माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त सजेशन धन्यवाद सगळ्याना !
सगळा रस्सा गाळुन वेगळा काढला, पॅन मधे थोडा कान्दा टोमॅटो परतुन घेतला एक उकडलेला बटाटा फोडी करुन घातला त्यात उसळ परतुन कोरडी उसळ केलिये..
रस्सा फ्रिज मधे ठेवलाय त्यात बटाटे, शेव यापैकी घालुन खपवु.
( या सगल्या पॅनडॅमिक मधे नवर्याने चुकुन एक्स्ट्रा हॉट तिखट पावडर आणली होती, कमी वापरायची अस ठरल होती पण विसरले त्यात कान्दा-लसून मसाला वापरला तो फार झणझणित आहे असा तो डबल तिखटाचा प्रताप झालाय.)
नवर्‍याला तिखटाचा प्रॉबेल्म नसतो कधी मलाच झेपत नाही पण यावेळेस उसपार प्रकरण झाल होत.
पोटॅटो फ्ल्केस ची आयडिया भारी आहे, पुढच्या ग्रोसरी मोहिमेत आणू!

चांगल्या आहेत आयडिया. माझ्याकडे असं लई तिखट झालं तर फक्त एक सर्वींग अ‍ॅडज्स्ट करते आणि मग उरलेला तिखट पदार्थ सरळ होतील तितके सर्विंग करून डीप फ्रीज मध्ये ठेवते. मग जहाल खाणार्ञा लोकांना अधून मधून ताव मारता येतो.

अती तिखट झालेतर खाववत नाही खरंय. मी जरा पाणी वाढवुन त्यात तयार बदाम पावडर घालते व घट्टसर होईल अशी उकळी आणते व जरा मीठ जास्त घालते. अगदीच वाटले तर वेगळे कांदा टोमॅटो तेलावर परतुन टोमॅटो विरघळला की ते पदार्थात घालते. मीठ कमी असेल तरी पदार्थ जास्त तिखट लागतो हा अनुभव आहे.

इडलीचा पहिल्या दिवशी घाणा बरोबर झाला. मग २ दिवस पीठ फ्रीजमधे होते. आज ३-४ तास बाहेर काढुन ठेवले व तापमान बरोबर झाल्यावर इडल्या केल्या. पातळपणा , वेळ वगैरे तोच होता पण ईडल्यांना वरुन सुरकुत्या आल्या. का असे झाले असेल?

ईडल्यांना वरुन सुरकुत्या आल्या.>>>दोन दिवस ठेवल्याने त्यांचे वय वाढले नि त्या म्हाताऱ्या झाल्या.

महिना झाला क्वारन्टाइनमध्ये पण त्या मानानं माकाचुवर तश्या मोजक्याच पोस्टी आल्यात. जरा नवीन-नवीन प्रकार ट्राय करा की लोकहो.

https://www.demilked.com/quarantine-baking-fails/

बायदवे,
मूळ धाग्यात, पिठल्यात मीठ घालायचं राहिलंय हे माकाचु आहे का?

माझे साबुदाणा वडे फ़ारच तेलकट झाले होते. शेवटी मीठ घातल्यावर मिश्रण थोडे सैल झाले होते. पुढच्यावेळी काय काळजी घेऊ? मिश्रण फार घट्ट लागते का? मोठ्या आचेवर तऴले होते.

कॉर्न दलियाचा उपमा केला होता. फोडणी व्यवस्थित होती. शिजलाही व्यवस्थित. पण प्रत्येक कणाला काही विशेष चव जाणवली नाही. दलियाचा मुळ रंग पिवळाधमक असल्याने कदाचित गोड चव (स्वीट कॉर्नची) येईल असे वाटले होते. तीही नव्हती.
पुढच्या वेऴी काय करता येईल? किंवा उपमा सोडुन आणि काय बनवु शकतो?

दलिया प्रकार खिचडी नाहीतर खीर करून चांगला लागतो. >>>
धन्यवाद राजसी.
इथे कॉर्न दलिया खिचडीची काही पाकक्रुती आहे का? साखि सारखी करायची की मुगडाळ-तांदळाच्या खिचडीसारखी?

डबा मजबूत असेल तर सोलाणं किंवा स्क्रू ड्रायव्हर आतमधे गोल फिरवत फिरवत साखर मोकळी करता येईल. नाहीतर सोप्पं म्हणजे त्यात पाणी घालून तेच चहा वगैरे साठी वापरत रहा संपेपर्यंत.

१.ओला नॅपकिन डब्यावर पसरून झाकण लावून ठेवा. होईल १-२ दिवसात मऊ.
२.ब्राऊन शुगरला ब्रेड किंवा मार्शमेलो घालुन ठेवल कि होते मऊ. इथे पण ब्रेडचा तुकडा घालुन बघायला हरकत नाही.

धन्यवाद प्राचीन आणि सीमा. मोठया पात्याच्या सुरीने भोसकून भोसकून साखर मोकळी केली. मग खडे काढून परत मिक्सरला फिरवले. झाली एकदाची मोकळी साखर.

थोडे अवांतर:
मला पडलेला प्रश्न, धारदार वस्तू ने आघात केल्यावर पडते ते भोक. मग "भोकसणे" बरोबर का "भोसकणे" ?
:विचारात पडलेला बाहूला:

पाफा, भोसकणे असा शब्द आहे. भोकसणे असं कधीच ऐकलं नाही.
सुई किंवा टोकदार वस्तूने भोक पडतं, पण चाकूने भोक नाही पडत,तर भसकन फाटतं, म्हणून भोसकणे Lol मी काहीहि सांगते आहे.

माझा मुलगा लहान असताना भोक आणि होल याची विचित्र सरमिसळ करून 'होक' म्हणायचा ते आठवलं. त्याच्या डिक्शनरी मध्ये असे स्वतः बनवलेले बरेच विचित्र शब्द होते.

@ मीरा,
Lol
शब्द भोसकणे हाच आहे. फक्त टिपी करत होतो.
चिटकवणे आणि चिकटवणे यावर पण प्रकाश टाकाल का? Rofl

चिकटपणामुळे चिकटतं म्हणूण चिकटवणे ...... तुमच्या आवडीचा गव्हाचा *चिक* जो चिकट असतो.... सगळ्याच धाग्यावक चिक चिटकलाय नव्हे तर चिकटलात Happy Happy
पाफा एक धागाच का नाही काढत टीपी साठी....

Pages