आठवण

Submitted by Snehalata on 11 May, 2020 - 05:18

आठवते का तुला
ती निःशब्द संध्याकाळ
तुला बोलायचे असताना
झालेली निघण्याची वेळ

आठवतंय तुला?
माझे भरलेले डोळे
माझी पाठ वळताच
तू टिपलेले डोळे

आठवतोय मलाही
तो मावळतीचा साथ
चढणीवर भेटलेला
तुझा आधाराचा हात

आठवतंय तुला?
किती वेडे होतो आपण
सारं माहित असताना
झुरत होतो क्षण नि क्षण

कसा रे विसरशील तू
तो निसटता क्षण
आपल्या नात्यामधली
ती नाजूक गुंफण

जपल्या आहेत मी
तुझ्या हळुवार आठवणी
सोबतीला आहेत
काही कडू गोड देणी

आठवतंय सारं मला
आणि आठवत असेल तुलाही
पण तुझ्या माझ्यात आता
दोन ध्रुवांचे अंतर

आजचे माझे शब्द
तू दूर गेल्यानंतर..............

स्नेहलता

Group content visibility: 
Use group defaults