३०९

Submitted by बेफ़िकीर on 8 May, 2020 - 13:39

"बोला?"

"मला ही रूम दिलीय!"

"ही? कोणी? "

"कोणी म्हणजे? स्टाफने! "

"आत्ता कोण आहे रिसेप्शनवर ?"

"म्हणजे? कोणी का असेनात? मला ही रूम दिलीय त्यांनी! बाय द वे, त्यांचे नांव गीता आहे, बाकीच्या तिघी चौघी झोपल्या आहेत"

दार उघडणारी मुलगी खळखळून हसली हे ऐकून!

"गीता होय! ये आत ये, इतक्या रात्री इथे कोणाला रूम अ‍ॅलॉट करत नाहीत म्हणून चौकशी केली. किती..... पावणे बारा वाजले ना "

आता नवीनच प्रवेश करणारी मुलगीही हसली काहीशी! खरे तर तिला पहिल्या नजरेत ही दार उघडणारी मुलगी विशेष आवडली नव्हती. स्वतःच्या मालकीची रूम असल्यासारखे क्वेश्चनिंग करत होती. मात्र पहिल्याच दिवशी, खरे तर पहिल्याच रात्री फर्स्ट इम्प्रेशनवर अवलंबून असलेले वर्तन नको म्हणून तिने आपला हात पुढे केला व म्हणाली.....

"पायल रजपूत, इथे जॉब मिळालाय मला, तुम्ही? "

समोरच्या मुलीने रूममध्ये इकडे तिकडे गोंधळून बघितले अन म्हणाली.....

"किती जण दिसतायत तुला इथे?? तुम्ही काय तुम्ही? फार तर दोन चार वर्षांचे अंतर असेल आपल्यात, सरळ ए म्हण! मी विलासिनी, यू कॅन कॉल मी विलू"

"हाय विलू "

"हाय पायल, कम इन, कम ऑन इन "

पायल आपल्या दोन बॅग्ज आणि एक पर्स घेऊन आत प्रवेश करती झाली. वर्किंग वूमेन्स हॉस्टेल होते ते! तिचे तेथे प्रॉपर बूकिंग झालेले होते. पण ट्रेन लेट झाली होती. आठला पोचणारी पायल पावणे बाराला पोचली होती. तिला कसलीही काळजी नव्हतीच कारण आपण लेट होणार वगैरे तिने आधीच फोन करून कळवून ठेवलेले होते. पण प्रत्यक्षात ती आली तेव्हा तिचे इतके थंडे स्वागत झाले आणि रिसेप्शनवर अशी काही रुक्ष वागणूक मिळाली की तिला वाटले तिने घोर अपराधच केलेला आहे. एक तर रिसेप्शनवर चौघी होत्या आणि त्यातील तिघी झोपलेल्या होत्या. जी एकमेव बया जागी होती ती उपकार केल्यासारखी वागत होती. पहिल्याच दिवशी वादविवाद नकोत म्हणून पायलने जरा नमते घेतले. वास्तविक या तिथे कामाला असलेल्या बायका आणि पायल तेथील ग्राहक! पण टिपिकल हॉस्टेलचे वातावरण निर्माण करण्यात स्टाफ यशस्वी ठरलेला होता.

३०९ नंबरची खोली आपली आहे हे कळल्याक्षणी पायलने गीताकडे असलेली नजर वळवली आणि ३०९ कडे चालू लागली. ३०९ चे दार वाजवले तर हे विलासिनी नावाचे प्रकरण! पावणे बारा वाजले म्हणून काय, ही खोली स्टाफने दिली आहे ना? ही कोण आक्षेप घेणार!

असो! पायल आत गेली. खरे तर प्रवासाने थकलेली होती. त्या क्षणी तिला विलासिनीने रूममध्ये ठेवलेला टी मेकर दिसलाही! पण आल्याच्या दुसर्‍या मिनिटाला कसे म्हणायचे की मी चहा घेते! पायल काहीच बोलली नाही. दोन्ही बॅग्ज तिने रिकाम्या बेडच्या पलीकडे कशाबश्या ठेवल्या, पर्स बेडच्या एका कोपर्‍यावर फेकली आणि शूज काढायला वाकली. अचानक चमकली. विलासिनीच्या बेडखाली काही लाल डाग होते. पायल डिस्टर्ब झाली. आल्यापासून नीट काहीच वाटत नव्हते.

विलासिनीकडे न बघताच स्वतःची पर्स घेऊन पायल बाथरूममध्ये गेली. बाथरूम स्वच्छ आहे हे बघून तिने एक सुस्कारा सोडला. बया नीटनेटकी असावी असे तिच्या मनात आले. घरची फार आठवण येत होती. मधेच पायलला गीताची आठवण आली. इतका रुक्षपणा का? आपण काय अपराध केलाय? ट्रेन लेट झाली यात आपली काय चूक? पण तिला राहवून राहवून काहीतरी खटकत होते. जे खटकत होते ते गीतापाशीच नेत होते. ३०९, असे म्हणताना गीताच्या चेहर्‍यावर काहीतरी वेगळे भाव आलेले होते. ही तरी त्या रूममध्ये जाते की नाही, असे काहीसे ते भाव असावेत असे बाथरूममध्ये असताना पायलला वाटून गेले. रूमतर ठीकठाक होती. विलासिनीही खेळकर स्वभावाची होती. पायलला पुन्हा ते लाल डाग आठवले. असेल काहीतरी असा विचार करून पायल फ्रेश होऊन बाहेर आली.

विलासिनी तिच्या बेडवर लोळत काहीतरी वाचत होती.

"मी साधारण बाराला झोपते. तू आजच आलीस. तुला यायला उशीर झाला म्हणून थोडी लेट झोपत आहे मी! इथे खाली एक कॅन्टीन आहे. ते रात्री दहाला बंद होते. नंतर काही मिळत नाही. पाणी वगैरे हवे असले तर तिथे आहे. उद्या सकाळी सहा वाजता चहा येईल. त्यावेळी तू टोस्ट वगैरे मागवू शकशील. तोवर निवांत झोप. मी सकाळी आठला बाहेर पडते. संध्याकाळी परत येते. तुला काही खायला वगैरे लागत असेल तर त्या गोष्टी तू रूममध्ये आणून ठेवू शकतेस. मी ते खाणार नाही. हा हा हा! ऑफर केलेस तर नक्की घेईन. माझ्याकडे मात्र काही नसते. मी दिवसातून तीनवेळा खाते. सकाळचे आणि दुपारचे खाणे बाहेर होते, रात्रीचे कॅन्टीनमधून मागवते. दॅट्स इट! तो टी मेकर आहे. त्याला हात लावू नकोस. शॉक बसतो. काय बिघडले आहे माहीत नाही. निवांत झोप. आणि हो..... "

"..... काय?"

"मधेच जाग आली तरी उठून बसू नकोस. पडून राहा"

शेवटचे वाक्य महाविचित्र होते. पायलला असली वाक्ये ऐकायची सवय तर नव्हतीच, पण एरवी तिने असे बोलणार्‍या मुलीला स्वतःच्या खोलीतून हाकलून दिले असते. कोण तुझ्या टीमेकरला हात लावतंय, असा विचार करून पायल बेडवर आडवी झाली. डोळ्यांसमोर सतराशे साठ गोष्टी येत होत्या. घरून निघताना सगळ्यांचा घेतलेला निरोप, ट्रेक पकडणे, ट्रेनचा मळकट, दमवणारा प्रवास, अर्धवट झालेले खाणेपिणे, ट्रेनमधील सहप्रवासी, रिक्षाचा प्रवास, गीताचा चेहरा, लाल डाग, विलासिनीचे उगीच अधिक स्पष्ट वागणे, सगळेच!

पायल! घरच्यांचा विरोध पत्करून महानगरात आली होती. पहिलीच वेळ होती ही असे राहण्याची! आढ्याकडे, भिंतींकडे, टीमेकरकडे, बाथरूमच्या दाराकडे आणि अधून मधून विलासिनीकडे बघत झोपेची आराधाना करणार्‍या पायलला शेवटी निद्रादेवी प्रसन्न झाली. तिच्या नकळत तिचे डोळे मिटले.

आजूबाजूला सगळे काही शांत शांत होत गेले. सुमारे पाचएक मिनिटांनी डोळ्यांवर येणारा प्रकाशही गेला. बहुधा विलासिनीने लाईट बंद केला असावा. अंगावर घेतलेले पांघरूण उकाडा होत असल्यामुळे लाथेनेच उडवत पायल एका कुशीवर वळली. पंख्याचा धीरगंभीर आवाज आणि अर्धवट उघड्या खिडकीतून येणारी सुखद झुळूक पायलला मस्त डुलकी देऊन गेली.

किती वाजले असावेत हे पायलला कळले नाही. झोपून सुमारे दोन तास झाले असावेत असे तिला वाटले. उठून मोबाईलमध्ये किती वाजले आहेत ते बघावे इतका उत्साह नव्हता राहिला तिच्यात! खोलीत प्रकाशाची एक तिरीप तेवढी येत होती. मगाशी रुक्ष आणि आपुलकीचा अभाव असणारी अशी वाटलेल्या खोलीला आता गूढता प्राप्त झाल्यासारखे पायलला वाटले. तिने दोन तीन वेळा कूस बदलली. आता पुन्हा डोळा लागत नव्हता. आणखी एकदोनदा कूस बदलली आणि पायल झटका बसल्यासारखी डोळे उघडून समोरच्या भिंतीकडे बघत बसली. आत्ताच तिने काहीतरी पाहिले होते. ते खरे असेल असे तिला वाटत नव्हते. पण ते खरे होते की नाही हे चेक करण्यासाठी पुन्हा कूस बदलून मागे पाहावे लागणार होते. जे करण्याची हिम्मत तिच्यात राहिली नव्हती. एका क्षणार्धात असे काय झाले होते?

कितीतरी वेळ पायल पांढर्‍या भिंतीकडेच बघत बसली. कितीतरी वेळ तिने स्वतःला समजावले की तिला जे पाहिल्यासारखे वाटले ते खरे नसणार! तो तिला झालेला भास असावा. पण हे चेक कसे करायचे? चेक करण्यासाठी कूस बदलून मागे पाहावे लागणार होते. आणि नेमके ते खरे निघाले असते तर? तर आपण काय करायचे हे पायलला समजतच नव्हते.

बराच वेळ कोणताही आवाज येत नाही आणि काहीच घडत नाही हे तपासल्यानंतर जणू काही वाटलेच नाही अशा थाटात सुस्तावलेल्या हालचाली करत पायल उताणी झाली. तिने डोळे मुद्दाम बंद केलेले होते. अजून ती पूर्णपणे उलट्या कुशीवर मुद्दाम वललेली नव्हती. जवळपास चार, सहा मिनिटे त्याच अवस्थेत झोपूनही काही होत नाही हे बघून ती हळूहळू वळली. डोळे बंद करूनच तिने कूस बदलली. कूस बदलूनही ती डोळे मिटूनच पडलेली होती.

जवळपास दहा मिनिटांनी प्रचंड धीर करून तिने डोळे किलकिले केले. हळूहळू पूर्ण उघडले. आणि तिला जे दृश्य दिसले ते पाहून दातखीळ बसायची वेळ आली. सर्वांगाला घाम फुटला. हात पाय उचलेनात! नजर त्या दृश्यावरून हलेना! खूप इच्छा असूनही पायलला हालचाल करता येत नव्हती. बराच वेळ तिने आपल्या हाताची बोटे वळवून मूठ झाकणे आणि मूठ उघडणे यात यश मिळवले. आता पावलेही किंचित हलू लागली. पायलचा श्वास आता जोरात सुरू झाला होता. तिची नजर खिळलेलीच होती. मनात कैक देवांचा धावा करून तिने कंबरेत बळ आणले स्वतःच्या! दोन्ही हात मनगटापासून बेडवर दाबत ती कशीबशी उठून बसली. तिची नजर विलासिनीवर खिळलेली होती. डोळे विस्फारलेले होते. श्वास जोरजोरात सुरू होता.

खूप वेळ अश्याच अवस्थेत असलेल्या पायलने शेवटी हिय्या करून विचारले.

"काय? ..... काय झाले? ..... काय बघतेस?"

उत्तर नाही, काही नाही.

समोरचे दृश्य काटा आणणारे होते. विलासिनी टक्क उघड्या डोळ्यांनी पायलकडे बघत होती. चेहर्‍यावर काहीही भाव नव्हते. तिची बुब्बुळे त्या डोळ्यांमध्ये नव्हती. पांढरे फटक डोळे पायलकडे रोखलेले होते. प्रकाशाच्या तिरिपेमुळे ते डोळे अगदी लख्ख दिसत होते. आपण गाढ झोपलेलो असताना शेजारी झोपलेली एक व्यक्ती टक्क जागी राहून आपल्याकडे नुसती पाहत राहते ही भावना पायलला मुळापासून हादरवून गेली होती. विलासिनी उत्तर का देत नव्हती हे तिला कळत नव्हते.

घामाने भिजलेल्या अवस्थेत पायल मागे मागे सरकत राहिली. नजर मात्र विलासिनीच्या चेहर्‍यावरून हटेना! शेवटी तिला भिंत लागली पाठीला. तिने बेडच्या कडांना हाताने धरले. किंचित अधिक बळ जमा झाले तसे ती ताडकन् उभी राहिली. पार बाथरूमच्या दाराकडे गेली. उलटीकडे गेली असती तर रूमच्या दाराकडेतरी गेली असती. मात्र ते तिच्या लक्षात आले नाही. बराचवेळ ती बातरूमच्या दाराची कडी हातात धरून उभी राहिली. विलासिनी थंड नजरेने तशीच बघत होती. पायलला आता धाडस करणेच आवश्यक होते. एकेक पाऊल पुढे टाकत ती विलासिनीच्या बेडजवळ आली. विलासिनीच्या डोळ्यांत तिचे डोळे गुंतलेले होते. शेवटी सगळा जोर एकत्र करून तिने विलासिनीचे खांदे धरले. विलासिनीला गदागदा हलवत तिने जागे केले. हडबडून विलासिनी जागी झाली. विलाचिनीच्या तोंडून अस्फुट किंकाळी निघाली. नशीब ती हॉस्टेलमध्ये कोणाला ऐकू आली नाही. नाहीतर रात्रीच हंगामा झाला असता. मात्र ती किंकाळी ऐकून पायलच्याही तोंडून एक अर्धवट किंकाळी बाहेर पडली. विलासिनीने फाडकन् पायलच्या तोंडात मारत हळू पण तीव्र स्वरात विचारले.....

"काय??? काय झाले? का उठवलेस? का ओरडतीयस? "

पायल हतबुद्ध होऊन बघत राहिली.

विलासिनी तिला गदागदा हलवत राहिली. बर्‍याच वेळाने पायल उद्गारली.

"तू... तू माझ्याकडे कशाला पाहत होतीस? मी झोपलेले असताना?"

"गधडे..... माझे डोळे उघडे राहतात झोपेत! तुझ्याकडे कशाला बघू? तू काय मुस्कान आहेस का? तू काय आदित्यची मैत्रीण आहेस का? तुझ्याकडे कशाला बघू? "

"कोण.... कोण मुस्कान अन् आदित्य? हे, हे खाली लाल डाग कसले आहेत? मला बाहेर जाऊदेत"

"बाहेर? तुला माहीत नाही? ३०९ बाहेरून लॉक करतात "

"क..... काय?..... का..... का????"

विलासिनी अभद्र हसली. तिने पायलच्या फाडकन् थोबाडात लगावली. पायल मागच्यामागे तिच्या बेडवर पडली.

किती वेळा गेला हे पायललाही कळले नाही. आजूबाजूला खूप आवाज वाढले. खिडकीतून प्रकाश येणे वाढले. पायलला जाग आली. डोके दुखत होते. तिने आरश्यात पाहिले. गालावर पाच बोटे उमटली होती. साडे नऊ वाजले होते. विलासिनी आठ वाजताच गेलेली असणार होती. इथल्या पहिल्याच दिवसाची वाट लागली होती. रूमचे दार उघडून बाहेर काय चालले आहे हे पाहावे म्हणून पायल रूमच्या दारापाशी गेली तर अचानकच खाडखाड आवाज होत दार बाहेरूनच उघडले. एक मावशी दारात उभी होती. त्या मावशीने पायलला पाहिले आणि किंचाळत रिसेप्शनपाशी गेली. रिसेप्शनवरच्या तिघीजणी धावत ३०९ पाशी आल्या. कधी नव्हे ते ३०९ साफ करायला आलेल्या मावशीला असे काय दिसले हे बघायला त्या धावल्या होत्या. दारात पायल उभी होती. एका स्टाफने विचारले.

"कोण.... कोण तुम्ही? "

"पायल रजपूत, काल रात्री चेक इन झाले... का?"

"रूम कोणी उघडली? "

"वि..... विलासिनीने... का?"

एक स्टाफ भोवळ आल्यासारखे करू लागली. दुसरीने विचारले.

"चेक इन कोणी केले तुला? "

"गीता..... काय झाले काय? "

"३०९ बंद ठेवतो आम्ही.... "

"का? "

"आदित्य आणि मुस्कानने विलासिनीचा खून केला होता इथे..... गीताने पाहिले म्हणून तिलाही मारले होते"

=====

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी इज बॅक .... आज लॉकडाउन सफल झाला....
अजून येऊ द्या बेफी जी....
- तुमच्या कथांचा चाहता !!!
नवीन Submitted by च्रप्स on 8 May, 2020 - 23:16
>>>>>

+७८६

आता कथा वाचतो...

क्डक वतावरण निर्मिती..

रात्रीचे 12.30 वाजलेत. कथेचे नाव वाचून अंदाज आला होता तरीपण धाडस केले आणि त्याचे चीज झाले.
छान बेफी जी

बाबो. काय घाबरावता हो. अमानवीय धागा वाया गेल्यापासून घाबरायची सवय सुटली होती. येऊ द्या अजून 310, 311, 312 कितीपण चालतील.

बेफी इज बॅक .... आज लॉकडाउन सफल झाला....
अजून येऊ द्या बेफी जी....
- तुमच्या कथांचा चाहता !!!
नवीन Submitted by च्रप्स on 8 May, 2020 - 23:16
>>>>>

+१

वेलकम बॅक बेफिजी. Happy

असे एखाद्याचे डोळे आपल्याला जाग आली अन ते आपल्यावर रोखलेले दिसले तर काय हालत होइल कल्पनाच करवत नाही.. भिती वाटली वाचुन.. Happy

Pages