लालेदी छोले पुरी

Submitted by Sanjeev Washikar on 22 May, 2020 - 07:49

आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी
आता तसे पहिले तर या घटनेला अनेक वर्षे होऊन गेली .मला अजून देखील तो दिवस चांगला आठवतो .मी जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी मला, माझे सिनियर्स या लालाच्या दुकानात छोले पुरी खाण्यासाठी घेऊन आले होते .लाल चौकात पॅलॅडियम टॉकीज जवळ, जी भाजी मंडई आहे ,त्या मंडईत आत शिरल्या वर डाव्या बाजूला हे दुकान होते. दहा बाय दहा फुटाच्या छोटयाशा दुकानात,बाजूच्या तिन्ही भितींना साधारण आठ इंचाची सभोवती एक लाकडी पट्टी लावण्यात आली होती . त्या पट्टीवर आपली प्लेट ठेवून,उभे राहूनच लोक मोठ्या मज्जेने छोले पुरी,टिक्कीया,सामोसे,चाट याचा आनंद घेत असायचे. काश्मिरी ,पंजाबी,मिलिटरीवाले लोक या दुकानाला जरूर भेट देत असायचे या दुकानात इतकी गर्दी होत असे कि चुकून एखादा,बाजूस असणाऱ्या माणसाच्या प्लेट मधील घास खाऊन रिकामा होत असे. जे कांही पदार्थ बनवले जात ते अतिशय स्वच्छ व आपल्या समोर तयार केले जात असत .दुकानाच्या बाहेर वरील बाजूस,एक ताडपत्री बांधलेली होती आणि पुऱ्या तळण्याचे काम या ताडपत्री खाली चाले . पुऱ्या मोहरीच्या तेलात तळत असल्या मुळे त्याचा उग्र असा वास सगळी कडे पसरलेला असायचा .सुरवातीला हा मोहरीच्या तेलाचा वास मला अजिबात आवडत नसे .या पूर्वी मी आयुष्यात मोहरीच्या तेलातील पदार्थ कधीच खाल्ले नव्हते. वासाने खुप मळमळायचे पण जशी सवय होत गेली तसे पदार्थ आवडू लागले .जेव्हा जेव्हा मी कॉलेज मधून लाल चौकात येत असे ,तेव्हा प्रथम माझे पाय,या लालाच्या दुकानकडे खेचून आणत असत ,मग एकदा का अल्पोपहार झाला कि मग बाकीच्या सगळ्या महत्वाच्या कामाची आठवण येत असे .
शुभ्र पांढऱ्या रंगाचा तीन बटणाचा शर्ट व तितकेच स्वच्छ पांढऱ्या रंगाचे धोतर नेसलेले ,चार्ली चॅप्लिन प्रमाणे मिशी असणारे साधारण सत्तरीतील ,गोरेपान पंजाबी गृहस्थ ,मोठया गंभीर भावाने येणाऱ्यांचे स्वागत करीत असत .एकदा दोनदा त्यांनी तुम्हाला पहिले ,कि बरोबर ते तुम्हाला ओळखत असत ."बाबूजी आप बहोत दिनसे नही आये ? ओ छोटू बाबुजीदी प्लेट विच बल्ले कट पाव जी ".तुमच्या आवडी निवडी देखील त्यांनी लक्षात ठेवलेल्या असायच्या .
काळ्या ,तपकिरी रंगाची छोले पुरी ज्या वेळी समोर येत असे ,त्या वेळी त्यातील अनेक मसाल्यांचा वास खरोखरच स्वर्गीय आनंद देऊन जात असत. काय ! काय ! या मसाल्यात हे लोक घालत असतील बरे ! दालचिनी ,जिरे,पुदिना मनात उगीचच विचार येत असत,बहुतेक आपली आज्जी करायची तसला काळा मसाला तर नाही . तस बघितलं तर प्लेट मध्ये छोलेचे दहा -पंधराच दाणे असायचे मात्र त्यांच्या सभोवती इतका दाट मसाला पसरलेला असायचा कि ज्याच्या चवीची तुलना दुसऱ्या कुठल्या चवीशी होणे शक्य नाही.बरोबरीने दिल्या जाणाऱ्या त्या मोठ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र मैद्याच्या पुऱ्या, लाटल्या वर लालाजी दोन हाताचे फटके देऊन त्या हळूच तेलात सोडत,पुऱ्या तळताना असे वाटायचे कि ए -४ साईजचा शुभ्र पातळ पेपर प्रिंटर मधून बाहेर येतो आहे. पुरीचा एक घास जरी घेतला ,तरी तोंडात पुरी विरघळून जात असे .
मी कमीत कमी तीन चार प्लेट छोले पुरी खात असे . कदाचित हे लाले पंजाबी वैष्णव असल्या मुळे कांदा खात नसावेत .छोले बरोबर ते नेहमी मुळ्याचा किव्हा मिरचीचा तुकडा देत असत.यांच्या मुळेच जेवताना मुळा खाण्याची आवड मला लागली असावी .आयुष्यात एकदा तरी ह्या संतरामच्या दुकानातील छोलेपुरी खाण्याची इच्छा आहे .मला माहित आहे ,हे आता कठीण आहे .बाकीच्या वातावरणा मुळे ते आता तिथे आहेत कि दुसरी कडे कुठे गेले आहेत देव जाणे .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही
तुम्ही काश्मीर ला शिकलात?अजून अनुभव येउद्या.
वर्णन खूपच जबरदस्त केलेय
भूतकाळातले असल्याने फोटो नसेल तर कुठे इंटरनेटवर किंवा मित्राकडे मिळाला तर नक्की टाका.

छान वर्णन, अजून वाचायला आवडेल.
बादवे छोले भटुरे माझ्या आवडत्या पदार्थांपैकी बऱ्याच वरचा पदार्थ.

हो, अनुजी माझे कॉलेजचे शिक्षण श्रीनगरमध्ये झाले. आपल्या सांगण्या प्रमाणे फोटो टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अभिप्राया बद्दल धन्यवाद.

वाह।.मस्त आठवण..
अजून आठवणी,अनुभव वाचायला आवडतील कश्मीरच्या.
तिकडे कसे काय शिकायला गेलात?

चैत्रालीजी, मी तिथल्या इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकलो. माझ्या बरोबर अनेक मराठी मुले देखील होती. बहुतेक मुलांच्या पालकांना लष्कराची पार्श्वभूमी होती.

मस्त

छान लिहिलंय

मी याच वर्षी आयुष्यात पहिल्यांदाच छोले भटुरे खाल्ले तेही मथुरेला. तुम्ही वर्णन केलेय अगदी तसल्याच ठेल्यावर. आम्ही जिकडे उतरलो होतो त्यांनी सांगितले की इकडे कुठल्याही हॉटेलमध्ये नाष्टा करण्यापेक्षा समोरच्या ठेल्यावरचे छोले भटुरे खाऊन तरी बघा, अन खरंच ती अप्रतिम चव अजूनही जिभेवर आहे.

VB ji,उत्तर भारतात हा प्रकार जास्त आढळून येतो. अमृतसरला देखील हा छोले भटुरे प्रकार खूप आहे. फक्त कुठे काय चांगले मिळेल हे शोधले पाहिजे. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

छान वर्णन, आवडले.
तुम्ही सांगता तसे माझे मूलीका पराठ्याबाबत झाले. आधी skeptical होते. मगं एकदम आवडलाच !!
अजून आठवणी,अनुभव वाचायला आवडतील कश्मीरच्या.......सहमत.
Happy

वाह मस्त वर्णन. वाचून छोले पुरी खावीशी वाटायला लागली! तिकडच्या अजून आठवणी नक्की लिहा>>>>+11111
पुलेशु

मी काश्मीरला काही महिने होते कैक वर्षापुर्वी. कशाला वगैरे दुय्यम बात.
पण तिथली राजमा , मसूर दाल, छोले दाल, छोले वगैरे खुपच मस्त लागायचे. राजमा सुद्धा तिथे वेगळ्या प्रकारचा मिळतो. वेगळी वरायटी. बुटका, किरमिजी किंवा गुलाबी व रेघा असलेला. मस्त लागतो.
काबुली चणे(ज्याचे छोले बनतात) सुद्धा बुटके, सफेद असत. इतके चविष्ट लागत. भिजवले की ट्प्प फुलत.

सुरुवातीला , राईच्या तेलाच्या वासाने मलासुद्धा उलटी व मळमळ व्हायची. नंतर जरा जरासेज खाल्ले तरी पोटात सुद्धा दुखायचे. खुपच उष्ण असते तेल. मग सवय लागली. तरीही इतके काही आवडीने खावू शकत नाही.
पण दुकानात व हॉटेलात झाडून सर्वजण, खायचा सोडा घालतात शिजताना.

आपल्या भारतात, खाद्य संस्कृतीमध्ये विविधता आहे. जरासे उत्तरेत सिम्ला, कुलुला आल्यावर छोले, दाल बनवायची पद्धतीत वेगळी पद्धत.