मेळघाटातला एक दिवस (भाग-२)

Submitted by अरिष्टनेमि on 12 May, 2020 - 14:24

अधून-मधून इकडं पाण्यावर येणा-या या बिबटाची विश्रामगृहाच्या लोकांना खोड चांगलीच माहिती. मी परतल्यावर यावर ब-याच गप्पा झाल्या. दोन बाजूला डोंगर अन् पसरत गेलेलं रान. जनावराला तोटा नाही. ससे, भेडकी, कोठरी, सांबरं, रोही, डुकरं, कधी चितळं तर कधी चराईला आलेलं चुकार ढोर. अन् काही नाही मिळालं तर रात्री गाव राखणीचं मोकाट कुत्रं.

नाले-नुले डोंगरातून उतरत होते अन् अशा उताराशी कुठं अटई, कुठं रायमुनीयाच्या जाळ्या वाढत होत्या. हातावर रेषा पसराव्यात तशा अख्ख्या रानात जनावराच्या वाटांची जाळी. दिसली दिसली, नाही दिसली अशी. उन्हाळ्यात डोंगरावर पाणी राहे नाही. पाणी कुठं खाली पायथ्याशी एखाद्या नाल्यात, बंधा-यात, नाहीतर असा एखादा नदीचा डोह.

टेंभरं सरली, चार अजून हिरवे, मोहाला टोळ्या भरू लागल्या.
21_1.jpg

अशा दिवसांत सुक्या गवताच्या काड्या चघळून हरणाच्या तोंडाला फेस येई. पण शहाणं जनावर दिवसाच्या उन्हात रानाचा आडोसा सोडून खाली उतरणार नाही. सूर्य बुडून अंधार झाला की मग अशी जनावरं हळूवार तुटक पावलं उचलत पाण्याकडं निघत. अशा एखाद्या वाटेला अभ्यासानं, अदमासानं दबून बसावं. रात्रीच्या अंधारात येणा-या हरणाला गाफील गाठून मुरगळावं. बिबट मोठा लबाड.

पाडलेल्या जनावराचं लुसलुशीत मांस पोट भरुन खाल्लं की एखाद्या जाळीत पंजे, मिशा साफ करत आराम करावा अन् तहानेची जाणीव झाली की उतरायला सुरु करावं. अशा वाटा-वाटांनी, चांदणी अंगाला लावून न घेता, सावली सावलीनं हलक्या पायानं बेतोबेत चालावं. विश्रामगृहापाशी आलं की झुडपामागं सावली होऊन उभं रहावं. कानोसा घेऊन सारं आलबेल असलं की विश्रामगृहाला वळसा घालून नदीकडं पोहोचावं. इथं लोकांनी पाण्यासाठी नदीवर उतरायला वाट केलेली आहे. या वाटेवर पंजे जमवून डोहाकडं उतरावं. समोर सारं निरखत, निरखत डोहाशी पोहोचावं. सारं शांत असेल. हळू पाण्याशी पंजे जुळवून जीभेनं लपालपा तृष्णा शमवावी. हरणाच्या खा-या रक्तानं घशाला पडलेली कोरड संपेपर्यंत यथेच्छ पाणी प्यावं. डोहाच्या काठा-काठानं नदीपात्रातून, पिक्की उंबरं तुडवत उंबराखालून, पळसाखालच्या केशरी फुलाच्या गालीचावरून, खक्क-खर्र, खक्क-खर्र ओरडणा-या वानराच्या मोहापासून चालत रहावं. पुढं नदी जिथं उजवी घेते तिथं डाव्या हातानं पात्राबाहेर पडून पुन्हा रानात घुसावं.

कधी कधी ठक्क उन्हाळ्याच्या चांदण्या रात्री मागची खिडकी उघडून हवेशीर बसलं तर अनमानधपक्यानं हा दिसूनही जाई. विश्रामगृहाला वळसा घालून खाली उतरताना टिपूर चांदण्यात याच्या अंगावरच्या पिवळ्या काळ्या चांदण्या गवतात उतरत नाहीशा होताना दिसत. मोहावर वानराचा खाकरा आला की समजावं, बिबट पाण्यावरुन उठला. खाकरा कमी होता होता पलिकडं रानात घुसताना त्याला पाहून एखादी भेडकी भुंकू लागे. त्या आवाजासारखाच हा भुतासारखा हवेत विरघळून जाई.

त्याची वाट काढत काढत मी पंजे निरखत निघालो होतो. मध्येच पायवाट ओलांडून नदीकडं जाणारी अस्वलाची पावलट दिसली. हे बेटं पलीकडच्या काठाला कशाला गेलं कोणास ठाऊक? त्याचा माग बघत मी निघालो. पाणी पिऊन अस्वल खडका-खडकानं परत फिरुन निघून गेलं होतं. इतक्यात नदीत धबकन आवाज झाला. काठाच्या दगडावर बसलेला एक विरोळा पाण्यात पडला अन् पोहत डोहात गेला, खोल, खोल. आता त्याचं डोकंसुद्धा दिसेना झालं.

डोहाच्या काठाशी बसलेला एक रातबगळा चांगलं उजाडलं तरी अजून मासे गवसतच होता. मला पाहून हळू हळू हटत मागच्या परळाच्या दाटीत घुसू लागला. ‘बरं बेट्या, तू सकाळी खा नाही तर रात्री खा. मला काय त्याचं?’ मी पुढं निघालो.

4_0.jpg

नदीतल्या खडकावर एक धोबी शेपटीचा पिळा आपटत बसला होता. याचे सारे जातभाई कधीच परत गेले कुठं कुठं. पोहोचले मायदेशी. हा एकटाच संस्थानिक आता वतन राखायला थांबलाय जणू. एका मुठीचा जीव.
5_0.jpg

नदीत पाणी पिऊन झाल्यावर वाळूत बसून काहीतरी खाणारी मातकट रंगाची पिवळ्या गळ्याची चिमणी उडून मोहाच्या लोंबत्या फांदीवर बसली. मोहाच्या नव्या पालवीला उगवत्या सूर्यप्रकाशाचं रंगीत झुंबर लटकलं होतं. त्याच्या मोहात चिमणी उडायचंच विसरून बसून गेली.

6_1.jpg

विसावं शतक सुरु होता होता हिच्या पिवळ्या गळ्यानंच ‘सालिम’ नावाच्या १० वर्षाच्या पोराला प्रश्न पडला ही ‘अशी कशी चिमणी?’ या पिवळ्या ठिपक्यापासून सुरु झाला भारतात पक्षीशास्त्राचा आजचा नवा प्रवास.

मघाशी उंबरावर बहुधा हाच होता. आता खाली सागाच्या फांदीवर बसून हा हळद्या किडे शोधतोय. याची बाकी नावंही अगदी सुंदर आहेत; हरिद्र आणि त्यापेक्षाही आम्रपक्षी. कदाचित रंग-रूप, आवाज आणि नावं सारंच सुरेख असणारा द्विजगणांपैकी हा एकटाच असावा.
माझी चाहूल लागताच यानं वळून पाहिलं. उडून उंबराच्या पानोळ्यात अजून वरच्या फांदीवर बसला.

7_0.jpg

वाटेवर खाली दुधी फुलली होती. फांदी-फांदीला पांढ-या-ढवळ्या फुलांचे घोस. झाडाला शतसहस्त्र चांदण्या लगडल्या होत्या. तारे तुटून कुठं जातात याचं उत्तर दुधीच्या झाडाला ठाऊक होतं. उन्हाळ्याच्या एखाद्या काळ्याभोर रात्री भुईला पाठ लावून झोपलं की आकाशभर फुललेली ही दुधीच तर दिसते. लखलख चंदेरी.

23_0.jpg
नाना किडे मकरंदाच्या आशेनं फुलावर येत होते. या टपो-या किड्यांना पाहून दयाळानं रियाज उरकता घेतला होता. दुधीच्या फुलाशी किडे वेचणारा हा दयाळ मला बघून दचकला. वाकड्या मानेनं निरखून पाहू लागला.

8_0.jpg

क्रमश:

लेखात वापरलेल्या बोली भाषेतील प्राणी / झाडं यांची सामान्य भाषेतली नावं

भेडकी - भेकर जातीचं हरीण. या हरणाचा आवाज कुत्रा भुंकल्यासारखा वाटतो.
कोठरी - चौशिंगा हरीण
रोही - नीलगाय
अटई - मुरुडशेगेचं झुडूप
रायमुनीया - टणटणी, Lantana
टेंभरं - तेंदूच्या झाडाची फळं
चार - चारोळीची फळं
मोहाची टोळी - मोहाचं फळ
विरोळा - पाणसाप
सालिम - डॉ. सालिम अली. थोर पक्षी संशोधक
दुधी - कुड्याचं झाड.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! लेखन, प्र चि दोन्ही आवडलं. जमत असेल तर जरा मोठे भाग टाकावेत ही नम्र विनंती आणि पुभाप्र!

वाह्!
सुरेख. फोटो आणि लेखन,दोन्ही.

फारच अप्रतिम...
मला तर काही वेळ मीच बिबट्या आहे आणि नदीकाठानं फिरतो आहे असा भास झाला ...
बोली भाषेतील शब्द वापरले की आणखीनच मजा येते.

प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद Happy
@ चंद्रा
मी या आधी लिहिलेले लेख; विशेषतः 'रानातले चावरे' आणि 'फारसे न पाहिलेले शिकारी' यावर दोन परिचितांनी असं सांगितलं की ३-४ पानं पुरेशी झाली. मोठे लेख नकोत. म्हणून मी तुकडे केले. : ) पण तुम्ही सुचवलंत त्यानुसार आता भाग थोडे मोठे करतो आहे.

तुमचे सर्व लेख पुन्हा एकदा वाचून काढले. निव्वळ अप्रतिम आहेत. वाचताना जणू स्वतःच त्या रानावनात शिरले आहे असे भासते. इतक्या अचूकपणे तुम्ही ते शब्दांतून उभे करता.
निसर्गाचा दांडगा अभ्यास आणि अनुभव जाणवतो आहे तुमच्या लिखाणातून.
चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या लिखाणाची आठवण झाली.
लिहीत रहा.
असे काही वाचले की मायबोलीवर आल्याचे समाधान वाटते.