पडली दरार आहे

Submitted by निशिकांत on 12 May, 2020 - 00:29

भाग्यास आज माझ्या पडली दरार आहे
तगमग उरात भारी आई बिमार आहे

निस्तेज नेत्र, हलके हसले मला बघूनी
नजरेतुनी झिरपते माया अपार आहे

फिरवून हात करते उपदेश आज ही ती
झालो जरी अजोबा तिज मी कुमार आहे

संस्कार छान केले मूल्ये तिने रुजवली
गोट्यास नर्मदेच्या दिधला अकार आहे

शिस्तीस लावताना भासे कठोर ती पण
हृदयात खोल तिचिया ओली कपार आहे

केला हिशोब नाही प्रेमात पाडसांच्या
नगदीत देत गेली येणे उधार आहे

ज्यांच्यात गुंतली ती, सारे उडून गेले
आता तिचाच तिजला उरला अधार आहे

नंदादिपाप्रमाणे ती तेवली खुशीने
विझण्यास वादळाने, देते नकार आहे

"निशिकांत" भाग्यशाली छाया अजून आहे
आई शिवाय जीवन रखरख दुपार आहे

बिमार आईला भेटून आलो; ही गझल कलमेतून ओघळली आणि नंतर पंधरा दिवसातच माझी आई निवर्तली.

निशिकांत देशपांडे मो. न. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users