कोठडी

Submitted by बिपिनसांगळे on 27 May, 2020 - 12:19

कोठडी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साहिल कोठडीच्या आत शिरला. त्याच्या मागे लोखंडी दार आवाज करत बंद झालं.
त्याच्यावर खुनाचा आरोप होता. साराच्या, त्याच्या मैत्रिणीच्या खुनाचा.
तो आत जाऊन भिंतीला टेकून बसला. सुन्न ! आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
एखादं झाड , एखादं घर डेंजर असतं सालं . झपाटलेलं ! पण एखादी तुरुंगातली कोठडी? ... तशी असू शकते ? ...
ती कोठडी तशीच होती . पण साहिलला तरी ते कसं माहित असणार . त्या क्षणाला ती कोठडी शांत होती . दगडी . जुनीपानी . अनेक गुन्हेगार पचवलेली आणि पोचवलेली .
खुनाचा आरोप हा पहिलाच तर धक्का होता आणि असे अजून कितीक धक्के त्याला पुढे बसायचे होते .
-----
रात्र झाली. मग मध्यरात्र. तुरुंगातले आवाज मंदावले आणि दिवेही. ठराविक दिवे न गस्त सोडता . गस्त घालणाऱ्या शिपायांच्या बुटांचे आवाज मात्र तेवढे येत होते. अधूनमधून त्यांची कुजबुज . मग ते आवाजही शांत होत गेले.
त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं . त्याचं मन दुःखाने भरून गेलं होतं .
साहिल केव्हातरी बसल्या बसल्या झोपी गेला होता. खूप उशिराने. त्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती.
आणि त्याला धडाम-धुडूम असा आवाज येऊ लागला. त्याची झोप चाळवली. आवाज बंद झाला. तो पुन्हा गाढ झोपला.
सगळ्या कोठडयांमधून शांतता होती. संपूर्ण तुरुंग शांत होता. आवारात, मैदानात, पलीकडच्या शेतात शांतता होती . कोठड्यांमधूनही शांतता होती. मग ते आवाज ?...
पुन्हा काहीतरी पडल्याचे, कोसळल्याचे आवाज येऊ लागले. लाकूड पडल्याचे, धातूचे पाईप- सळया पडल्याचे, सिमेंटचे खांब - गट्टू पडल्याचे. चित्र-विचित्र. नकोसे वाटणारे. झोप उडवणारे !
रात्रीचं तुरुंगात काम चालू होतं की ... की कोण तुरुंग फोडून पळण्याची तयारी करत होतं , कोणास ठाऊक ?
मग आदिवासी लोकांची तालवादयं वाजल्यासारखा आवाज येऊ लागला . पण ते ताल कुठले असावेत , ते ना कळणारे . पण उरात धडकी भरवणारे . कदाचित नरमांसभक्षक लोक बळी देण्याआधी जे रौद्र संगीत वाजवतात , तसं काहीतरी ...
त्या आवाजांनी त्याला जाग आली . तसे ते आवाज थांबले . पूर्णपणे . एकदम भीषण शांतता . जीवघेणी !
त्याला आधी कळेचना की तो कुठे आहे ? मग तो भानावर आला. त्याला तो कोठडीत, कैदेत असल्याचं लक्षात आलं. अंधारात त्याला काही दिसलं नाही. उन्हाळ्याचे, असहय गर्मीचे दिवस होते. त्यामुळे आधीच नकोसं होत होतं. पण त्याला आता अस्वस्थ वाटू लागलं. जीव गुदमरल्यासारखं होऊ लागला. कोणीतरी गळा दाबतंय असं वाटू लागलं. त्याचा श्वास- त्याचा श्वास कोंडू लागला.
अख्खा तुरुंग कैद्यांनी ओसंडून वहात असला तरी , त्या क्षणाला त्याला खूप निराधार, खूप एकाकी वाटलं .
जणू काही तो तुरुंग म्हणजे एखादी पडीक, निर्जन हवेली होती... रात्र चढल्यावर भीतीच्या सावल्या चुनेगच्ची भिंतींवर नाचत असल्यासारखी...
तिथे काहीतरी होतं नक्की . पण ते अस्तित्व त्याला दिसत नव्हतं . जाणवत होतं फक्त. अन - ते त्याचा जीव घेण्यासाठी आसुसलेलं होतं ...
त्याला कोंडीत सापडल्यासारखं वाटलं . कारण तो कोठडीच्या आत होता , बंदिस्त ! त्याला बाहेर पडायला ,पळायला काही संधीच नव्हती . आजूबाजूला कोणी नव्हतं . त्यात त्याचा आवाज गळ्यातून बाहेर पडतच नव्हता. जणू कोणी तोंडात बोळा कोंबलाय.
जिवाच्या कराराने तो उठला . तोच तो धडपडला . पुन्हा तो जोर लावून उठला आणि कसाबसा कोठडीच्या गजांपर्यंत पोचला ... त्याचं डोकं त्यावर धडकलं . का कोणी धडकवलं ? ... त्याच्या डोक्यात असह्य कळ आली. त्याचा जोर क्षीण झाला …
एका क्षणाला तो त्राण जाऊन खाली पडला. सगळ्या जाणीवा हरपून.
-----
सकाळ झाली.
रात्री भयाण वाटणारी ती कोठडी आता ओके वाटत होती . तुरुंगही प्रसन्न वाटत होता . हिरवागार . झाडे ल्यायलेला . आखीव रेखीव चुना आणि काऊने रंगवलेल्या फूटपाथच्या विटा असलेला . तुरुंग छानच होता ; वाईट काय होतं, तर तिथे असलेली, गुन्हेगारी मानसिकता असलेली माणसं !
त्याच्या कोठडीपाशी एक शिपाई आला. त्याच्या चेहऱ्यावर लबाडी पसरून राहिलेली होती . साहिलकडे पाहून तो कुजकट हसला.
“ का बे ? कसं काय ? झाली का झोप ? कशी झाली पहिली रात ? ”
“ठीक… ठीक.पण- “
तो मुरलेला, अर्क असलेला शिपाई पुन्हा हसला. म्हणाला, ”कोठडी झपाटलेली आहे ही !”
साहिल त्याच्याकडे डोळे फाडून बघत राहिला.
शिपाई बेरकी हसत म्हणाला,” म्हणून तर तुला ठिवलाय हितं !... ज्याने खून केलाय त्याला हितं ठिवलं जातं . खून करण्यायवडी चरबी असते ना अंगात ,मग ती जिरायला नको का आधीच ! ”
-----

बंदिवानाचं आयुष्य !... त्यात साहिल काही निर्ढावलेला गुन्हेगार नव्हता.एक साधासुधा, सगळ्यांसारखं जीवन जगणारा तरुण होता. नोकरी करणारा . आणि आता डोक्यावर खुनाचा आरोप. सगळं आयुष्य एका झटक्यात बदललं होतं.
आणि हे कमी म्हणून की काय, अशी झपाटलेली कोठडी वाट्याला आलेली !
त्याला एक कैदी भेटला , जेवायच्या वेळेस . त्याला या गरीब पोराची दया आली . त्याच्या सराईत नजरेने या पोराची नियत ओळखली.
तो त्याच्या बरोबरच्या पोरांना म्हणाला , " अरे , ह्याचं बघा कायतरी . "
ती पोरं साहिलकडे बघत राहिली . तोही त्यांच्याकडे बघत राहिला . पण काही बोलला नाही . त्याला काय करावं ते कळेना .
ती वेळ तशीच निघून गेली .
दिवस गेला. कळलं नाही. पण आता रात्र होणार होती आणि नंतर मध्यरात्र !... झपाटणारी.
साहिलला झोप येणं शक्यच नव्हतं. तो टक्क जागा होता. वाट बघत. पण विचारांनी , दुःखाने त्याचं मन दमलं. त्याच्या डोळ्यावर केव्हातरी झापड आलीच. तुरुंग आता पूर्ण शांत झाला होता. कसलाच आवाज नव्हता.
त्याला स्वप्न पडलं -
कोठडीत सगळीकडे फासाचे दोर लटकवलेले. जाड जाड वळेदार . गळ्यावर वण उठवायला तयार असलेले . रांगेत, उभे - आडवे. हलणारे. एका लयीत हलणारे.
ते फाशीचे दोर पाहून त्याला जिवाच्या भीतीने घाम फुटला. झोपेतच त्याने घाम पुसला.
मध्येच ते फाशीचे दोर खटका दाबल्यासारखे धाडकन खाली येत. मग तो आवाज- कैद्याला फाशी देताना येणारा, त्याच्या खालच्या फळीचा आवाज - घुमणारा . त्याला ते स्वप्न अभद्र वाटलं. जणू ते कैद्याच्या फाशीचे दोर त्याचाच जीव घेण्यासाठी लवलवत होते.
तो घाबरला. जागा झाला . किंचाळला !...
पण त्याचा आवाज त्याच्या घश्यापर्यंतच मर्यादित होता. त्याने डोळे लावून समोर पाहिलं आणि तो हबकला. जे चाललं होतं ते स्वप्न नव्हतं.
एक विचित्र , आकारहीन, काळ्या धुरासारखं असलेलं एक अभद्र अस्तित्व कोठडीत संचार करत होतं. जणू एखादी मासोळी पाण्यात मजेने विहरत जावी. सळसळ - सु ळूक. इकडून तिकडे , तिकडून इकडे झपाट्याने .
मध्येच तो आकार छतापाशी जाऊन थांबला. त्याला दोन डोळे होते अंगारासारखे. डोळ्यातली काळी बुब्बुळं येत होती, जात होती. मगरीचे डोळे असल्यासारखी बुब्बुळं. मध्येच ती घड्याळाच्या लंबकासारखी हालत होती.
आणि ते फाशीचे दोर - ते दोर एकमेकांना धक्का देत होते . म्हणजे एक दोर दुसऱ्याला धक्का देत होता . मग दुसरा झोक्यासारखा हलत तिसऱ्याला . एकामागे एक . सगळेच दोर हलायला लागले . अगदी एका लयीत . त्यांना मजा वाटत असावी… एका नवीन बळीच्या अपेक्षेने.
फाशीचे दोरही वाट पाहत असावेत का , एखादं आयुष्य गिळायला मिळण्याची ?...
मध्येच ते अस्तित्व सगळ्या दोरांच्या गोलामधून एकाच वेळी सर्र्कन गेलं . एखाद्या बोगद्यातून गेल्यासारखं . आणि ते साहिलच्या एकदम जवळ आलं-
साहिल पुन्हा किंचाळला. पण त्याला ओरडताच आलं नाही. त्याचा गळा आवळला गेला होता. त्याला खूप एकटं वाटलं, असहाय्य्य ! जणू त्याने शरणागती पत्करली. पण त्याचे हात गळ्यापाशी झटत होते.
त्याच्या गळ्यात एक फाशीचा दोर होता. आवळत जाणारा. त्याचा श्वास घुसमटवणारा. शेवटी तो थांबला. तो खाली पडला,निपचित .
-----
सकाळ झाली. अंधुक प्रकाश आला. पाखरांची चिवचिव सुरु झाली. अनेक प्रकारची पाखरं .पॅसेजच्या छताला घर करून राहणारी पाखरं . बंदिवान कैद्यांच्या नाकावर टिच्चून मुक्त विहरणारी पाखरं !
तो शिपाई आला. भांडणाऱ्या , शिवीगाळ करणाऱ्या कैद्यांना शिव्या घालत . आता तुरुंगालाही जाग आली होती.
साहिलने डोळे उघडले. त्याच्या जिवाचं पाखरूही शरीरात जिवंत होतं. पण शक्तिहीन. दोनच दिवसात जणू आठ दिवस उलटल्यासारखं झालं होतं . त्याचा चेहरा सुकल्यासारखा झाला होता . ओठ पांढरे पडले होते .
तो शिपाई साहिलजवळ आला. दात विचकत हसला.
“ साहेब, “ साहिल म्हणाला.
“ काय ?” तो गुरकावला.
“ अहो , इथे रात्रीचे विचित्र भास होतात. माझा जीव जाईल इथे.”
“ हां,ते खरंय . मग ?” शिपाई नेहमीची सवय असल्यासारखा म्हणाला.
“ मला ही कोठडी बदलून मिळेल का ?” शिपायाच्या चेहऱ्याकडे पाहत तो खूप आशेने म्हणाला .
“ बदलून ? हे काय लॉज आहे का ? रूम बदलून मिळायला ?” स्वतःच्या विनोदाचं त्याला स्वतःलाच खूप हसू आलं.
“ काहीतरी करा हो प्लिज . प्लिज साहेब… मी खरं तर खून सुद्धा केलेला नाही .”
तो हसत म्हणाला , " इथे आलेला प्रत्येक जण असंच म्हणतो !"
मग त्याला काय वाटलं कोणास ठाऊक . त्याला पोरगं अगदी चारचौघांसारखं, साधंसुधं वाटलं . चॅप्टर वाटत नव्हतं . साहिलच्या चेहऱ्याकडे पाहत तो म्हणाला ," बघतो " .
" थँक्स ! ”साहिल म्हणाला .
त्याला खूप हायसं वाटलं . निदान तेवढाच बदल तरी . पण कोठडी बदलली तरी, ते जे काही आहे ते आपला पिच्छा सोडेल ? … ते या कोठडीत येऊ शकतं तर ते दुसऱ्या कोठडीतही येऊ शकतंच ना . कोठडीच्या गजांची बंधनं आपल्यासाठी . त्याच्यासाठी थोडीच आहेत . त्याच्या मनाला पुन्हा एक वाईट शंका चाटून गेलीच .
-----
तो वाट पाहत होता. त्याला वेडी आशा होती तो शिपाई येण्याची. रात्र व्हायच्या आत कोठडी चेंज व्हायची .पण तो शिपाई -परत फिरकलाच नाही.
त्याला आता त्याच झपाटलेल्या कोठडीमध्ये रात्र घालवायची होती ! ...
आणि रात्र ? ती तर आली. रोजच्यासारखीच. कुठे गुलाबी तर कुठे काळी.कुठे धुंद तर कुठे कुंद.
त्याने आज जीवाची आशा सोडली होती .
त्या अमानवी शक्तीचा फास रात्रीगणिक घट्ट होत जाणार असं त्याला वाटत होतं .तो डोळे मिटून बसला. पण जागाच.
मध्यरात्र झाली. हवा कोंदटली. बाहेरच्या झाडांची अंधारात पडलेली काळी पानं नकोशी सळसळली. अशोकाच्या फांद्या जणू नाचू लागल्या. एका नवीन अघटिताच्या साक्षीदार होण्याच्या अपेक्षेने . पिंपळावरचे मुंजे जणू कान टवकारून बसलेले .
ते अभद्र आलं. त्याचा कोठडीमध्ये संचार झाला. ते घोंगावयाला लागलं .ते घुमायला लागलं. अशक्य गतीने ते सरसरत होतं.
साहिल म्हणाला,” का त्रास देतोयंस? एकदाचा जीव घेऊन टाक. सोडव मला यातून.”
एका चिरकट अमानवी आवाज आला, “का रं, कटाळलास यवड्यात जीवाला ? ”
“मग ? नाहीतरी फुकटची शिक्षा भोगतोय,” साहिल म्हणाला.
आवाज म्हणाला, “ काय ?”
साहिल काहीच बोलला नाही. त्याची नजर वेडीवाकडी हलत होती.
तो चिरकट आवाज पुन्हा आला ,”फुकाटची शिक्षा ? खरं बोलतुयास का ?”
“ हो. फुकटची शिक्षा. माझ्यावर खुनाचा आरोप आहे. जो मी केलेलाच नाही.” साहिल म्हणाला.
तो संचार थांबलाच. ते साहिललाही जाणवलं. मग त्याची नजरही स्थिर झाली.
“ का थांबलास ?,” त्याने विचारलं.
तो असमान , काळ्या धुराचा आकार भिंतीपाशी थांबला. त्यामध्ये एक चित्र स्पष्ट होऊ लागलं. साहिल ते पाहू लागला.
भिंतीवर एखादं म्युरल असावं तसा भिंतीलाच एक चेहरा उगवून आला . उग्र , राकट , ओबडधोबड.
त्याला दोन डोळे होते अंगारासारखे. डोळ्यातली काळी बुब्बुळं येत होती, जात होती. मगरीचे डोळे असल्यासारखी बुब्बुळं. मध्येच ती घड्याळाच्या लंबकासारखी हलत होती.
साहिलने डोळे मिटून घेतले . त्याला ते बघणं सहन होत नव्हतं .
मग समोरचा तो अंगार निवला . ते डोळ्यांमधले हलणारे बुब्बुळांचे लंबक हलायचे थांबले. ते डोळे साधेसे झाले. तरी रोखलेले अन भेदक !
आणि तो आवाज बोलला, “तू काय केलाय ते पयला सांग ”.
साहिल काय अन कसं घडलं ते सांगू लागला…
तो चेहरा शांत होत गेला. त्या नजरेतला भेदकपणा शांत होत गेला.
मग तो पुढे म्हणाला , " तूजीबी कहाणी माज्यासारखीच दिसतिया...कारण मलाबी फाशी झाली होती... मी न केलेल्या खुनाची !.... ऐक माजी कहाणी.”
-----
माजं नाव सूर्ज्या. मी जवा जवान झालो तवा मी वाईट मार्गाला लागलो . अंगात ताकद होती . रग होती. माझे साथीदारबी माज्यासारखेच होते. दंडाच्या बेडक्या फुगलेले ,सावळे. कायबी करायला तयार असलेले . खरं तर आम्ही मोलमजुरीवाले . पण लागलो वाईट मार्गाला . कदी खायचे फाके पडायचे -तवा डोकं काम करायचं नाय . आम्ही चार जण हुतो . आम्ही लय डाके घातले. कदी एवढा घोळ झाला नाय .लोकांना आम्ही मारायचो .पर जीवानिशी नाय.
पर एकदा ... आम्ही एका गावाबाहेरच्या शेतावर गेलो .शेतात घर हुतं. ते लुटायला .हातात कुऱ्हाडी . अन रातीची येळ .
भाईर अंगणात शेतकऱ्याचा पोरगा झोपला हुता. तो जागा झाला. पैलवान गाडी हुता . त्यो उठला अन आला अंगावर. आमचा जो मेन हुता, त्याने त्याच्यावर कुऱ्हाड घातली . वार बसला तोच नेमका . त्यो जाग्यावरच मेला . पोराला मारलं तसा त्याचा चुलता आला , त्यालाबी मारलं .
मग आम्ही घर लुटलं . तिथनं पळालो. पुढं पकडले गेलो .मी समद्यात लहान हुतो . उरलेल्या तिगांनीबी डाव साधला .मला फसवलं. त्यांनी खुनाचा आळ माज्यावर टाकला . त्यो निगालाच नाय .ते साले लवकर सुटले . मला फाशीची सजा झाली .खून न करता. मी शेवटपर्यंत वर्डायचो - मी खून नाय केला !
माजा आवाज कोणाच्या कानापर्यंत नाय पोचला .पर फाशीचा दोर- माज्या गळ्यापर्यंत पोचला ... आखिर फासावर चढलोच.
पर मी माज्या साथीदारांना सोडलं नाय . तिगांची प्रेतच मिळाली. गावाभाईर नदीकाठाला . त्ये कसे मेले, कोणालाच कळलं नाय .
हीच माजी कोठडी हाय, जिथं तू आत्ता हायेस . सूर्ज्याची कोठडी !
मला खून करणाऱ्या लोकांची चीड निर्माण झाली
मग मी हिथं आलेल्या प्रत्येक कैद्याला तरास देतो , त्याला इचारतो, त्यानं काय केलया म्हून ? जो हिथं येतो तो खुनाचाच आरोपी असतो .मग मी त्याला लय छळतो .पर जीव घेत नाय. ते मला पटत नाय. ते माजं कामच नाय.
मी लय डाके घातले. पर कोणाचाबी जीव घेणं वंगाळ काम हाय. हा पर ज्याला दयामाया नाय ,त्या गुन्हेगाराला तर फाशी हुयालाच पायजे !
अन तू - पयलाच भेटलास गड्या , ज्याने खूनच केलेला नाय ! तू बी माज्यासारखास हायेस अगदी माज्यासारखाच. कमनशिबी !
तो आवाज चक्क भरून आला.
-----
त्याची जीवनकहाणी ऐकून साहिल सुन्नच झाला.
बऱ्याच वेळाने तो बोलता झाला.
“सूर्ज्या, कळलं रे, कळलं तुझं दुःख. तूपण फुकाचा फासावर चढलास. जसा आता मीपण चढणार आहे. पण तू या आधी हे कोणाला सांगितलंयस ?”
“ कोणालाच नाय. कारण तू पयला भेटला हायेस , ज्याने प्रत्यक्षात खून केलेला नाय. आत्तापर्यंत समदे साले गुन्हेगारच भेटले. खरे गुन्हेगार. साले माणसात जमाच नाय असे . एकेकाचे कारनामे ऐकले तर धडकी भरेल . उलट्या काळजाचे हैवान साले ! मग ? लय तरास दिला साल्यांना . पोलिसांचा मार परवडला , पण सूर्ज्याची कोठडी नको म्हणतात ते . फेमस हाये रे ही कोठडी. पण सतत आत- बाहेर करणाऱ्या, पोचलेल्या गुन्हेगारांना ते माहित , तुला कसं कळणार ?. . . पण तू बिनघोर ऱ्हाय आता .”
आता तो चिरकट आवाज बराच सामान्य झाला होता.
सूर्ज्याचं ते अस्तित्व हवेची झुळूक गोलाकार फिरावी तसं फिरून तिथून गायब झालं .
साहिलला पहिल्यांदाच शांत वाटलं. तो थकून झोपी गेला.
-----

मध्यरात्रीची वेळ होती.
करण त्याच्या बेडवर शांत झोपलेला होता . त्याचा चेहरा झोपेतही रगेल भासत होता .
खिडकी बाहेरचा नीलमोहोर जणू कालमोहोर झालेला .
अचानक - त्याला छातीवर काही दडपण जाणवलं. त्याला श्वास घेता येईना. तो तडफडू लागला. त्याने डोळे उघडले . तर अचानक तो वर उचलला गेला. अधांतरी. जमिनीला समांतर. खालचा बेड बाजूला सरकला व तो धाडकन जमिनीवर पडला. तो परत उचलला गेला, तेव्हा तो बेडशीटमध्ये बांधला गेल्यासारखा झाला अन बेडशीट पंख्याला बांधलं गेलं. तो गोलगोल फिरू लागला .ओरडू लागला, किंचाळू लागला.
" वाचवा वाचवा ..."
पण ऐकायला होतं कोण ?
त्याचं दुर्दैव , घरात आज तो एकटाच होता . आणि असतं तरी काय उपयोग ? ...
“कोण आहे ... ए , कोण आहे ते ? xxx सोड सोड मला .”
अपशब्द ऐकताच त्याला एक फाडकन मुस्काटात बसली .
अचानक तो सरळ झाला आणि तो घंटीच्या आतल्या दांडीसारखा इकडे तिकडे झुलू लागला.
मधेच ती गम्मत थांबली. तो स्प्रिंग लावल्यासारखा पंख्यालाच खालीवर- खालीवर हलू लागला . पुन्हा ती स्प्रिंग जणू तुटली. तो धाडकन खाली आदळला. सगळं अंग सडकून निघालं. तो घाबरला होता. त्याला विचार करायलाच वेळ मिळत नव्हता .
“करण… “ तो चिरकट आवाज म्हणाला .
“क- क कोण ?”
“साराचा खून कोणी केला ? “
“साहिलने ”, करण म्हणाला.
त्याला एक जोरदार थप्पड बसली .जणू काही एखादा गरम लोखंडी तवा गालावर बसल्यासारखी .
“... मी केला मी ... खून ...”
“ समदं सांग पद्दतशीर. नायतर ...”, तो चिरकट आवाज म्हणाला.
“सांगतो “.
“हां! अन तो मोबाइल- तो चालू कर. “
“मोबाइल ? तुला रे क्का- काय माहिती ? “
“ ए शान्या , गप ! आमालाबी काळाबरोबर जायला लागतंय. कंचं माडेल हाय ? जाऊ दे असंल कुठलंबी . “
“काय ? तू कोण हायेस ? तुला हे काय माहिती ?”
“ए, फुकाट टाइमपास नको . मीबी मोबाइल वापरलेला हाय. फक्त माजं जुनं ,तुजं माडेल नवीन असंल, येवढंच. मोबाइल चालू कर . व्हिडीओ बनव त्याचा . “
“नाही !”
“नाही ?” त्याला एक फाडकन तोंडात बसली .
करणने गपगुमान मोबाइल चालू केला . व्हिडिओचं बटन चालू केलं .
तो बोलू लागला -
“आम्ही सगळे एका कंपनीत आहोत. चांगला ग्रुप आहे आमचा, मोठा. आम्ही नेहमीच काही ना काही मजा करत असतो . फिरणं , भटकणं , खाणं - पिणं .
त्यादिवशी रात्री आमची अशीच एक पार्टी होती . साराच्या फ्लॅटवर . ती एकटीच राहायची. आम्ही आठ- दहा जण होतो . त्यामध्ये सारा, साहिल अन मीही होतो .
साहिल खूप प्यायला . आम्ही निघालो पण त्याला उभं राहवत नव्हतं. सारा म्हणाली , त्याला राहू दे इथंच.
सगळे गेले .पण मी परत फिरलो .
मला वाटलं ,साहिल तिथे का म्हणून राहणार ? रात्री काही कमी-जास्त ? ...
मला सारा आवडायची . त्या रात्री तर ती खलास सुंदर दिसत होती . मला काही ठीक वाटेना . माझ्या डोक्यात धुंदी होतीच पण माझ्या मनातदेखील .
मी तिच्या घरी गेलो. तिने दार उघडलं.
साहिल अजून लास होता.
मी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने मला प्रतिकार केला .
सारा ओरडली ,” साहिल, साहिल “…
तिचा आवाज ऐकून तो उठला. पण परत आडवा झाला . मग ती मला ओरडली ,” करण ,थांब ! “
तरी मी तिच्या अंगावर झेपावलो. तिला आसुसून मिठीत घेतलं : पण ती निसटली. किचनमध्ये पळाली . तिने ओटा चाचपडला . चमचास्टॅन्डला हात लागताच तो खाली पडून त्यातला एक चाकू तिच्या हाताला लागला . तिने तो माझ्यावर उगारला. पण मी तिचा हात धरला आणि झटापटीत तोच चाकू तिच्या मानेवरून फिरला.
गळ्यातून गरम लालभडक रक्ताची चिळकांडी उडाली. तिला ओरडताही आलं नाही. ती खाली पडली .
मी घाबरलो .थोड्याच वेळात मी तिथून पळून गेलो .
तेव्हा साहिल तिथेच होता ... “
तो थांबला .
“हां- झालं ?” त्या आवाजाने विचारलं.
“हो..हो “
“आता तो विडिओ तुमच्या समद्या गुरुपवर पाठव. वाटसॅप कर “
करणला पुढचं चित्र लक्षात आलं,तसा तो थांबला .
आणि समोरच्या त्या अनियमित आकाराला एक चेहरा उगवून आला . उग्र , राकट , ओबडधोबड.
त्याला दोन डोळे होते ,अंगारासारखे. डोळ्यातली काळी बुब्बुळं येत होती, जात होती. मगरीचे डोळे असल्यासारखी बुब्बुळं. मध्येच ती घड्याळाच्या लंबकासारखी हालत होती.
त्याने तो व्हिडिओ मग समोर न बघताच शेअर केला .
मग तो शुद्ध हरपून जमिनीवर कोसळला .
त्या डोळ्यांमधले बुब्बुळांचे लंबक हलायचे थांबले . काम झालं होतं . ते तिथून निघून गेलं .
-----
पुढे यथावकाश साऱ्या गोष्टी पार पडल्या .साहिलवरचा आरोप मागे घेण्यात आला .
तो कोठडीतून मुक्त झाला .
आणि सूर्ज्याचा आत्माही– कायमचा !
------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

र्व निरपराध आरोपींना असा सूर्ज्या भेटायला हवा.>>
मुळात असा कोणि निरपराध ज्याला न केलेल्या चुकीची शिक्षा झाली, असं नकोच घडायला
सुर्ज्या बन्लाच नाही पाहिजे आणि साहिलही

कथा मस्त Happy

अजय जी
प्रतिसादाबद्दल खूप आभार .

१. तुमची कथा वाचली . तिन्ही भाग. कंसेप्ट मस्त . छान लिहिलेय . कथा आवडली .
२. हे खरं आहे की - आपला प्रतिसाद -
कथा आवडली पण ही कथा माझ्या एका कथेच्या खुपच जवळ जाणारी आहे -
वाचल्यावर तसं वाटलं ,
३. पण काही एक पार्श्वभूमी सोडता कथेचं जे सूक्ष्म बीज असतं , ते मात्र दोन्ही वेगळं आहे . दोन्ही कथांचं स्टेटमेंट वेगळं आहे .
४. तरीही , हे असं आहे , हा निव्वळ योगायोग समजावा . आणि आपण तो मित्रत्वाच्या नात्याने समजाल, याची मला खात्री आहे .
खूप धन्यवाद .

वावे आभार
बरं वाटलं . तो सिनेमा माझा पाहायचा राहून गेलाय . आता पाहीन .

र्व निरपराध आरोपींना असा सूर्ज्या भेटायला हवा.>>
मुळात असा कोणि निरपराध ज्याला न केलेल्या चुकीची शिक्षा झाली, असं नकोच घडायला
सुर्ज्या बन्लाच नाही पाहिजे आणि साहिलही

कथा मस्त Happy

Submitted by किल्ली on 27 May, 2020 - 13:53
सहमत

. तरीही , हे असं आहे , हा निव्वळ योगायोग समजावा . आणि आपण तो मित्रत्वाच्या नात्याने समजाल, याची मला खात्री आहे .
खूप धन्यवाद .>>> ऑफकोर्स बिपीनजी..

योगायोगच लक्षात आणून दयायचा होता बाकी काही नाही.
तुम्ही नेहमीच छान लिहता.. लिहत राहा..

अजयजी पुन्हा मनापासून थँक्स .
अजून काही शेअर करायला आवडेल .
काही गोष्टी कल्पिताहून भारी असतात .
मला भयकथा लिहावीशी वाटली , सुचत नव्हतं अनेक कल्पनांचा विचार करून पाहत होतो . . तेव्हा हातात ' माझी जन्मठेप ' हे पुस्तक पडलं . बस . मी विचार केला कि तुरुंगाच्या पार्श्वभूमीवर आपण लिहू शकतो
मला जेव्हा हि कल्पना सुचली तेव्हा भारी वाटली . नंतर विचार करता असं लक्षात आलं की , भूत मदत करतं , हि कल्पना तर ' एक डाव भुताचा ' या मधेही वापरली गेली आहे . त्यावरून हे प्रेरित आहे असं हि लोकांना वाटू शकतं .
पण हे नेहमी असं घडतं कि -
मध्ये एका मोठ्या व चांगल्या लेखकाचे विचार ऐकण्याचा योग आला , ते असं म्हणाले कि एकच , सेम कल्पना दोघांना
सुचू शकते . नाही असं नाही . पण सादरीकरण सेम असू शकत नाही .
पुप्रप्र

मध्ये एका मोठ्या व चांगल्या लेखकाचे विचार ऐकण्याचा योग आला , ते असं म्हणाले कि एकच , सेम कल्पना दोघांना
सुचू शकते . नाही असं नाही . पण सादरीकरण सेम असू शकत नाही >>

हे खरं आहे...मागे एक कथा माझ्या डोक्यात होती.. अर्धी लिहलीपण होती पण फेसबुकवर सेम तशीच कथा वाचण्यात आली .. आश्चर्य वाटलं खुप... पण सादरीकरण सेम कधीच असू शकत नाही...

अजय जी
थॅक्स .
मी एवढ्यात एक कच्ची कथा लिहिली ,आत्ता लॉक डाउन मंध्ये . अन लॉक डाउन वरच . मध्येच मित्राचा फोन आला . त्याला ती कथा सांगितली तर तो म्हणाला कि त्यालाही तशीच एक कथा सुचलीये . फक्त पात्र अन परिस्थिती वेगळी . त्याची शॉर्ट होती अन माझी थोडी मोठी . मलाही तेव्हा धक्का बसलेला .
संगीताचं हि तसाच असावं . एकच राग घेऊन दोन संगीतकार गाणं करतात . चाल वेगळी पण स्वर तेच . अर्थात संगीत हे वेगळा प्रांत आहे . जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील
पु प्र प्र