एकटीच @ North-East India दिवस २८

Submitted by सुप्रिया राज जोशी on 7 May, 2020 - 10:23

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

5th मार्च 2019

प्रिय nameless जावई,

माझे असे एकही पत्र नाही जे प्रवासापेक्षा प्रवाशाच्या आठवणीने भरलेले आहे. ह्या पत्रातून मात्र तुझीच गोष्ट, तुलाच सांगायची. पण एवढ्या मायेने मी तुला पत्र लिहिते आहे, ते तुला कळेल तरी कसे? तू तर आत्ताच कायमचा संपर्क कक्षेच्या बाहेर जाऊन पोहोचला आहेस. तुला सोशल मिडियावर शोधले असते तर ते ही आता शक्य नाही. कारण की मला तुझे नावच माहित नाही. मला कळते, कि मी तुला लक्षात ठेउन पत्र लिहिले याच्या आनंदापेक्षापेक्षा, मी तुझे नावही विसरून गेले याचे तुला दु:ख जास्त होईल. कारण एकाच दिवसात अनेकदा तुझे नाव सांगून ते मला डोक्यात फिट करून ठेवायला तू बजावले होतेस. जरी तुझे नाव नेहेमीच्या ओळखीच्या नावांपेक्षा वेगळे होते तरी पत्र लिहायला घेईघेई पर्यंत सुद्धा मी ते विसरून जाईन असे मलाही मुळीच वाटले नव्हते. विचित्र आहे पण खरे आहे.

काल एकापाठोपाठ एक तीन फोन आले तेव्हा पत्रलेखन आटोपतं घेतलं जवळपास तिथूनच आजच्या पत्राच्या गोष्टीची सुरवात करते.

मला हे सारे फोन अपेक्षित होते तेव्हा फोनची बॅटरी डेड होती आणि सर्किट हाउस मध्ये लाईटही नव्हते. मी जर फोनवरही बोलू शकले नसते तर माझ्या सुरक्षिततेबद्दल त्यांचा गैरसमज झाला असता. म्हणून त्या अंधारातही शेजारच्या VIP रूममध्ये अपरिचित व्यक्ती रहात होता त्याचे दार ठोठावायची मी हिम्मत केली. माझे नशीब चांगले होते की तिथून मला डबल मदत मिळाली. त्या महोदयाने त्याचा युएसबी चार्जर तर दिलाच पण दुसरऱ्या दिवशी पहाटे बस स्टॅन्ड पर्यंत गाडीतून सोडायची मदतही ऑफर केली.

सर्किट हाउस पासून नाम्साई बस स्टेन्ड फार तर दीड किलोमीटर दूर असेल. पण न जाणो बहुदा उद्या दिवसाची सुरवात पावसात भिजून करावी लागली तर पुढचा बारा तासाचा प्रवास ओल्या अंगाने करावा लागेल हा विचार करूनच वैताग येत होता. म्हणून तीही मी मदत स्वीकारली. अशा प्रकारे आज भल्या पहाटे साडेचार वाजता रिपरिप पावसात मला आरामात बस स्टॅन्ड पर्यंत पोहोचता आले. नाम्साईचा दिवस उजाडायला थोडा अवधी होता तेव्हाच माझा आजचा दिवस सुरुही झाला. अर्थात, बस स्टॅन्ड वर त्या वेळी काहीही हालचाल दिसत नव्हती आणि पुढचा एक-दीड तास माझ्यावर इकडे तिकडे फक्त घुटमळत रहायण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. सव्वासहा वाजता आमची बस निघून धड पंधराही मिनिटे झाली नसतील तोच सकाळचा ब्रेकफास्ट करण्यासाठी बस ने ब्रेक घेतला. मला कालपासून तेजू ला पोहोचायची केवढी घाई होती! पण माझ्याशिवाय सारेच प्रवासी सवडीने तेजू ला जायला निघालेत ह्या विचाराने मी थोडी अस्वस्थ झाले. पण आता वाटते की ती सोय माझ्या भल्यासाठी झाली असावी. कारण आजचा कठीण प्रवास झेपवण्यासाठी पोट भरून उरेल एवढी उर्जा जवळ असणे खरच किती गरजेचे होते. अरुणाचली बायका चालवत असलेलेल्या त्या रोडसाईड कॅंटीनमध्ये आयुष्यात प्रथमच मी पंधरा रुपयात गरमागरम चविष्ट भरपेट नाश्ता खाल्ला.

IMG_20190305_070926.jpg
तेजू हे गाव लोहित डीस्ट्रीक्टचे हेड क्वार्टर! एवढ्या सर्वसाधारण गावाला पोहोचायला एवढी करामत करून, अपेक्षित वेळेच्या बारा तास उशिरा, म्हणजे सकाळी सातच्या सुमारास, मी तेजू ला पोहोचले. हा वेळेचा अचूक अंदाज नाही कारण मी माझा फोन विचारपूर्वक बंद करून ठेवला होता, न जाणो इथून पुढे चार्ज करायला मिळेल न मिळेल. पण त्या तेजू ला असे काही नाटक झाले की मला फोन सुरु करून कॅमेरामध्ये ते नाट्य टिपून घेण्याचा मोह मुळीच आवरला नाही.

रोड साईडला दुकान मांडून बसलेला एकुलता एक ट्रॅव्हल एजंटच्या आजच्या दोन्ही गाड्यांचे बुकिंग म्हणे आदल्याच दिवशी संध्याकाळी फुल झाले होते. माझा भरवसा माझ्या वेळेने मोडला, त्यात माझी काय चूक? ? नुसते फोनवरून बुकिंग केले त्यांचा तरी काय भरवसा? मी तर तिकिटाचे पैसेही त्याला काढून दिले, पण त्याने त्याला हातही लावला नाही. तो मला परोपरीने सांगत होता, की मला आज डोंग ला जाणे शक्य नाही म्हणजे नाही. माझ्या परीने मी ही त्याला सांगायचा प्रयत्न केला की एकेका आव्हानाला सामोरे जात आता इथवर पोहोचल्यावर हार मानून उलटे परत जायची माझी मुळीच तयारी नाही म्हणजे नाही. डोंग हे माझे स्वप्न होते आणि स्वप्नपूर्तीसाठी माझ्याकडे फक्त दोन दिवसाची मुदत होती, हे वास्तव होते. आठ तारखेचे विमान पकडायला निदान आठ तारखेला तरी मी गोहाटी मध्ये असायलाच हवे!

मी त्याला खूप हैराण केलं असेल हे मला माहित आहे तरी तो हसूनच वार्ता करत होता. एकदा मस्करीत म्हणाला की, “काळ्या गाडीतून ट्रान्सपोर्टचे सामान जाणार आहे त्या सामानाबरोबर बांधून तुला पाठवून देऊया”. मी त्या सेटिंग ला सुद्धा तयार झाले तसा मात्र त्याने डोक्याला हात लावला. एव्हाना मला कळून चुकले की मलाच काहीतरी जुगाड करावा लागणार आहे. मग मी एकाच वाक्यात सारा विषयच संपवला, “जैसेही गाडी आएगी मै गाडी मे घुसके बैठूंगी| फिर मुझे कोई उतार नही सकता|”

IMG_20190305_085412.jpg

काळी गाडी पहाताच क्षणी मी गाडीकडे धावले. तर गाडीत आधीच तुमची चांडाळ चौकटी बसली होती. गाडीच्या पाठीवरही कोबून कोंबून सामान चढवले होते. माझी कुठे सोय होईल अशी जागा मला दिसेना. एवढा वेळ ज्याच्याकडे वशिला लावला होता तो सुद्धा गायब झाला. आजूबाजूला लोक कुजबूज करत होते की त्याचे डोके भणभण करायला लागले म्हणून एक पेग मारायला तो सटकला आहे. मी गाडीचे दार उघडायचा प्रयत्न केला पण तुम्ही दार आतून लॉक केले होते. तुमच्या तर्फे मला आत प्रवेश निषिद्ध आहे हे मला स्पष्ट कळले आणि तेवढ्यात तो परत आला. आता त्याच्या आवाजात रुबाब आला होता. आधी त्याने मला पाठी सरकायला सांगितले. मग तुम्हाला थोडे सरकून गाडीत लेडीजला ऐडजेस्ट करून घ्यायला सुचवले. ते ऐकताच तुमची सटकली. प्रवास कठीण होता. फुलसीटचे पैसे भरून तिकीट घेतले होते. तडजोड करायचा सवालच नव्हता. काहीच क्षणात विषयाला वेगळेच स्वरूप आले. पाठच्या सीटवर जो तुझा लंबू मित्र तुझ्या बाजूला बसला होता त्याने शिव्या द्यायला सुरवात केली तसे त्या एजंट ने तुमचे तिकिटाचे पैसेच चक्क परत केले आणि गाडीतून मुकाटयाने उतरायला सांगितले. माझ्या स्वप्नपूर्तीसाठी हा एजंटही असा राडा करायला तयार झाला. आता बोला. माझे हृदय कृतज्ञतेपोटी आणि तुमचे हृदय तिरस्काराने भरून गेले. तुम्ही गाडीचे दार उघडले खरे, पण एक जणही तसूभरही हलला नाही. तुझ्या खिडकीतल्या मित्राने मला आत जाण्याविषयी सुचवले. आता काय मी लंबूच्या मांडीवर जाऊन बसणार होते? मी गोडीगुलाबीने मला खिडकीत जागा द्यायचा आग्रह धरला आणि लाजे पोटी का होईना तुम्हाला थोडे थोडे सरकायचे नाटक करावे लागले.

मी गाडीत बसले असे म्हटले तर तुझा वाचताना गैरसमज होईल. गाडीत टेकायला तुम्ही जागाच कुठे दिली होती? तसेच हवेत अडकलेल्या अवस्थेत मी गाडीचा दारवाजा बंद केला. तुम्हाला वाटत होते की असा प्रवास करायची मी हिम्मत करणार नाही तेव्हाच असाच प्रवास करायचा आहे हे माझ्या मनाला समजावायला सुरवातही केली होती. गाडी सुरु होऊन दहा एक मिनिटे झाली असतील का रे? तुझ्या खिडकीतल्या मित्राला पोटात मळमळू लागले. तो दुसऱ्या सीट वरून खिडकीतल्या सीट वर जागा बदलताना मी चपळाईने स्वत:ला सीट मध्ये कोंबून घेतले. दरम्यान गाडीने NH 52 वर भरधाव पळायला सुरवात केली. वेळ सरला तसा लंबूचा शिवीगाळ ओसरला. मी मात्र तरीही दोन अनोळखी पुरुषांच्या मधल्या अपुऱ्या जागेत अंग चोरून अवघडल्यासारखी बसले होते.

लंबूने मला माझा अतापता विचारला तशी मी त्याला माझी ओळख करून दिली. मी ओळख करून दिली तसा माझ्या बद्दलचा तिरस्कार थोडा ओसरून, थोडे कुतूहल वाटू लागले. लंबूला एवढी जाणीव नक्की होती की माझ्या रोजच्या लेखनातून तुमची वार्ता चार लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याला तर ही भीती वाटत होती की माझी भटकंती प्रवासापूर्ती मर्यादित नाही तर मला कुठच्या ओफ़िशिअल मिशनवर नेमलेले आहे आणि मी त्या गुप्त मिशन मधील माझी कामगिरी पार पाडत आहे. मला ते ऐकून स्वप्नगत वाटले. काल परिस्थिती बरोबर उलट होती. मला on duty असल्याचे सोंग रचावे लागले होते. पण कालचे खोटे काय किंवा आजचे सत्य काय, कोणाला पटवून द्यावे याचा माझ्याजवळ काहीही पुरावा नव्हता. तुम्हाला माझी खरीखुरी ओळख दाखवली तरी तो माझ्या मिशनच्या पूर्वनियोजनाचा भाग वाटत होता. आता तुमच्या बद्दल मी माझ्या रिपोर्ट मध्ये काय लिहिणार हीच चिंता लागून राहिली होती. म्हणून थोडा वेळ तुम्ही गुड बोइज सारखे वागत होतात. पण जशी काय मी तुमचीच सवंगडी आहे याची खात्री पटू लागली तसे तुम्हाला माझे भय वाटेना झाले.
IMG_20190305_154242.jpg
पुढे गप्पागोष्टी अशा रंगल्या की जणू चार नाही पाच मित्र प्रवास करत होते. आणि मित्रता असते तिथे कोणाची कोणाला अडचण कशी होईल? खिडकीतल्या मित्राला ओकारी करून करून ग्लानी येउ लागली तसे त्याचे डोके मी माझ्या मांडीवर घेउन त्याला निजू दिले. एकीकडे आपल्या सुखदुखाच्या गोष्टी चालू होत्या. लंबूने बिस्किटे काढली ती आपण वाटून खाल्ली. मग पुढच्या सीट वरच्या मित्राने मोबाईल वर एकसे एक गाणी वाजवायला सुरवात केली. त्या छम्मक गाण्यांवर आपण टाळ्या पिटून ताल धरायला सुरवात केली. तुझ्या मोबाईल मध्ये तू आपले फोटोव्हिडीओ काढलेस. मी सुचवलं की गाडी थांबवून आपण सारे रस्त्यावर नाच करूया. लाजत लाजतच तुम्ही तयार झालात पण आपला तो कार्यक्रम आटपला तोवर अशा मस्तीच्या नादाने तुम्ही अवाक होऊन गेला होतात.

आज सर्वतोपरी तुमच्या मौजमज्जेचा दिवस होता. म्हणूनच तासां- दीड तासागणिक गाडी थांबवून लंबू स्वत:ची एकेक नोट खर्च करून तुमच्यासाठी बिअर विकत घेऊन यायचा. मी ही तुम्हाला थांबवलं नाही कारण, आजचा प्रवास आटपला की पुढची सुट्टी मिळेपर्यंत पुढचे काही महिने घरापासून, फॅमिलीपासून पार दूर, जगाच्या संपर्क कक्षेच्या बाहेर, भारतीय सीमेवर तुम्हाला ड्युटी करायची. या ड्युटीचा वर विषय येऊन थांबला की तुम्ही एकेक जण खूप खूप उदास व्हायचात. मग परत एक ब्रेक व्हायचा आणि परत बिअर!

Untitled-1.jpg

चायनीज आक्रमणापासून भारतीय सीमेचे रक्षण करण्याऱ्या इंडिअन आर्मीचे तुम्ही कूक! तुमच्या बरोबर प्रवास करायला मिळाला म्हणून बर्फाच्छादित Line of Actual Control वरच्या अनेक रोचक गोष्टीही मला ऐकता आल्या. बोर्डर वरच्या ड्युटी वर सैनिकांबरोबर त्यांच्या कुक्सचे आयुष्य सुद्धा किती कठीण असते ते तुमचे मनोगत ऐकता आले. तुम्ही जे सांगितले की आर्मीच्या अंगातील ताकद टिकवण्यासाठी तुमचाही वाटा आहे यात काही शंकाच नाही.

दर अर्ध्या तासाने लंबू खिशातले पैसे काढून मोजायचा. सुरवातीला मला त्याच्याकडे थोड्याफार नोटा दिसत होत्या. पण बिअरच्या तीन चार राउंडस झाल्यावर दोन चार नोटाच राहिल्या तेव्हा मात्र मी त्याला सांगून पाहिले की आता हे प्यायचे प्रकरण पुरे झाले. पण त्याने ऐकले नाही. आजचा प्रवासच तसा आगळा वेगळा होता. दर वेळेस सुट्टी संपवून ड्युटीवर परतायचा प्रवास संपता संपत नाही. असे वाटते की, नोकरी सोडून आत्ता घरी पळून जावे. पण आजचा प्रवास तुम्हाला त्रासदायक वाटला नाही. सुरवातीला तर गाडीच्या बाहेर सामनासकट फेकून द्यावे एवढा माझा तिरस्कार वाटत होता आणि नंतर पुन्हा पुन्हा मला धन्यवाद देऊनही तुमचे समाधान होत नव्हते.

जेव्हा तू मला सांगितलेस की तुला मला सासू मा मानायची इच्छा होतेय. मी तुझ्या तोंडून हे प्रथम ऐकले तेव्हा मला वाटले की माझी ऐकण्यात काहीतरी चूक झाली. याच कशाला पण एकूणच आयुष्याच्या प्रवासात अनेक जण भेटतात कोणी मला ताई म्हटते कोणी आंटी म्हणते. मेघालय मध्ये तर कोणी कोणी मम्मी म्हणत होते. पण आयुष्यात प्रथमच कोणी मला सासू मां मानले. आता ह्या नात्यात एक दुसराच ट्वीस्ट आहे. मला दोन मुली आहेत त्यामुळे ते शब्द मला विशेष खटकले. पण तू माझ्या बिन बुडाच्या शंकेचे निरसन स्वत:हून केलेस.

“मेरा सासू मा की लडकी लोग से कोई वास्ता नही| फिर भी तू मेरी सासू मा है| क्यो की जब मै शादी करुंगा तो मै मेरी वाईफ को बोलून्गा| ये मेरी सासू मा है तो इस नातेसे ये तेरी मा हो गयी|”
म्हणूनच माझ्याशी जोडलेल्या सर्व नात्यात तुझे माझे नाते सर्वात अनोखे आहे.

आपला प्रवास संपायला फक्त एकच तास राहिला असेल. काळोख पडला होता. थंडगार वारा वहात होता. बिअरच्या नादापायी लंबू जवळच्या सर्व नोटा संपल्या होत्या. एक शेवटची बिअर घेण्यासाठी त्याने तुझ्याकडे लकडे लावले. वालोंगला तुम्ही सारे दुकानात गेलात तेव्हा पोटात अन्नाचा कण गेला नाही तो तुमचा खिडकीतल्या मित्र ग्लानी येउन माझ्या मांडीवर निजून राहिला होता. इतक्यात तू मला दुकानात बोलवायचा इशारा करू लागलास. मी तुला समजावायचा प्रयत्न केला की मला हलणे कठीण आहे. पण तू काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हतास. मी उतरून दुकानात गेले तेव्हा आधी तू माझ्या हातात दोन गुड डे बिस्कीट चे पुडे सोपवलेस. त्याशिवाय दुकानाच्या टेबलवर माझ्यासाठी गरमागरम मॅगीही माझीच वाट बघत होते. इथून पुढे डोंगरात खायची काही सोय होणार नव्हती. मी आज रात्री उपाशी राहेन या काळजीपोटी जवळची शेवटची नोट तू बिअर वर नाही तर माझ्या जेवणासाठी खर्च केलीस. एवढ्या मोठ्या मेजवानीला मी नाही कस म्हणू? आपण दोघांनी एकमेकांना गरमागरम नुडल्स भरवत सासू आणि जावयानी एकमेकांना निरोप घ्यायच्या आधीचा थोडा वेळ एकत्र घालवला.
maagi.jpg

वालोंग ला माझी काहीही रहायची सोय होणार नाही ही एकच चिंता तुला लागून राहिली आणि तू ती परत परत बलून दाखवली होतीस. मी I.B. ला उतरून घ्यावे हा तुझा सल्ला शेवटी मी ऐकला नाही. मी गोरोम पाणी ला उतरले आणि तुला शेकहांड केला तसे तुला गलबलून आले. तू मला मिठी मारलीस आणि पुटपुटलास, “बस क्या? सिर्फ शेकहेंड करके बायबाय बोलोगे?”

तुम्हाला पुढे किबिटूकडे निघायचे होते. ड्रायव्हर घाई घाई करत होता. पण तुझा पाय तिथून निघेना. त्या उजाड रस्त्यावर एकच घर होते. त्या घरात जी बाई रहाते तीच डोंगला सूर्योदय पहायला जायच्या डोंगरातल्या वाटेवर प्रवाशांचा वाटाड्या बनून जाते. तिच्या घरी तिथे माझी रहायची सोय होईल का ते बघायला तू स्वत: माझ्याबरोबर आलास. आपण दार ठोठावले ते तिनेच उघडले. पण माझी अडचण सांगितली तरी रात्रीपुरता आसरा द्यायलाही ती मूळीच तयार नव्हती. तुमची जीप तर पुढे जायची होती. पुन्हा उलटी मी वालोंग ला जाऊ तरी कशी? आता प्रश्न एवढ्या सहजी सुटणार नव्हता तशी मी तुला तिथून निघायची गळ घातली. माझ्या काळजीपोटी तुझा जीव वरखाली होत असतानाही शेवटी तुला निघावेच लागले. तू निघालास, तसे माझी खुशाली तुला कळवायचे सारे मार्गही बंद झाले.

आजचा दिवस सरत आला होता तशी तुझ्या फेवरेट डायलॉगची पुनरावृत्ती आणि तीव्रता वाढत चालली होती. “मै तुमको जिंदगीभर भूल नही सकता, लेकीन तुम मुझे भूलही जाओगे|” असा फिल्मी डायलॉग रिअल लाईफ मध्ये मारताना मी तर दहा वेळा विचार करेन. जरी त्यातला रांगडेपणा मला कळतो, भावतो तरी असं उलगडून बोलायची मला सवय नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस तू तुझ्या भावना व्यक्त केल्यास त्या त्या वेळेस मी ते हसण्यावारी नेले. पण हे पत्र संपवायच्या आधी मला त्या बद्दल माफी मागायची आहे. आणि माझ्या मनातली एक भीती तुला बोलून दाखवायची आहे, “मै तुमको जिंदगीभर भूल नही सकती, लेकीन कही तुम मुझे भूल तो नही जाओगे?”

तुझी
सासू मां

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>“मेरा सासू मा की लडकी लोग से कोई वास्ता नही| फिर भी तू मेरी सासू मा है| क्यो की जब मै शादी करुंगा तो मै मेरी वाईफ को बोलून्गा| ये मेरी सासू मा है तो इस नातेसे ये तेरी मा हो गयी|”
कित्ती वेगळं थिंकिंग Wink

शेवट चांगला आहे. आता पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल.
अवांतर, सारखं सारखं पावसाचं ऐकून तुमच्यात (म्हणजे बॅगपॅकर्सच्यात) पोंचो अलॉड नाही है काय Happy

हर्पेन, वेका धन्यवाद
वेका >> हेहे ... त्या महिन्यात खर तर पावसाचं काहीच काम असायची गरज नाही (फेबृबारी - मार्च ) पण गेल्या वर्षी सुटीच्या दिवसात तो ही फिरायला निघाला असेल. मी जाईन तिथेच तो कसा पोहोचायचा? . मलाही नाही माहित.