सुटकेस २

Submitted by जव्हेरगंज on 29 April, 2020 - 15:37

सुटकेस १

गारठा चांगलाच झोंबत होता. आणि हायवेला मोठमोठाल्या ट्रॅव्हल्स सुसाट धावत होत्या. वळणाच्या अलिकडेच एक पेट्रोलपंप आहे. तिथे मी जरावेळ थांबलो. आणि कानोसा घेऊ लागलो. तशी फारशी हालचाल दिसत नव्हती. पण एकदोन लक्झरी कार त्या पुलाजवळच ऊभ्या होत्या. मी बाईक हळूहळू पुढे नेऊन त्या कारच्या पाठिमागे ऊभी केली. आणि लघुशंकेचा बहाना करून ओढ्याकडे चाललो.
"अबे साले दिखता नही क्या, निचे आदमी है" कारच्या पुढे दोघे ऊभे होते. त्यातला एकजण म्हणाला. तसे दिसायला ते प्रतिष्ठित होते.
"ओह. सॉरी. क्या हुआ है?" मी त्यांच्या जवळ जात विचारले.
"तू अपना काम कर. और निकल यहासे. चल फूट.." त्याने जसा काय मला दमच दिला. हे साले तर डेंजर निघाले.
मी मुकाट दुसऱ्या बाजूच्या झुडपात गेलो. तिथे त्यांचे बोलणे जवळपास स्पष्ट ऐकू येत होते.
"आखिर वो सुटकेस गयी तो कहा?" एकजण घाम पुसत बोलत होता.
"मुझे लगता है पुलिसनेही हात मारा होगा" दुसरा म्हणाला. हा थोडा लुकडा आणि दाढीवाला होता.
"पुरा का पुरा नाला ढुंढ लिया भाई, किधरीच कुछ भी नै मिला." निसरड्या गवतातून अजून दोघे वर येत म्हणाले. त्याच्या हातात टॉर्च होत्या आणि ते चांगलेच भिजले होते.

मग बराच वेळ कोणी काही बोललं नाही.

"राजनभाई को खबर देनी पडेगी. अब पुरा मामला चौपट हुआ है." गाडीत अगदी शांतपणे बसत एकजण म्हणाला.
"चलो अब.." दाढीवाल्याने इशारा केला तसे बाकी दोघेही दुसऱ्या गाडीत बसले. आणि उलट्या बाजूने भरधाव निघाले.

जाताना दाढीवाल्याने माझ्याकडे तिरक्या नजरेने बघितले आणि माझा थरकाप उडाला. साले हे गँगस्टरंच असणार. मोठ्या झमेल्यात पडलोय आपण याची जाणीव झाली. आणि अधिकच टेंशन आले.
मी बाईकजवळ आलो आणि पुलावरून वाकून खाली पाहिले. ओढ्यात कार नव्हती. कदाचित क्रेनने उचलून बाहेर काढली असणार. पण तो आतला माणूस जिवंत आहे की मेला काही कळायला मार्ग नव्हता.

बाईक स्टार्ट करून मी उलट्या बाजूने ट्रॉमा सेंटरला निघालो. पहाट झाली होती. आणि आता डोळ्यावर झापडही येत होती. हायवेला चिटकूनच एक पोलिस स्टेशन होते. आणि तिथेच आवारात ती टोयोटा कार क्रेनलाच लटकवून ठेवली होती. मी तिथे जरावेळ थांबलो. पण पोलीस सगळे झोपले असणार. कसलीच हालचाल नव्हती. मग जवळच असणाऱ्या ट्रॉमा सेंटरला गेलो. तर तिथे बाहेर त्या मघाच्या लक्झरी कार ऊभ्या होत्या. मग आत जायची हिंमतच झाली नाही. सरळ घरी आलो आणि झोपलो.

गढूळ! पाणी किती गढूळ!
याचा उपसाच होत नाही
बोजड टायर छातीवर
मी चिखलात रूततो आहे
खोल
खोल
प्रचंड खोल
तळ याचा सापडेना
हे पाणी किती गढूळ!

"ऊठ, ऊठ.." चिऊ छातीवर बसून झापड्या मारत होती. आणि माझे डोळे तरटावले होते. सकाळची साखरझोप कधीच पुर्ण होत नाही.

मग भराभरा आवरले आणि ऑफिसला गेलो.

"मी भोसरीच्या पत्र्याच्या शेडमध्येसुद्धा काम करायला तयार आहे.." त्याने एक पॉज घेतला आणि आम्हां सर्वांकडे निक्षून पाहिले. बॉस अशावेळी आमचा अंदाज घेतो की पुढील वाक्यांची जुळवाजुळव करतो काही कळत नाही. सकाळी गेल्यागेल्याच त्याने आमची मिटींग बोलावली होती. आणि आम्ही एकत्र येऊन बसलो होतो. तरी विक्या काल म्हणाला होता तयारीत राहा.
"पण इथे काम करणार नाही" तो पुढे बोलला. आणि आम्ही अवाक झालो. हे म्हणजे आम्ही काही करायच्या आधीच याची विकेट पडली.
"मी राजीनामा दिलेला आहे हेच सांगण्यासाठी मिटींग कॉल केली आहे. फार फार मी इथे महिनाभर असेन." बॉसने पुन्हा एकदा आमच्याकडे निक्षून पाहिले. आणि आम्ही सगळ्यांनी माना खाली घातल्या.
"कुणाला काही बोलायचंय?" त्याने विचारले.
"बॉस पण तुम्ही राजीनामा का दिला?" मी तत्पर विचारले. "हा त्यांनी मागितला असेल तर ठिक आहे, पण तुम्ही स्वतःहून कसा काय दिला?" बॉसला असले फालतू प्रश्न विचारायची मला प्रचंड आवड होती.
"सर आम्ही येथे पाच पाच वर्षे निर्लज्जपणे घासतोय. आणि तुम्ही दिड वर्षातच कलटी मारताय?" विक्यानेही आपला पॉईंट मांडला.
"वेळ निघून गेली आहे मित्रांनो. आता त्यात काही बदल होऊ शकत नाही. अर्थात मला तुम्हा सर्वांच्या मताचा आदर आहेच.." बॉस शांतपणे बोलत होता.
"चूक केली सर तुम्ही.." मी काय त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हतो.
"एनीवे, आजची सगळी टार्गेट पूर्ण करा.." म्हणत बॉस निघून गेला.

आम्ही सगळे मिटींगरूममध्ये बसून राहिलो.
"च्यायला हा गेला की आता आपली वाट लागणार.." विक्या म्हणाला.
"मग काय, आपल्या नावच्या सगळ्या शिव्या तो खात होता वरती" मी त्याला दुजोरा दिला.
"नाय नाय, त्यांना आपण नाही जाऊ द्यायचं.." चिंकी म्हणाली.
"बरोबर, त्याला आता असा सोडायचा नाही."
कालपर्यंत ज्याला आम्ही हाकलायचे प्लॅनिंग करत होते, त्याला आता कसे थांबवावे याच विचारात गढलो होतो. परिस्थिती कशी झटक्यात बदलते च्यायला!

मग दिवसभर बोअर होत आम्ही गप्पांचा अड्डाच जमवला. बॉसला कुणी कसे कधी झापले याचेच किस्से!

पण विक्याची एक गोष्ट त्या दिवशी कळून चुकली. नालायक बॉस हे आपले संरक्षण कवच असते.
खरंतर बॉस आमच्यासाठी नाही पण डायरेक्टर साठी नक्कीच नालायक होता. त्याला कसंही करून थांबवण्यातंच शहाणपण होतं.

त्यादिवशी लवकरच घरी निघालो. पाच वाजताच गाडीला किक मारली. सुटकेसविषयी मी दिवसभर जसं काय विसरूनच गेलो. वळणावरून जाताना तुटलेला कठडा टक्क दिसला. सोसायटीच्या आवारात गाडी पार्क करून कुत्र्याला चुचकारायला निघालो. तेवढ्यात अनोळखी दोघे चालत माझ्याकडे आले.
"अबे किधर गयेला था तू? इधर दिनभर हम मख्खिया मारते बैठेले है" त्यातल्या एक ताडमाड माणसाने विचारले.
"आप लोग कौन है? क्या चाहिये?"
"अबे वो सुटकेस दे. राजनभाई भेजेला मेरेको."
च्यायला हे काय?
"कौनसी सुटकेस? दिमाग ठिकाने पे है क्या?"
"अबे, हमको सब पता है. रातको तुने सुटकेस उठाया कार से. तू रातकोभी उधर आया था देखा हमने."
ही लोकं खरंतर सीआयडीतंच पाहिजे होती राव.
"मेरे पास कोई सुटकेस नही है. कुछ गलतफैमी है तुमको."
"कुछ गलतफैमी नही है. ये देख प्रुफ हे हमारे पास.." त्याने कमरेला अडकवलेले पिस्तूल मला दाखवले. बापरे.
"अब जाके फट गयी सालेकी... हाहाहा" तो दुसरा खळखळून हसला.

"ठिक है, मै लाके देता हू. इधर कोई लफडा नही चाहिये.."
"जैसा आप कहे हुजूर..." ते खिदळत म्हणाले.

मी धावतंच वरती गेलो. कपाटातली सुटकेस काढली. आणि खाली येऊन त्यांच्या हाती सुपुर्द केली.
"ये क्या बवाल बनाके रख्खा है ईसका?" ते सुटकेस उघडत म्हणाले.
"खुल नहीं रही थी ना, तो ठोक दी.."
"कुछ निकाला तूने इसमेसे?"
"बिलकुल भी नही."
"ये ले, ऐश कर.." एक बंडल देत तो मला म्हणाला.
"नही. कायको"
"ले रे, अभी बच्चा है तू... समझ जायेगा.."
मी तो बंडल ठेवून घेतला. आणि खिदळतंच ते निघून गेले.

जिन्याजवळचं कुत्रं आज स्वतः माझ्याजवळ येऊन ऊभे राहिले होते.
चुचकारून घ्यायला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

जबरदस्त!
आता सहाव्या प्रतिसादात नवीन विशेषण शोधा! Wink

हायला! दुसर्‍याच भागात ट्विस्ट आला. सुटकेस तर देऊन टाकली आणि त्यामुळे आता उत्सुकता अधिकच वाढली आहे. रोज नवा भाग हवाच. आणि लगेच संपवू नका.

जबरदस्त.
सांगितलं कोणी होते शहाणपणा करून परत स्पॉट वर जायला, गेली ना सुटकेस.
लवकर टाका नविन भाग, उत्कंठा वाढली आहे.