कर्ता - १

Submitted by ऑर्फियस on 29 May, 2020 - 00:10

walkers-486583_640.jpg

अकराव्या मजल्यावरच्या आपल्या ऑफेसातल्या खिडकीत उभे राहून राजेंनी बाहेर पाहिले. कामातून थोडासा वेळ काढून एसी बंद करून खिडकी उघडणे आणि तेथे उभे राहून बाहेरचे जग न्याहाळणे हा राजेंचा आवडता छंद होता. इथे उभे राहिले की शहरच कवेत घेतल्याप्रमाणे वाटायचे. कसलिशी सत्ता, ताबा आपल्या हातात असल्यासारखे वाटायचे. ती भावना राजेंना आवडायची. राजे पाहात होते. शहर उत्साहाने नांदत होते. माणसे येत होती. जात होती. गाड्या पकडत होती. तरुणी प्रियकरांना भेटत होत्या. लहान मुले बागडत शाळेत जात होती. सारे काही ठीकच चालले होते. पण आपल्याकडे का असं? गेल्या सहा महिन्यात जणू कुणाची तरी दृष्ट लागली होती. हा विचार मनात येताच राजे चमकले. आपण हा असा विचार करायचा? डॉ. राजे तुम्ही फिजिक्समध्ये डॉक्टरेट केलंय. तुमच्या बोलण्यात दृष्ट वगैरे? पण त्यांनी तूर्तास तो विचार बाजुला सारला. संस्थेत चिंतेचे वातावरण पसरले होते. पाच मिनिटात मिटिंग सुरु होणार होती. चार वर्षांपूर्वी कुणी या विषयासाठी ऑफीसमध्ये राजे मिटिंग बोलावतील असे म्हटले असते तर राजेंनी त्या माणसाला वेड्यात काढले असते. पण घटनाच अशा घडू लागल्या होत्या की कुणालाच त्यांची कसलिही संगती लागत नव्हती.

पाच वर्षांपूर्वी बड्या पगाराच्या सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर राजेंनी सेंट्रल रिसर्च इन्स्टीट्युट ही स्वतःची संस्था सुरु केली होती. सरकारी कामात आणि वातावरणात मुरलेल्या राजेंनी वर्षभरात संस्था नावारुपाला आणली. त्यांच्या अनेक ठिकाणी मोठमोठ्या लोकांशी ओळखी होत्या. रिसर्च प्रोजेक्ट्सचा ढीग संस्थेत येऊन पडला. मग मात्र राजेंनी मागे वळून पाहिलेच नाही. निरनिराळ्या क्षेत्रातील अतिशय हुशार अशा काही निवडक लोकांना त्यांनी आपल्या संस्थेत बोलावलं. आपल्याकडे मोठा पगार देऊन कामाच्या बाबतीत त्यांना भरपूर स्वातंत्र्य दिलं. या हुशार माणसांना बॉस म्हणून कुणाचा जाच नको होता. आणि काम चोख होत असेल तर राजेंना बॉसगिरी करण्याची हौस नव्हती. ही गोष्ट दोन्ही बाजूंनी सोयीची झाली होती. त्यामुळे संस्थेची भरभराट होऊ लागली. अनेक होतकरु विद्यार्थ्यांचा, पीएचडी स्टूडंटसचा राबता संस्थेत वाढु लागला. व्यावसायिक तसेच शैक्षणिक संस्थांमध्येही संस्थेचे नाव होऊ लागले. राजेंनी सुरुवातीपासूनच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत कटाक्ष ठेवला होता. त्यामुळे एखाद्या प्रोडक्टचे मार्केट रिसर्च असो किंवा कुठल्या आडभागात पिकावर आलेला विशिष्ट रोग असो. राजेंच्या संस्थेचे निष्कर्ष अचुकच असणार असे सरकारदरबारातही बोलले जात असे.

संस्था भरभरटीला आली की संस्थेचे शत्रू देखिल उत्पन्न होतात. राजेंची संस्थाही याला अपवाद नव्हती. अनेक सेमिनार्समध्ये राजेंच्या संस्थेने केलेल्या संशोधनावर कडकडून टिका केली जात असे पण संस्थेची माणसे या टिकेला यथास्थित उत्तर देत. कारण कामात संस्था कसूर करीत नसे. असे असताना गेल्या सहा महिन्यांपासून संस्थेत चमत्कारिक घटना घडू लागल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी अतिशय महत्त्वाच्या संशोधनाची फाईल गहाळ झाली होती. तेथून या घटनांना सुरुवात झाली. त्यासाठी सर्वप्रथम बाबुराव शिपायाला जबाबदार धरले गेले. बाबुराव म्हणजे एक प्रकरणच होते. सतत नखे चावत काहीतरी पुटपुटत बसणारा हा माणुस प्रथमदर्शनी थोडासा वेडसरच वाटत असे. आणि तो तसा होताही. त्याच्याबद्दल कुणालाही प्रेम वाटत नसे, किंबहूना तिटकाराच वाटत असे. जाड चष्मा लावणार्‍या, अडखळत बोलणार्‍या, चाळीशी उलटलेल्या आणि अस्ताव्यस्त सुटलेल्या या माणसाचे लग्न झाले नव्हते. घरापेक्षा हा जास्त ऑफीसमध्येच राहून मर मर काम करीत असे. ऑफीसचे काम हाच त्याच्या भगभगीत आयुष्यातला एकमेव विरंगुळा उरला होता. फाईल गायब झाल्यावर खरं तर त्याला काढूनच टाकायला हवं होतं पण त्याचा या गहाळ प्रकरणाशी थेट हात असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नव्हता. मात्र त्याला संस्थेत ठेवण्याचे कारण वेगळेच होते.

इतक्या कमी पगारात पैशाच्या अनेकपट कामं हा माणुस करीत असे. त्याला ऑफिसमधील माणसे हवं तसं राबवत असत. असा माणुस शोधूनही पुन्हा मिळाला नसता. शिपायाचे काम करणारी तरूण माणसे टिकत नव्हती. आणि बाबुराव मात्र खालमानेने पडेल ते काम करीत होता. चहा बनवण्यापासून ते एखादे खाजगी घरगुती काम बाबुरावला सांगताना तेथिल कुणालाही कसलाही संकोच वाटत नसे. त्याचा लठ्ठ ओबडधोबडपणा हा संस्थेतील माणसांचा हुकमी टाईमपास होता. शिवाय अशी गाढव मेहनत करूनही थोडका पगार हातात ठेवला की त्याच्या भाबड्या बावळट चेहर्‍यावर आनंद दिसत असे. फाईल गायब झाली आणि हे काम बाबुरावचेच आहे असे छातीठोकपणे सांगणारी काही माणसे संस्थेत निघाली. पण बाबुरावविरुद्ध पुरावा मात्र मिळाला नाही. नेमके ते संशोधन दुसर्‍या संस्थेने वापरून राजेंच्या पुढे बाजी मारली होती. पण काही दिवसातच त्या प्रोजेक्टवर काम करणार्‍या राजेंच्या संस्थेतल्या डॉ. देसाईंचा अपघाताने मृत्यु झाला. माणसे अपघाताने मरतात पण देसाईंच्या कारवर ट्रक अशा तर्‍हेने आदळला होता की देसाईंचा देह ओळखण्यापलिकडे गेला होता. मृतदेहाच्या नावाने तुकडेच गोळा करावे लागले होते. या अपघाताच्या भीषणतेमुळे संस्थेतील माणसे मनातून धास्तावली होती. त्यानंतर चमत्कारिक अपघातांची मालिकाच सुरु झाली.

एक महिन्याने अकाऊंटच्या तांदळे बाईंना अपघात झाला, त्या वाचल्या पण व्हीलचेयरवर बसावे लागले. परत कधी कामावर येतील किंवा कधी काळी येऊ शकतील की नाही काहीच सांगता येत नव्हते. कारण तर फारच चमत्कारिक घडले होते. ट्रेनमधून उतरताना त्यांची ओढणी आतच कुठेतरी अडकली आणि तिचा गळ्याला फास बसला. गाडी सुरु झाली आणि त्या फरफटत गेल्या. प्रसंगावधान राखून स्टेशनवरच्या लोकांनी आरडाओरडा केला आणि गाडी थांबली. पण व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. लगेच नंतरच्या आठवड्यात बायोलॉजीचे रिसर्च पाहणारा नायर. कुठल्यातरी रिसॉर्टवर मित्रांबरोबर गेला होता. दारु पार्टी झाली. त्यात भरपूर पिणे झाले. नायर तसा पट्टीचा पिणारा पण त्या दिवशी जरा जास्तच झाली. रुममध्ये आल्यावर बेडवर पडला सिगारेट पेटवली. आणि लायटर पडून कधी बेडने पेट घेतला कळलेच नाही. दार तोडून माणसे आत आली तेव्हा नायरची निव्वळ राखरांगोळी झाली होती.

नायर गेल्यावर तर संस्थेतल्या श्रद्धाळू लोकांनी राजेंना संस्थेच्या इमारतीत होमहवन करण्याची गळ घातली. राजेंना हा निव्वळ वेडेपणा वाटत होता. पण संस्थेत काम करणार्‍या श्रद्धाळू लोकांना दुखावून त्याचा कामावर विपरीत परिणाम होऊ देण्याइतके राजे वेडे नव्हते. त्यांनी चेहर्‍यावर नापसंती न दाखवता नुसती परवानगीच दिली नाही तर ते हवनाला हजरदेखिल राहिले. फक्त सारे गुपचुप करण्यास सांगितले. संशोधन संस्थेत होमहवन केले गेले ही बातमी बाहेर फुटणे चांगले नव्हते. तशी खबरदारी घेतली गेली. हवनाच्यावेळी दोन तास राजे समोर बसून होते. निरनिराळ्या क्षेत्रात पदव्युत्तर पदव्या मिळवलेली माणसे भक्तीभावाने हवनात समिधा टाकत होती ते पाहात होते. मनातून अतीव तुच्छतेने हसत होते. हवन झाले आणि महिनाभर सारे काही ठीक चालले. आणि अचानक डॉ. देसाईंना असिस्ट करणारा भातखंडे ट्रेकच्या अपघातात गेला. आता मात्र राजेही जरा हादरले. त्यांच्या तर्कात या घटनांची संगती लागत नव्हती. कुणाचेही मृत्यु म्हटलं तर गुढ नव्हते. भातखंडेला ऐन पावसात सर्वात धोक्याचा कडा चढण्याची काही गरज नव्हती. पण हे सर्व घडतं आहे आणि ते ही आपल्याच संस्थेत आणि अशा भयंकर तर्‍हेने?

ऑर्फियस (अतुल ठाकुर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात छानच झालिये.
फक्त वेग आणि पकड अशीच ठेवा.
नम्र विनंती : कथा अजिबात अर्धवट ठेवु नका. अर्धवट जेवल्यासारखं वाटतं हो.

खूप दिवसांनी जुन्या मंडळींपैकी कोणाचं तरी लिखाण बघतेय. अर्धवट नका हां सोडू, ऑर्फियस!
कमाल सुरुवात जमलीय. वाट्टेल तितक्या शक्यता डोक्यात फिरतायत!

पुलेशु!

सर्वांचे खुप खुप आभार Happy

कथा अजिबात अर्धवट ठेवु नका. अर्धवट जेवल्यासारखं वाटतं हो.
मास्टरमाईन्ड, मुळीच अर्धवट ठेवणार नाही Happy दुसरा भाग तयार होतो आहे Happy

वाट्टेल तितक्या शक्यता डोक्यात फिरतायत!
आनंदनंदिनी धन्यवाद Happy असं ऐकलं की खुप छान वाटतं.