ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २३

Submitted by स्वप्ना_राज on 17 May, 2020 - 07:35

माणसाचं मन ही काय अजब चीज आहे नाही? एकाच वेळेस इतकं सगळं कसं वाटू शकतं आपल्याला? 'भावनांचा कल्लोळ' ह्या तद्दन छापील वाटणार्‍या शब्दांचा खरा अर्थ आज हा पन्ना लिहायला बसल्यावर लागला. आधी 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' ह्या न्यायाने मायबोलीची साईट ओपन होईना. झाली चिडचिड. मग लिहायला बसले तर इतकं काही लिहायचं असून शब्द सुचेनात. शेवटी लॅपटॉप बाजूला ठेवून बसले पाच-एक मिनिटं स्वस्थ. म्हटलं आजच लिहायचंय असं काही नाहीये. नाही जमलं तर बंद करून ठेवून देऊ. पण लिहायचं जमलं तर काय लिहिणार आहोत आपण?

काही लिहायला हवंय का? जे वाटतंय ते नीट पोचवता येईल का? का त्यातून वेगळा अर्थ काढला जाईल? कर्कश्शपणा वाढलाय किती आजकाल. दोन शब्द बोलावेत तर लोक चार ऐकवतात. गप्प बसावं तर रोज कसले कसले व्हिडिओज, फोटोज, मतं, मतांतरं, लोकांच्या मनीची गुजं, आम्ही लॉकडाऊनमध्ये काय करतोय ह्याची वर्णनं, कोविड होऊ नये म्हणून काय करा आणि काय करू नका ह्याची सूचनापत्रं. यंव आणि त्यंव. बरं फोनचं असं आहे की असून अडचण आणि नसून खोळंबा. माणसाने करायचं तरी काय?

मी खूप संवेदनशील नसले तरी अगदीच असंवेदनशील नाहिये ....बहुतेक. महिन्या-दोन महिन्यांपूर्वी आपापलं आयुष्य जगत असलेली एव्हढी सगळी माणसं एकदम ध्यानी मनी नसताना जाताहेत. त्यांच्या जवळच्या व्यक्तींना त्यांचं अंत्यदर्शनही घेता येत नाहीये. हातावर पोट असलेली गरीब माणसं कच्च्याबच्च्यांना घेऊन मैलोन मैलांची पायपीट करत निघताहेत. कोणाला रस्त्यावर मृत्यू गाठतोय तर कोणाला रुळांवर. त्यांचं ज्यांना सोयरसुतक हवंय त्यांना उशीरा जाग येतेय. आणि आपण हळहळण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसांत दुकानातले रिकामे शेल्फ्स पाहून विलक्षण हबकायला झालं होतं. आपल्याला खायला मिळेल ना हा प्रश्न पडल्याचं मला लख्ख आठवतंय. कधी न झोपणारं शहर अशी ख्याती असलेल्या माझ्या मुंबईतल्या सुनसान रस्त्यांनी मला मुळासकट हादरवलं होतं. रानडे रोडवर वाणसामान घ्यायला उभी असताना भर टळटळीत दुपारी रातकिड्यांचा आवाज ऐकून दचकले होते. पॉपकॉर्न खात एखादा जगबुडीवरचा चित्रपट पहात बसावं आणि काहीतरी गडबड होऊन आपणच त्या चित्रपटात शिरावं तसं वाटलं सुरुवातीला. आजही तसंच वाटतंय.

आता हे रूटीन अंगवळणी पडतंय का काय ही भीती आहे. बिनडोक मेसेजेस तितक्याच बिनडोकपणे फॉरवर्ड करणार्यावरचा वैताग आहे. ज्या वादांतून कोणाचंही मतपरिवर्तन होणार नाही असले वाद हिरीरीने घालणार्‍यांचा राग आहे. हे सगळं ठीक होईल ना अशी धाकधूक आहे.

पण ह्या सगळ्यांपलिकडे एक विलक्षण कंटाळा आलाय. इंटरनेटच्या पानापानांवर ठाण मांडून बसलेल्या कोविडच्या टक्केवारीचा. मुंबईची चिंता वाढली/पुण्याची चिंता वाढली असं ओरडणार्या न्यूज चॅनेल्सचा. घरकाम करणार्या बायकांना सोसायटीत येऊ द्यायचं की नाही ह्यावर उहापोह करत फरसाणवाल्याला मात्र न चुकता येऊ देणार्या सोसायटीच्या ग्रूपमधल्या लोकांचा. आम्ही लॉकडाऊनमध्ये यंव केलं नी त्यंव केलं असं रसभरित वर्णन करणार्यांचा. सेलेब्रिटीजच्या शेअर केलेल्या फोटोजचा. मार्केटमध्ये मास्क चढवून जाण्याचा. एका यादीतल्या दहा वस्तूंसाठी चार दुकानं फिरण्याचा. आयुष्य कधी पुन्हा पहिल्यासारखं होईल ह्याची वाट बघण्याचा.

आजकाल कुठलीही साईट उघडली की मी आधी तो कोविडच्या टक्केवारीचा फिरणारा क्यूब बंद करते. आणि दर वेळी क्षणभर का होईना पण थबकते.

मी असंवेदनशील आहे का? बहुतेक.......
--------------

'बोला, तुम्हाला काय पाहिजे?'

'दोन खारी, एक टोस्ट, एक दही, १०० ग्रॅम पनीर' मी यादी सांगितली.

आमच्या दूधवाल्याने सगळ्या वस्तू समोर काढून ठेवल्या आणि टोटल करायला सुरुवात केली. त्याच्या एका हातातला ग्लोव्ह थोडा फाटला होता. फाटका ग्लोव्ह घालून काय उपयोग? माझ्या मनात येऊन गेलं. तेव्ह्ढ्यात एक बाई रांगेच्या विरुध्द दिशेला येऊन उभी राहिली. म्हातारी होती. क्यूमधलं कोणी काही बोललं नाही. तिला क्यूची सवय नसावी. काही महिन्यांपूर्वी आम्हाला तरी कुठे होती?

तिने जे मागितलं ते दूधवाल्याने दिलं आणि पुन्हा टोटल करायला सुरुवात केली.

'आणि हो, एक ब्रेड' मी म्हणाले.

'कुठला देऊ? ' मी खांदे उडवले. ह्या प्रश्नाला 'तुमच्याकडे असेल तो' एव्हढंच उत्तर सांप्रतकाली संभव होतं. ब्रेड आहे हेच खूप होतं.

'गोल्डन डिलाईट देऊ?' त्याने विचारलं. मी चमकले.

'अरे वा! आहे का गोल्डन डिलाईट? द्या'

पैसे चुकते करून मी निघाले तेव्हा दोन(च) महिन्यांपूर्वीचा बेकरीतला संवाद आठवला

'एक व्हाईट ब्रेड, फुल, गोल्डन डिलाईट'

'गोल्डन डिलाईट व्हाईट संपलाय. ब्राऊन देऊ?'

'नको'

'दुसरा कुठला व्हाईट देऊ का?'

'नको'

'खाईन तर तुपाशी' ही माझी मिजास एक क्षुद्र विषाणू हां हां म्हणता उतरवेल असं स्वप्नातसुध्दा वाटलं नव्हतं कधी. आता जे उपलब्ध आहे ते घ्यायची, समोर दिसतंय ते उद्या मिळेल की नाही माहित नाही म्हणून आजच घेऊन टाकायची सवय लागेल की काय अशी भीती वाटते.
----

'स्वप्नाच्या आई, गोकुळ दूध येणार नाहिये आज. दूधवाल्याकडे जाम गर्दी झालेय' लॉकडाऊन सुरू झाल्यावर एक दिवस सकाळी सकाळी कामवाल्या बाईने 'आजकी ताजा खबर' दिली. उरलेल्या चहाचा घोट घशाखाली ढकलून मी घाईघाईने दूधवाल्याकडे धावले तेव्हा फक्त गाईचं दूध शिल्लक होतं. आम्हाला म्हशीच्या दुधाची सवय. ते पिऊन पिऊनच मला म्हशीसारखी शिंगं उगारून धावून यायची सवय लागलेय असं माझ्या भावाचं माझ्याबद्द्लचं ठाम मत आहे. असो.

'उद्या येणार आहे का दूध?' मी 'शब्द बापुडा केविलवाणा' स्वरांत विचारलं.

'माहित नाही हो'

'तुमचा नंबर देता का? सकाळी फोन करून विचारते'

त्याने नंबर दिला. सुदैवाने दुसर्‍या दिवशीपासून शहराचा दूधपुरवठा सुरळीत झाल्याने त्याला फोन करायची गरज पडली नाही.

मग २-३ दिवसांनी चॅट लिस्टमध्ये नसलेल्या कोणाला तरी मेसेज करायला Contact list स्क्रोल केली तेव्हा दूधवाल्याचा 'मिया बीबी बच्चों समेत' डीपी दिसला.

'अय्या, आपल्या दूधवाल्याने बघ त्याच्या फॅमिलीचा फोटो टाकलाय' म्हणत मी आईला तो फोटो दाखवला.

इतकी वर्षं त्याच्याकडून दूध घेतोय आम्ही. पण कधी त्याच्या घरातल्या कोणाला दुकानात कधी पाहिलं नाही. खरं तर सहकुटुंब सहपरिवार दुकान चालवणारे काही गुजराती दुकानदार सोडले तर बाकी दुकानदारांच्या बाबतीतही हे खरं आहे. इतकी वर्षं त्यांचे नंबर घ्यायची वेळ आली नाही. कारण एक रविवार संध्याकाळ सोडली तर दुकानं रोज उघडी असायची. फक्त सोसायटीतून बाहेर पडायचे कष्ट घ्यायचे. काही वर्षांपूर्वी सुपरमार्केट आल्यामुळे तर ह्यांच्याकडे जाणंही जवळपास थांबलेलंच. पण आज जीवनावश्यक वस्तू घ्यायला पुन्हा ह्याच दुकानांत जावं लागलं होतं. भले त्यांच्याकडे १० ब्रँडसची उत्पादनं नसतील पण माल आला की माझ्यासाठी इतका काढून ठेवा म्हटलं की ते काढून ठेवणार म्हणजे ठेवणार. sanitary napkins चा तुटवडा अशी बातमी वाचल्यावर माझ्यासाठी दोन पॅकेट्स काढून ठेवा असा मेसेज केमिस्टला व्हॉटसएपवर पाठवून मी निर्धास्त झाले होतेच की.

ज्यांच्या अस्तित्वाची आजवर मला खबरबातही नव्हती अश्या दुकानांतून मी लॉकडाऊनच्या दिवसांत खरेदी केलेली आहे. खरं तर ह्या छोट्या दुकांनात खरेदी करायची एक वेगळीच मजा असते हे इतक्या वर्षांत मी विसरूनच गेले होते. करोनाच्या निमित्ताने का होईना त्याची पुन्हा आठवण झाली.

Silver lining म्हणतात ते कदाचित हेच असावं.
----

'फरसबी कशी दिली?' तोंडावरचा मास्क सांभाळण्याची कसरत करत मी घाम पुसायचा प्रयत्न केला.

'चाळीस रुपये पाव किलो'

चाळीस रुपये? ह्या फरसबीला? 'जाने भी दो यारों' मधला धृतराष्ट्राचं काम करणारा नट विचारतो तसं 'ये क्या हो रहा है' असं विचारावंसं मला वाटू लागलं. पण मला वाटतं ते दिवस एपीएमसी मार्केट आठवड्याभरासाठी बंद होतं तेव्हाचे होते. तसंही मला गवार, फरसबी, तोंडली वगैरे भाज्या अजिबात आवडत नाहीत. फरसबी फ्राईड राईस मध्ये घालता येते म्हणा. पण सध्या चायनीज लोकांशी कट्टी असल्याने तो ऑप्शन बंद केलाय. आमच्या कविताताईच्या टोपलीतली हिरवीगार कोवळी फरसबी क्षणभर डोळ्यांसमोर तरळून गेली. Sad

'दीदी, कैसे हो?' मी हाकेच्या दिशेने वळून पाहिलं तर नेहमीची फुलवाली. कॅप, मास्क वगैरे जामानिमा घालूनही तिने मला कसं काय ओळखलं देवच जाणे. बरीच वर्षं मी फुलंही घ्यायचं बंद केलं होतं. पण ती नेहमी पूर्वीच्याच उत्साहात हसून बोलायची.

'बहोत दिनोंके बाद देखा आपको. कैसे हो?' मी तिच्यापासून काही अंतरावर उभं राहून विचारलं.

'ठीक हूं दीदी, सब बंद था ना. अभी आने लगी हूं' ती तोंड भरून हसत म्हणाली. मी पण तोंडभरुन हसले. म्हणजे मास्क घालून जितकं तोंडभरून हसता येईल तितकं. तिला बघून मला इतका आनंद का झाला ते माझं मलाच कळेना. कदाचित तिला इतक्या दिवसांनी पाहिलं म्हणून असेल. किंवा ती यायला लागली म्हणजे सगळं काही हळूहळू सुरळीत होईल अशी आशा वाटली असेल म्हणून असेल.

तशी तिच्या टोपलीत फार फुलं नव्हती. त्यामुळे असेल कदाचित पण कोणी गिर्‍हाईकही दिसत नव्हतं. खपेल ना हिचा माल? 'चलो आती हूं' असं तिला म्हणून निघाले तेव्हाही हसली ती. 'चला येते' चं हे शब्दशः हिंदी भाषांतर आहे हे लक्षात येऊन मी थोडी ओशाळले खरी पण भावना पोचल्या हे महत्त्वाचं. Happy

४-५ दिवसांनी मी बाजारात गेले तेव्हा मात्र तिच्या टोपलीत नेहमीसारखीच फुलं होती आणि भोवती (सुरक्षित अंतर राखून!) गिर्‍हाईकांची गर्दी. आज तिला इथेतिथे लक्ष द्यायला अजिबात फुरसत नव्हती.

मी मास्कातल्या मास्कात पुन्हा एकदा तोंड भरून हसले. आता इथून पुढं सगळं चांगलं व्हणार दादा.......
----

गेल्या काही दिवसांत ४-५ लोकांकडून एकच व्हिडिओ आला तेव्हा एकदाचा उघडून पाहिला. आवाज अमिताभचा. शब्द कोणाचे आहेत ठाऊक नाही. खूप शोधायचा उत्साहही नाही. तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल हा व्हिडिओ. तरी ह्या पन्न्याच्या शेवटी त्यातल्या काही ओळी द्यायचा मोह आवरत नाहिये.

माना मौत चेहेरा बदलकर आयी है
माना रात काली है, भयावह है, गहराई है
लोग दरवाजोंपे रस्तोंपे रुके बैठे है
कई घबराये है, सहमे है, छिपे बैठे है
मगर यकीन रख
ये बस लम्हा है
दो पलमे बिखर जायेगा
जिंदा रहनेका ये जो जज्बा है फिर असर लायेगा
मुश्किल बहोत है मगर वक्तही तो है
गुजर जायेगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलस...
कविता छान आहे.. हे ही दिवस जातील..

खूप सुंदर लिहिलेय...

आजवर ज्यांचे अस्तित्व माहितीही नव्हते त्यांच्या दुकानात जाऊन उभे राहायची वेळ आली. Happy Happy

Death is a great equaliser असे म्हणतात.... Death's fear is equally great equaliser असे म्हणायला हवे कोरोना संदर्भात.

किती दिवसांनी ! पण खुप छान लिहिलयं.

इतके दिवस नव्हते काही पण नेमकी आजच १ +Ve केस सापडली आमच्या एरियात. जाम भिती वाटतेय पण एक दिवस सगळ सुरळीत होईल अशी आशा आहे Happy

This too shall pass! पण जाताना आपल्याला अधिक शहाणं व, सजग करुन जाईल अशी आशा करूया.
छान लिहिलं आहेस!

This too shall pass! पण जाताना आपल्याला अधिक शहाणं व, सजग करुन जाईल अशी आशा करूया.
छान लिहिलं आहेस!
>>>> +१

स्वप्ना किती सुरेख लिहिता . हा मी तुमचा वाचलेला पहिला लेख. आता तुमचे जुने लेख शोधून वाचणे आले .
जबरजस्त लिहिता .

नेहमीप्रमाणेच प्रत्येक वाक्यांवर, अगदी अगदी झाले.
पण,
>>>> आता हे रूटीन अंगवळणी पडतंय का काय ही भीती आहे. बिनडोक मेसेजेस तितक्याच बिनडोकपणे फॉरवर्ड करणार्यावरचा वैताग आहे.<<<#

ह्याच्यासाठी, +१००००
लोकांचे ईगो पण अगदी कळसाला पोहोचलेत... नका पाठवू असले फॉरवर्ड्स तरी पाठवणार वर राग येणार , इतके काय त्यात असे प्रश्ण करणार.
बरं, ब्लॉक केलतरी पंचाईत, कारण नातेवाईक/ मैत्रीणीब पडले.
आणि, प्रत्येक वाक्याचा वेगळाच अर्थ काढणार काय बोलले तरी.

एक तर मैत्रीण, सकाळ-संध्याकाळ कोविड आकडे पाठवणार...
मी आता, उत्तर देत नाहीच.

>>> घरकाम करणार्या बायकांना सोसायटीत येऊ द्यायचं की नाही ह्यावर उहापोह करत फरसाणवाल्याला मात्र न चुकता येऊ देणार्या सोसायटीच्या ग्रूपमधल्या लोकांचा.<<<

सुरुवातीला, सोसयटीच्या ग्रूपवर तर अगदी, हाणामारी.
स्वतःची आळशी बुडं सांभाळण्यासाठी, दूध, फरसाण वाला दारात येवु द्यायच ठरले, काय नी काय.
काही लोकं वाटत नाही सुधारतील; सदैव टोमणे मारणे, कुजकटपणा , दादागिरी अगदी ह्या काळात सुद्धा ठासून भरलीय.

ते हि नो दिवसा गता:
अतिशय अप्रतिम !!!!
खूप दिवसांनी सुंदर वाचायला मिळालं

ते हि नो दिवसा गता:
अतिशय अप्रतिम !!!!
खूप दिवसांनी सुंदर वाचायला मिळालं

अतरंगी, अनघा., साधना, किट्टु२१ , चिन्नु, अनया, आसा. , जिज्ञासा, हर्पेन , कटप्पा, 'सिद्धि', झंपी, आशुचँप, सस्मित, रेव्यु, धनवन्ती धन्यवाद Happy

>>Death's fear is equally great equaliser असे म्हणायला हवे कोरोना संदर्भात.

अगदी अगदी

>>इतके दिवस नव्हते काही पण नेमकी आजच १ +Ve केस सापडली आमच्या एरियात. जाम भिती वाटतेय पण एक दिवस सगळ सुरळीत होईल अशी आशा आहे

भीती वाटू देऊ नका हो. आवश्यक तेव्हढी काळजी घ्यायची. पण त्याउप्पर उपरवालेकी मर्जी

>>पण जाताना आपल्याला अधिक शहाणं व, सजग करुन जाईल अशी आशा करूया.

फक्त आशाच करू शकतो. मला तरी असं होईल असं वाटत नाही. Sad

>>हा मी तुमचा वाचलेला पहिला लेख. आता तुमचे जुने लेख शोधून वाचणे आले .

अरे बापरे, ऑल द बेस्ट. माझे जुने लेख मीही वाचत नाही हो Proud

>>बरं, ब्लॉक केलतरी पंचाईत, कारण नातेवाईक/ मैत्रीणीब पडले.
माझ्या एका मित्राला ब्लॉक केलं नाहिये मी. पण त्याला काही फॉरवर्डही करायचं बंद केलंय. पर्सनल मेसेजेस तर दूरकी बात आहे. वाईट वाटलं कारण खूप वर्षांची मैत्री होती. पण जो माणूस दुसर्‍याला त्याचं/तिचं मत असू शकतं आणि ते आपल्याहून वेगळं असू शकतं हे मानत नाही अश्या माणसाशी मैत्र टिकवणं कठिण आहे हे लक्षात आलं माझ्या. ह्याविषयी पुढल्या एखाद्या पन्न्यात नक्की लिहिणार आहे.

>>> पण जो माणूस दुसर्‍याला त्याचं/तिचं मत असू शकतं आणि ते आपल्याहून वेगळं असू शकतं हे मानत नाही अश्या माणसाशी मैत्र टिकवणं कठिण आहे हे लक्षात आलं<<<
अगदी अगदी..

स्वप्ना, मला तुझं हलकंफुलकं लिखाण प्रतिसाद वाचायला आवडायचे, पण पन्नए (नीट लिहिता येत नाही हा शब्द) कधीच वाचले नव्हते. मी दिवसातून एखादी चक्कर मारते आणि पहिली एक दोन पानं चाळून जाते, त्यामध्ये हे वाचणं राहून गेलं असावं. आता आधीचे 22 पन्नए वाचेन.

खूप छान लिहिलं आहे. कित्येक भावना आणि मतांशी रिलेट करता आलं कारण कित्येक ओळी ' अगदी अगदी' मोमेंट होत्या. व्हाट्सअप्प वर येणारे व्हिडीओज आणि tv वर बातम्या बघून एवढं सुन्न व्हायला होतं आणि FB आणि इंस्टावरची खाखा बघून फ्रस्ट्रेशन. तू म्हणालीस तसं, मेड्स आणि लेबर्स सोसायटीमध्ये येऊ शकत नाहीत, पण बाकी इतके सप्लायर्स येतात की लोक खाणं सोडून दुसरं काही करताहेत की नाही शंका येते. एकच उदाहरण - आमच्याकडे फक्त आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या ब्रॅन्डसच्या 3 गाड्या आणि बेकरी प्रॉडक्ट्सचे 4 सप्लायर्स येतात.

प्रत्येक वाक्या करता जिओ स्वप्ना , सर्व कसं बरोब्बर पकडतेस शब्दात, सुपर्ब
पुढच्या पन्न्याच्या प्रतिक्षेत

खूप छान लिहिलंयस. दर पन्ना वाचताना बर्‍याच ठिकाणी असं वाटून जातं की मला जसं वाटतं तेच तू कसं शब्दात बरोब्बर उतरवतेस? या ही पन्न्यात तोच अनुभव आला. लिहीत रहा.

छान लिहीलं आहे. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि आजचे दिवस..
( २३ वा पन्ना म्हणजे वेगवेगळी पानं आहेत का ही ? )