मंगोल देशा पवित्र देशा

Submitted by भास्कराचार्य on 24 May, 2020 - 02:34

"काय त्रास आहे!"

"कशाला निघालो इतक्या सकाळी बोंबलत?"

"ह्यांना सक्काळी सक्काळीच कशाला बस काढायची असते काय माहिती..."

"अ‍ॅपवर टॅक्सीही दिसत नाही जवळपास!"

असे अनेक उद्गार मनात अंधाराच्या पार्श्वभूमीवर उमटत होते, आणि मी मुकाट सामानासकट पंढरीची वाट चालावी तसा 'देह जावो अथवा राहो' म्हणून चालत होतो.

पण खरंतर थोडं मागे जाऊन सुरवात करायला हवी. सरळ छोट्या खयालाला हात घालून कसं चालेल? आधी आलापी, मग काय ते बडा खयाल, स्थायी, अंतरा वगैरे करून मगच हे. त्यामुळे आपण थोडं मागं जाऊ.

तर, "आपण मेलं कुठ्ठं म्हणून जात नाही" ह्या चीजेची आळवणी अगदी प्रातर्सायं नाही तरी मधूनमधून आमच्या घरी होत असते, हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे वसंत ऋतूची जरा चाहूल लागली, की कोकिळेची कुहूकुहू इथे फारशी ऐकू येत नसली, तरी हे ऐकू येत असतं. ह्या वर्षी मलाही जरा कुठे जाऊन यायची खाज आली होती, त्यामुळे मी स्वतःहूनच दोन-तीन दिवस कुठेतरी जाऊन यायची टूम काढली.

आता तुम्ही म्हणाल, "इथे म्हणजे कुठे?" म्हणजे पुन्हा वरचाच प्रसंग आला. तर इथे म्हणजे बीजिंगमध्ये. त्यामुळे बीजिंगपासून कुठे जाऊन यायचं म्हटलं, तरी भाषा कळण्याच्या बाबतीत आपला ठणठणगोपाळ असल्याने 'केशवाय स्वाहा माधवाय स्वाहा' पासून सुरवात करावी लागते. (सवयच आहे स्वतःचं अज्ञान लोकापुढं दाखवत फिरायची - मनातला एक चुकार आवाज.) पण परदेशी लोकांसाठी खास असलेली एक सहलमंडळी मला नुकतीच कळली होती. त्यांची २ दिवसांत इनर मंगोलियाला सहल जाणार होती म्हणे. बीजिंगपासून ६ तासांवर बसने. आता मुंबईकर माणूस धावत लोकल पकडतो, तर २ दिवसांनंतरची सहल पकडणं म्हणजे तर काय डाव्या हाताचा मळ! पण स्वच्छ शाकाहारी माणसाला हे इतकं सोपं असतं होय! आता तुम्ही म्हणाल, स्वच्छ शाकाहारी माणसाला बीजिंगमध्ये राहणंच कठीण असत असेल. तसं ते तितकं अवघड नाही. पण आपली इच्छा असेल तिथे जाऊन जेवणं आणि कुठल्या तरी मंडळीने नेलेल्या खाणावळीत जेवणं ह्यात फरक हा असायचाच. त्यामुळे "अटी लागू" जसं बारीक अक्षरांत लिहिलेलं असतं, तसा माझा प्रवास सशर्त होतो. त्यातून ह्यांची बस निघणार पहाटे ५ वाजता. जिथे बसमध्ये बसायचं ती जागा घरापासून ३ किमी दूर. त्यामुळे "निघताना थोड्या दशम्या बरोबर ठेवायला हव्या", "पहाटे ३ वाजताच उठायला लागेल" वगैरे सोपस्कार पार पाडले, अ‍ॅपवर जवळपास कुठली टॅक्सी दिसतच नाही म्हणून माफक शिव्या घातल्या, आणि घेतलेल्या सर्व खाऊ आणि इतर लवाजम्यासकट बस पकडायला निघालो.

थांब्यापाशी येऊन बघतो, तर इतर अनेक परदेशी आणि काही चिनी लोक भल्या पहाटे जांभया दाबत उभे होते. आता हे एवढे लोक एकाच बसने कसे काय जाणार, म्हणून अस्सल भारतीय माणसाच्या त्वेषाने जागा पकडायला सज्ज व्हायला सज्ज होणार होतो. पण एक म्हणजे बर्‍याच बस असणार आहेत, आणि मुळात ही सगळी माणसे वेगवेगळ्या मंडळींबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत, हे वर्तमान कळाल्यावर त्वेष मावळला. उभ्या असलेल्या लोकांत काही पाकिस्तानी लोक असल्याने त्वेषाच्या ठिकाणी द्वेष करण्यासारखी परिस्थिती होती, पण आपण 'त्यातले' नाही हे माझ्या मनाला मी नीटच समजावून वगैरेच सांगितलं. हल्ली असं फार समजावून वगैरे सांगावं लागतं म्हणे. नाहीतर मग मनात नसतानाही आपोआप द्वेषलहरी मनात उद्भवू लागतात. नाईलाजच होतो म्हणे.

असं सगळं होत असताना बस आली. मग पुढे बसू, मागे बसू, वगैरे यथासांग करून मध्यभागी बसून घेतलं. सामानाची वरच्या खणांमध्ये चेपाचेपी झाली. आणि मग बस इनर मंगोलियाच्या मार्गाला एकदाची लागली. गणपतीबाप्पा वगैरेचा गजर अर्थातच झाला नाही. बस मार्गाला लागल्यावर आमचीही गाडी झोपेच्या मार्गाला लागली. ठेचेवर ठेच वगैरे काही बसत नसल्याने 'तुमचा प्रवास सुखाचा होवो' वगैरे पाट्या नसूनही प्रवास सुखाचा होऊ लागला.

२-३ तास अशी झोप काढल्यावर महामार्गावरचा थांबा आला. इथे बरीच चिनी फळफळावळ (अहाहा हा शब्द बर्‍याच दिवसांनी पहायला मिळाला - मनातला मराठी लेखनप्रेमी मास्तर.) मांडून ठेवली होती. त्यातली एखाद-दोन आपल्या फुगलेल्या सामानात जोर करून घुसवायचं कर्तव्य पार पाडलं, आणि पुढे निघालो. बघतो तर काय! आमच्या चिनी बस ड्रायव्हरने आता पिच्चर दाखवायच्या कर्तव्याला अनुसरून चक्क आमिर खानचा दंगल लावला. त्यामुळे बसमध्ये फुकट दाखवला जाणारा चित्रपट पाहिला नाही म्हणून पाप लागायचं कारण उरलं नाही. मग आश्चर्याचा पहिला धक्का ओसरला, चिनी टीव्हीवर दंगल दिसतोय म्हणून फोटोबिटो काढून झाले, इतरदेशीय लोकांना हरयाणा, मुली, कुस्ती इत्यादी विषयांवर थोडक्यात ज्ञानप्रदान करून झाले, आणि मी खिडकीबाहेर बघायला लागलो.

IMG_20190501_083713.png

खिडकीआत मी इतका वेळ झोपलो असलो, तरी खिडकीबाहेर सूर्य केव्हाच जागा झाला होता. त्यामुळे कोवळंबिवळं ऊन केव्हाच ढगाआड गेलं होतं. पण नुकताच वसंत आला असल्याने रणरणतं म्हणावं अशीही परिस्थिती नव्हती. मातीने जो हिरवा रंग धारण करायला घेतला होता, तो हिरवा शालूबिलू म्हणावं असा काही नव्हता. पण मंगोल घोड्यांना तो हिरवा म्हणजे आजीच्या लुगड्यासारखाच प्रेमळ वाटत असेल, हे नक्की. बाकी छटा मोठी मजेदार होती हे नक्की. काळपट मातीत हिरवट रंग म्हणजे अगदी ग्रीन टी म्हणजे ह्यांचा 'मा चा' अगदी मिसळून धूम मचवत होता. तरीच चिनी लोकांना हा इतका आवडत असावा. ग्रीन टी टूथपेस्ट, ग्रीन टी गोळ्या, ग्रीन टी आइसक्रीम ... काही विचारू नका. ग्रीन टीच्या स्वादाचं चष्मा पुसण्याचं कापड उद्या मला कोणी आणून दिलं तरी आश्चर्य वाटणार नाही.

IMG_20190503_154449.png

"ह्याच हिरव्या कुरणातून उगवले मंगोल साम्राज्य! इथेच दौडली ती यलो रिव्हरथडी तट्टं!" इत्यादी विचारही मनाला चाटून गेले. "Visit Mongolia before Mongols visit you" असा विनोद स्वतःशीच करून घेतला. ह्यांच्या घोड्यांना लगाम म्हणून ठाऊक नव्हता. भारतीय उन्हाळ्यात ह्यांच्या घोड्यांच्या जाडसर केस आणि कातडीचा निभाव लागला नाही, म्हणूनच भारत ह्यांच्या आक्रमणांपासून बहुतकरून सुरक्षित राहिला का? एज ऑफ एम्पायर्स खेळताना चंगीज खान म्हणून खेळण्याची आठवण तर माझ्या वयाच्या हजारोलाखो लोकांना असेल. चंगीज खानचं नाव सर्वपरिचित असलं, तरी त्याचा सुबुताई हा सेनाधिपती खरा सैन्याची खेळी करणारा. त्याच्या सैन्यखेळ्या कल्पक आणि विकसित होत्या. एकमेकांपासून हजारो किलोमीटर्स विभक्त असलेल्या सैन्याच्या वक्तशीर आणि सुसूत्र खेळ्या रचून त्या यशस्वी करणारा हा सेनापती. पण त्याचं नाव फार कुणाला माहितीही नसेल. नियतीची स्वतःची अशी वेगळीच खेळी असते हेच खरं.

IMG_20190501_163625.png

छोट्याछोट्या टेकड्या उन्हाने न्हाऊन निघाल्या होत्या. मागे पडत होत्या. आकाशात एखादाच ढग शाळा सुटल्यावर मागे चुकारणार्‍या पोरासारखा उंडारत होता. वारा चढत होता, आणि पडतही होता. 'शेअरमार्केटसारखा' असं म्हणायची फार इच्छा झाली, पण 'शी: शी: काय ही उपमा ती' असं म्हणून ती मागे घेतली. असं होत होत आम्ही 'होह्होट' ह्या इनर मंगोलियाच्या राजधानीला येऊन पोचलो.

इनर मंगोलिया हा खरं तर चीनचाच मंगोलियाला लागून असलेला प्रांत आहे. म्हणजे मंगोलिया बघणं होऊन जातं आणि व्हिसाचीही भानगड नाही. अर्थात मला हेही ठाऊक नाही की तिथे जायला व्हिसा लागतो की नाही, पण आळस हा स्वभावधर्म ... असो. होह्होट शहरी मंगोल लिपीतले आणि रशियन लिपीतले फलक वगैरे दिसायला लागले, आणि ते दोन्ही वापरतात, हे एक ज्ञान झाले. आता बसमध्ये ५-६ तास होऊन गेले होते, आणि जेवायचीही वेळ जवळ यायला लागली होती. त्यामुळे आता कंटाळ्याने डोकं वर काढायला सुरूवात केली. शहरात तर आलोय, पण नुसतंच इकडेतिकडे फिरतोय असं दिसायला लागलं. मग एका पेट्रोल पंपी थांबल्यावर मार्गदर्शक साहेबांना पकडून त्यांच्याशी बोलल्यावर चालक साहेब रस्ता चुकून शहरात घुसले आहेत, हे शुभवर्तमान ऐकायला मिळालं. बोंबला! हे नवीनच प्रकरण आलं. पण बस प्रवासात असं काही होण्याचा मला सरावच आहे. हिमालयात एकदा बस खराब होऊन २५ तास साधना झाली होती, तर बाल्टिमोरजवळ बस खराब होऊन ३ तास गेले होते. त्यामुळे फक्त रस्ताच चुकलाय ना, मग ठीक आहे, म्हणून बसमध्ये बसलो. मग होह्होटबाहेर निघून ज्या 'शिलाम्युरेन' कुरणामध्ये आजचा मुक्काम होता, तिकडे येऊन पोचलो. तोपर्यंत दुपारचे ३ वाजून गेले होते.

इथे आमचं स्वागत करायला इनर मंगोलियामधले मद्य घेऊन तरूणी उभ्या होत्या. प्रवास संपल्यावर सुस्वागतम आणि तो सुखरूप केल्याबद्दल पितरांचे आभार म्हणून चार थेंब आकाशात उडवायचे, ही नवीन माहिती मिळाली. आता माझे स्वर्गस्थ पितर तिकडे वर सोमरस पित असतील की नाही ह्याची कल्पना नाही, पण ह्या भुईवर त्यांना दारू दिली असती तर त्यांनी मला आभाळात पाठवला असता. त्यामुळे स्पर्श न करता चार थेंब उगीच उडवल्यासारखं करून पुढे गेलो.

IMG_20190501_155841.jpg

मग ज्या मंगोल यूर्टमध्ये आमचा मुक्काम होता, तिकडे सामान ठेवून पटकन जेवण आटपून घेतलं. इथे मंगोलियावरच्या बौद्ध प्रभावाची ग्वाही मिळाली. बरेच शाकाहारी (आणि मांसाहारी) पदार्थ दिमतीस हजर होते. टोफू, कोबी, याक चीज, बटाटे ... व्वा! (मांसाहारी मंडळी, माफी असावी. - मनातला सहिष्णु वगैरे विचार) फटाफट खाऊन कुरणावर गेलो. काय माहौल होता म्हणून सांगू. लांबच्या लांब गवत असं पसरलंय, त्यात घोडे चरतायत आणि दौडतायत. पलीकडे यलो रिव्हरची अंधुक रेषा लांब क्षितिजावर दिसते आहे. सूर्य हळूहळू अस्ताला जातो आहे. मला तर नुसतं हे बघत राहायला चाललं असतं, पण आमच्या यजमानांनी आम्हाला मंगोल कुस्ती बघायला बोलावलं. उगाच 'जगायाची पण सक्ती आहे, मरायाची पण सक्ती आहे' आठवलं. कुस्तीवीर मंगोल पारंपरिक पोशाखात उभे होते. त्यांनी एकमेकांना 'ट्रॅशटॉ़क' करायला सुरू केलं. मला त्यातला एक जरा बेरकी वाटल्याने दुसरा जिंकावा अशी इच्छा मनी आली. मग बराच वेळ बडबड करून झाल्यावर ते एकमेकांशी झोंबाझोंबी करायला लागले. आणि एकदम बेरकी माणसाच्या मानगुटीवर दुसरा जाऊन बसला आणि सोड सोड म्हणेपर्यंत त्याला खाली पाडलं. (कुस्तीमधलं मला इतकंच कळतं, हे सुज्ञास सांगणे नलगे.) मग कुस्तीवीरांनी स्वतः ऑलिंपिक गोल्ड मेडलिस्ट असल्याच्या थाटात आम्हाला आव्हान द्यायला आरंभ केला. मग आमच्यातल्या दोन ऑस्ट्रेलियन कॉलेजवीरांनी जाऊन स्वतःला आपटून घेऊन कपडे खराब करून घेतले. आणि हे सगळं होत असताना सूर्य आपला खाली येतच होता.

IMG_20190501_163351.jpg

मग आम्हाला घोड्यावर चढवण्यात आलं. मंगोल जगज्जेत्याच्या थाटात मी खोगीर नसलेल्या घोड्यावर बसलो. दुसर्‍या घोड्यावर आमची ही बसली. आणि इतर घोड्यांवर बाकीचे लोक, अशी ही घोड्याबरोबर आमची यात्रा निघाली. पण घोडे धावणार नाहीत, नुसतेच चालणार, म्हटल्यावर त्या घोड्याइतकाच आम्हाला त्या यात्रेत रस राहिला. मग दीड-दोन किलोमीटर त्या घोड्यांवर फिरून आल्यावर संध्याकाळच्या जेवणाचीच वेळ झाली. पण मी आणि ही त्या कुरणावरच अडून राहिलो. कारण मंगोल साम्राज्यावरचा सूर्यास्त नाही बघायचा तर काय बघायचं?

आयुष्यात मी भरपूर प्रेक्षणीय सूर्यास्त पाहिले आहेत, पण ह्या सूर्याने वेगळीच भूल पाडली, हे खरं. कधीतरी वयोमानानुसार मी म्हातारा होईन, तेव्हा मला हा सूर्यास्त आठवेल. लांबच्या लांब पसरलेला हिरवा रंग, त्यावर स्वच्छ प्रकाश पाडणारं, झरझर खाली जाणारं सूर्यबिंब आणि बरोबरीला पत्नी, हे म्हणजे भलतंच मऊशार धाग्यांनी गुंफलेलं चित्र आहे.

IMG_20190501_191939.jpg

एकदाच आकाशा
मनामध्ये हाक दे
देह राही मोकळा
गाडीला ह्या चाक दे

झाकू नको क्षितिज हे
प्रकाश मज राहू दे
एक नदी दे मजला
प्रवाहात वाहू दे

अशा ओळी मनात चमकून गेल्या. पण असो. मग आम्ही मंगोल कपड्यांमध्ये फोटो वगैरे भलताच रोमँटिकपणा केला. मजा आली.

एव्हाना थंडी जोरदार पडायला लागली होती. यूर्टमध्ये जाऊन पांघरुणात गुरफटून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. अंथरूणात हीटींग पॅड होतं, पण बाहेर पडायची सोय नव्हती. अशी कडकडून थंडी वाजण्यातही काय मजा असते खरं तर. पहिल्यांदाच मी ८ वाजता आडवा झालो असेन. त्या मजेत थकव्याने घोरासुराचं आख्यान कधी लागलं, हे कळलंही नाही.

आता सूर्यास्त इतका पाहिला म्हटल्यावर सूर्योदय पाहणं हे आलंच. आयुष्यात मी पहिल्यांदाच दोन सलग दिवशी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठलो असेन कदाचित. त्यातून संत्र्याचा रस कपड्यांमध्ये झिरपावा तशी कुडकुड थंडी शरीराशी लगट करत होती. पण त्या गवताची आणि हवेची नशा डोक्यात चढली होती. सूर्योदयाची वेळ टळून जाईल म्हणून कपड्यांचा जामानिमा कसाबसा आटपून धावत मैदानात पोहोचलो, तेव्हा सूर्यबिंब अगदी कणभर वर यायची वाटच बघत होतं. त्या एका कणाने माखलेलं क्षितिज बघायला मला फार मजा येते. एकच कण, पण त्याचा लाल रंग अक्ख्या क्षितिजाला सोनेरी कडा देऊन जातो. ग्रहणाच्या वेळेसही त्या चिरंतन अंधाराच्या पोटातून तो प्रकाशाचा एक कण डोकावतो, तेव्हा काय मजा येते! माणसाने अश्या प्रकाशाचा अभिलाषी असावं, असंच मला वाटत आलं आहे. ह्या प्रकाशाच्या पोटातूनच उगवली आहेत साम्राज्यं! ह्याच प्रकाशाच्या पोटी ती भस्मही झाली आहेत. शेवटी सूर्य उग्ररूप धारण करेल आणि धरणीचं आणि त्याचं मीलन होईल, असं म्हणतात. ती अब्जावधी वर्षं बघायला मी नसेन, पण हा प्रकाश गेल्या अब्जावधी वर्षांचा आणि येणार्‍या अब्जावधी वर्षांचा साक्षीदार आहे. आणि गंमत म्हणजे त्या प्रकाशाच्या घड्याळात सेकंदाचा काटा जरा म्हणून इकडचा तिकडे झालेला नाही, असं आईनस्टाईन म्हणतो. 'इतक्या वेगात तुम्ही इकडेतिकडे फिरत बसता, सगळ्यांची कामं बघता पण जर्रा म्हणून घराकडे द्यायला वेळ नाही' अशी तक्रार त्या प्रकाशाकडे होत नसेल, हाही एक फायदा.

IMG_20190502_054024.jpg

संध्याराग असो की प्रातःराग असो, मी मौनरागच धारण करतो अश्या वेळी. पण सूर्योदयासारख्या गतिमान वेळेस पत्नी बरोबर असताना फार गप्पही बसवत नाही. त्यामुळे मग बरीच बडबड केली, त्या सूर्यनारायणाच्या वगैरे साक्षीने फोटो, सेल्फी वगैरे काढले आणि मग गाडी नाश्त्याकडे गेली. त्यात पुन्हा याक चीज वगैरे खाऊन घेतलं, आणि मग पाऊले बसकडे वळवली.

आता आम्ही पुन्हा होह्होटला जाणार असं कळलं, आणि त्या मस्त गवताळ कुरणाचा आणि झिम्माड वार्‍याचा निरोप घेतला. जाताना पुन्हा यलो रिव्हर ओलांडली. ह्या नदीच्या आणि यांग-त्से नदीच्या खोर्‍यांत पुरातन चिनी संस्कृतीचा विकास झाला. इतिहासाचे अदृश्य पहारेकरी इथे आता 'अवधारिजो जी' म्हणत काळाच्या तावदानांमधून आमच्याकडे गंभीरपणे बघत असतील, असं वाटलं. इतकंच काय, तर आशियामधले महाकाय डायनोसॉर वगैरेचे सांगाडेही इथे सापडतात. त्यामुळे जीवनाला रस देणारी सुजलाम सुफलाम अशी ही भूमी आहे, हे नक्की. इथले असे सगळे पुरावे प्रेमाने जपून ठेवणार्‍या वस्तुसंग्रहालयामध्येच आता जायचं होतं.

IMG_20190503_093618_1.jpgIMG_20190503_094005.jpg

तिकडे पोचल्यावर रांगाबिंगा लावून आत गेलो. पाहतो तर भलामोठ्ठा डायनोसॉरचा सांगाडा. अमेरिकेबाहेर सापडलेला हा सर्वात मोठा सांगाडा म्हणे. इतरही भरपूर होते. इनर मंगोलियाचे पठार डायनोसॉर जीवाश्म मिळण्यासाठी प्रसिद्ध आहे, ही माहितीत भर पडली. मग तिथे फोटोबिटो काढले. डायनोसॉरची मान दुखत कशी नसेल, ह्यावर लघुचिंतन केलं. 'आय अ‍ॅम नॉट फॅट! आय ओन्ली हॅव बिग बोन्स!' असं तो डायनोसॉर त्याच्या सवंगड्यांना सांगत असेल, अशीही कवीकल्पना केली. मग संग्रहालयात जरा अलीकडच्या काळातले म्हणजे फक्त तीन हजार वर्षांपूर्वीपासूनचे प्रदर्शन बघायला गेलो. मंगोलिया आणि इनर मंगोलियाच्या जमाती, त्यांचं कालौघात झालेलं एकीकरण वगैरे भरपूर बघून घेतलं. सगळं बघायला काही अर्थातच वेळ मिळाला नाही, कारण दुपारचं जेवण करून परत बीजिंगला प्रस्थान करायचं होतं. सुटी संपवून परतणारी भरपूर वाहतूक रस्त्यात लागणार होती. त्यामुळे इनर मंगोलियन हॉट पॉट खायला लगेच गेलो.

इकडे त्यांनी शाकाहारी लोकांना वेगळ्या खोलीत काढलं. खोलीमध्ये भलं मोठं मेज, त्यावरच्या मोठ्ठ्या भांड्यात पाणी खदखदतंय, आणि आजूबाजूला भरपूर भाज्या आणि मश्रूम्स आणि टोफू असा सगळा थाटमाट होता. शाकाहारी लोकांत ५-६ भारतीय, १ रशियन, १ जर्मन, १ स्वीडिश असा माहौल होता. मग भाज्या आणि मश्रूम्सबरोबर एकमेकांच्या अनुभवांचीही देवाणघेवाण झाली. मस्त गप्पा मारत जेवलोबिवलो. मी तर इतकं हादडून घेतलं, की आता डायनोसॉरच्या जागी माझा सांगाडा उभा केला जातोय की काय, असं वाटायला लागलं. मंगोलियन दही तर इतकं गोड आणि चविष्ट होतं, की जिथे ते मिळेल तिथे ते घेऊन खायचा आता पणच केला आहे.

IMG_20190503_120538_1.jpg

मग आली परत जाण्याची वेळ. गूगल मॅप्सच्या चिनी आवृत्तीवर कळलं, की बीजिंगला जाणारे सर्व रस्ते गच्च आहेत. हे कळल्यावर मी आधी वॉशरूमचा रस्ता शोधून ती सोय करून घेतली. मग आमची बस डुलतडुलत बीजिंगकडे जायला निघाली. माझ्यासारखा शहाणपणा इतर लोकांनी न दाखवल्यामुळे आमच्यातल्या काही नेपाळी लोकांना तासा-दीडतासातच निसर्गाने हाक मारली. मग त्या हाकेला नेपाळीमध्ये 'ओ'ला जे काय म्हणतात ते त्यांनी कसं दाखवावं, हे कळेना. शेवटी त्यांचा भलताच नाईलाज झाला आणि अगदी उपखंडीय पद्धतीने ते न हलणार्‍या वाहतुकीतून धावत जाऊन रस्त्याकडेच्या जंगलात अदृश्य झाले! माझ्यावर ही वेळ न आणल्याबद्दल मी नंतर स्वतःचेच आभार वगैरे मानले.

एकंदरीतच सर्व प्रकारचे शरीरधर्म मागे लावून नियतीने मानवाच्या मागे वेगळाच व्याप लावला आहे. उत्क्रांतीच्या अगदी परमोच्च बिंदूला सर्व मानवांचा आत्मा (conscious) एकमेकांत विलीन होईल, आणि वेगवेगळ्या विलग शरीरांची गरजच उरणार नाही, असं झालं तर काय मजा येईल! शेवटी अफगाणिस्तानपासून मंगोलिया-चीन-जपानपर्यंत ह्या गौतम बुद्धाचा विराट विश्वविजय झाला तो त्याची शरीरधर्मोद्भव दु:खांचा उगम शोधण्याची कळकळ लोकांना भावली म्हणूनच का? सिद्धार्थ, शाक्यमुनी, मैत्रेय, कितीकिती रूपांनी हा शोधक अडीच हजार वर्षे वेगवेगळ्या लोकांना भावतो आहे! माझ्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर लांब ह्या बुद्धाच्या पन्नासफूटी चंदनी मूर्ती वेगवेगळ्या सम्राटांनी बनवून घेतल्या, त्यांना काय भावलं असेल नक्की? किती विलक्षण असा हा मानवी संस्कृतीचा प्रवास होतो आहे? आजच्या काळात आहेत तसे घृणेचे व्यापारी तेव्हाही असतील, पण शेवटी विजय ह्या करुणेच्या पुजार्‍याचाच होईल का? छे:! किती नाना प्रश्नांचे भुंगे ह्या डोक्याला सतावतायत?

भरपूर विचार केला, पण त्या बसच्या धीम्या गतीपेक्षाही सच्चिदानंद वगैरेचा माझ्या डोक्यात घुसण्याचा वेग कमी आहे, असं ध्यानात आलं. त्यामुळे बुद्धाचा कार्यक्रम कधीतरी पुन्हा करू, असा विचार करून मी इतर काहीबाही विचार करायला लागलो. तेवढ्यात आमच्या बसवाल्या साहेबांनी गाडी बाजूला घेऊन कुठल्यातरी बायपासला लावली. इथे पुन्हा माझ्या काळजाचे ठोके चुकायला लागले. पण बीजिंगपासून दूर जाताना आमचे साहेब शेळी असले, तरी बीजिंगकडे जाताना वाघ होते. त्यामुळे त्यांनी योग्य अंदाजाने घेतलेला रस्ता काही काळाने मोकळाच झाला आणि बस एकदम धावायला लागली. त्यामुळे माझा श्वासही जरा मोकळा झाला आणि नाडी उत्साहाने धावायला लागली. मॅप्सनी दाखवलेली ९:३०ची वेळ उद्या सकाळची नसून आज रात्रीचीच आहे, असा विश्वास दाटून आला. आणि खरंच ९:३०च्या ठोक्याला आम्ही इष्ट थांब्याला उतरलो. दोन दिवस कुरणावरचा वारा पिऊन उधळलेली आमची मनं आता अंधाराच्या कुशीत येऊन विसावायला उत्सुक होतीच. मग मस्त भारतीय जेवण घेऊन (शेवटी गाडी इथेच्च येते.) आम्ही आमच्या छोट्याशा अनुभवाची इतिश्री केली, ती पुन्हा मंगोलियाला जाऊन जास्त वेळ राहिलंच पाहिजे आणि ते दही खाल्लंच पाहिजे, ह्या विचारांचं अर्घ्य देऊन! शेवटी महाराष्ट्र काय किंवा चीन काय किंवा मंगोलिया काय, सारेच 'मंगल देशा पवित्र देशा' आहेत, हेच खरं. प्रत्येक ठिकाणचे गडकरी वेगळे असतील फार तर. आपण जमतील तितके असे छोटे अनुभवांचे तुकडे गोळा करावे, काही इतरांनाही द्यावे, हीच खरी समृद्ध संस्कृती, नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख. Happy
मंगोलिअन बार्बेक्यू कंफर्ट फूड इतका प्रचंड आवडतो.

खूप सुंदर प्रवास वर्णन व फोटोग्राफी. लेखा मध्ये कांहीं ठिकाणी, तुम्ही मिष्कील कॉमेंट्स लिहता ते वाचताना खूप मज्जा येते, खूप सुंदर.

खूप सुंदर प्रवास वर्णन व फोटोग्राफी. लेखाच्या मध्ये जे मिष्किल कॉमेंस लीहता ते वाचताना खूप मज्जा येते. लिहीत रहा.

Pages