देण्या साठी...

Submitted by मनोजकुमार देशमुख on 16 May, 2020 - 05:19

निष्पर्ण निःशब्द ऐकाकी
उभे ते झाड माळरानावर
वाळलेल्या फांद्या चे पसरून हात
वाट पाहत कोण्या एका पक्ष्याची

असंख्य पाखरांचा होता जिथे निवारा
आणि किलबिलाट भुकेल्या पिलांचा
होती कित्येक घरटी वाऱ्यावर झुलणारी
उरल्या केवळ खुणा त्यांच्या अस्तित्वाच्या

हिरव्यागार पानांनी बहरलेले
आणि मधुर फळांनी लगडलेले
होते जे हक्काची निवाऱ्याची जागा
येणाऱ्या जाणाऱ्या कित्येक वाटसरू साठी

श्रावण आला आणि हिरवळ देऊन गेला
पण पालवीचा कुठे मागमूस ही नव्हता
आता पुन्हा बहरणे नाही
की फळांनी लगडणे नाही

काहीच देण्यासारखे नव्हते आता
खिन्न उदास नजरेने त्याने खाली पाहिले
घेतला अंदाजा रुंद वाढलेल्या खोडाचा
आणि करू लागला आखणी पुढील प्रवासाची

त्याला वाटले व्हावे एक सुंदर शेज
आणि मौन साक्षीदार नवदाम्पत्याच्या सुखद क्षणाचा
आपल्याच विचारावर लाजले जरासे
ठरवेल त्याने छत होऊन निवारा द्यायचे

एकाच जागी आयुष्यभर उभा राहून कंटाळलेले
म्हणून वाटले त्याला चाक व्हावे भरधाव बैलगाडीचे
देवळातून येणाऱ्या अभंगाचे सुर कानी पडले
वाटले त्याला व्हावे दार मंदिराचे

दुरून चार लोक येताना पाहिले त्याने
आणि वेळेची गरज लक्षात घेऊन
काहीच वेळात सरणाची लाकडे झाले झाड
आणि राख होत स्वतः गती दिली अनोळखी प्रेताला..

Group content visibility: 
Use group defaults

छान