चकणा - एक गूढ कथा

Submitted by सागर J. on 9 April, 2020 - 22:46

" ए काश्या कांदा फोड कि लवकर , कधी पासून बसलोय असाच ."

"अरे थांब कि किती घाई आहे तुला , साल्या स्वतः एक पैसा पण नाही घालत आपल्या पार्टी साठी पण ऑर्डर देणार का मला "

" मग काय तू दोस्त आहे आपला आणि चकण्याशिवाय मजा नाही दारू पिण्यात , लवकर फोड कि बोत्तल."

नाऱ्याच्या शेतामध्ये आमची तिघांची पार्टी चालू होती . मि , मनोज आणि नरेश तिघेजण खूप जिवाभावाचे मित्र होतो . अगदी लहानपणापासून ........लहानपणी मोठे माणसं बाटली मध्ये काय पितात याचे अप्रूप आम्हा तिघांनाही होते . मोठे होता होता त्या द्रव्याचे नाव दारू आहे असा एक मोठा शोध आम्हाला लागला . गम्मत म्हणून थोडीशी घेत घेत कधी आम्ही एक्स्पर्ट झालो आम्हालाच कळलं नाही.
गेल्या पाच वर्षापासून मि मुंबईला एका सोसायटीमध्ये वॉचमनची नोकरी करत होतो .मुंबई मला रास आली होती. सोसायटीचे निरनिराळे लोक , त्यांचे स्वभाव , त्यांचे गुपित सगळे माहित झाले होते . कधी कधी हे श्रीमंत लोक त्यांचे गुपित लपवून ठेवण्यासाठी मला काही लाच पण देत .असच एकदा एका साहेबाने त्याच अफेयर त्याचा बायकोपासून लपवून ठेवण्यासाठी मला व्हिस्की ची बाटली दिली होती . ती मी माझ्या गावातील मित्रांसाठी खूप जपून ठेवली होती . काही दिवसांनी जेंव्हा मि गावाकडे गेलो तेंव्हा आम्ही परत नार्याच्या शेतामध्ये पार्टी ठेवली होती . नाऱ्या शहरात नोकरीला लाव म्हणून माझ्या मागे लागला होता . आणि मन्या ......त्याची गोष्टच वेगळी होती .तो तर दारूच्या खूप आहारी गेला होता . त्याच्या अंगाला नेहमी देशीचा वास असे . रात्री गाढ झोपेत पण त्याच्या कानाजवळ येतो का पार्टीला म्हणा कि गडी तयार सोबत करायला . त्याच्या म्हाताऱ्याने त्याचे लग्न पण लावून दिले पोरग सुधारेल म्हणून पण काय उपयोग झाला नाही .

" अरे हि बाटली विशी कि काय ते पितो असा झालाय एकदा , लवकर दे ."

" थांब बे बेवड्या देतोय ना तो "

मि सगळ्यांच्या ग्लासात व्हिस्की टाकली . त्याची पहिली चव घेतली व मस्त नशा आली सगळ्यांना .सगळा कसा हलक वाटायला लागलं. मन्या तर गपकन ग्लास संपवून दुसऱ्याची वाट पाहत बसला होता. काही वेळाने जास्त नशा झाल्यावर मन्याने त्याच्या खिशातून चपटी देशी दारूची बोत्तल काढून लवकर गटाकली.

" अबे काय करतोय, एवढी स्टॅंडर्ड पिताना पण तुला देशी पाहिजे का सोबत "

"काय करू ......काश्या......तुला म्हणून सांगतो ...ह्याच्या शिवाय जमत .....नाही मला "

"अरे भाई तुझा दोस्त आहे ना आता असला काही नाय प्यायचा , तुला माहितीये का मि एकदा सोसायटीच्या पार्टीमध्ये एकदा उरलेली शॅम्पेन नावाची दारू पण पिली होती, काय लागती म्हणून सांगू तुला ..........."

" मग काय ........भावड्या....... दोस्तासाठी नाही आणली तू ...."

"ए खुळ्या..... दहा हजाराची एक बोत्तल असती ती .....आपण आपल्या लेव्हलला राहायचं..."

पण मि शॅम्पेनची एवढी तारीफ केली होती कि मन्या माझ्या मागेच लागला होता. तो म्हणाला कि काय अर्थ आहे आयुष्यात शॅम्प दारू ना पिता मेलो तर ,मला पाहिजे काहीपण कर ..."

पहिल्यांदाच व्हिस्की पित असल्याने ती इतकी चढलं असे वाटले नव्हते . तसेच झोकांड्या देत आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन घरी गेलो . माझ्या घरचा दरवाजा आतून बंद होता . आई -बहीण झोपले असतील आता कश्याला उठवायचे म्हणून मि बाहेरच ओसरीवर ताणून दिली ............
सकाळी सकाळी लोकांच्या कुजबुज करण्याच्या आवाजाने मला जाग आली. खूप गाढ झोप लागली होती रात्री बहुतेक . उठून बसलो तेंव्हा डोके जड वाटत होते ,बहुतेक रात्रीची पूर्ण उतरली नव्हती..........गावातील लोक हळू आवाजात कुजबुज करत कुठेतरी जात होते. कोण मेल का काय गावात . माज्या घरात कोण दिसत नव्हतं , तसाच लोकांच्या पाठी गेलो . गर्दी मन्याच्या घराशी झाली होती ." आयला मन्याचा बाप गचकला का काय ? बर झालं ते म्हातारं दररोज देवाला म्हणायचं

" देवा मला उचल रे . सहन होत नाही हे म्हातारंपण ...."

तसा हे फक्त म्हणायला , बाकी म्हातारं खूप कडू होता . जरा ठसका लागला आणि जवळ पाणी नसल कि सगळ्याचा शिव्यांची लाखोली वाहून उद्धार करायच . मला काही तुकडा जात नाही असा म्हणनार म्हातारं एकट असताना चांगली तीन तीन भाकऱ्या एका दमात खायचंबी. ते गेलं आता तर मन्या सुटला अस वाटलं मला तर तिथे ते म्हातारं जिवंत बसल होत . अायला म्हंजे दुसर कोण गचकल ...............................

बघतो तर काय माझा दोस्त मन्याचं गचकला होता .......माझा तर डोळ्यावर विश्वास बसेना गेला होता अरे असा कसा काय झालं ....काल तर आम्ही पार्टी करत होतो....काल तर मस्त होता मग .....बाजूला मला नाऱ्या दिसला रडत बसलेला . त्याला जाऊन कसे झाले विचारावं तर माझीच वाचा गेली होती .........काही वेळाने तिरडी उठली मण्याची ...त्याची बायको धाय मोकलून रडायला लागली. काय करणार बिचारी ,कोण सांभाळ करेल तिचा आता ....असो ....गावाबाहेरच्या एका चितेवर मन्याला अग्नी दिला गेला . दोस्त गेल्याच खूप दुःख झालं होता आम्हाला ...सुधरत नव्हता मला काहीही .....वापस ये रे मित्रा अस नको सोडून जाऊस.....

आणि माझी नजर दूर अंतरावर असलेल्या झाडावर गेली तर , माझा सूरकन दारू उतरली....पाय लटपट कापू लागले माझे ....नजर पण हालत नव्हती ...समोरच्या झाडावर मन्या बसून माझ्याकडेच बघत होता . त्याच्याकडे यायला खुणावत होता ......हा तर मेला आहे ना मग .....समोर त्याची चीता आणि झाडावर बसलेला तो ......बेन माझ्याकडे बघत हसत होता आणि क्षणात मी भोवळ येऊन खाली कोसळलो.

" कसा काय भोवळ आली ह्याला म्हणायची ?"

" अरे त्याचा मित्र गेला म्हणून दुःख मध्ये झाला असेल तस ,पण काय दोस्ती होती ह्यांची व्वा......"

" एे काश्या उठ रे "
नाऱ्या मला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होता ,हळू हळू मला शुद्ध येत होती तेंव्हा लोकांचे असे बोलणे कानावर पडले .आता ह्यांना कोण सांगा मला का चक्कर आली ते .....कोंन विश्वास ठेवणार .....मी उठून बसलो तसे माझ्या जवळ थांबलेले लोक मला काळजी घ्यायला सांगून घरी निघून गेले . नाऱ्याच थांबला होता सोबत माझ्या .

" अरे नाऱ्या मला त्या झाडावर मण्या दिसला होता बे ...."

"अरे खुळा क काय तू , गेला आपला दोस्त नाही भेटणार पुन्हा "

म्हणून नाऱ्या रडू लागला , आता मित्र गेल्याचा दुःख मला पण होता की , पण भीतीने माझा अंग थोडा थोडा अजून पण थर थर करत होता .पण जाऊदे दारू मुळे मला भास झाला असेल कदाचित .

घरी आलो पण माझ्या डोक्यातून ते दृश्य काय जात नव्हते . स्मशानातल झाड आणि झाडावर बसलेला तो .... मण्या....
शहरात निघून जावं वाटत होते पण मित्रा गेल्यावर असं कसा जायचा निघून . मन्याच्या घरी पण जायची हिंमत होत नव्हती माझी. पण त्याच्या पिंडदान च्या दिवशी मात्र मला बळजबरी नेल नाऱ्या न ......
तिथे पांढऱ्या कपड्यात उभी होती सगळी मंडळी . मण्याच्यां बायकोला पांढऱ्या साडीत पहावला नाही मला . पूजा करणारे गुरुजी म्हणाले आता पिंडदाना साठी नैवेद्य ठेवा आणि कावळ्या ना आमंत्रण द्या .त्या प्रमाणे आम्ही सर्व केले पण कावळा काही शिवत नवते पिंडाला . मग त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्याला मनातील इच्छा पूर्ण करतो असे आश्वासन दिले पण कावळा काही शिवत नव्हता . च्यायला काय इच्छा राहिली आता ह्या बेवड्या ची........शेवटी सर्वजण थकून गेले .मग गुरुजी म्हणाले

" आजचा मुहूर्त तर गेला पुढे चार दिवसांनी आपण पुन्हा पिंडदान करून बघू कावळा शिवतोय का......"

सगळे घरी परतले पण मी तिथेच बसून विचार करत होतो की काय इच्छा राहिली असेल त्या बेण्याची .......ह्याला काय घराची खूप काळजी होती असा पण नव्हता , मेला रोज बायकोला मारहाण करायचा , ह्याच्या मरण्याने ही सुटली होती बिचारी . शेत होता थोड ते पण तो करत नवता .... बटाई ने दिलेली जमीन . मग काय अडला असेल ...... मन्याने विष पिऊन आत्महत्या केली असे खोटेच दाखवल्यामुळे शासनाकडून मदत पण भेटली होती त्याच्या बायकोला . बेवड्याचा काहीतरी फायदा झाला म्हणून गावकरी पण काही बोलले नाहीत .

मग मी शोध चालू केला मण्याची राहिलेली इच्छा पूर्ण करायचा .गावामध्ये तर मन्या कुटुंबाचं काळजीने अडकला होता असं सगळे म्हणत होते .पण काय खरं ते मला विचारा ना .......
तसा मन्या रोज रात्री माझ्या स्वप्नात येत होता . त्याचे भास सारखे मला होत होते . रात्री झोपेत माझा पलाग कोणीतरी जोरजोरात हलवत होते .मन्या असेल नक्की .....ह्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय हा माझी मानगूट सोडणार नाही हे मी पक्क ओळखलेच होते .एकद्या नाऱ्या म्हणाला की त्याच्या म्हाताऱ्याला मन्या हुक्का घेऊन देणार होता म्हणे .ती इच्छा बहुतेक अपूर्ण राहिली असावी .झाला आम्ही म्हाताऱ्याला हुक्का आणून दिला , ते पित पित म्हातारा काय म्हणतंय

" डुकरा आधी द्यायला काय होत होता , माझ्या सोन्यासारखा पोरगा गेला नसता ना .....नरकात जाणार तुम्ही ......."

पुढचा ऐकायला आम्ही थांबलो नाहीच .म्हाताऱ्याने हुक्का घेऊन वर आम्हाला शिव्या दिल्या होत्या. दुसऱ्यादिवशी पण मन्या च भास झाला मला . आता माझीच हालत खराब होत चालली होती . आताशा मी जेवण पण कमी करत होतो . मण्याची इच्छा म्हणून कितीतरी गोष्टी केल्या आम्ही पण साल्याच समाधान होताच नव्हता . मध्ये एकदा मला लक्षात आलं की मन्या मागे मला त्याची बायको रोमँटिक पिक्चर बघायचाय म्हणून मागे लागलीय असा म्हनला होता हे आठवलं .पण त्याच्या बायकोला हे कोण विचारणार .म्हणजे मला काही नाही पण ती दुःखात असेल बिचारी . आणि तिने गैरसमज करून घेतला तर .....

पण मन्याची भीती मला जास्त वाटत होतं. आधी जरी मित्र असला तरी आता तो भूत झाला होता. भुताचा काय भरवसा ?
दुसऱ्या दिवशी मन्याचे घरी गेलो, म्हातारा नव्हता घरी ....बर झालं ... मण्याची बायको धन्य निवडत बसली होती, मला बगून हसली . काळजाचा ठोका चुकला ना माझा . मण्याची बायको होतीच सुंदर .... लंगुर के मुह में अंगुर असा सारा गाव म्हणायचं.

"वहिनी तुम्हाला पुन्हा हसताना बघून खूप चांगल वाटल बघा "

" काय करावं हो भाऊजी रडत बसून गेलेलं माणूस काय परत येणार का , आणि आता कोण सांभाळणार आम्हाला ...?"

आता तीनी हाक दिल्यावर अख्खा गाव सांभाळायला आला असता .त्यात मी पण होतो .गावामध्ये सगळ्यात सुंदर होती.....

"वहिनी...तुम्ही....तुम्ही माझ्यासोबत पिक्चर पाहायला येताल का रात्री "

भरकन बोलून गेलो मी , आता मला टेंशन आला ही काय बोलतेय ते , पण ती खुश झाली आणि म्हणली

" का हो भाऊजी, लोक काय म्हणतील. जा बाबा तुम्ही पण आता हे झालात....... अहो कुणाला कळणार नाही अस जावं लागेल..."

हे एकूण मला घेरी यायचीच बाकी होत. आधीच हीच कारनामे ऐकले होते .आता शिक्कमोर्तब पण झाला .नको ही ब्याद आपल्यावर म्हणून मी तिथून सटकलो . अशा प्रकारे मण्याच्या कितीतरी अतृप्त इच्छा आम्ही पूर्ण केल्या पण मन्याच भूत काय जात नव्हत......

एक दिवशी नाऱ्या मला म्हनला

" मला वाटायला लागलंय की त्याला ती प्यायची आहे ."

" काय ते स्पष्ट बोल आधीच त्यान डोक पकवलाय माझ "

"अरे तू त्याला ते द्यायचा वादा केला होता ना .....ते काय ते शाम्पू....नाय नाय शापेन.....ते मागत असेल तर "

"अरे काय पण बोलू नको , साल्या ला काय जातंय दहा हजार काय तू घालणार आहेस .....आणि एवढं करून पण जर त्याची इच्छा
ती नसलीच तर काय "

"पण प्रयत्न करायला काय जातंय आणि आपला पण होईल की थोडा घेऊकी कसा ......."

नाही हो म्हणत मी तयार झालो . खूप प्रयत्न करून माझ्या मुंबई चा साहेबाकडून एक शम्पेन ची बोत्तल आणली . मग एका रात्री मी आणि माझा मित्र गुपचूप मण्याचा शेतात जाऊन बसलो होतो .मण्याची नाही पण दुसरा भूत आला तर काय करावं .......

तर मग शंपेन ची बाटली आम्ही नेहमी बसायचो तेथे ठेवली. आणि मोठ्या आवाजात मण्याला बोलावलं. तशी आमच्या समोरची बाटली उचलली गेली . आणि मन्या हळू हळू आमच्या समोर दिसू लागला आम्हाला . मस्त खुशीत तो शंपेण पित होता. तर असा होता बेन , घरच्या वाटत होता की मन्याला त्यांची काळजी आहे आणि हे शांपेन पायी थांबला होता . धन्य ते दारू प्रेम ...... आता तरी सुटलो असा वाटत होतं तर मन्या म्हणाला

"नुसती शापेण आणली , चकणा कुठाय बे ?"

नमस्कार मंडळी कथा आवडली असेल तर किंवा काही चुका झाल्या असतील तर नक्की सांगा. आणि माझ्या दुसऱ्या कथा ही पाहा . तुमच्या सहकार्यानेच स्वतः तील लेखक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
मी इथेपण http://www.marathirt.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाऱ्याच्या बायकोला तर तसा पांढर्या साडीत पहावला नाही मला .
इथे मन्या हवेय....

खुसखुशीत आहे कथा... आवडली.....

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. नवीन असल्याने थोड्या लिखाणात चुका झाल्या आहेत. त्या पुढे सुधारण्याचा प्रयत्न करेन.