मेळघाटातला एक दिवस (भाग-१)

Submitted by अरिष्टनेमि on 9 May, 2020 - 16:16

हिमालयातल्या बर्फात, दगड-गोट्यात रमणारा माझा मित्र रंजन. मी कधी त्याला रंजन म्हणालो नाही, “रंजा” हेच त्याचं नाव. हा गडी नेहमी मला म्हणायचा, “चल ट्रेकिंगला.” पण तो आपला प्रांत नव्हे हे मला पूरेपूर उमगलं होतं. १-२ वेळा मी हिमालयात गेलोही. पण तिथं सगळ्यांबरोबर चालणं माझ्याच्यानं नाही झालं. मी आपला फुलपाखरं, फुलं, पक्षी पहात पहात मागंच रेंगाळायचो. मी कधी त्याच्याबरोबर गेलो नाही ट्रेकिंगला, पण त्याच्या डोक्यात मी वनभ्रमंतीचा किडा सोडला. एका रविवारी दोघांनाही वेळ होता. त्याला जंगल दाखवायला घेऊन गेलो…आणि त्याला ती नशा पुरेपूर भिनली. त्याचा हिमालय सुटला नाही. मी ट्रेकिंगला गेलो नाही, पण त्याला जंगलानं पछाडलं. तो असा राना-वनात फिरून निसर्गाचा आनंद घेऊ लागला. फुलांत, फुलपाखरांत, पक्ष्यांत त्याला गोडी वाटू लागली.
1_0.jpg

माझ्याकडं जुना एक कॅमेरा होता. पण त्यानं माझ्या मागं लागून मला नवीन चांगला कॅमेरा घ्यायला लावला. तसा लोकांना पटवायला तो वस्तादच. मी भरीला पडून नवीन कॅमेरा घ्यायला गेलो. तिथं, “हे बघ हा फिल्टर घे. ती बॅग ठेवून दे, ही चांगली आहे तिच्यापेक्षा. ही अजून एक लेन्स असू दे छोटी.” ही हवा भरण्याची कामं याची सुरूच. “रंजा, पैसे नाहीत रे,” कॅमे-याच्या दुकानात उभं राहून माझी विनवणी. “नसू दे रे. मी सांगतो त्याला. उरलेले उधार. नंतर दे.” शेवटी एकदाची काही रोख, काही उधार करून खरेदी झाली. कॅमे-याचं उद्घाटन कुठं, तर मेळघाटात. एवढं करून या बाबानं ऐन टायमाला कलटी मारलीच.

एप्रिल महिन्यात एका सोमवारी संध्याकाळी सूर्यास्ताला वनविश्रामगृहात पोहोचलो. दुपारी उशीरा जेवण भरपेट झालेलं. मग रात्री पाणी न घातलेलं एक पेला गरमागरम दूध पिऊन बिछान्यावर पडलो. दिवसा तपमान पंचेचाळीशी पार करत असलं तरी संध्याकाळ सुखद होती. खिडकीतून छान थंड हवा येत होती. पंखा, कुलर कशाचीच गरज वाटत नव्हती.

रात्री आजूबाजूचा राबता कमी झाला, हळू हळू आवाज मंदावत गेले, जंगल जागत गेलं. सागाच्या फांद्यांच्या फराट्यातून वर चढणारा चंद्र सुंदर दिसत होता. दिवे मालवून मी बिछान्यावर पडल्या-पडल्या समोरचं अंधूक दिसणारं जंगल पहात होतो. दूरुन डिझेल गिरणीचा कूक-कूक-कूक आवाज सुरु होता. पाण्याचा जग घेऊन आलेल्या चौकीदाराला विचारलं, “इथं गिरणी सुरु झाली का?” तोंडात भरलेला तमाखूचा बार अदबशीर सांभाळत तो उत्तरला, “नाही जी गिरणी, जफरी होय ती सायेब!” मी ओशाळलो. “अरेच्च्या! हा तर आपला रातवा, मी असा कसा फसलो?”

एखादा पावशा मध्येच खडबडून ‘पावसा ये, पावसा ये’ करुन पावसाला आवातनं देत होता. दोन-चार तांबट दूर-दूरच्या झाडांवर बसून टूक-टूक करुन वायरलेसवर एकमेकांशी काहीतरी गप्पा मारत होते. मागच्या नदीपात्राशी संध्याकाळी कुकूरचूक करत धिंगाणा घालणारे रानकोंबडे आता शांत होऊन कुठं-कुठं झाडावर जागा पाहून निजून गेले. समोर चंद्राच्या आड येणा-या सागावर वानराचं एक कुटूंब लांब शेपट्या खाली सोडून शांत निजलं होतं. वडाच्या लोंबलेल्या पारंब्यांसारख्या त्या आठ-दहा शेपट्या हवेच्या झोतानं झुलत होत्या. दिवसभराच्या धिंगाण्याची स्वप्नं बघणारं, वानरीणीनं पोटाशी धरलेलं एखादं पोर स्वप्नात कुत्रं पाहून की कायसं कुई-कुई किंचाळत सा-यांना जागवत होतं. वर बसलेल्या हुप्प्यानं एकदा वळून खाली पाहिलं, डाव्या हातानं पाठीचे केस खाजवून तो पुन्हा पेंगू लागला.

विश्रामगृहामागचा मोह उतरणीला आला होता. आता फुलाचे दिवस संपून टोळ्यांची सुरुवात होती. कुठं क्वचित फूल दिसे. त्या मोहाखाली पाचोळा वाजत होता. काय असेल? मोह फुलं खायला अस्वल आलं असेल? संध्याकाळी हे लोक बोलतच होते ना, ‘इथून अस्वलीचा पाण्यावर जायचा रस्ता आहे.’ पण नाही, अस्वल एवढ्या शांततेत नाही चरणार. फास-फूस करत पाचोळा फुंकत, आवाज करत चरणारं ते जनावर.

तिथं कळप तर नक्की नव्हता, आवाज एखाद्याच जनावराचा होता. ही पाण्यावर उशीरा आलेली कोठरी मोहासाठी आली होय का? की मोहडोंबरी आता बाहेर निघाली? खिडकीतून मोहाच्या खालचं काही दिसत नव्हतं. काही समजत नव्हतं. दमलो होतो, पण झोपावसं वाटत नव्हतं. पुन्हा बिछान्यावर पडलो. मोहाखालची सावट घेत होतो. तिकडं रातवा चक्कू-चक्कू-चक्कू करुन अखंड गिरणी चालवतच होता. त्याचा एका लयीतला नाद संमोहित करत होता. बघता बघता डोळे मिटू लागले अन् झोप कधी लागली ते कळालंच नाही.

पहाटे-पहाटे डोळे उघडले. रात्री पावसाचा एक हलका शिडकावा झाला होता. थंडी वाजत होती. मी पातळ दुलई अंगावर घेतली. एव्हाना उजाडायचंच होतं. मी खिडकीतून बाहेर पहात होतो. तांबडं फुटलं.

पक्ष्यांची लगबग त्याआधीच चालू झाली. दूर कुठूनतरी महाभृंगराज सुंदर गाऊ लागला. दाट रानाचा तो यक्ष, इकडं माणसांत नाही येणार. बहुतेक नदी पात्रातल्या उंबरावरुन हळद्या मधाळ शीळ घालत होता. या आवाजाला तोड नाही. समोर करंजावर चिक-चिक करणारे फुलटोचे आले. भलत्या अवघड ताना घेणारा हा नक्कीच दयाळ. याचा आवाज असा एका चौकटीत बसवता नाही येणार. आणि हा आला आता सुरेल सुभग. मूठभर जीवाचा इतका मोठा आवाज. अतिशय सुमधूर. या रानात किती कलाकार! कानाला मधुमेह झाला नाही म्हणजे बरं.

आता विश्रामगृहामागून निलीमेचा नाजूक घंटीसारखा मंजूळ आवाज स्पष्ट येत होता. मी उठून चूळ भरली, कॅमेरा घेऊन आवाजाच्या दिशेनं निलीमेच्या शोधात नदीकाठानं निघालो. थोडंसं पुढं गेलो. नदीपलीकडच्या मोहावर महाराष्ट्राचे राज्यपक्षी थव्यानं उतरून कुंऊंऊंऊं अशी शीळ घालत होते. या उतरलेल्या हरोळ्या मी मोजू लागलो, दोन-पाच-आठ-दहा. नक्की समजेना, पान कोणतं आणि हरोळी कोणती. मी खाली नदीत उतरलो. या नादात निलीमा उडून गेली तिचा आवाज बंद झाला.

तोवर काही हरोळ्या उडून अलीकडच्या पळसावर उतरताना मी पाहिल्या. मी दबत दबत गेलो, कॅमेरा एका हरोळीवर रोखला अन् फर्र आवाज करत सा-या हरोळ्या उडून परत पलीकडच्या झाडावर जाऊन माझ्याकडं पहात बसल्या.

2_0.jpg

मी पळस निरखला. एकही पक्षी नव्हता. धाडधाड चालत पळसाजवळ गेलो. अजून ८-१० हरोळ्या डोळ्यादेखत पळसातून उडाल्या. मी स्वत:वरच चिडलो. झाडावर जेवढ्या हरोळ्या दिसतात, तितक्याच हरोळ्या अजून न दिसलेल्या असतात. मी पुन्हा पळस निरखला. ‘नाही, काहीच नाही आता.’ जवळ गेलो, डोक्यावरच्या पळसावरुन अजून तीन हरोळ्या उडून गेल्या. आता मी कॅमेरा बाजूला ठेवून पळसाला पाठ लावून मोहाकडे बघत बसलो. वर फुललेला पळस, समोर नदी, चौफेर पक्ष्यांची धांदल.

जराशानं उठून मीही निघालो. रात्री उशीरा बिबट या वाटेवरुन पाण्यावर आला होता.
हा पंजा त्याचाच.

3_0.jpg

क्रमशः

लेखात वापरलेली बोली भाषेतील प्राणी / पक्षी यांची सामान्य नावे -

रातवा – Nightjar bird
पावशा – Hawk cuckoo bird
तांबट – Coppersmith barbet bird
मोहाची टोळी – मोहाचं फळ
कोठरी – चौशिंगा हरीण
मोहडोंबरी – उदमांजर
महाभृंगराज – Greater racket-tailed drongo bird
हळद्या – Golden oriole bird
फुलटोचे – Flower pecker bird
सुभग – Iora bird
निलीमा – Tickell’s blue flycatcher bird.
हरोळी - Yellow footed green pigeon

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरवात आणि आवडीचा विषय! व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनाची आठवण झाली. जंगल, निसर्ग भ्रमंतीविषयक लेख आणि पुस्तके वाचायला सर्वात जास्त आवडतात. पुभाप्र!!

खूप सुरेख वर्णन.
कोठरी, मोहडोंबरी वगैरे समजले नाही. फोटो टाकले तर बरं होईल.

फक्त चिमणी कावळा आणि कबूतर नीटपणे ओळखु शकणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य वाचकांना पक्ष्यांची नावे वाचून पटकन समजत नाहीत आणि डोळ्यासमोर नक्की आकार रंग वगैरे येत नाही. प्रत्येक नावागणिक फोटो देणे शक्य नाही ह्याची कल्पना आहे म्हणून एक पर्याय सुचवेन - किमान त्या बोलीभाषेतील नावानंतर कंसात शास्त्रीय नाव दिले तर गूगल करून आम्ही त्यांचे फोटो पाहुन ते ते पक्षी ओळखायला शिकु शकतो.

मस्त! बोलीभाषेतील नावानंतर कंसात शास्त्रीय नाव दिले तर खरंच बरं होईल.
रात्रीचं वर्णन वाचताना किरण पुरंदऱ्यांच्या 'सखा नागझिरा' ची आठवण झाली Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद Happy

@मऊमाऊ , हॅपी, वावे, तैमूर आपण सा-यांनी सुचविल्यानुसार मी लेखाच्या शेवटी बोली भाषेतली नावं कशाची आहेत ते देतो आहे.