कळ्या...

Submitted by मनोजकुमार देशमुख on 12 May, 2020 - 14:49

जपल्या होत्या
ओंजळ भरुन कळ्या
परसातील वेलीवर
तुला फुलें देण्यासाठी

दवाचे माळून मोती
लेऊन वसने अंगभर
सोनेरी किरणांची
सजल्या होत्या कळ्या

पाकळ्या पाकळ्यात
भरून गडद रंग
करून साठवण सुगंधाची
कळ्यांचे फुले झाली

भरली ओंजळ रिते अंगण
आणि दारावर मोठे कुलूप
गाव सोडून गेलेली तू
आत्ताच कळाले मला

हातातली फुलें
आपसूक सांडली
अंगणभर त्यांनी
रांगोळी मांडली

झेलत माझ्या असावांचे मोती
क्षणात फुल झाली निर्माल्य
फुले नव्हतीच ती
कोमेजली प्रीतीच माझी...

Group content visibility: 
Use group defaults