. सुट्टीच्या दिवशी जगदीश दिवसभर या झोपाळ्यावर बसलेला असायचा. खूप आवडायचं त्याला असं हलके हलके झोके घेणं! त्याच्या आठवणींच्या झोक्यावर झुलत बराच वेळ दुर्गा तिथेच बसून होती.
थोड्या वेळानी गोठ्यातल्या गायीच्या हंबरण्यानी ती एकदम भानावर आली. तिनी दचकून बघितलं...उन्हं हळूहळू अंगणात उतरत होती. "अगबाई ! गंगीला चारा घालायची वेळ झाली वाटतं." अंगणातल्या हातपंपा जवळ चहाचा कप ठेवून दुर्गा लगबगीनी गोठ्याकडे गेली. गोठ्यातल्या गायीला आधी नमस्कार करून तिनी तिच्या पुढ्यात चाऱ्याची पेंड टाकली आणि घरातून दुधाची चरवी घेऊन आली. आज दूध काढायला जरा उशीरच झाला होता. "गंगे, आत्ता जर सासूबाई असत्या ना तर माझं काही खरं नव्हतं. या एका चुकीमुळे माझ्या चाळीस पिढ्यांचा उद्धार झाला असता ." गंगाच्या पाठीवरून हात फिरवत दुर्गा खिन्नपणे म्हणाली. त्या मुक्या जनावराला सुद्धा तिच्या मनाची अवस्था कळली असावी. आपली मान वळवून तिनी दुर्गाचा हात चाटायला सुरुवात केली.... जणू काही ती तिच्या परीनी सांत्वन करत होती !
गोठ्याची सफाई करून गंगी ला चारा पाणी ठेवून दुर्गा घरात जायला निघाली. अचानक बाहेरच्या अंगणात तिचं लक्ष गेलं...."अगं बाई ! आज तुळशीसमोर रांगोळी काढलीच नाही..." पुन्हा एकदा तिच्या सासूचा खाष्ट चेहेरा तिच्या डोळ्यांसमोर आला. रोज सकाळी अंगणातल्या तुळशीसमोर रांगोळी काढल्याशिवाय चूल पेटवायची नाही- असा दंडकच होता त्यांचा...आणि त्यांनी स्वतः देखील वर्षानुवर्षे अगदी नेमानी पाळला होता तो! 'पण आज तर आपली ही चूक बघायला इथे कोणीच नाहीये...' दुर्गाच्या मनात आलं...का कोण जाणे - पण आज प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम सासूच्या इच्छेविरुद्ध करायची इच्छा होत होती. मग भलेही त्यामागे काही सबळ कारण असो वा नसो.... पण 'आपण आपल्या मर्जीनी, आपल्याला हवं तेव्हा हवं ते करू शकतो' ही कल्पनाच मुळात खूप रोमांचकारी होती. त्या नुसत्या कल्पनेनीच दुर्गाच्या चेहेऱ्यावर एक मिश्किल हसू फुटलं.... तिच्यातली बंडखोर दुर्गा आज कधी नव्हे ती डोकं वर काढत होती.
एकीकडे घरातली सगळी कामं करत असताना दुर्गाचं मन मात्र कुठे कुठे भटकून येत होतं. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. दुर्गाच्या मोठ्या दिराच्या नव्या घराची वास्तुशांती होणार होती. दुर्गा फोटोतल्या जगदीशला म्हणाली, "कसं असेल हो त्यांचं नवं घर? खूप मोठं आहे म्हणे ! आणि खूप सुंदर पण आहे... संगमरवरी फरशी, मोठ्या मोठ्या खोल्या... त्यांचं न्हाणीघर तर म्हणे इथल्या माझ्या या खोलीपेक्षा सुद्धा मोठं आहे. त्या दिवशी सासूबाई अगदी कौतुकानी सांगत होत्या शेजारच्या लक्ष्मी वहिनींना...मी फक्त दोनदाच भेटलीये भाऊजी आणि जाउबाईंना - एकदा आपल्या लग्नाच्या वेळी आणि दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही...." दुर्गा बोलता बोलता मधेच थांबली; तिच्या डोळ्यांतून काही अश्रू गालांवर ओघळले. आपल्या नवऱ्याचं असं अकाली या जगातून निघून जाणं .... आज वर्ष होऊन गेलं तरी रोज निदान एकदा तरी तिला तो काळा दिवस आठवायचा आणि तिचं मन अजूनच कोमेजून जायचं.
हातातलं काम तसंच सोडून तिनी कपाटातून एक अल्बम काढला - त्यात तिचे आणि जगदीशचे फोटो होते. काही लग्नाआधीच्या त्या चोरट्या भेटींमधे काढलेले तर काही लग्नानंतरचे !!एकदा काही कामासाठी शहरात गेला असताना- मोबाईल मधे काढलेल्या त्या फोटोंचे मुद्दाम प्रिंट्स काढून आणले होते जगदीशनी . तो म्हणायचा,"फोटो असे हातात धरून बघितले की जे समाधान मिळतं ना ते त्या मोबाईल मधल्या फोटोत नाही मिळत." कितीतरी वेळ दुर्गा त्या फोटोंमधून दिसणारा तिचा भूतकाळ पुन्हा जगत राहिली.
घराच्या अंगणात कोणाचा तरी आवाज ऐकू आला आणि ती भानावर आली. पदराच्या टोकानी आपले डोळे टिपत बाहेर आली. शेजारच्या लक्ष्मी वहिनी आल्या होत्या. दुर्गाचा एकंदर अवतार बघून म्हणाल्या," काय गं? तब्येत बरी आहे ना तुझी? अशी कोमेजलेली का दिसतीयेस? आणि अजून सडा रांगोळी पण नाही केलीस रोजच्या सारखी... म्हणून विचारलं हो!" वहिनींच्या प्रश्नावर ओशाळलेल्या स्वरात दुर्गा म्हणाली," नाही, तसं काही नाही. फक्त डोकं दुखतंय जरा. तुम्ही या ना आत...चहा टाकते." त्यावर तिला थांबवत त्या म्हणाल्या," अगं, चहा वगैरे सगळं नंतर...आधी मी काय म्हणतीये ते ऐक... मगाशी मी भाजी घ्यायला गेले होते ना मंडईत, तेव्हा त्या खालच्या आळीतला तो दिवाकर सांगत होता ... म्हणाला - कालपासून वाण्याच्या दुकानात सामान घ्यायला खूप गर्दी झालीये म्हणे! तो परवा 'जनता कर्फ्यु' का काय तो झाला होता ना; त्यामुळे घाबरून जाऊन आता सगळे जण जास्त सामान घेऊन ठेवतायत.... येणाऱ्या दिवसांत काय होईल काही सांगता येत नाही बाई.... म्हणून मी पण निघालीये तिकडेच. म्हटलं तुला ही सांगावं सगळं. तुझे सासू सासरे नाहीयेत ना सध्या इथे! तू पण ये वाटलं तर माझ्या बरोबर ." एका दमात सगळं बोलल्यामुळे लक्ष्मीला थोडा दम लागला. तिथल्या झोपाळ्यावर टेकत तिनी उत्तराच्या अपेक्षेनी दुर्गाकडे बघितलं. ही नवीन घडामोड ऐकून दुर्गा क्षणभर गोंधळली. पण मग तिनी मनातल्या मनात एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला आणि ती म्हणाली," येते मी तुमच्या बरोबर; पण मला काही सामान वगैरे नकोय. मागच्याच आठवड्यात आम्ही वर्षभराची धान्यं भरून ठेवली ना !"
हे सांगताना दुर्गाला त्या दिवसांतली तिची झालेली धावपळ आणि दमणूक आठवली. तिची सासू दरवर्षीच उन्हाळ्यात सगळं धान्य भरून ठेवायची...पण या वर्षी शहरात मुलाकडे जायचं ठरलं होतं म्हणून त्यांनी जायच्या आधीच सगळं मागवून घेतलं होतं....अगदी गहू, तांदूळ पासून ते डाळी कडधान्यापर्यंत सगळं ! एवढंच नाही तर पापड लोणची वगैरेची सुद्धा बेगमी करून ठेवलेली असायची घरात. त्यांच्या एका मैत्रिणीचा पापड आणि लोणच्याचा छोटासा गृहोद्योग होता ... तिला मदत होईल या भावनेनी त्या पूर्ण वर्षभराचा साठा करून ठेवायच्या.
या वर्षी सुद्धा त्यांनी दुर्गाला हाताशी धरून सगळं धान्य भरून घेतलं होतं. त्या सगळ्याला ऊन दाखवणं, निवडून डब्यांमधे भरून ठेवणं - या सगळ्या उस्तवारीत दुर्गाच्या कमरेचा काटा मात्र ढिला झाला होता. पण सासू पुढे काही बोलायची हिम्मत कुठे होती तिच्यात! आत्ता सुद्धा ते सगळं आठवून तिला धडकी भरली.
लक्ष्मीच्या पुढच्या प्रश्नानी ती भानावर आली. "ते ठीक आहे गं, पण भाजीपाला वगैरे तर लागेलच ना घ्यायला ?" आणि प्रश्न विचारतानाच तिच्या एकदम लक्षात आलं..." तुझी मागची बाग आहेच म्हणा ! त्यामुळे तुम्हांला त्याची पण जास्त काळजी नाही." 'दुर्गाची परसदारची बाग हा त्यांच्या ओळखीच्या लोकांत अगदी चर्चेचा विषय असायचा नेहेमी. तिला पहिल्यापासूनच बागकामाची आवड होती. त्यामुळे जेव्हा सासरी घराच्या पुढे मागे मोकळं अंगण दिसलं तेव्हा ती खूप खुश झाली होती. जगदीशच्या मदतीनी तिनी मागच्या अंगणात एक भाज्यांची बाग फुलवली होती.....वांगी , भेंडी, टोमॅटो, मिरच्या वगैरेची झाडं त्याशिवाय भोपळा, घोसाळी, कारल्याचे वेल ही चढवले होते. जोडीला मेथी, कोथिंबीर, पालक पुदिना वगैरे पालेभाज्या पण होत्याच. या बाबतींत मात्र तिच्या सासू-सासऱ्यांना तिचं नेहेमी कौतुक वाटायचं....अर्थात, त्यांनी तसं कधी बोलून नाही दाखवलं; पण दुर्गाच्या मेहेनतीमुळे फुललेली ती बाग त्यांना खूप आवडायची. दर दिवसाआड घराच्या बागेतली ताजी भाजी ताटात वाढलेली असायची... त्यांनी जरी बोलून दाखवलं नाही तरी त्यांना तसं आवडीनी खाताना बघितलं की दुर्गाला तिची पोचपावती मिळायची.
लक्ष्मी च्या बोलण्यावर हसून मान हलवत दुर्गा म्हणाली," हो ना!आणि सध्या तर मी एकटीच आहे. पण तरीही मी येते तुमच्याबरोबर.आलेच मी पैसे घेऊन." दुर्गा घाईघाईत तिच्या खोलीत गेली आणि कपाटात तळाशी ठेवलेल्या बटव्यातून थोडे पैसे काढून घेतले. खरं तर तिचे सासरे जाताना तिला घरखर्चासाठी म्हणून पैसे देऊन गेले होते; पण त्यातले खर्च केले तर सासूबाईंना हिशोब द्यावा लागला असता... आणि तेच नको होतं दुर्गाला.
ती जेव्हा वाण्याच्या दुकानात पोचली तेव्हा खरंच तिथे लोकांची अगदी झुंबड उडाली होती. पण तिला फक्त एक दोनच वस्तू घ्यायच्या होत्या; त्यामुळे तिचं काम लवकर झालं. लक्ष्मी वहिनींचा निरोप घेऊन ती घरी आली. 'आज उठल्यापासून इतकी कामं केली तरी अजून अक्खा दिवस बाकी आहे...काय करू आता ?' दुर्गाला ती शाळेत असतानाचे दिवस आठवले. जसजशा सुट्ट्या जवळ यायच्या तसतसे तिचे कितीतरी प्लॅन्स सुरू व्हायचे.... सुट्टीत हे करीन, ते करीन !! पण जेव्हा खरंच सुट्ट्या सुरू व्हायच्या तेव्हा तिला काय करावं ते सुचायचंच नाही. आत्ता तिची अवस्था अगदी तशीच झाली होती. शेवटी तिनी ठरवलं की 'आज काहीच करायचं नाही. स्वैपाकाला पण सुट्टी... जेव्हा भूक लागेल तेव्हा बघू काय खायचं ते... आज दिवसभर नुसता टीव्ही बघायचा.... आणि ते सुद्धा आपल्याला हवे ते कार्यक्रम आणि हवं ते चॅनेल... 'ही इतकी छोटीशी कृती सुद्धा दुर्गा करता एक पर्वणीच होती.ती गोठ्यात चक्कर टाकून गंगेशी थोड्या गप्पा मारून , तिला खायला प्यायला देऊन आली आणि तिनी टीव्ही समोर बसकण मारली. कोणती तरी मराठी मालिका चालू होती. दुर्गाला या अशा मालिका आणि त्यातलं ते नाट्यमय वागणं कधीच आवडायचं नाही... तिला खरं म्हणजे बौद्धिक कार्यक्रम आवडायचे... बातम्या, चर्चा सत्र वगैरे ! पण एरवी कामाच्या रामरगाड्यात तिला वेळच नाही मिळायचा आणि जर कधी मिळालाच तर तेव्हा सासूबाईंच्या आवडीचेच कार्यक्रम बघायला लागायचे. त्यामुळे तिनी ठरवलं - आता पुढचे काही दिवस फक्त बातम्या बघायच्या.'
खूप उत्साहात तिनी टीव्ही चालू केला आणि बातम्यांचं चॅनेल लावलं.
दुर्गानी बातम्या लावल्या खऱ्या पण त्यात कोरोना आणि त्याबद्दल ची सविस्तर माहिती ऐकून ती चांगलीच काळजीत पडली. 'एवढं मोठं संकट आलंय मानवजातीवर... खूप जागरूक राहिलं पाहिजे आता यापुढे....खूप काळजीही घ्यायला हवी.' दुर्गा स्वतःलाच बजावत म्हणाली. "आज या बातम्या बघितल्या म्हणून हे सगळं कळलं तरी नाहीतर सासूबाईंच्या राज्यात तर त्या बिनडोक मालिकांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही." आता दुर्गा अगदी लक्ष देऊन टीव्ही बघायला लागली....कोरोना बद्दल अगदी सविस्तर माहिती सांगत होते... या रोगापासून बचाव होण्यासाठी काय करावं- काय करू नये....सगळं नीट लक्षात ठेवत होती ती. या सगळयात ती इतकी गुंग झाली की दुपार उलटून संध्याकाळ झाल्याचंही लक्षात नाही आलं तिच्या. गंगीच्या हंबरण्यानी तिला वेळेची जाणीव करून दिली. ती टीव्ही बंद करणार इतकयत त्या बातम्या देणाऱ्या माणसानी सांगितलं..' आज रात्री आठ वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करतील.' 'रात्री आठ वाजता नक्की पाहायला पाहिजे,' दुर्गानी मनाशी ठरवलं. आणि ती देवापुढे दिवा लावायला गेली. बाहेर गोठ्यात जाऊन गंगीला काय हवं नको ते बघितलं आणि दुर्गा पडवीतल्या झोपाळ्यावर टेकली. अचानक तिला भुकेची जाणीव झाली. टीव्ही बघायच्या नादात तिनी काहीच खाल्लं नव्हतं. ती स्वैपाकघरात गेली आणि एकीकडे चहाचं आधण ठेवून रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागली. "आज काय बनवू?" तिनी स्वतःलाच प्रश्न केला.." काहीतरी सोप्पं, पटकन होईल असं!" हो ना, सगळी कामं आटोपून तिला आठ वाजता पुन्हा टीव्ही ऑन करायचा होता. तिनी रात्री खायला म्हणून तिच्या आवडीचे झणझणीत पोहे करून ठेवले. आणि चहाचा कप घेऊन बाहेर आली.... पण आत्ता नुसता चहा नव्हता तर त्याबरोबर खारी बिस्किटं पण होती...जगदीशच्या आवडीची ....सकाळी वाण्याच्या दुकानातून घेऊन आली होती ती ! या तिच्या एकांतवासात आपल्या सगळ्या सुप्त इच्छा पूर्ण करून घेणार होती ती. मनाशी काहीतरी ठरवत ती आत गेली आणि तिची डायरी आणि पेन घेऊन आली. अंगणातल्या तुळशी वृंदावनाला टेकून बसत तिनी लिहायला सुरुवात केली.... पुढच्या पाच सहा दिवसांत काय काय करायची याची यादी...."दुर्गाबाई, नीट आठवून लिहा बरं.. म्हणजे काही राहून नको जायला. पुन्हा कुठून मिळणार हे असं स्वातंत्र्य ?"
काय काय होतं त्या यादीत ..... दुर्गाच्या आवडीच्या पदार्थांची नावं... असे बरेच पदार्थ होते जे ती सासूबाईंच्या राज्यात करू शकत नव्हती... कारण ते त्यांना आणि सासऱ्यांना आवडायचे नाहीत....टीव्ही वर स्वतःच्या पसंतीचे कार्यक्रम बघणं ... रेडिओ वर जुनी गाणी ऐकणं आणि त्याबरोबर स्वतः ही गुणगुणणं .... हातभर काचेच्या रंगीबेरंगी बांगड्या घालणं....रोज केसात ताज्या फुलांचे गजरे माळणं.....पुस्तकं वाचणं.... एक ना अनेक.... पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट करायचं ठरवलं होतं तिनी... रोज छान नटून सजून तयार होणं... अगदी जसं जगदीशला आवडायचं तसंच !
त्या नुसत्या विचारानीच दुर्गाच्या चेहेऱ्यावर छानसं हसू पसरलं. थोड्या वेळानी तुळशीसमोर दिवा लावताना तिच्या मनात आलं..' उद्या गुढीपाडवा….. किती महत्वाचा सण ! आणि या अशा सणाच्या दिवशी मी मात्र घरात एकटी...भुतासारखी! भावजींकडे मात्र सगळे अगदी जोरात साजरा करणार उद्याचा दिवस.... माझी आठवणही नाही येणार कोणाला ..' दुर्गाच्या चेहेऱ्यावर एक खिन्न भाव झळकला. पण पुढच्याच क्षणी तिनी ठरवलं ,' त्यांना जे करायचं असेल ते करू दे तिकडे ; मी पण उद्या इथे सण साजरा करणार.... आणि तोही अगदी थाटामाटात !' मनाशी निश्चय करून दुर्गा उठली. आता चांगलंच अंधारून आलं होतं. तिनी घराचा मुख्य दिंडी दरवाजा अडसर लावून बंद केला. गोठ्यात एक चक्कर मारली आणि घरात गेली. सगळी दारं, खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची खात्री करून ती टीव्ही समोर बसली.... पंतप्रधानांचं भाषण ऐकायला.....
"अरे बाप रे, आता पुढचे एकवीस दिवस पूर्ण लॉक डाऊन ? कुठे येणं नाही की जाणं नाही !" पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यावर दुर्गाच्या मनात विचार सुरू झाले. "तसंही मी कुठे जाते म्हणा! गेल्या वर्षभरात हे घर आणि त्याचं अंगण हेच माझं विश्व झालंय.... घरातल्या लोकांना माझ्या असण्याचं काही सोहेर नाही आणि बाहेरच्या लोकांना- माझ्या नसण्याचं काही सुतक नाही !! " आपल्या एकाकी विश्वाबद्दलचा दुर्गाच्या मनातला सल तिच्या शब्दांतून बाहेर पडत होता. बराच वेळ ती तशीच शून्यात बघत राहिली.... मनात होणारी विचारांची गर्दी न्याहाळत....अचानक तिला एक गोष्ट लक्षात आली..." म्हणजे आता पुढचे एकवीस दिवस सासूबाई आणि मामंजी पण नाही परत येऊ शकणार. हा लॉक डाऊन संपेपर्यंत त्यांना तिकडे शहरातच राहावं लागेल...." हा विचार मनात आला आणि हळूहळू दुर्गाच्या चेहेऱ्यावरच्या विषण्णतेची जागा एका खट्याळ हास्यानी घेतली. 'म्हणजेच आता पुढचे एकवीस दिवस मी माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगू शकते...." नकळत दुर्गाची नजर तिच्या डायरीत लिहिलेल्या त्या यादीकडे गेली. तिच्या मनाची अवस्था तर अगदी 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे' अशीच झाली होती. हा आनंद कोणाबरोबर साजरा करावा तेच कळेना तिला. ती धावत आपल्या खोलीत गेली आणि जगदीशच्या फोटो समोर जाऊन उभी राहिली. फोटोतल्या त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवत म्हणाली," आता आपल्याला दोघांना जास्त वेळ एकत्र घालवता येईल. देवानी बोनस म्हणून दिलेले हे लॉक डाऊन चे दिवस अगदी भरभरून जगणार आहे मी... पुढच्या एकाकी आयुष्यासाठी काही सुखद आठवणींची पुंजी साठवून ठेवणार आहे."
त्या रात्री ते झणझणीत पोहे सुद्धा दुर्गाला अगदी गोड वाटले. येणारं नवीन वर्षं एक चांगला संकेत घेऊन येत होतं. पुढच्या एकवीस दिवसांची स्वप्नं रंगवत असतानाच कधीतरी तिला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी नेहेमीप्रमाणे पहाटे जाग आल्यावर दुर्गानी ठरवल्याप्रमाणे कामं करायला सुरुवात केली. आजचा दिवस साजरा करायची सगळी तयारी केली. अंगणात सडे आणि रांगोळ्या, दाराला फुलांचं तोरण. अगदी मनोभावे पूजा करून गुढी उभारली. जगदीशच्या आवडीची बासुंदी आणि तिला स्वतःला आवडायची म्हणून गुळाची पोळी - असा जंगी बेत होता जेवायला! रेडिओ वरची गाणी होतीच साथीला. आज गंगीच्या गळ्यात पण छान सुवासिक फुलांची माळ घातली होती दुर्गानी...नैवेद्याची सुद्धा दोन ताटं वाढली होती तिनी - एक देवांसाठी आणि दुसरं गंगीसाठी! दुर्गाचा तो उत्साह त्या मुक्या जनावराला पण न सांगताच समजला असावा.... आज तिच्या हंबरण्यातही दुर्गाला आनंद ऐकू येत होता. दुपारच्या जेवणाचा थाटही न्यारा होता.... दुर्गानी स्वतःच्या ताटाभोवती छान रांगोळी काढली होती , ताटासमोर लावलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध सगळीकडे पसरला होता. ते पूर्ण भरलेलं ताट बघून दुर्गाच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.... त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला असाच थाट होता जेवणाचा.... क्षणभर दुर्गाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या ; पण स्वतःच स्वतःची समजूत काढत ती म्हणाली," आता पुढचे एकवीस दिवस नव्या सुखद आठवणी तयार करायच्या आहेत...आधीच्या आठवणीनी डोळ्यांत पाणी नाही आणायचं." कित्येक महिन्यांनंतर त्या दिवशी दुर्गा अगदी पोटभर जेवली.... जिभेबरोबरच मनही तृप्त झालं तिचं ! सगळी आवरासावर करून ती टीव्ही बघायला जाणार इतक्यात तिची नजर तिच्या सासऱ्यांच्या पानाच्या डब्यावर गेली. मनाशी काहीतरी ठरवत दुर्गानी तो डबा उघडला.खरं तर तिला विडा खायची फारशी हौस नव्हती. कधी सणासुदीला लहर आली तर जगदीशच मस्तपैकी गुलकंद घालून विडा तयार करायचा आणि तिला द्यायचा....आणि केवळ त्यानी दिलाय म्हणून दुर्गा तो खायची. तसंही त्या पानाच्या डब्याला दुसऱ्या कोणी हात लावलेला तिच्या सासऱ्यांना अजिबात नाही आवडायचा...एक दोन वेळा दुर्गालाही त्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं....त्यानंतर ती कधीच त्या फंदात पडली नव्हती.... पण आजची गोष्ट वेगळी होती...आज तिच्यातली बंडखोर दुर्गा जागी झाली होती.... आज तिनी मुद्दाम तो डबा उघडला....विडा हवा होता म्हणून नाही तर केवळ सासऱ्यांना जे आवडत नाही ते करून बघायचं होतं म्हणून !! बाहेरच्या वेलावरून दोन कोवळी पानं खुडून आणली आणि एक छानसा गोविंदविडा बनवून घेतला. तो टप्पोरा विडा तोंडात घालताना दुर्गाच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच सुप्त आनंद होता... उगीचच लादली गेलेली बंधनं तोडण्याचा आनंद !!! आजचा हा विडा चांगलाच रंगणार होता !
दुपारी झोपाळ्यावर बसून पुस्तक वाचता वाचता दुर्गाचा डोळा लागला.... एक तर अगदी पोटभर जेवण झालं होतं आणि त्याहीपेक्षा जास्त - सतत जाणवणारा मनावरचा ताण कालपासून नाहीसा झाला होता ; त्यामुळे शरीराबरोबरच मनही थोडं सुस्तावलं होतं ! जेव्हा तिला जाग आली तेव्हा दिवस सरून संध्याकाळ होत आली होती. दुर्गा आळसावत उठली. अंगणातल्या हातपंपावरून पाण्याची एक बादली भरून घेऊन ती गोठ्याच्या दिशेनी गेली. सगळा गोठा तिनी झाडून आणि धुवून स्वच्छ केला. स्वतःच्या हातांनी गंगीला चारा भरवला आणि ती घरात गेली..... नटून सजून तयार व्हायला ... तिनी कपाटात अगदी खालच्या कप्प्यात ठेवलेली एक कापडी पिशवी काढली आणि अगदी हळुवार हातांनी त्या पिशवीतली ती गर्भरेशमी साडी काढली.... तो लग्नाच्या वेळी नेसलेली पिवळी अष्टपुत्री ! त्या साडीबरोबरच ठेवलेल्या हिरव्या पिवळ्या रंगांच्या बांगड्या दोन्ही हातात चढवल्या ; केसांत टपोऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला. जगदीशच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, " कशी दिसतीये मी ? तुम्हांला आवडते तशीच तयार झालीये आज."
किती वेळ ती तशीच उभी होती कोण जाणे... तिच्या मोबाईल ची रिंग वाजली आणि त्या आवाजानी ती आपल्या समाधीतून जागी झाली. शहरातून तिच्या जावेचा फोन होता. " हॅलो, आता सासूबाई आणि मामंजी लॉक डाऊन संपल्यावरच येतील गावी परत. एवढंच सांगायला फोन केला होता." दुर्गाच्या उत्तराची वाटही न बघता तिच्या जावेनी कॉल बंद केला. दुर्गाला खरं तर बोलायचं होतं आपल्या जावेशी...नवीन घराचं साठी शुभेच्छा द्यायच्या होत्या. तिच्या दिरांची, छोट्या पुतणीची ख्याली खुशाली विचारायची होती .... पण तिच्या जावेला तिच्याशी बोलण्यात काहीही रस नव्हता. तिच्यासारख्या उच्चशिक्षित, एका मोठ्या कंपनीत नोकरी करणाऱ्या आधुनिक स्त्रीकडे दुर्गा सारख्या बारावी पास, गावंढळ मुलीकरता अजिबात वेळ नव्हता. तसंही आता सासू- सासऱ्यांचा नव्या घरातला मुक्काम वाढल्यामुळे तिच्या जीवाचा संताप होत होता ! तिच्या मनातली ती खदखद दुर्गाला सुद्धा जाणवली होती. आपल्या जावेचा होणारा उद्वेग बघून दुर्गाला मात्र खूप मजा येत होती.... ती हातातल्या फोनकडे बघत मिश्कीलपणे म्हणाली," आता कितीही चिडलात ना; तरी काही उपयोग नाही... अजून तीन आठवडे हा सासुरवास सहन करावाच लागेल." आपल्या सासूच्या खोलीच्या दिशेनी बघत ती पुढे म्हणाली," तुम्हांला आनंदच झाला असेल ना ! तुमच्या लाडक्या मुलाकडे आणि सुनेकडे अजून काही दिवस राहायला मिळालंय... एकदा त्यांचाही पाहुणचार अनुभवा म्हणजे कळेल माझं महत्व !"
काहीशा त्रासलेल्या मनस्थितीतच दुर्गा स्वैपाकघराच्या दिशेनी जायला निघाली ; पण वाऱ्यावर स्वार होऊन मागच्या अंगणातल्या मोगऱ्याचा सुगंध घरभर पसरला आणि दुर्गा त्या वासाच्या दिशेनी खेचली गेली. कितीतरी वेळ ती मागच्या पारावर बसून होती.... आयुष्यातली नात्यांची झालेली ही गुंतागुंत कशी आणि कधी सुटणार याचा विचार करत !
मंगलाताई आणि वसंतराव दोघांनाही लॉक डाऊन ची बातमी ऐकून आनंदच झाला होता. कारण त्यामुळे आता त्यांना तीन आठवडे तरी आपल्या मोठ्या मुलाबरोबर आणि लाडक्या सुनेबरोबर राहायला मिळणार होतं ; आपल्या नातीचे लाड करता येणार होते.
मंगलाताईना त्यांची मोठी सून - कल्पना- खूप आवडायची. तसं पाहिलं तर तिचा जास्त सहवास नव्हता मिळाला त्यांना... दोन एक वर्षांतून कधीतरी ती गावी यायची तेव्हा थोडे दिवस मिळायचे तिच्याबरोबर.. कल्पना जन्मापासून शहरात वाढलेली असल्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास जाणवायचा मंगलाला.... आणि त्यात भर म्हणून ती उच्चशिक्षित आणि एका मोठ्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर कामाला होती. त्यामुळे तिचं राहणीमान, तिचं ते फाडफाड इंग्रजीत बोलणं ... सगळ्यांचंच खूप अप्रूप होतं मंगला ला ! प्रत्येकवेळी सुट्टीत गावी येताना ती त्यांच्या साठी आणि वसंतरावांसाठी महागड्या वस्तू, कपडेलत्ते घेऊन यायची. तिचा तो सगळा थाटमाट बघून दोघांचेही डोळे दिपून जायचे.
मंगला ताईंना नेहेमी वाटायचं... 'काय गंमत आहे...मोठी सून इतकी स्मार्ट आणि छोटी सून अगदी गावंढळ ... किती हा विरोधाभास!' पण खरं म्हणजे त्यांना दुर्गाबद्दल जो राग होता त्याचं मुख्य कारण काही वेगळंच होतं... जगदीशनी त्यांच्या इच्छेविरुद्ध दुर्गाशी लग्न करायचं ठरवलं होतं.. आणि त्यासाठी तो घर सोडून जायलाही तयार होता.... याचाच खूप मनस्ताप व्हायचा मंगलाताईना! आधी ज्या मुलाला आपल्या आईचा प्रत्येक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य वाटायचं.. तोच मुलगा एका नुकत्याच भेटलेल्या मुलीसाठी स्वतःच्या आईला कायमचा सोडून जायला तयार झाला होता. आणि स्वतःचा हा असा अपमान त्या पचवू शकत नव्हत्या. जेव्हा जेव्हा त्या दुर्गाला बघायच्या तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना ते सगळं आठवायचं आणि मग तोच सगळा राग त्यांच्या वागण्या बोलण्यातून दुर्गाला सहन करायला लागायचा.
पण आता या लॉक डाऊनमुळे निदान थोडे दिवस तरी का होईना पण त्यांना दुर्गाचा चेहेरा बघायची गरज नव्हती. आणि म्हणूनच त्या खूप खुश होत्या.
पण त्यांच्या लाडक्या कल्पनाचा जीव मात्र खालीवर होत होता. या नवीन घडामोडीमुळे तिचे सगळे प्लॅन्स फिसकटले होते. सासू सासरे गावी परत गेल्यानंतर तिनी मस्तपैकी नवरा आणि मुलीबरोबर एक family outing ठरवलं होतं. चांगला आठवड्याभराचा प्रोग्रॅम होता. पण आता सगळंच होत्याचं नव्हतं झालं होतं. एक तर नेमका वास्तुशांतीच्या दिवशीच लॉक डाऊन सुरू झाल्यामुळे तिच्या माहेरचे, तिच्या कंपनी मधले कोणीच नव्हते येऊ शकले तिच्या नवीन घरी.... अगदी एकाच गावात असूनसुद्धा ! इतकंच काय पण पूजा करायला गुरुजी पण नव्हते येऊ शकले. त्यामुळे त्यांना skype च्या माध्यमातून पूजा करून वेळ निभावून न्यायला लागली होती. सगळी हौस मौज तशीच राहून गेली होती. आणि त्यात भर म्हणून आता सासू सासरे तीन आठवड्यांसाठी तिथेच राहणार होते.... पण नुसता मनस्ताप करून घेण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. लॉक डाऊन चे सुरुवातीचे एक दोन दिवस जरा बरे गेले... पण मग हळूहळू कल्पनानी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. 'ऑफिस चं काम आता घरून कॉम्प्युटरवर करावं लागतं' हा एक चांगला बहाणा मिळाला होता तिला. त्यामुळे कसाबसा सकाळचा चहा नाश्ता उरकून ती आणि सतीश दोघंही आपल्या खोलीत जाऊन बसायचे . मंगला ताई मात्र 'तेवढीच सुनेला मदत होईल' असा विचार करून बाकी सगळं घरकाम करायला लागल्या. त्यामुळे कल्पनाचं चांगलंच फावलं ! तिला जणू घरबसल्या एक नोकरच मिळाली होती आणि तीही बिनपगारी....
इतकं मोठं घर... आणि घरात इतकी माणसं... शिवाय आता कामवाली देखील येऊ शकत नव्हती; त्यामुळे एकदम सगळंच काम मंगलाताईच्या अंगावर पडलं.. वसंतराव जशी जमेल तशी मदत करायचे पण मग त्यांचीही दमणूक व्हायची. त्यात भर म्हणून की काय… त्यांची नात कायम त्यांच्या मागे भुणभुण करत फिरत राहायची…. तिचा तरी वेळ कसा जाणार ?
पहिले चार पाच दिवस कसंबसं निभावून नेलं दोघांनी ; पण मग वयोमानापरत्वे रोजच्या कामांत काही त्रुटी राहायला लागल्या.... कधी केर फरशी राहून जायची तर कधी स्वैपाकाला उशीर व्हायचा... आणि त्यामुळे कल्पनाचे मारलेले ताशेरेही झेलायला लागायचे.
एक दिवस संध्याकाळी सुनेला आणि मुलाला चहा देण्यासाठी मंगलाताई त्यांच्या खोलीच्या बंद दारापाशी गेल्या. त्या दार वाजवणार इतक्यात आतून कल्पना आणि सतीशच्या हसण्याचा आवाज आला. त्यांनी जरा कान टवकारून ऐकलं...कल्पना सतीशला काहीतरी सांगत होती.... पण तिचं बोलणं ऐकून मंगलाताईच्या हृदयात जोराची कळ उठली.... कल्पना म्हणत होती,"अनायासे तुझे आई बाबा आले आहेत म्हणून बरं झालं.... नाहीतर या लॉक डाऊन मधे मलाच सगळं घरकाम करावं लागलं असतं ... आता ते दोघं बाहेर सगळी कामं करतात आणि आपण खोलीत मस्त आराम करतो !" तिचं हे असं बोलणं ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं; पण त्याहीपेक्षा - आपला मुलगा पण असाच विचार करतो हे कळल्यामुळे त्या पूर्णतः खचून गेल्या.
आता मंगलाताईंच्या लक्षात आलं की 'इतकी वर्षं जिला त्या लाडकी म्हणून डोक्यावर घेऊन नाचत होत्या - तीच त्यांची सून आता त्यांच्या डोक्यावर मिरे वाटायला लागली होती '....
आणि अजून एक जाणीव झाली होती त्यांना... दुर्गाचा चांगुलपणा, तिची कामसू वृत्ती, सहनशीलता .... सगळं सगळं आता स्पष्ट दिसायला लागलं होतं. कधी नव्हे ते दुर्गाच्या आठवणीनी त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं...' खरंच, खूप चुकीचं वागले मी तिच्याशी...खूप छळलं तिला...घालून पाडून बोलले...पण तरीही तिनी कधी मान वर करून प्रत्युत्तर नाही दिलं. सगळं काही निमुटपणे सहन करत राहिली. जिला आम्ही इतकी वर्षं गारगोटी समजत होतो ती हिरकणी निघाली !'
मंगलाताईना आपल्या आजीची आठवण झाली. आजी नेहेमी म्हणायची ," देवाच्या काठीला आवाज नसतो... आपल्या चुकांचा हिशोब इथेच वळता करून घेतो तो !"
"खरंच म्हणायची आजी. आपल्या पापांची शिक्षाच भोगतोय आपण आता ." आपले डोळे टिपत मंगलाताई वसंतरावांना म्हणाल्या. कधी एकदा हा लॉक डाऊन संपतो आणि कधी एकदा आपल्या घरी परत जातो - असं झालं होतं त्या दोघांना ! "देवा, लवकर संपव बाबा हा लॉक डाऊन," मंगलाताई हात जोडून आढ्याकडे बघत म्हणाल्या.
त्याचवेळी गावात दुर्गा मात्र देवाकडे वेगळंच मागणं मागत होती. काही दिवसांकरता मिळालेलं हे स्वच्छंदी आयुष्य आता लवकरच संपणार होतं. पुन्हा एकदा दुर्गाच्या आयुष्याच्या दोऱ्या दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जाणार होत्या.... आणि पुन्हा तिला त्यांच्याच तालावर नाचावं लागणार होतं....अर्थात, आज ना उद्या हे होणारच होतं म्हणा.... आणि दुर्गाला त्याची जाणीवही होती. पण तरीही सध्या मिळालेलं हे स्वातंत्र्य अजून काही दिवस वाढवून मिळावं म्हणून ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती.
बघता बघता लॉक डाऊन शेवटच्या दिवसापर्यंत येऊन पोचला. १४ एप्रिल ला पंतप्रधानांचं भाषण ऐकायला पूर्ण देश उत्सुक होता. काय निर्णय झाला असेल ? कोणती घोषणा करणार असतील? मंगला आणि दुर्गा आपापल्या जागी टीव्ही समोर बसल्या होत्या. दोघींचे हात जोडलेले आणि मनात देवाचा धावा...आपापल्या इचछा पूर्ण होण्यासाठी देवाची प्रार्थना !!!
शेवटी एकदाची पंतप्रधानांनी बोलायला सुरुवात केली.....'लॉक डाऊन अजून एकवीस दिवसांनी वाढवण्यात आला होता.' त्यांचं भाषण ऐकून दोघींच्या डोळ्यांत पाणी तरळलं....फक्त त्यामागच्या भावनेत जमीन आस्माना इतकं अंतर होतं....
डोळ्यांतलं पाणी टिपत मंगलाताई म्हणाल्या," आजी बरोबरच म्हणायची.... देवाच्या काठीला आवाज नसतो !!!"
-------------------- समाप्त ----------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा मस्तच!
निलुदा+१, कथाबीज जवळपास असले तरीही मला कथेतलं लॉकडाऊन आवडलं..

निलुदा,
डॉलर बहु ही कथा कुठे वाचायला मिळेल ? कोणी लिहिली आहे? मला आवडेल वाचायला.

निमिता, डॉलर बहु ही सुधा मुर्ती यांची कादंबरी आहे. नावावरुन सासु-सुनेची कथा आहे हे लक्षात येत.. पण वाचताना कुठेही टिपीकल स्टोरी वाचतोय अस जाणवत नाही..

सुधा मूर्तीच पुस्तक आहे का? वाचायला हवं मग.. मी त्यांची एक दोनच पुस्तके वाचली आहेत..थॅन्क्स तायडे.. नकळत पुस्तक सुचवल्याबद्दल.

धन्यवाद मन्या,
हे सुधा मूर्ती यांचं पुस्तक आहे हे खरंच माहीत नव्हतं. (माझं अज्ञान Sad ).... पण माझी कथा वाचून त्यांच्या पुस्तकाची आठवण झाली - यातच मी धन्य झाले Happy _/\_

छान!

निलुदा,
धन्यवाद. लवकरच 'माझी सैन्यगाथा' हे पुस्तक प्रकाशित करायचा विचार आहे. Happy

चांगली रंगवली आहे कथा.मलाही डॉलर बहू आठवलं.अर्थात ही तुलना नाही.
दुर्गा च्या घरचं वातावरण, गायी वगैरे ऐकून एकदम 20 वर्षं मागे गेल्यासारखं वाटलं.
ही कथेवर टिप्पणी नाही, पण अश्या सर्व दुर्गाना मनातल्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करायला सासू सासरे फोटोत किंवा लॉकडाऊनमुळे गावी अडकून पडायची वाट पहावी लागू नये असं प्रकर्षाने वाटलं.(प्रत्येक वेळी संधी येईलच असं नाही.मग आयुष्याच्या शेवटी मनात रिग्रेट नको की कधी जगलेच नाही ☺️☺️)

सुरूवात अगदी छान झाली होती, जावेचा फोन येईपर्यंत.

पण मग कथा अगदीच टीपीकल झाली..शहरी दुष्ट सून, सासू सासऱयांचा छळ - त्याला मुलगा सामील इ.इ.
कितीतरी मराठी चित्रपटात पाहीलेली गोष्ट ...

कथा जर दुर्गेच्या भावविश्वापुरतीच ठेवली असती तर जास्त आवडली असती.