ढेकळे

Submitted by जव्हेरगंज on 11 May, 2020 - 03:14

गुलछबू रातीचा गाभारा भादवातल्या कुत्र्यासारखा लवलवत होता. गोठ्याच्या शेजारी थोडी जागा करुन गजड्या त्यावर झोपला होता. वारा कितीही थंडगार वाहत असला तरी तो आतुन धुसमुसत होता. पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखा तो तडफडत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होता. आजची रात त्याला बोडक्या बाईच्या अंधाऱ्या खोलीसारखी भकास वाटत होती. जिच्या नैराश्याचे भाले त्याच्या शरीरात भळ्ळकन घुसले होते. वर्षानुवर्षे उभा असलेला एखादा वटवृक्ष एखाद्या जोरदार वादळात उन्मळून पडावा तसा तो अशक्त होऊन अंधरुणावर पडला होता. डोक्यात ना ना विचांरांची शकले चौफेर उधळली गेली आणि तो उठून बसला. फुलपात्रानं झाकलेल्या तांब्यातलं पाणी तो बसूनच पिला. मग एक लांबवर पिचकारी मारुन त्यानं घरादाराचा कानोसा घेतला. पारुबाई आन चंद्रकला ओट्यावर झोपल्या होत्या. कुण्या एका नात्यातल्या म्हातारीनंपण तिथंच पथारी पसरली होती. नवीकोरी नवरी आतल्या खोलीत एकटीच झोपली होती.

खरंतर दिवसभर उन्हातान्हात फिरून गजड्याचा जीव आंबला होता. आजच्या रातीची रंगीत स्वप्नं बघत त्यानं तो कसाबसा ढकलला होता. पण संध्याकाळी हमरस्त्यावर बाळ्या भेटला अन त्याला हि रातच नकोशी वाटायला लागली. बाळ्याला नीच तरी कसं म्हणावं. तो फाटक्या तोंडाचा जरुर होता. पण लोकांच्या आनंदात विष कालवण्याचं त्याचं कसब निर्विवाद होतं. चार दिवसांपूर्वी गजड्याचं लगीन झालं. तेव्हापासून बाळ्या गजड्याच्या नव्याकोऱ्या बायकोची तोंड फाटोस्तोर तारिफ करत होता.
"डोळं जरी नागीनीसारखं आसलं, तरी सुजी म्हंजे आग आहे आग " असं बाळ्या त्याला म्हणायचा. मग माजलेल्या रेड्यासारखा गजड्या फुशारायचा. त्याच्या पाठीवर थाप टाकून स्वतःच्याच नशीबाला दाद द्यायचा. न मागताच तंबाखूचा मळलेला विडा त्याच्यापुढे धरायचा. मिसरुडावर हात फिरवून मैदान मारल्याच्या आवेशात धुंद व्हायचा.

नाकी डोळी छान म्हणून पारुबाईनं गरीबड्या घरची सुजाता सून म्हणून घरी आणली. गजड्याची बायको असून असून कशी असणार म्हणून लोकांनी तिच्यात काय विशेष रस दाखवला नाही. पण पोरगी भलतीच देखणी निघाली. अन वाडीवस्तीवरच्या गड्यामाणसांना गजड्याचा हेवा वाटायला लागला. आल्या गेल्या त्याची चेष्टा मस्करी सुरु झाली. सांडपाण्यात गुदमरुन गेलेल्या एखाद्या बेडूकानं अचानक बाहेर येऊन राजकुमाराचं रुप धारण करावं तसं काहिसं गजड्याचं झालं होतं. सुजाता नावाचा एक सुगंधीत कोपरा त्याच्या मनात आता कायम दरवळत होता. ज्या क्षणासाठी त्याने चार दिवस वाट बघितली होती तो क्षण आला होता. पण संध्याकाळी बाळू भेटला अन गजड्या पुन्हा गटारातच गेला.

"गफूर जायचा हायस्कूलात तिला भेटायला " बाळ्या असं म्हणला आन गजड्याचं कान टवकारलं.
" आपला राजा हाय ना, तो सकाळी सांगत हुता, ह्या गफूरची तिच्या घरच्याशीपण वळख हाय. सूजी शाळेला म्हणून जायची, आन हा गफूर तिला मधीच गाठून फिरायला घीवून जायचा, एक लॉज सोडला न्हाय त्यानं. लयजण म्हणतेत म्हणल्यावर खरंच आसंल" दातकिडक्या बाळू बोलत राहिला अन गजड्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

हा गफूर दोन लेकरांचा बाप. गवंडीकामासाठी गावोगाव फिरून पोट भरणारा. तसा आतल्या गाठीचा. गुपचूपपणे अनेक लफडी करणारा. पण म्हणून सुजीही? गजड्याला उचंबळून आलं. त्याला आत्ताच्या आत्ता जाऊन गफऱ्याचं तुकडं तुकडं करावसं वाटलं. गजड्या विचार करत सतरंजीवर बसून होता. एखादं मरतुकडं कुत्रं आडोश्याला बसून विव्हळत होतं. गजड्याला ते असह्य झालं. उठून त्यानं एक अनकुचीदार दगड हातात घेतला, अन त्या कुत्र्याकडे जोरदार भिरकावला. कर्कश्य किंचाळत ते कुत्रं लांबवर पळून गेलं.

"राघू, तू आजून हितंच झोपलाय का?, आरं आत झोपकी, नव्या नवरीला आसं एकटं सोडूनी रं " पारुबाईची झोप चाळवली तसं तिनं गजड्याला म्हटलं. राघू म्हटलेलं गजड्याला आवडायचं न्हाय. आणि आता या क्षणी तर ते अजिबातच आवडलेलं नव्हतं.
पारुबाईनं त्याला सांगायची ही दुसरी वेळ होती. मघाशी आंगदुखीचं कारण सांगून तो जरावेळ म्हणून बाहेर पडला होता. पण आता त्याला तसे करता येणार नव्हते. केवळ नाईलाज म्हणून तो उठला. सतरंजीची घडी घालून मग बखोटीत मारत त्यानं चालत जाऊन घराचा दरवाजा उघडला. घरात बल्ब चालूच होता. त्याच्या पिवळसर प्रकाशाने खोली उजळली होती असेच म्हणावे लागेल. कोपऱ्याला लागूनच कॉट होता अन त्यावर मऊशार गादी. अन त्यावर पडलेली ती नववधू. बहुदा तिची झोप लागली असावी.

गजड्यानं दरवाजा लावून आतून कडी घातली. एखाद्या बेवारस पडलेल्या मढ्याकडे बघावं तसं त्यानं नव्याकोऱ्या वधूकडे बघितलं. तिच्या उघड्या पडलेल्या पोटरीचा गोरटा रंग बघून तिला एखादा रोग झालेला आहे की असे त्याला वाटून गेले. त्या रोगट शरीराला स्पर्श करायची पण त्याची इच्छा नव्हती. एखादा मेलेला उंदीर ढकलावा तसे त्याने तिला ढकलून एका बाजूला सारले. युध्द हरलेल्या शूर सेनापतीसारखा तो झालेल्या मोकळ्या जागेत कोसळला. त्या रातीच्या गर्भाचे उसासे कोणी ऐकलेच नाहीत.

सकाळी गजड्या उठला. जसं काही झालंच नाही अशा थाटात त्यानं आंघोळ उरकली. जेवणखान करुन डबा भरुन कामावर गेला. त्याला एक काम नव्हतं. कधी तो वाणसामाणाच्या दुकानात पुड्या बांधायचा, कधी कापडाच्या दुकानात सेल्समन म्हणून उभा राहायचा. कधी पेट्रोलपंपावर, तर कधी बाजारतळावर हमाल म्हणून काम करायचा. त्यानं बहुदा ते बिकट सत्य पचवून घ्यायची तयारी केली होती. दिवसभर तो स्वतःला कामात बुडवून घ्यायचा. सुजीचा विचारही येऊ द्यायचा नाही. सुजाता नावाची आपली बायको आहे हे ही कधी कधी विसरून जायचा. तेच त्याला हवे होते. त्यातच त्याला मौज वाटायची. संध्याकाळी घरी जाताना सुजीची आठवण होऊन कापायला चालवलेल्या बोकडासारखा हतबल चालायचा.

गजड्या घरी यायचा पण त्याला बराच उशीर व्हायचा. रात्रीचे बारा बाजले तरी त्याचा पत्त्या नसायचा.बायकोशी कधी तो धड चार शब्द ही बोलला नाही. पारुबाई काळजी करायची. चार हिताच्या गोष्टी सांगायची. पोरगं कमावतंय म्हणून तिला आनंदही व्हायचा. गजड्याला काही गोष्टी तिलाच काय कोणालाच सांगायच्या नव्हत्या. त्यानं त्या त्याच्या मनातच साठवल्या होत्या. बऱ्याचदा त्याला वाटायचं की दातकिडक्या बाळूनं रचून सांगितलेलं हे सगळं थोतांड आहे. पण आजवर त्यानं ऐकलेल्या अशा गोष्टी कधीच खोट्या ठरल्या नव्हत्या. काही गोष्टींचातर तो साक्षीदार होता. गजड्या रात्र रात्र अश्या गोष्टींचा विचार करायचा. शेजारी झोपलेल्या सुजाताचा चेहरा त्याला कधीकधी टवटवीत वाटायचा. फुलांच्या देशातून आलेल्या राजकन्येसारखी त्याला ती भासायची. तिला आवडीने तो निरखत बसायचा अन फुललेल्या जखमेतून किडे वळवळावे तसा त्याच्या डोक्यातून गफूरचा विचार बाहेर यायचा. त्यावेळी त्याला त्या चेहऱ्यावर थुंकावे वाटायचे. मरतुकड्या प्रेताबरोबर रात काढायची त्याला किळस वाटू लागली. कुठल्या जन्माची ही अघोरी शिक्षा म्हणत तो रडत बसायचा. बांध फुटायचा. मोकळा व्हायचा. अन सकाळी उठून कामावर जायचा.

पेताडा बाबूण्णा आपला शेजारधर्म निभवत गजड्याचे हालहवाल विचारायचा. बाजारतळावर आपल्यालापण काय काम भेटलं तर सांग म्हणून गळ घालायचा. कधीकधी दारुची बाटली आण म्हणून पैसै द्यायचा. हे आता नेहमीच होत चाललं होतं. बाबूण्णा बोलायचा तर गोड पण स्वार्थी माणूस. एवढ्या दिवस गजड्याची त्याने साधी त्याने दखलपण घेतली नव्हती. मधूनच टक्कल पडत गेलेला बाबूण्णा, हसला की विचित्र भासायचा. गजड्याला तो कधीच आवडला नाही. पण मुरत असलेलं पाणी गजड्याच्या कानावर आलं अन शेवटी ते घडलंच.

दातकिडक्या बाळूनं त्याला सांगितलं होतंच पण खातरजमा करण्यासाठी गजड्या दुपारी घाईघाईतच घरी आला. दुपारची पारुबाई घरी नसतेच. ती शेतावर, गवताला, रोजंदारीला म्हणून बाहेरच असायची. गजड्यानं सरळ येऊन दरवाजा वाजवला. आत जराशी धडपड झाली. मग कडी काढून ओशाळवानं तोंड घेऊन बाबूण्णा बटणं लावत बाहेर आला. केलाच गजड्यानं वार तर तो चुकवायच्या तयारीत उभा राहिला. पण गजड्याची नजर खोलीत भिरभिरत राहिली. नागडं उघडं शरीर चोरुन घेत बसलेली सुजाता आता थेट त्याच्या डोळ्यात विरघळली होती. बाबूण्णा दोन क्षण थांबला अन ऐटीत घरी निघून गेला पण गजड्या त्या फुलाफुलांच्या भिजक्या शरीराकडे पाहत सांडपाण्याच्या गटारात गटांगळ्या खात बुडत गेला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या लेखणाची शैली जबरदस्त आहे...

पण एक तक्रार कराविशी वाटते....
तुमच्या बहुतेक कथा वाचून वाचकाला एखाद्या काळोख्या अंधारात फेकले गेल्यासारखे वाटते. म्हणजे त्या कथा बहुतेक वेळी मनावर निगेटीव्ह इंप्रेशन पाडतात. मन प्रसन्न व्हायच्या ऐवजी उदास होऊन जाते. (हे माझं वैयक्तीक मत असू शकतं) तुम्हाला अश्या कथा लिहायला आवडते का?
..................वाईट वाटलं तर माफ कराल आशी अपेक्षा!!

@सारथी१,
मला वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. काही कथांवर दु:खाची छटा दिसून आली असेल. पण सगळ्याच कथा तशा नाहीत. उदा. ही लिंक पहा. https://www.maayboli.com/node/55958
यानेही प्रसन्न नाही वाटले तर अजून एखादी देऊ Wink

अर्रर सॉरी... सांगतो..
कथा लिहिल्यावर आणि वाचल्यावर ढेकळांवरून चालताना जसा त्रास होतो तसाच त्रास झाला.
म्हणून ढेकळे.
नायकाच्या खडतर प्रवासाचे कारण ही ढेकळे..

हं... थोडक्यात, शेतातून चालताना जसा एकापाठोपाठ एक ढेकळांचा अडथळा होऊन त्रास होतो तसा कथानायकाचा जीवनप्रवास.

माझ्या तक्रारीला पॉझिटीवली घेतल्याबद्दल धन्यवाद, जव्हेरगंज!
तुम्ही दिलेली ती कथा छान आहे.. सर्वच कथा नाही, तर मला बहुतेक कथा म्हणायचं होतं.
पुनःश्च एकदा धन्यवाद!! Happy