परशुराम मंदिर, विसावा पॉइंट

Submitted by ferfatka on 19 August, 2013 - 07:43

कोकणात जायचे म्हटले की प्रथम आपल्या डोळ्यांसमोर दिसतो तो अथांग असा समुद्र व त्याचा किनारा. परशुरामांनी समुद्राला ४०० योजने मागे हटवून कोकण वसविले अशी आख्यायिका सांगतात. कोकणातली अनेक पुरातन व प्राचीन मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच चिपळुणजवळील एक परशुराम मंदिर. महाराष्ट्रात परशुराम मंदिर आहेतच त्याशिवाय केरळ, आसाम, गुजरात व पंजाबमध्येही परशुराम मंदिर असल्याचे वाचण्यात आले.

DSCN4130.jpg

मुंबई - गोवा महामार्गावर असलेले श्रीक्षेत्र परशुराम हे कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सप्तचिरंजीवांपैकी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. मनुष्यदेहातील चिरंजीव अवतार म्हणून परशुराम ओळखले जातात. चिपळूणपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर महेंद्रगिरी डोंगराच्या कुशीत असलेले हे परशुरामांचे मंदिर. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. परशुराम हे जगदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे चिरंजीव. परशुरामांचे मूळ नाव राम. त्यांनी हातात परशू धरला म्हणून ते परशुराम. तसेच भृगू कुळामध्ये जन्माला आले म्हणून त्यांना भार्गवराम नावाने हे ओळखले जाते.

या मंदिराचे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की हे मंदिर प्रथम विजापूरच्या अदिलशहाने बांधले. त्यानंतर ३०० वर्षांनी श्री.ब्रह्मेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून जंजिराच्या सिध्दिने मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही कारागिर ख्रिस्ती होते. त्यामुळे मंदिरावर हिंदु, मुस्लिम व ख्रिस्ती स्थापत्यकलेचा अंमल दिसतो. मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे.
परशुरामांच्या जन्मोत्सानिमित्त कीर्तन, भजनाचे कार्यक्रम येथे ठेवले जातात. अक्षयतृतीयेस येथे मोठा उत्सव असतो.

परशुरामांचे मंदिर
DSCN4134.jpgDSCN4122.jpg

मंदिराकडे जाण्याच्या पायºयांचे बांधकाम जांभा दगडातून करण्यात आलं आहे. चिपळूणला पायी जाता यावे म्हणून यासाठी चार किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे. जावळीचे सरदार चंद्रराव मोरे यांनी हा रस्ता बांधला त्याला 'पाखड्या' म्हणतात. मंदिर परिसरात एक छोटी कमान व एक उंच दगडी जांभा दगडातून तयार केलेली दीपमाळ दिसते. मंदिर परिसरात एक तलाव देखील आहे. त्याच नाव आहे बाणगंगा. परशुरामांनी पाच बाण मारून भूमीच्या पोटातले पाणी वर आणले ते बाणगंगा हे तीर्थकुंड प्रवेशद्वाराशेजारीच आहे. परशुरामाची आई रेणुकामातेचं मंदिरही इथे आहे.

रेणुका मातेचे मंदिर :

श्री परशुराम मंदिराच्या मागे रेणुकामातेचे हेमाडपंती पद्धतीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी शस्त्रे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. मंदिर १२८५ च्या सुमारास यादवसम्राट रामचंद्र यांच्या संगमेश्वर-खेड विजयानंतर बांधण्यात आल्याचे येथील जाणकार सांगतात. मंदिरावर अनेक वेळा मुस्लिम आक्रमणे झाली. त्यामुळे इ.स. १६९८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्राचीन काळी दक्षिण भारतामधून हजला जाणारे मुसलमान मक्केला जाण्यासाठी दाभोळ या बंदराचा उपयोग करीत. प्रवासाला निघण्यापूर्वी परशुरामाला ते नवस करीत असत.

परशुराम मंदिराचा परिसर मोठा रम्य व शांत आहे. येथून चिपळूणचा परिसर मोठा सुरेख दिसतो. आम्ही दर्शन घेऊन इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी बºयाच वेळ थांबलो. हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी खास वेळ काढून यायला हवे. इथलं शांत वातावरण आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य मन मोहवून टाकतं. उंचावरुन वशिष्ठ नदीचे मोठे पात्र दिसते. जवळच चिपळूणकडे जाताना दोन किलोमीटरवर सवतसडा नावाचा मोठा धबधबाही आहे.
मंदिरातून चिपळूणकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत विसावा पॉर्इंटला काही काळ थांबलो.

विसावा पॉइंट

parshuram ghat.jpg
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर चिपळूण शहरापासून अंदाजे ८ किमीवर निसर्गरम्य असा हा विसावा पॉईंट आहे. परशुराम घाटातील एक अवघड, व अपघाती वळणावर हा पाँईट आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण येथे आपले वाहन हळू करून काही काळ येथील निसर्गाचे दर्शन घेतो. जवळच परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉईंटवरून चिपळूण शहराचे दर्शन घडते. जवळच असलेला गोवळकोट किल्ला व वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्राचे मनोहारी दृश्य आहे. वाशिष्ठी दर्शन पॉईटला विसावा पॉईट असेही म्हणतात. वशिष्ठ नदीची लांबी ३० किलोमीटर असली तरी तिचे पात्र मोठे आहे. या पाँईटपासून जवळच प्रसिद्ध असा सवतसडा नावाचा धबधबा आहे. वेळ कमी असल्यामुळे मला त्याचे दर्शन फक्त रस्त्यावर थांबून घ्यावे लागले.

चिपळूण -

वाशिष्ठी नदीच्या काठावर असलेले चिपळूण हे गाव. पावसाळ्यात वशिष्ठ नदी आपले पात्र सोडून चिपळणू शहरात घुसते. याच्या बातम्या टिव्हीवर पाहण्यास मिळतात. चिपळूणला सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, करंजेश्वरी देवीचे मंदिर आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटरवरील डेरवण येथील शिवसृष्टीचा खजिना मूर्तीस्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो.

विसावा पॉर्इंटवरून १५ मिनिटातच चिपळणूच्या करंजेश्वर देवी मंदिराकडे जाण्यासाठी निघालो.

करंजेश्वरी देवी

DSCN4159.jpg
चिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. चिपळूणपासून जवळ सुमारे ४ किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.
आज शनिवार असूनही देखील कमी भाविक आले होते. त्यामुळे सहजच भक्तनिवासातील जागा राहण्यास मिळाली. बरोबरचे आणलेले सामान खोलीमध्ये ठेवले. देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो.

कथा

करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्र देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना ३०० ते ३५० वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.

मराठ्यांचे आरमारप्रमुख तुळाजी आंग्रे यांनी गोविंदगड असे किल्ल्याचे नाव ठेवले. किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. पूर्वी एकदा या किल्यावर गेलो होतो. त्यावेळी कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी एवढीच माहिती. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम समाज आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानकºयांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रात जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रात जागा मिळणे कठीण असते.

कसे पोहोचाल :

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण हे मोठे स्थान आहे. एसटीने येथे जाता येते. येथून मंदिराचा रस्ता चिपळूण बाजारपेठेतून जातो. चिपळूणपासून सुमारे ४ किलोमीटरवर करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे.

काही अंतरे :

  • पिंपरी ते रायगड : १३७ किलोमीटर (ताम्हिणी घाटातून)
  • रायगड ते चिपळणू : ११३ किलोमीटर (महाडमार्गे)
  • पिंपरी ते चिपळूण : २५३ किलोमीटर (कुंभार्ली घाटातून)
  • चिपळूण ते गुहागर : ४५
  • चिपळूण ते परशुराम मंदिर : १३
  • चिपळूण ते संगमेश्वर : ४६
  • गुहागर ते हेदवी : २१
  • गुहागर ते वेळणेश्वर : १८
  • संगमेश्वर ते मार्लेश्वर : ४०
  • कसे जाल :

    • मुंबई-गोवा महामार्गावर श्री परशूराम मंदिराची स्वागत कमान आहे.
    • चिपळूणच्या अलिकडे मुंबईच्या दिशेला सुमारे ७ किलोमीटरवर हे स्थान आहे.
    • या मंदिरापर्यंत वाहनं जाऊ शकतात. एक रस्ता पायºयांनी उतरण्यासाठी तर शेजारचा रस्ता गाडीने मंदिरापर्यंत जातो.

      अधिक फोटो व माहितीसाठी कृपया ही लिंक पहा

      ताम्हिणी घाटातून किल्ले रायगडवर रोप वे मधून नुकताच जाऊन आलो. त्या विषयी.... http://www.maayboli.com/node/44682


      रात्री मुक्काम करून सकाळी श्री कर्णेश्वर मंदिर पाहण्यास निघालो. त्या विषयी....

      http://www.maayboli.com/node/44763

      http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_15.html

    Group content visibility: 
    Public - accessible to all site users

    शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. >>> माझे आजोळ आईकडून दरवर्षी देवी आणि चिपळूणचा शिमगा ह्या गोष्टी ऐकवल्या जातात

    मस्त धागा फक्त प्रची अजून क्लिअर् हवे होते

    छान माहिती आहे... मी परशुराम मंदिराला भेट दिली आहे, पण त्यावेळी आम्हाला छायाचित्रण करण्यास परवानगी दिली नाही..

    अगदी लहापणापासूनच्या या वळणावर थांबल्याच्या आठवणी आहेत. फिरोझ रानडे यांच्या इमारत पुस्तकात या देवळाच्या बांधकामाबद्दल लिहिलेले आहे.

    मस्त वर्णन केलंय फेरफटका तुम्ही, हा परिसर बघायची खूप इच्छा आहे, कधी योग येतो बघुया. फिरोझ रानडे यांनी ह्या देवळाबद्दल लिहिलेले पण वाचले आहे. त्याचीपण आठवण झाली.

    सवतसडा म्हटले कि बालपण आठवते माहेरचे गाव संगमेश्वर तालुक्यात असल्याने ह्यामार्गेच जायचो आणि दोन सवतीच्या संदर्भातील गोष्ट ऐकलेली असल्याने नेहेमी सवतसडा कधी येतोय ह्यावर आम्ही मुले लक्ष ठेऊन असायचो.