तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा

Submitted by अदित्य श्रीपद on 15 April, 2020 - 09:38

तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा
चिकन १/२ कि
चिकन धुवून त्याला मीठ हळद आणि लिबू किंवा विनेगर १बुच लावून फ्रीज मध्ये ठेवावे. सोया सॉस लावल्यास ही चालते
गरम मसाला बनवण्यासाठी
१. जिरे – १ छोटा चमचा
२. शहाजिरे- १ छोटा चमचा
३. खसखस – २ चमचे ( मध्यम आकाराचा चमचा)
४. लवंगा - ४-५ लवंगा
५. हिरवा वेलदोडा – ७-८
६. काळी मिरी – ४-५ दाणे
७. काळा वेलदोडा- २-३
८. जावित्री – २ कळ्या
९. दगड फुल – चमचाभर
१०. तमाल पत्र – ३-४
११. धणे- ५-६ मोठे चमचे
१२. चक्री फुल – १-१/२ फुलं
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वर दिलेले सर्व जिन्नस आधी मिक्सर मधून फिरवून त्याची भरभरीत पूड करून घ्या. (वस्त्रगाळ पूड करू नका. मसाल्याची चव लागत नाही.) कढईत ते मोठ्या आचेवर भाजा (तेल टाकू नका) थोडा रंग तपकिरी होऊ लागला आणि सुंदर वास येऊ लागला कि गॅस मंद करून त्यात २ चमचे ज्वारीचे पीठ टाका. ज्वारीचे पीठ लगेच करपते म्हणून मंद आचेवर सतत चमच्याने फिरवत मसाले आणि पीठ चांगले एकजीव होऊदे आता पीठ आणि मसाल्याचा वास येऊ लागेल लगेच गॅस बंद करून सर्व जिन्नस झाकण असलेल्या भांड्यात काढून घ्या अन झाकण लावा. हे महत्वाचे आहे नाहीतर तापलेल्या कढईमुळे ज्वारीचे पीठ करपून मसाला कडसर होतो. अंदाज येत नसेल तर मसाले थोडे कच्चे राहिले तरी चालतात नंतर ते परत व्यवस्थित भाजता येतात पण करपले तर मात्र कडसर लागतात. चव बिघडते. गरम मसाला थंड झाल्यावर परत एकदा मिक्सर मधून काढून वस्त्रगाळ पूड करून घ्या. हा एवढा गरम मसाला आपल्याला आता एका वेळी लागत नाही. अर्धा किले चिकनला २ ते २/५ चमचे पुरतो.हवाबंद झाकणाच्या डब्यात ठेवा. चांगला २-३ महिने टिकतो.

ओले वाटण
साहित्य
१. सुके खोबरे १/४ वाटी
२. कांदे -२ मध्यम आकाराचे
३. लसून -९-१० पाकळ्या
४. लाल मिरच्या – ४-५ देठ काढून ( बेडगी मिरची असल्यास उत्तम, रंग छान येतो.)
५. कोथिंबीर- मुठभर
६. आलं- १ १/२ इंच
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्रथम कांदे धुवून त्याला चार काप मारावे. वरची फोलपट काढू नका. गॅसवर हे कांदे आणि सुके खोबरे भाजायचे. डायरेक्ट जाळावर भाजायचे किंवा पापड भाजायची जाळी वापरू शकता. खोबरे लगेच पेटते आणि त्याला तेल सुटते त्याला छान तेल सुटले कि ते बाहेर काढून फुंकर मारून विझवावे आणि निवत ठेवावे. कांदे भाजायला थोडा वेळ लागतो, छान आत पर्यंत धग लागली आणि वरून ते काळे ठिक्कर पडले कि काढून लगेच पाण्याखाली नीववावे. काजळी धुवून काढावी थोडी राहिली तरी चालते काही फरक पडत नाही. घरात पाटा वरवंटा असेल तर उत्तम नसल्यास खलबत्ता असेल तर त्यात वर दिलेले सर्व जिन्नस घालून व्यवस्थित कुटावे एकजीव लगदा करावा. जर खलबत्ता नसेल तर सुरीने बारीक चिरून मिक्सर मधून काढा.(पण काय राव! घरात खलबत्ता ठेवाच त्यात कुटलेल्या वाटणाची लज्जत काही औरच)

आता २ मध्यम आकाराचे टमाटे बारीक चिरून तयार ठेवा

आता आपली सगळी सिद्धता झाली , आता चिकन बनवायला सुरु करू.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
कुकर मध्ये (हे चिकन कुकर मध्ये छान होते ज्यांना कढईत मंद आचेवर आवडते त्यानी तसे करावे पण कुकर मध्ये सगळे मसाले आणि त्यांची चव शाबूत राहते. अर्थात हा माझा अनुभव आहे)
तर कुकर मध्ये ३ चमचे तेल घेऊन ते मस्त गरम झाले कि त्यात २-३ लवंगा, हिंग आणि २ तमाल पत्र टाका. आता त्यात आपण केलेला गरम मसाला २-२/५ चमचे आणि लाल तिखट २-३ मोठे चमचे (किंवा चवीनुसार) टाका.गरम तेलाने मसाला लगेच जळू लागतो म्हणून मसाला जळू लागायच्या आत त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा म्हणजे मसाला जळत नाही. टोमॅटोला पाणी सुटू लागले कि आपले वाटण त्यात टाकून चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. आत्ताच वरून पाणी अजिबात घालु नका. मसाला छान परतला गेला आणि त्याला तेल सुटू लागले कि त्यात २-३ चमचे साखर घाला. त्यानंतर दोनेक मिनिटांनी चिकन त्यात टाका आणि चमच्याने नीट ढवळून त्याला सगळा मसाला नीट चोपडून. थोडावेळ चिकन तसेच मसाल्यात परतू द्या आणि मग वरून थोडे पाणी घाला. हे पाणी मसाल्याची भांडी, चिकनचे भांडे धुवून घेतलेले असेल तर उत्तम. आपल्याला किती रस्सा हवा त्या प्रमाणात पाणी घाला. कमीत अर्धा लिटर तरी पाणी असावे सर्व मिश्रण एकजीव करून थोडी उकळी आली कि चव घेऊन पहा हवे असेल त्याप्रमाणात मीठ टाका.आता कुकरचे झाकण लाऊन २-३ शिट्ट्या काढा. झाकण पडले कि हा सर्व जिन्नस चांगल्या सर्विंग बाउल मध्ये काढून वर कोथिंबीर आणि पुदिन्याची पखरण करा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

झणझणीत, मसालेदार चिकन रस्सा तयार आहे. भाकरी आणि इंद्रायणी भातासोबत बेस्ट लागतो. अजून मजा हवी असेल तर कोथिंबीर आणि पुदिन्याबरोबर सवताळलेला कांदा हि टाका आणि घरात कोळसा असेल तर एका वाटीत कोळशाचा निखारा घेऊन त्यावर चमचा भर साजूक तूप टाकून ती वाटी भांड्यात ठेवून वर घट्ट झाकण ठेवा. ५-६ मिनिटे धूर दाबा इतका छान सुवास येतो कि विचाराता सोय नाही.
(टीप वर निरनिराळे जिन्नस जरी चमच्याच्या हिशेबात दिले असले तरी हाताचे माप हे उत्तम तेव्हा अंदाज येण्यासाठी सर्व जिन्नस चमच्या चमच्याने हातात घेऊन मग पुढे वापरायला घ्यावे. मसाले भाजताना कुटताना ठेचताना वाटताना हाताने नाकाने त्याचा फील घ्यावा ह्यातून आपल्याला जो अडर्थ बनवायचा आहे त्याचे चव कशी होणार हे समजू लागते आणि आवश्यक ते बदल करता येऊ लागतात.)
---आदित्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेब,
या अडकलेल्या काळात नका ना अशा रेस्प्या टाकू. पोटात खड्डा पडतो.
रच्याकने झणझणीत आहे.

इंटरेस्टिंग रेसिपी आहे. मुख्य ज्वारीचं पीठ घरात आहे तेव्हा तो कोरडा मसाला करून ठेवेन. पुढच्या वेळी करणार्ञाला तेवढीच मदत Wink आज ग्रील चिकनचा बेत आहे सो आता नाही.

अवांतर - तुम्ही कुकरमध्ये शिजवता तो अ‍ॅल्युमिनियमचा नसेल हे पहा. त्यात शिजवून खाऊ नये असं काही आहे. डिटेल्स वेबवर असतीलच. माझ्याकडे एक दुसर्या मटेरियलचा छोटा कुकर आहे त्यात करायला सांगेन तुम्ही इतकं लिहिलं आहे तर.

सविस्तर लिहिल्यामुळे फार खायची इच्छा होतेय Wink धन्यवाद.

नाही..........

आज कांबर करणार आहे आणि त्याच वेळी ही रेसिपी समोर आली....

Sad

जबरदस्त दिसतेय चिकन! एकदा निवांत वेळ काढून करणार आणि खाणार Lol

छान रेसिपी. नक्कीच करून बघण्याजोगी.
पण
>>तेल सुटू लागले कि त्यात २-३ चमचे साखर घाला.>>
हे साखरेचं प्रमाण जास्त वाटतंय जरा.

मस्त रेसीपी. गरम मसाल्याच्या सविस्तर कृतीसाठी धन्यवाद.

छानच रेसीपी. तनिक सावजी चिकन रस्सा सारखी रेसीपी आहे पण त्याहुन कमी मसालेदार. माझा प्रॉब्लेम म्हणजे बिर्याणी व चेट्टीनाड करून खडा मसालाच संपत चालला आहे. ज्वारी पिठा ऐवजी थालीपीठ भाजणी आहे ती चालावी. गॅस पण नाही कांदा खोबरे तव्यावरच भाजावे लागेल.
चेंज म्हणून करीन एकदा. लॉक डाउन उठला की नक्की करून बघेन.

बरोबर माहितेय फिश पेपर फ्राय एक दोन तुकडे हवे.

मायबोलीवर पाककृती हा वेगळा विभाग आहे, त्यात टाकलेल्या रेसिपी शोधायला सोप्या जातात नंतर.

कृपया मा. अ‍ॅडमिन यांना विनंती करून हे तिकडे हलवा, किंवा नवीन धागा करा ही विनंती.

आज ह्या रेसिपी ने केला. खूपच छान झाला रस्सा. भाजलेल्या कांदा खोबर्याची चव अप्रतिम!! थँक्स आदित्यजी ह्या रेसिपीसाठी.

IMG-20200523-WA0013.jpg20200523_165235.jpg