संध्याकाळ

Submitted by pranavlad on 6 May, 2020 - 03:06

तव स्मृतींनी संध्याकाळी
पांघरले वस्त्र तमाचे
गुदमरला श्वास फुलांचा
विरघळले दुःख कुणाचे?

थबकली हवाही इथली
अवघडून वाहत आहे
पारावर कुणी शहाणा
विराणी ऐकत आहे

मज पुन्हा आठवू लागे
तव सदा निरंतर माया
रणरणत्या उन्हात जैसी
वृक्षाची शीतल छाया

मृगजळात तव भासांच्या
मी खोल खोल हा बुडतो
मज काठही गवसत नाही
आणि तळही फुटका दिसतो

©️ प्रणव

Group content visibility: 
Use group defaults