उपद्व्याप-१

Submitted by चितले शन्कर on 1 April, 2020 - 18:40

दुसरीत / तिसरीत असतांना, म्हणजेच ९/१० वर्षाचा असताना मी सायकल चालवायला शिकलो.प्रथम हातात सायकल धरून , एक हात हँडलला व एक हात सीटला धरून,घरापुढील अंगणात गोल गोल चकरा मारता, मारता,मध्येच दांड्याखालून तिरका पाय टाकून तोल सावरता/सावरता सायकल चालवायला माझा मीच शिकलो.सर्वात प्रथम जेव्हा तोल सांभाळत , उतारावरून जायचो तेव्हा स्वनिर्मितीचा, आपण कांहीतरी केल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला . खरच सांगतो, जीवनात नंतर जेव्हा जेव्हा सुखदायी घटना घडल्या व त्या त्या वेळी जेव्हा जेव्हा आनंद झाला, त्या सर्वांपेक्षा वयाच्या ९ व्या वर्षी जेव्हा सायकल चालवणे शिकलो तो आनंद सर्वात मोठा होता.( वयाच्या ज्या वर्षांत मी सायकल शिकल़ो, त्याच वयाचा असताना माझा मुलगा गिअरची १०० किलो वजनाची मोटारसायकल चालवायला शिकला.आहे नां ! काळाचा महिमा.तो म्हणेल, काय मोठं सायकल शिकल्याचे कौतुक सांगतायत !असो. तर अशा तर्हेने एकदा सायकल शिकल्यावर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तेथे तेथे सारखी सायकलच चालवायचो.घराच्या अंगणात,शेतात,बांधावर,शाळेच्या पटांगणात, कोठेही अगदी जवळसुध्दा सायकलने जात असे. आईने सांगितलेली किरकोळ कामेसुध्दा सायकल शिवाय व्हायची नाहीत. साधारण १०० फुटाच्या परिसरात पिठाची गिरणी , किराणा मालाचे दुकान,सलून, लाँड्री,सर्व गोष्टी घराजवळच होत्या पण प्रत्येक ठिकाणी मी जाताना सायकल शिवाय जायचो नाही.
अशी सायकल मला सुखासुखी मिळत असे ,असे मात्र समजू नका हं ! त्यासाठी योग्य ती बोलणी खायला लागायची ,पण सायकल दिलीस तरच 'हे' काम होईल अशा प्रकारे मी आईला अडचणीत आणायचो व सायकल मिळवायचोच.
"मातीतून, धुरळ्यातून, दगडधोंड्यातून सायकल पादडवतो,पण कधी सायकलवर फडका सध्दा मारायचा नाही, सायकल धुवायचा नाही, तिला तेलपाणी करायचा नाही. फक्त सायकल पादडावयाची तेवढी माहीत " असा घरचा 'अहेर' मिळायचा.
झाले,सायकल धुवायची, तेल पाणी करायचे असे मनाने घेतले.
एका सुटीच्या दिवशी दुपारी जेवणे झाल्यावर वडील वामकुक्षी करत असताना हळूच दार उघडून सायकल बाहेर काढली.अंगणात सायकल उलटी केली ,म्हणजे सीट व हँडल जमिनीवर आणि दोन्ही चाके वर आकाशाकडे.कल्पना करा वयाच्या ९ व्या वर्षी २६" इंची मोठी सायकल अशी उलटी करायला मला काय परिश्रम पडले असतील ? कोपर/ढोपर कायम फुटलेलीच असायची. सायकल उलटी करून झाल्यावर नळाला रबरी तोटी जोडुन पाण्याच्या फोर्सने धुऊन काढली.मग घरातून राँकेल आणून चेन, अँक्सल,पँडल, फ्री व्हील क्रँक व्हील सर्व जागा राँकेलच्या बोळ्याने धुवून काढल्या .फडक्याने स्वच्छ पुसुन सायकल कोरडी केली.व जवळच असलेल्या पीठ गिरणीच्या गंगारामकडून आँईलची बुदली आणली व सायकलच्या प्रत्येक अवयवांवर सढळ हस्ते मुबलक आँईल सोडले,शंकरावर अभिषेक करतात तसे.आता मला सायकल चालवायची ह़ोती ना ! उरले सुरले तेल, तेलाचे ओघळ सायकलच्या रिमना चोपडले.भरपूर तेल सोडले की सायकल खूप खूप वेगाने पळेल ही माझी कल्पना. आता वडील झोपून उठायच्या आंत सायकल जाग्यावर बांधुन ठेवली.सायकलची सेवा मनोभावे केल्याने आता सायकल न्यायचा थोडा का होईना "हक्क" मला प्राप्त होईल या आशेवर मी रात्री झोपी गेलो.
सकाळी थोडी गडबड, चर्चा, आरडा-ओरडा यांने जागा झालो.भल्या पहाटे, सायकलला दुधाच्या बरण्या लाऊन, दुधाचे रतीब घरोघरी घालायला निघालेले माझे वडील, उतारात सायकलला ब्रेकस् न लागल्यामुळे २० लिटर दुध व वडील दगडी पुलाजवळील गटारांत आडवे होऊन परत आले होते.
सायकलच्या रिमला भरपूर लावलेले ग्रीस व तेल यांनी आपले "काम" चोख बजावले होते.सायकल वेगाने पळाली न थांबता, पण वडिलांना पाडून.
परिणाम ? कोणत्याही आयुधाचा मार आईकडून खायच्या तयारीत होतो.मनाची तयारी असली म्हणजे मग मार सुसह्य होतो.(भरपूर पूर्वानुभव !)
पण परमेश्वराने माझ्या कष्टाचे मोल जाणून ,आईला मला मारण्यापासून पराव्रूत्त केले होते. अकल्पित घडले होते.केवळ वडिलांच्या अस्खलीत कोकणी "भाषालंकारानी" मला सालंक्रुत व्हायला लागले.मोठ्या मारापासून मला, व मोठ्या मोडतोडीपासुन वडिलांना वाचवल्याबद्दल परमेश्वराचे आभार.! तेव्हापासन कोठेही "आँईल" सोडताना मला सायकल डोळ्यापुढे दिसते.-शंकर चितळे.पाग चिपळूण.(पुणे-२९/३/२०२०)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लई भारी.
वाईटातून चांगले म्हणजे,
"केवळ वडिलांच्या अस्खलीत कोकणी "भाषालंकारानी" मला सालंक्रुत व्हायला लागले."
भाषाज्ञानात भर पडली. Biggrin

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

फार छान शब्दात वर्णन केले आहे. मजा आली वाचायला...

फक्त एक गोष्ट खटकली...९-१० वर्षाचा मुलगा १०० किलो वजनाची गिअरची मोटरसायकल चालवतो हे जरा अती वाटले. तो जरी खरोखर चालवत असला तरी त्याला देऊ नका. या वयात तितकी समज नसते. उगाच कुठे काही घडले तर फार जड पडेल तुम्हाला...

चालवतात हो मुले मोटरसायकल. आमच्या शेजारचा मुलगा चालवायचा. वडील मागे बसायचे आणि हा पुढे हातांनी जेवढे होईल तेवढे करायचा.
-------
आठवणी आवडल्या.

माझं पण योगी ९०० सारखंच मत आहे, एवढ्या लहान वयात मोटरसायकल चालवायला देउ नये. त्याच्या साठी आणि बाकीच्या साठी बरं नाही ते. बाकी लेख खुसखुशीत आहे.
वडिल दुधासकट गटारात पडल्याचं वाचून मला वाईटच वाटलं, मला तसंही कोणी पडलं तर हसू न येता अरेरे हिच रिअॅक्शन येते.