प्रवासवर्णनातील मायनर त्रुटी

Submitted by सखा on 23 April, 2020 - 23:57

#TravelDiaries
#Around_The_Globe

दिवाळी अंकातल्या अमेरिकेच्या प्रवास वर्णनात:

"...मग ते अनोळखी पण लोभसवाणे गोरे कपल ताबडतोब आमचे मित्र झाले. सूर जुळतात म्हणतात ना ते असे. मैत्री ला देश वय जात धर्म यांचे बंधन नसतेच मुळी. त्या रात्री दोनशे मैल प्रवास करून ते आम्हाला आग्रह करू करू - आग्रह करू करू - आग्रह करू करू त्यांच्या घरी घेऊन गेले. प्रवासात आम्ही खूप गाणी म्हंटली ह्यांनी म्हटलेले "ओ मेरी जोहरा जबी" तर त्यांना इतके आवडले कि बस. त्यांच्या २२ खोल्याच्या मॅन्शन मध्ये स्वतःच्या हाताने दोघांनी आम्हाला विविध चविष्ट पदार्थ करून खाऊ घातले. आम्हाला भेटायला त्यांच्या गावातले खूप लोक आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रेमळ. निरोप घेताना आमचे काळे आणि त्यांचे निळे डोळे भरून आल्या शिवाय राहिले नाहीत...."

जर असे लिहिले असेल तर ते असे वाचा:

"मी आणि हे (गोट्याचे बाबा) ज्या ग्रीन वॉटर पार्कात चार महिने रोज फिरायला जायचो तिथे मेलं काळ कुत्रे जरी दिसल तर शप्पथ!"

#प्रवासवर्णनातील_मायनर_त्रुटी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी...
मलासुद्धा राहून राहून वाटतं की या प्रवासवर्णन लिहीणार्या सगळ्यांनाच का पावलापावलावर कलंदर, प्रेमळ इ. इ. माणसे भेटतात.
मला तर आजपर्यंत असं कुणीही भेटलेलं नाही..

मस्त. आणि मी मेरी व जेन ह्यांना पाचवारी साडी नेसवुन दिली. माझ्या बुट्ट्याच्या आकाशी गुलाबी बनारसी साड्या त्यांच्या गौर वर्णिय कांतीवर व सोनेरी केस निळे डोळॅ मध्ये अतिशय सुंदर शोभुन दिसत होत्या.

Lol

विमानातल्या चटपटीत एअर होस्टेसला विसरू नका. किती आस्थेनं तिने आमची काळजी घेतली आणि 'विषुववृत्त आलं की दाखवा बरं का' या 'आमच्या यां'च्या नर्मविनोदाला ती कशी गोड हसली ते सांगितलं नाही तर प्रवासवर्णन पूर्ण होत नाही.
परदेशात गोट्याकडे गेला असाल तर त्याची बायको नोकरी करून घर कसं सांभाळते (मी तिला म्हटलं, मी आहे तोवर स्वयंपाकाची अगदी काळजी करू नकोस! तिला माझ्या हातची मसुराची आमटी फार आवडते!) आणि वीकेन्डला बागेत आम्हाला हास्यविनोद करताना पाहून परदेशी म्हातारीच्या निळ्या डोळ्यांत तिच्या दुरावलेल्या मुलानातवंडांच्या आठवणीने कसं पाणी तरारलं हे आवश्यक. शेवटी आपली कुटुंबव्यवस्था सगळ्या आधुनिकतेला पुरून उरते हो!
(हे असं वाचा : गोट्याची बायको घरात इकडची काडी तिकडे करत नाही! विकतचं खायचं आणि स्वच्छतेला मेड लावायची की झाला यांचा संसार! मीच हौस म्हणून चार प्रकार करून घातले लेकाला! मेलं अमेरिकेत जा नाहीतर चंद्रावर जा, किचन काही सुटत नाही! यांना काय होतंय 'अगं घे जरा जुळवून' म्हणायला! सात वाजता चहा नाही मिळाला की घ्या जुळवून म्हणावं!)

गोट्याऐवजी गोटीकडे गेला असाल तर जावयांच्या ड्रायविंगचं कौतुक मस्ट. 'एअरपोर्टवरून घरी जाताना पोटातलं पाणीही हललं नाही' हे वाक्य आलं नाही तर फाउल होतो!
वीकेन्डला आम्हाला इन्डियन ग्रोसरीत नेलं - कित्ती मोठ्या भाज्या! गोटी म्हणाली 'आई, यांना पुरणपोळ्या खायच्यात बरं का तुझ्या हातच्या!'
(वाचा: वरचंच 'मेलं अमेरिकेत जा... ' पासून पुढे.)
Proud

एकदा प. रे. ने दादर ते विरार गेलो. दादरलाच बसायला जागा मिळाली होती. बोरिवली आल्यावर उठून उभे राहिलेल्या एकास जागा दिली आणि उभा राहिलो. बोरिवलीला उतरलो नाही हे पाहून त्याने " कुठे जायचे?"
"विरारला."
"इकडे नवीन आहात का?"
"डोंबिवलीहून आलो."
"इकडे सेंट्रल रेल्वेचा रूल चालत नाही!"

प्रवासाची सुरूवात...

" <> ट्रॅव्हल्सच्या श्री. यांना भेटलो. त्यांनी आमची चांगली बडदास्त ठेवली. मग विमानाने आकाशात झेप घेतली, खालची मुंबापुरी, लक्ष दिवे, दिवाळी. माझे मन भूतकाळात गेले... (येथे "..." व "!" ची रेलचेल) "

प्रत्यक्षात वाचा:
"अर्धा तास शोधल्यावर <> ट्रॅव्हल्सचा माणूस सापडला. तो म्हणे गेट नं ७ जवळ भेटायचे ठरले होते. नंतर तर लोक एसटी च्या स्टॅण्डसारखे सगळीकडे गर्दी करून उभे होते. चहा घ्यायला गेलो तर १२० रू. ला डिप डिप चहा. हिला म्हंटलो यात घरी आठवड्याभराचा चहा होईल. माझ्या विनोदावर २-३ लोक हसले. मग शेवटी विमानात बसलो. हे वरचे मुंबापुरी, लक्ष दिवे वगैरे सगळे विचार नंतर सुचले आहेत. प्रत्यक्षात त्या वेळेस समोरच्या टीव्हीच्या बटनांशी खटपट करत, सीटमागच्या कप्प्यातील वस्तू चेक करत व आजूबाजूच्या अजिबात निरखून बघण्यासारख्या नसलेल्या लोकांकडे उगाचच निरखून बघत वेळ घालवला. मग डुलकी लागली, ते खाणे आल्यावर हिने उठवले."

बाय द वे, अशा काही "टेम्प्लेट्स" इथे आहेत.
https://www.maayboli.com/node/49536?page=4

स्वाती, फार एंड मस्त प्रतिसाद. काल फोन वरुनच वाचलेले.

ते जावयांलेकी बरोबर नायगारा ट्रिप, मेड ऑफ द मिस्ट , रेन कोट घालुन नायगारा बघणे वगैरे पण येउद्या की.

Pages